घरफिचर्ससारांशधगधगणारं काश्मीर आज बदलत आहे !

धगधगणारं काश्मीर आज बदलत आहे !

Subscribe

निसर्गाने ज्याच्या पदरात भरभरुन दान टाकले आहे अशा नंदनवन जम्मू-काश्मीरचा धुमसणारा इतिहास आपणां सर्वांना माहीतच आहे. काश्मीरच्या या नंदनवनाला सौंदर्याचे जसे वरदान लाभले आहे त्याच जोडीने थरकाप उडवणार्‍या आतंकवादाचा शापही लाभला आहे. पांढर्‍या शुभ्र बर्फाळ पर्वताच्या राशीतला हा रक्तरंजीत इतिहास सर्वश्रुत आहे. हिमालयाच्या दर्याखोर्‍यांमध्ये देवदार,चिनार, सफरचंद, आक्रोड,बदाम वृक्षांच्या जंगलात दडलेला,सरोवर व नद्यांच्या काठावर अथांग पसरलेले हे जम्मु-कश्मिर.... भारताचे नंदनवनच. काश्मिरच खोरे म्हणजे निसर्गाने भूतलावर निर्माण केलेला स्वर्गच जणू. मात्र 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीनतंर आतंकवादी कारवायांमुळे हे खोरे सतत धुमसतच आहे. त्यामुळे या प्रदेशातील जीवन अस्थिर असल्याचेच चित्र सतत आपल्या समोर आणले गेले व आणले जात असते. 370 कलम, 35अ कलम हटवल्या नंतर काश्मीरमध्ये प्रचंड उलथापालथ होईल असा कयास काही जाणकार व तज्ञ मंडळी मांडत होती. मात्र त्याला अपवाद ठरतय ते आजच काश्मीर. आंतकवादास भीक न घालता कश्मिरी अवाम बदलत्या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे. काश्मिरात बदल घडत असतानाच प्राप्त सुसंधीचा लाभ घेण्याच्या पवित्र्यात सध्याचे काश्मीर उभे ठाकले आहे. कश्मीर मध्ये दिसुन येणारा हा अनपेक्षीत बदल भारताचे सार्वभौमत्व व अंखडता आबाधीत राखण्याच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचा बदल ठरतो आहे. येणार्या आगामी काळात जम्मू-काश्मीर (आज जरी केन्द्रशासीत प्रदेश असला तरी) हे भारतातील सर्वच बाबतीत पुढारलेले राज्य होणार याची हि नांदी आहे..........

भारत सरकारने कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम व 35 अ कलम काढल्या नंतर काश्मिरमध्ये प्रचंड उलथापालथ होणार. आंतकी या भागात प्रचंड विध्वंस घडवून आणणार. बहुसंख्य मुस्लीम समुदायातुन या विरुध्द आवाज उठवला जाणार. या सर्व घटनांचे भारताला दूरगामी परिणाम भोगावे लागणार. हा कयास सर्वांनीच मांडला होता. नाही म्हणायला ही कलमे हटवताना थोडाफार विरोध हा झालाच. विरोधी पक्षांनीही आकडतांडव केलेच, पंरतु राज्याला मिळालेल्या विशेष दर्जाची कलमे हटवल्याने भारतीय लष्कर व सीआरपीएफच्या कामात सातत्याने होत असलेली राज्य सरकारची आडकाठी दूर झाली. त्यामुळे भारतीय लष्कर व सीआरपीएफच्या अतिरेकी व समाजकटंका विरुध्दच्या मोहिमेला चांगलीच धार चढली. भारतीय सैन्य, सीआरपीएफला मनाजोगे काम करण्याची संधी मिळत आहे. जम्मु व काश्मिर मध्ये कायदा सुव्यवस्थेतेची घडी व्यवस्थीत बसण्यात लष्कराला यश येत आहे.काश्मीर जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे चित्रही संपूर्ण काश्मीर खोर्यात दिसुन येत आहे.

काश्मिरची तरुण पिढी- काश्मीरी तरुण धर्मांधतेच्या छायेतुन बाहेर पडत असुन शिक्षणाकडे त्यांचा कल वाढत चालला आहे. काश्मीरातील अतीदुर्गम भागात शालेय शिक्षणाची सोय उपलब्द होत असल्याने निर्धास्तपणे खेड्यापाड्यातील बालक शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. उच्चशिक्षित तरुण भारतभर पसरलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेत असुन भारतीय समाजाशी एकरुप होण्याच्या उंबरठ्यापर्यंत हे तरुण पोहचले आहेत. वैद्यकीय, आभियांत्रीकी, व्यवस्थापण, आर्किटेक्चर या क्षेत्रात काश्मीरी विद्यार्थ्यांची वाढती प्रवेशसंख्या हे या गोष्टींचे धोतक आहे. काश्मिरी तरुणांना पुर्वीही भारतातील शिक्षणाचीद्वारे खुली होती परंतु असुरक्षतेतेची भावना त्यांच्यात असल्याने ही संख्या नगण्य होती. काश्मीरात येऊ घातलेले शासकीय व खाजगी प्रकल्प, भारतातील उद्योगांना काश्मीरात उद्योग उभारण्याची मिळणारी संधी, भारतभर पसरलेल्या उद्योग व व्यवसायात रोजगारांची प्राप्त होत असलेली संधी या सर्व गोष्टींचा इष्ट परिणाम काश्मीरी जनतेच्या समाजमनावर दिसुन येत आहे. काश्मिरात बदलाचे शितल व संयमी वारे वाहु लागले आहेत. या बदलामुळे शिक्षीत व दूरदृष्टी असलेल्या तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून त्याचा इष्ट परिणाम काश्मिर खोर्यातच नव्हे तर जागतीक पटलावर दिसण्याची सुचिन्हे निर्माण होत आहेत.

- Advertisement -

काश्मीरची नैसर्गिक साधनसंपदा- जम्मू-कश्मीरच्या दर्याखोर्‍यात, सकल, पठारी भागात व पर्वत राशींत अनेक प्रकारच्या वृक्षांची रेलचेल आहे. यात देवनार, पाईन, साग, आक्रोड, बदाम, चिनार, विविध रंगी फुलांची वृक्षे यांचा समावेश होतो. या सर्व वृक्षांच्या घनदाट जंगलांची मालिकाच काश्मिर खोर्‍यात पाहयला मिळते. सफरचंद, केशर, नाशपत्ती, क्रानबेरी, ब्ल्युबेरी गुलाबफुल, कश्मीरचा सुंगधी तांदुळ यांची शेती मोठ्या प्रमाणात काश्मीर खोर्‍यात होत असते. रेशीम, लोकर, अन काश्मिरी शाली यासाठी कश्मीर पुर्वीपासुनच जगप्रसिध्द आहे. मात्र सामाजिक अस्थिरतेमुळे उत्पादित मालाला काश्मीरमध्ये हवी तशी बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकरी व व्यापार्यांचे मोठे आर्थीक नुकसान होत होते. मागील काहि दिवसां पासुन भारतभर या प्रदेशातील उत्पादित शेती व वन्य माल पुर्वीच्या तुलनेत जास्त क्षमतेने पाठवला जात आहे. भारतीय बंदरे व हवाई मार्गाने विदेशात माल जात असल्याने शेतकरी व व्यापार्यांना विदेशातील नव्या बाजारपेठाही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. या सर्वांचा इष्ट परिणाम शेतकरी व व्यापार्यांच्या आर्थीक स्थितीत सुधारणां होण्यात होत आहे.

पर्यटन व्यवसाय- काश्मीरच्या पर्वत राशीत अनेक सौदर्य स्थळे लपलेली आहेत. गुलमर्ग, सोनमर्ग या भागांतील बर्फाच्छादित पर्वत रांगा. या रांगामध्ये खेळले जाणारे साहसी खेळ, गंडोला राईड हा पर्यटकांच्या आकर्षणांची प्रमुख केन्द्रे आहेत. पहलगाम, आरु व्हॅली, चंदनवाडी, बेताब व्हॅली, शेषनाग व्हॅली मधील बर्फाच्छादित हिमालय पर्वतांच्या रांगां, घनदाट जंगले, सरोवरे, नद्यां म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्यच. श्रीनगर मधील दलसरोवर, दलसरोवरात असणार्या हाऊस बोटी. याबोटीत राहण्याचा अनुभव हा रोमाचंक असतो. सरोवरातील शिकारा राईड स्वर्गीय जलाशयात विहार करत असल्याचीच अनुभूती देत असतो. परीमहल, मुघलकालीन शालीमार्ग, चश्मेशाही, निशात बाग, ट्युलीप व गुलाबफुलांच्या बागा अशी कितीतरी पर्यटन स्थळे काश्मीरच्या खोर्‍यात दडलेली आहेत. हिंदु भाविकांचे श्रध्दास्थान असलेले अमरनाथ व वैष्णोवदेवी मंदिर याच काश्मिरच्या खोर्यांत आहे.

- Advertisement -

जगातील एकमेव आदि शंकराचार्यांचे मंदिर हे श्रीनगरच्या डोंगरावर वसलेले आहे.जम्मु-कश्मीर म्हणजे निसर्गनिर्मित या भुतलावरचा स्वर्गच जणु. आंतकवादामुळे विदेशातीलच काय भारतातील पर्यटक या भागात पर्यटन करण्यास घाबरत. मात्र आता परिस्थितीत बदल घडत आहे. देशात व जगात करोनाचा हाहाकार माजला असतानाही जम्मु-काश्मिरला भेट देणार्या पर्यटकां मध्ये विक्रमी वाढ होताना दिसत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जम्मु-काश्मिरातील लोक काश्मिराच्या खोर्यात पर्यटन करण्यास घाबरत. तेही निर्धास्तपणे फिरत असुन पर्यटनातील काश्मिरी जनतेची रुची वाढताना दिसत आहे. पर्यटन व्यवसाय हा जम्मु काश्मीरच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. नंदनवनात भटकंती करणार्या प्रत्येक पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची असल्याने त्यादृष्टीकोणातुन भारत सरकारकडुन खंबीर पावले उचलली जात आहेत. काश्मीर खोर्यात अत्यंत महत्त्वांच्या महामार्गावर प्रत्येक चारशे मिटरवर सीआरपीएफचे हत्यारबंद शिपाई तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीरी जनतेत सुरक्षतेतची भावना वाढीस लागली आहे.

काय आहे काश्मिरचा इतिहास
1947 पूर्वी भारत व पाकिस्तान हे दोनही देश इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते त्याचवेळी जम्मू-काश्मिर हे एक स्वतंत्र संस्थान होतं. या संस्थानाचा राजा इंदर महेन्द्र राजराजेश्वर हरीसिंग होता. त्याकाळी कश्मीरात हिंदु,शिख यांच्या लोकसंख्येच्या तिप्पट लोकसंख्या मुस्लीम समुदायांची होती. अशा या संस्थानाचा राजा हा हिंदु धर्मीय होता. 1947 च्या फाळणीपुर्वी देशात 565 संस्थाने, नवाब, महाराज अस्तित्वात होते. फाळणी होत असताना इंग्रजांनी या सर्वांसमोर तीन पर्याय ठेवले होते एकतर भारतात विलीन व्हा नाहितर पाकिस्तानात विलिन व्हा. हे दोन्ही पर्याय मान्य नसतील तर स्वतः स्वतंत्र देश निर्माण करा. या पर्यायामुळे काहि संस्थाने पाकिस्तानात विलीन झाली तर काहि भारतात विलिन झाली. मात्र काश्मिरचा राजा हरिसिंग ना भारतात, ना पाकिस्तानमध्ये विलीन होऊ इच्छित होता. त्याला स्वतंत्र काश्मिर अबाधित ठेवायचे होते.भारतानेहि राजाच्या या भुमिकेचा आदरच केला. स्वइच्छेने राजाने काश्मिर भारतात विलिन करावे अशी भारताची इच्छा होती. कोणत्याहि परिस्थितीत काश्मिर संस्थान स्वतंत्र ठेवायचेच हि राजाची भुमिका मात्र शेवट पर्यंत राहिली.

दुसरीकडे पाकिस्तानचे जनक जिन्हा यांना स्वतंत्र काश्मिरची कल्पना मान्य नव्हती. त्यांनी काबीले व लष्कराच्या ताकदीच्या जोरावर काश्मिरला मजबूर करुन पाकिस्तानात विलनीकरण करुन घ्यायचा निश्चय केला. त्यांनी या दृष्टीने 22 आक्टोबरला 1947 मध्ये काबील्यांना शस्त्रास्त्र पुरवली व त्यांच्या सोबत प्रशिक्षित सैन्यांना काश्मिरात धाडले. काश्मिरात छुप्या मार्गाने घुसलेल्या काबिली गटांनी काश्मिरवर सर्वत्र हल्ला चढवला. त्यातच राजाच्या लष्करातील मुस्लिम सैनिकांनीही राजा विरुध्द बंड पुकारले. या सैन्यांने काबील्यांशी हात मिळवणी केली. त्यामुळे या काबिल्यांना बळ मिळाले. या सर्वांनी काश्मिरात खोर्यात हाहाकार माजवला

या सर्व गदारोळात शेख अब्दुला हा शिक्षित तरुण काश्मिरी जनतेचे नेतृत्व करत होता. या तरुणांने राजा हरीसिंहच्या एकछत्री कारभारा विरुध्द दंड पुकारलेले होते. सर्व कश्मीरी अवाम या तरुणांच्या विचाराने भारावलेली होती. हा तरुण कश्मीरी जनतेचा ताईत झाला होता. या शेख अब्दुलांना पाकिस्तानने छुप्या मार्गाने काश्मिरवर चढवलेला हल्ला रुचला नाही. पाकिस्तानच्या गुप्त कारवायांचा त्यांनी प्रचंड विरोध केला. या तरुणाने आपले मत मत भारताच्या पारड्यात टाकले. शेख अब्दुलांची भुमिका सर्व कश्मीरी जनतेलाही मान्य होती.

काबीलच्या स्वरुपात आलेल्या पाकिस्तानी सैन्यानी व घुसखोरांनी काश्मिरातील बाजारपेठा, घरे यांच्यावर हल्ले चढवले होते. स्त्रीयांची अब्रु लुटली जात होती. हे करत असताना हिंदु,शिख, मुस्लमान कोणालाच त्यांनी सोडले नाहि. हल्लेखोर श्रीनगर पासुन 54 किलोमिटर अंतरावर आले होते.त्यांनी मोहोरा येथील विजप्रकल्प नेस्तानुबूत करत श्रीनगरला अंधारमय करुन टाकले. आता कोणत्याही क्षणी श्रीनगर घुसखोरांच्या ताब्यात जाणार. पाकिस्तानच्या काबिल्यांपासुन आपल्या जीवाला व संपुर्ण काश्मिरलाच धोका निर्माण झालाय याची राजा हरिसिंगला कल्पना आली होती. काश्मिरवर ओढवलेल्या यासंकटामुळे राजाने ताबडतोब भारत सरकारकडे मदत मागितली. पंडित जवाहरलाल नेहरु स्वतः कश्मीरी असल्याने व त्यांच्या दृष्टीने काश्मीर हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी संकटात सापडलेल्या राजाच्या मदतीचा निर्णय घेतला.

मात्र त्यावळेचे भारताचे गव्हर्रनर माऊंटबॅटन यांचे स्पष्ट मत होते की प्रथम काश्मिरच्या राजाने भारतात विलिन होत असलेल्या करारावर सही करावी. ही सही झाल्यानतंरच भारताने आपले लष्कर काश्मीरच्या मदतीस पाठवावे. एकदा का काश्मीर मध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली की काश्मिरी जनतेचे जनमत अजमावुनच काश्मीर भारतात विलिन करावा. ही अट पंडित जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेलांनी मान्य केली. त्यानतंरच 26 आक्टोबर 1947 रोजी काश्मिर भारतात विलिन करत असलेल्या बाबतच्या करारावर काश्मिरचा राजा हरिसिंहांची स्वाक्षरी घेण्यात आली. स्वाक्षरी झाल्यानतंर दुसर्‍याच दिवशी भारताने आपले सैन्य काश्मिरला रवाना केले. भारतीय लष्काराने काश्मिरात पाऊल ठेवताच पाकिस्तानी काबिल्यांचे धाबे दणाणले. शेख अब्दुला या तरुणांनेही लढवया तरुणांची फौज तयार केली होती. या नवतरुण कश्मिरी फौजेने भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन पाकिस्तानी घुसखोर सैनिकांचा मुकाबला केला. चारी बाजुनी हल्ला झाल्याने हल्लेखोरांनी काश्मिरातून काढता पाय घेतला.

काश्मिरच्या राजाने भारतात विलीनकरण करारावर सही केल्याने व शेख अब्दुलांच्या मताशी सहमत असणार्‍या कश्मिरी अवामामुळे कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनला होता.

असे असले तरी पाकिस्तानच्या जिन्हांना हे विलनीकरण मान्य नव्हते. त्यांचे असे मत होते की, भारताने जोरजबरदस्तीने लष्करी बळाचा वापर करत काश्मीरचे विलनीकरण करुन घेतले आहे. पुढे पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्र परिषदेकडे नेला. मात्र संयुक्त राष्ट्राने हा प्रश्न दोन राष्ट्रातील असून तो त्यांनी सामंजस्याने सोडवावा अशी भूमिका घेतली. या सर्व घडामोडीमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. काही दिवसातच पाकिस्तानने भारताबरोबर उघड उघड युध्द छेडले.. पाकिस्तान सैन्यांने काश्मिरात बरेच आतपर्यंत घुसखोरी केली. पाकिस्तानी सैन्यांना कश्मीरमधून संपूर्ण पणे पिटाळुन लावत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या आदेशान्वये युध्दबंदी करण्यात आली.

या युध्दबंदीमुळे दोन्ही देशाचे सैन्य ज्या भागात होते तिथेच थांबले. पाकिस्तानचे सैन्य ज्या भागात थांबले तो पाकव्याप्त काश्मीर बनला.उर्वरीत कश्मिर भारताचा काश्मीर म्हणुन ओळखला जाऊ लागला. भारताचे कश्मीर व पाकव्याप्त कश्मीरच्या सिमेला प्रत्यक्ष नियत्रंण रेषा संबोधले जाऊ लागले.पाकिस्तान त्याच्यां ताब्यातील कश्मीर सोडायला तयार नाही. भारत-पाकिस्तनच्या या प्रश्नांवर तोडगा अद्यापपर्यंत निघाला नाहि, यापुढेहि निघण्याची शक्यताही धुसरच आहे. मात्र संपुर्ण कश्मिर हस्तगत करण्याची पाकिस्तानची मनिषा काही लपुन राहिलेली नाही. आपला उद्देश साध्य करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरात व काश्मिर बाहेर सतत आंतकवादी कारवाया करत असतो. त्यामुळे भारताचे हे नंदनवन सतत धुमसतच आहे.

दुसरीकडे कश्मिरी जनतेला भारताच्या बाजूने भूमिका घेण्यास भाग पाडणार्‍या शेख अब्दुलांकडे पंडित जवाहरलाल नेहरुनी काश्मीरची कमान सोपवली होती. कश्मिर राज्य म्हणून अस्तित्वात येत असतानाच भारताची राज्यघटनाही लिहली जात होती. शेख अब्दुलांना काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा हवा होता. विशेष दर्जान्वये त्यांना काश्मिरी जनतेचे काही हक्क अबाधित ठेवायचे होते.या करीता त्यांनी भारतीय राज्यघटनेत 370 व 35 अ कलमांचा समावेश करावा असा आग्रह धरला.

370व 35-अ कलम रद्द करण्यास विरोध का होता- कलम 35 अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाट होती. कलम रद्द झाल्यास मुस्लीम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे होते. 35 अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात.

जग कश्मीरच्या सौदर्याला शापीत सौंदर्य म्हणत आले आहे, मात्र तेच शापीत सौंदर्य भविष्यात भारतासाठी हिमालयातील जीवनसंजीवनी बनू पहात आहे. यासर्व इष्ट बदलाचे राजकारण न करता भारतातील सर्व नागरिकांनी काश्मीर खोर्‍यातील जनतेच्या पाठिशी समर्थपणे उभे राहिले पाहिजे.

–रणधिर शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -