-प्रतिमा जोशी
गेल्या पंधरा-वीस दिवसांतील बातम्या आहेत या. त्या नॅशनल मीडियात झळकल्या नाहीत. वर्तमानपत्रांतही त्यांना जागा मिळाली नाही. सोशल मीडियावर त्या आल्या, पण अर्थातच मर्यादित मित्र यादीत त्यांची फारशी चर्चा झाली नाही. मात्र त्यातील घटना अक्षरशः जीवघेण्या आहेत. पहिली घटना आहे मराठवाड्यातील एका छोट्या गावात घडलेली. एका सर्वसामान्य छोट्या शेतकरी कुटुंबातील.
यातील पंधरा-सोळा वर्षांचा नुकताच दहावी पास होऊन कॉलेजला जायची स्वप्नं पाहणारा मुलगा. कॉलेजात जायचं तर कपड्यांचे दोन बरे जोड घ्या म्हणून वडिलांकडे सांगत होता. नवे कपडे घेण्याची आई-वडिलांची ऐपत नव्हती. ते बिचारे नंतर बघू, घेऊ म्हणत त्याची समजूत काढत मनातल्या मनात खंतावत होते. आपल्याला नवे कपडे मिळणार नाही हे ते पोर समजून चुकलं. आजूबाजूच्या रंगीबेरंगी जगात त्याचं मळकट, जुनाट साधं जग मेळ खात नव्हतं.
वास्तवाच्या या धगीनं पोळलेल्या त्या पोरानं शेतात जाऊन गळफास लावून घेतला. बराच वेळ पोरगा दिसेना म्हणून वडील त्याला शोधत शेतात पोहोचले तेव्हा गळफास लावलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेलं निर्जीव पोर पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पोराची साधी मागणी आपण पुरी करू शकत नाही, या भावनेनं वडिलांनी मुलाचा निष्प्राण देह खाली उतरवला आणि त्याच दोरखंडानं त्यांनीही गळफास लावून घेतला.
दिवाळखोरीत निघालेल्या, भुईला भार झालेल्या भारतातील शेतीक्षेत्राने घेतलेल्या हजारो बळींमध्ये आणखी दोन मृत्यूंची नोंद झाली. उत्पादनखर्चापेक्षा बाजारभाव कमी, पिकाची हमी नाही, कर्जाचं वाढतं व्याज, शेतीआधारित अन्य रोजगाराची वानवा, सतत बदलणार्या तंत्रज्ञानाच्या जगात जगण्यासाठी आवश्यक ते कौशल्य नाही. निराशेनं गा्रसलेल्या मनाला उभारी मिळावी असं काहीच नाही आसपास… असं भकास, बिनरंगी, पोतेरं झालेलं आयुष्य जगणारी आपल्या देशात कोट्यवधी माणसं मरण येत नाही म्हणून जगतात आणि तेही अशक्य झाल्यावर स्वत:चा जीव संपवतात.
दुसरी बातमी आहे सारंग पुणेकर ऊर्फ रूपाची. सारंग ही पारलिंगी समाजकार्यकती. जन्मनोंद पुरुष म्हणून झाली असली तरी शरीर मन हे स्त्रीत्वाची मागणी करणारं. या वेगळेपणामुळे लहानपणापासूनच समाजाने तर अवहेलना केलीच, पण घरच्या लोकांचाही दुस्वास वाट्याला आला. धड मुलगा नाही, ना मुलगी असं मूल जन्मदात्यांनाही नकोसं. सतत उपेक्षा, अपमान, टवाळी, तिरस्कार यांना तोेंड देत वाढलेल्या सारंगने त्यातही जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं.
पुढे काही चांगल्या मित्रमैत्रिणीच्या संपर्कात आल्यावर सारंगच्या आयुष्याला क्रियाशील वळण लाभले. सामाजिक कार्यात ती सक्रिय झाली. तिला स्वत:ची ओळख सापडली. एलजीबीटीक्यूू समूहाच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काच्या लढ्यात ताकदीने उतरली. विविध स्तरांंवर महत्त्वाच्या जबाबदार्या पेलल्या. एक उत्कृष्ट कार्यकती, संवेदनशील विचारी व्यक्ती म्हणून स्वत:चं एक स्थान तिनं निर्माण केलं.
असं असतानाही तिनं आत्महत्या का केली असावी, या प्रश्नाचे उत्तर सागर लोधीजी यांनी व्यक्त केलेल्या स्वैरकथनात काहीसं सापडतं. सागर लिहितात, रोज रात्री मला मृत्यू यावा आणि हे सगळं संपावं, असं मला कोवळ्या वयाात वाटू लागलं. माझ्याशी चार शब्द प्रेमानं बोलून माझ्या एकटेपणाचा, हळवेपणाचा फायदा घेऊन माझ्या शरीराचा उपभोग घेऊन मला पुन्हा सोडणार्यांनी मला तीच जाणीव करून दिली की कदाचित माणूस म्हणून जगण्याचा मला अधिकारच नाही.
या सगळ्यांना सोडून कुठेतरी दूर जाऊ असं वाटल्यानंतर जे लोक भेटले ते माझ्यासारखेच घरदार सोडून स्वत:च्या शोधात निघालेले. लाचार, एकटी, असाह्य. मग पुढे शिक्षणाच्या शोधात, ज्ञानाच्या प्रकाशात मला काही मंडळी भेटली. त्यांनी मला समजून घेतलंही. माझ्या मनावर फुंकर घातली. मी तयारीला लागले स्वत:चा शोध घेण्यासाठी. सावित्रीबाईंनी उघडून दिलेल्या ज्ञानाच्या दारातून बाबासाहेबांचं बोट धरून हक्काची भाषा बोलू लागले.
कायद्याने मला तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली. न्यायालयानं ३७७ कलम हटवून माझ्यासारख्यांना जगण्याचा इतरांसारखाच पूर्ण अधिकार दिला. मला वाटलं की आता मला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. पण समाजात वावरताना माझी नको असल्याची भावना पुन्हा पुन्हा उफाळून वर येत होती…. सारंगला सामान्य माणसासारखं वैवाहिक आयुष्य जगायचं होतं. नाही पूर्ण झालं. पुरेशी साथ नाही मिळाली. रितेपणानं तिचा ताबा घेतला. तिनं जगाचा निरोप घेतला.
या दोन बातम्या खरं तर त्या त्या गेल्या जिवांच्या नाहीत. त्यांंची बोटं प्रत्यक्षात आपल्याकडेच रोखलेली आहेत. आपण म्हणजे धोरणकर्ते, शासन, प्रशासन आणि आपण नागरिक. आपणा सर्वांना हे जग कसं असावं असं वाटतं, काही वाटतं की नाही, आपल्या मर्यादित परिघातून आपल्याला बाहेर पडावंसं वाटतं की नाही, समोर भुकेचा सागर पसरला असताना आपल्याला अजीर्ण होईपर्यंत खावं वाटतं हे बरोबर नाही अशी टोचणी लागते की नाही, आपल्यासारखे न दिसणारे वाटणारे लोकसुद्धा याच जगाचा एक हिस्सा आहेत हे आपल्याला समजते की नाही. यावरच हे जग सुखी असणार की दुःखी, हे ठरणार याची जाणीव आपल्याला आहे का?
उपलब्ध असलेली तुलनेनं अलीकडची आकडेवारी म्हणजे २०२२ ची आकडेवारी अंतर्मुख व्हायला लावणारी आहे. या वर्षात देशात एकूण १ लाख ७१ हजार आत्महत्या नोंदवल्या गेल्या. २०२१ पेक्षा ही वाढ ४.२ टक्क्यांनी अधिक तर २०१८ पेक्षा २७ टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात दर एक लाखामागे १२ आत्महत्या असे हे गुणोत्तर आहे. यातही २०१४ ते २०२१ या कालावधीत ज्या आत्महत्या झाल्या त्यात रोजंदारीवर काम करणार्यांचे प्रमाण सर्वाधिक होतं.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार हातावर पोट असणार्या लोकांच्या आत्महत्यांमध्ये १७०.७ टक्के इतकी भीषण वाढ आहे. आत्महत्यांमागे सर्वात महत्त्वाचं आणि अग्रस्थानी असलेलं कारण आहे बेकारीचं. हाताला काम नाही आणि पोटाला घास नाही, अशा परिस्थितीत असलेल्या या आपत्तीग्रस्त लोकांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठं आहे. एकूण आत्महत्यांपैकी ४० टक्के मृत्यू ३० वर्षांखालील तरुण मुलांचे आहेत. भारतात दर आठ मिनिटांनी एक तरुण व्यक्ती आत्महत्या करते. १५ ते २४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आय सी थ्री या संस्थेच्या पाहणी अहवालानुसार दरवर्षी सुमारे १३ हजार विद्यार्थी आपलं जीवन संपवतात. गरिबी, दारिद्य्र, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक हिंसा, व्यसन, सामाजिक विषमता अशी आणखी महत्त्वाची कारणं. गरिबीच्या कारणात पारलिंगी व्यक्तीबाबत अनेक मुद्दे दिसतात. उदाहरणार्थ, या समूहात अनेक अडचणीमुळे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. शाळा गळतीचं प्रमाण मोठं आहे. रोजगार मिळत नाही. तांत्रिक समस्यांमुळं २७ टक्के लोकांकडे आधार कार्ड वा अन्य कागदपत्रं नाहीत, त्यामुळे सरकारी अर्थसाह्य, योजना, अनुदान इत्यादी लाभ बहुतांशांना मिळत नाहीत.
अक्षरश: भीक आणि भूक त्यांचे जन्माचे सोबती असतात. देशात सर्वाधिक आत्महत्यांचं प्रमाण सिक्कीम ४३.१ टक्के, अंदमान निकोबार ४२.८ टक्के, पुद्दुचेरी २९ टक्के, केरळ २८.५ टक्के, छत्तीसगड २८.२५ टक्के, तेलंगणा २६.३ टक्के, तामिळनाडू २५.९ टक्के, कर्नाटक आणि गोवा १९ टक्के आणि महाराष्ष्ट्र १८ टक्के असे आहे. प्रगत राज्यांमध्ये हे प्रमाण असण्याचं एक कारण म्हणजे शिक्षणानं येणारी आत्मसन्मानाची भावना. त्या अनुरूप आयुष्य जगण्यास मिळाले नाही तर नैराश्य ग्रासतं.
आज देश भारतीय राज्यघटना प्रमाण मानून वाटचाल करू लागला, त्याला ७५ वर्षं पूर्ण झाली आहेत. आपला देश प्रजासत्ताक आहे. म्हणजे हे लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य आहे, असं आपलं संविधान सांगतं. जगातील मोठी लोकशाही आपली आहे. प्रत्यक्षात जगणे असह्य झाल्यामुळे सुमारे पावणेदोन लाख लोक दरवर्षी आपलं जीवन संपवत आहेत.
त्यात राष्ट्राचा आधारस्तंभ समजल्या जाणार्या तरुणांचा भरणा अधिक आहे हे चिंताजनक आहे. त्यामागच्या कारणात बेकारी आणि गरिबी, त्यामुळं आलेलं नैराश्य ही मुख्य कारणं आहेत हे तर भयावह आहे. प्रजासत्ताकानं बहाल केलेल्या स्वातंत्र्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार याबरोबरच व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क समाविष्ष्ट आहे. तो हक्क शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल तो खरा प्रजासत्ताक दिन.