घरफिचर्ससारांशतीन तरुणांच्या जिद्दीची गोष्ट...‘तेंडल्या’

तीन तरुणांच्या जिद्दीची गोष्ट…‘तेंडल्या’

Subscribe

तारुण्याचा काळ म्हणजे भविष्याची तयारी वर्तमानात करण्याचा काळ असतो, मग आपणही त्याच प्रकाश यशस्वी युवा मार्गातील एक पथिक आहोत अशी जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी, ध्येय मनाशी ठेवून औंढी नावाच्या छोट्याशा खेडेगावातील सचिन जाधव, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर या तीन पोरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बनवलेला ‘तेंडल्या’ हा सिनेमा ५ मे रोजी १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ज्यांनी नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकरला टीव्हीवर खेळताना पाहिलं, त्या पिढीची ही झपाटलेली गोष्ट आहे.

– आकाश महालपुरे

ज्याच्या चेहर्‍यावर तेज, देहामध्ये शक्ती, मनामध्ये उत्साह, बुद्धीमध्ये विवेक, हृदयामध्ये करुणा, मातृभूमीवर प्रेम, इंद्रियांवर संयम, प्रबळ इच्छाशक्ती, धाडसाचे बळ, सिंहासारखी निर्भयता, सेवेसाठी तत्परता आहे, आजच्या घडीला खर्‍या अर्थाने तोच आदर्श युवक आहे. खरंतर तारुण्य ही आयुष्यातील सर्वात रूपेरी सायंकाळ असते. क्षणिक सुखासाठी अनंत काळासाठी दुःखे आयुष्यात येतात. विवेकबुद्धीवर अविवेकाचे धुके साठण्याचे हे वय असते आणि जागे करणारे कोणी आयुष्यात आले, तर ते आपल्याला शत्रू वाटू लागतात.

- Advertisement -

खोल दरीत नेणारे मित्र वाटू लागतात आणि शिखरावर नेणारे शत्रू वाटतात. हीच तर या वयाची गंमत आहे. उत्साह, जिद्द, प्रचंड सामर्थ्य, बुद्धिमत्ता, गगनभेदी अस्मिता अशा अनेक गुणांनी परिपक्व असे तरुणाचे व्यक्तिमत्त्व असायला हवे, असे उपनिषदातदेखील म्हटले आहे. मग दुसर्‍याचे खेळ, गाणी, नृत्य, विनोद पाहताना आपला स्वत:च्या जडणघडणीचा वेळ किती वाया जात आहे याचं भान ज्या युवकाला आहे तोच युवक पुढच्या कालप्रवाहात तग धरून असेल. मग मोबाईल, कॉम्प्युटर, यू ट्यूब, फेसबुक यात किती गुंतायचे हे आपणच साक्षेपाने म्हणजेच सारासार विचाराने ठरवायचे असते.

कारण तारुण्याचा काळ म्हणजे भविष्याची तयारी वर्तमानात करण्याचा काळ असतो. मग आपणही त्याच प्रकाश यशस्वी युवा मार्गातील एक पथिक आहोत अशी जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी, ध्येय मनाशी ठेवून औंढी नावाच्या छोट्याशा खेडेगावातील सचिन जाधव, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर या तीन पोरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बनवलेला ‘तेंडल्या’ हा सिनेमा ५ मे रोजी १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ज्यांनी नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकरला टीव्हीवर खेळताना पाहिलं, त्या पिढीची ही झपाटलेली गोष्ट आहे. गावात नुकतंच दूरदर्शन आलं तेव्हाची ही गोष्ट आहे. क्रिकेट खेळाला आयुष्य मानणार्‍या आणि तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानणार्‍या गावाकडच्या तरुण पोराथोरांची ही अस्सल गोष्ट आहे.

- Advertisement -

खरंतर सिनेमा तयार करायचा ना अनुभव या तिघांकडे होता, ना आर्थिक पाठबळ या तिघांकडे होते, पण तरीही स्वतःचं मनं मारून, कष्ट करून औंढी गावी शिक्षक म्हणून बरीच वर्षे काम केल्यावर निवृत्त झालेल्या सचिन जाधवच्या वडिलांनी ज्ञानदान केलेले चक्क पेन्शन फंडाचे जमा झालेले एकरकमी पैसे सचिनच्या हाती दिले आणि कोणीही पालक करणार नाही असे धाडस सचिन जाधवच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी करून दाखविले आणि आपल्या मुलाच्या वेगळ्या नवलाईतील जिद्दीला एक सजग पूर्णविराम दिला. यातील चैतन्य काळेने तर घरातील आपल्या माऊलीचेच दागिने सोनाराकडे गहाण ठेवून कर्ज घेतले. तसेच नचिकेत वाईकरनेसुद्धा त्याची जमा असलेली पुंजी चित्रपट बनवायला मोठ्या मनाने खर्च केली. मग उरलेल्या बाकीच्या काही मित्रांकडून कर्ज घेऊन तिघांनी मिळून चित्रपट तयार करायचं स्वप्न वेळोवेळी पुढ्यात आणलं.

मग चित्रपटासाठी एकही सेट वापरायचा नाही अशीही संकल्पना या तरुणांनी आखली. शूटिंग चालू असतानाचाच आवाज रेकॉर्ड करून वापरायचा असाही घाट या ध्येयवेड्या तरुणांनी घातला. कोणत्याही प्रकारचा अनुभव नसल्याने या तिघा मुलांना उद्भवलेल्या प्रत्येक अडचणींना मधल्या काळात तोंड द्यावे लागले, पण बघितलेल्या स्वप्नांना जिद्दीने पूर्णविराम देतं पैशांची प्रचंड प्रमाणात अडचण असूनही तांत्रिक गोष्टीत अजिबात कुठलीही तडजोड न करता अखेर या ध्येयवेड्या तरुणांनी चित्रपटाचं शूटिंग कसोशीने पूर्ण केले. एक ठरवलेल्या दिवशी सचिन तेंडुलकरने संपूर्ण चित्रपट बघितला आणि गावाकडच्या लोकांचे आपल्यावर असलेलं प्रेम बघून सचिन तेंडुलकर अक्षरशः भारावूनच गेला.

२०१८ मध्ये तर चक्क राज्याचे तब्बल ५ पुरस्कार या ध्येयवेड्या स्वप्नांच्या प्रवासातील मुलांनी बनवलेल्या ‘तेंडल्या’ चित्रपटाला मिळाले. इतकेच नाही तर लाईव्ह रेकॉर्डिंगचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील ‘तेंडल्या’ सिनेमाला मिळाला. मग आपण बनवलेला सिनेमा कोण प्रदर्शित करणार म्हणून विविध चॅनेल्स आणि सिनेमा दिग्गजांना भेटी देणे या तिघा मुलांनी चालू केले. सिनेमाचे लेख दिग्दर्शक एडिटर आणि सर्वच्या सर्व कलाकारांचे पदार्पण असल्याने कुठलंही चॅनल चित्रपट बघून आवडूनही कोणी आपलं पाऊल पुढे टाकायला तयार होत नव्हते. अगोदरच कर्जाची चिंता मनात घरघर निर्माण करीत असताना तयार सिनेमा थिएटरमध्ये लागला नाही तर तो वितळणार्‍या बर्फासारखा असतो, या भाषेत वारंवार बोलून सिनेमा व्यवसायातील लोक अजून चिंता वाढवत होते.

अखेर २०२० मध्ये मुहूर्त मिळाला. एक चांगली कंपनी चित्रपट प्रदर्शित करायला तयार झाली आणि सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘तेंडल्या’ चित्रपट २४ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित करायची योजनादेखील पक्की करण्यात आली. तेव्हापासून ‘तेंडल्या’ सिनेमा खर्‍या अर्थाने सचिन तेंडुलकरला अर्पण केला गेला, पण काय करणार नियतीला ही योजना मान्य नव्हती. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कावळा बसायचा आणि फांदी तुटायचा घात एकच झाला आणि कोरोना महामारीनं त्या सुंदर योजनेला सुरूंग लावायला सुरुवात केली. अनेक चित्रपटगृहे बंद झाली आणि अखेर सिनेमा पूर्णपणे रखडला. राज्य पातळीवरचे ५ आणि राष्ट्रीय पुरस्कार एक, असे एकूण ६ पुरस्कार मिळूनही हा चित्रपट योग्य पाठबळाविना दिवसेंदिवस रखडतचं गेला.

सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असतानाही सचिन जाधव, नचिकेत वाईकर आणि चैतन्य काळे ही तिघं मुले थोड्या प्रमाणातही डगमगली नाहीत, घाबरली नाहीत. कारण ते नुसते सचिनचेच चाहते नव्हते तर ते सचिनच्या विचारांना सोबत घेऊन प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणारे सचिनसारखे घ्येयवेडे तरुण होते. मग जीवनाच्या खेळपट्टीवर खेळत असताना कितीही समस्या आल्या तरी विकेटवर खंबीरपणे उभे राहून शेवटच्या चेंडूपर्यंत विजयी खेळी करण्याचे सचिनचे कसब त्यांनी मनात अत्यंत उपयुक्तपणे रूजवलेले होते. आपण चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड किमान थोड्या प्रमाणात का होईना चालू राहावी यासाठी मग सचिन जाधवने शिराळा भागातलं आठ एकर शेत भाडेतत्त्वावर घेतलं आणि सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केलेली मुलेच शेतीच्या कामाला तयार केली आणि सगळ्यांनी मिळून मग भाजीपाला पिकवून तो विकायला सुरुवातदेखील केली.

नवीन पालवीप्रमाणे जगण्यालाही पालवी फुटली. फळे आली, पण आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, या म्हणीप्रमाणे अखेर सांगली जिल्ह्यात अचानकपणे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीने मेहनत, मशागत करून उगवलेलं पीक काळ्या आईसह वाहून गेले आणि छोटा ट्रॅक्टरदेखील जमिनीत एकवटला गेला. सगळं अगदी क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पण जिद्दीने ही पछाडलेली पोरं शेवटपर्यंत हरली नाहीत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले झगडणे चालू ठेवले.

आपण उभ्या केलेल्या या विस्तीर्ण कर्जाच्या डोंगरातून बाहेर येण्यासाठी या पोरांना शेवटी एकच तरणोपाय होता, तो म्हणजे काहीही करून आपण बनवलेला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करायचाच. मग काही दिवसांनी पुण्यातील एका टूडीप नावाच्या मोठ्या कंपनीच्या संचालकांना ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या मुलांची सत्यकथा समजली आणि त्यांनी या तिघा मुलांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. औंढीसारख्या छोट्याशा गावखेड्यातील ध्येयाने झपाटलेल्या या तीनही मुलांची उदाहरणं खरंच तरुणांची वाटचाल स्पष्ट करण्यास पुरेशी आहेत. तीनही पात्रातील तरुणांनी वेगवेगळ्या संकटांवर मात केली आहे. आजची बरीच तरुणाई भौतिक सुखाच्या आहारी जात आहे. तरुणाईला खर्‍या अर्थाने जगणं माहीत नाही, असं सतत म्हणणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही तीच तीन उदाहरणं आहेत. शेवटी या तरुणांनी पाहिलेल्या वेगळ्या स्वप्नांसाठी शासनासह समाजाने दखल घेऊन थिएटरमध्ये जाऊन ‘तेंडल्या’ सिनेमा आवर्जून बघावा आणि त्यांना शाबासकीसह आर्थिक बळ द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -