Homeफिचर्ससारांशInstruments Of The Gods : यंत्र आणि मानव

Instruments Of The Gods : यंत्र आणि मानव

Subscribe

मानवी समस्या म्हणजे शारीरिक व्याधी, मानसिक आजार, आर्थिक कोंडी, मालमत्तेचे वाद इत्यादी, अशा यंत्राने दूर होऊ लागल्या असत्या तर ती सारी यंत्रे मोठ्या उद्योगपतींनी मोठी रक्कम देऊन घेतली असती. म्हणजे त्याची जाहिरात करून विकण्याची वेळ आलीच नसती. माझ्याकडे असे एक यंत्र आहे, पण मला ते भेट मिळाले आहे. त्याला तीन वर्षे झाली. त्याची किंमत आठशे ते हजार रुपये असावी, असा माझा अंदाज आहे. कारण ते भेट देणारा, माझ्यापेक्षा खूपच धनवान आहे. त्यामुळे माझ्याकडे संपन्नता आली असे घरातील कोणालाही चुकूनही वाटलेले नाही.

-योगेश पटवर्धन

यंत्र हा शब्द सगळ्यात आधी जोडला गेलाय तो होकायंत्राशी. सूर्य, चंद्र उगवण्याच्या वेळा टळून गेल्यानंतरही दिशा दाखवण्याचे एक छोटे उपकरण. किनार्‍यापासून सागरात दूरवर असलेले खलाशी किंवा सर्वदूर वाळूच्या टेकड्या ओलांडत उंटावरून प्रवास करणारे अरब यांच्यासाठी हे महत्त्वाचे साधन. क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, अचानक सुरू होणारी वादळे, पावसाच्या सरी, मिट्ट काळोख यामुळे दिशा चुकून भरकटण्याचे प्रसंग नित्याचे, त्यामुळे हे छोटेखानी यंत्र जीवापाड जपावं लागे.

यंत्र ही वस्तू विकत घेऊन वापरण्यार्‍यांपैकी काही जणांना ते योग्यरित्या हाताळणे न जमल्याने त्याची उपयुक्तता न वाटणे स्वाभाविक असेल. हे प्रमाण शंभरात दोन/पाच असेल तर नगण्य. दहापेक्षा अधिक असेल तर ते वापरण्याची पद्धत समजावून सांगायला हवी. २५ टक्के ग्राहकांना अडचणी येत असतील तर विकल्या गेलेल्या यंत्रांची पुन्हा एकदा चिकित्सा व्हायला हवी आणि एकालाही ते उपयोगी ठरत नसेल तर ती फसवणूक ठरते.

५ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण विषयावर निर्णायक मत दिलं आहे, त्यानुसार देवदेवतांची यंत्रे, म्हणजे धातूचे पिरॅमिड, तांब्याचे चौकोनी कोरीव काम केलेले पत्रे नामक वस्तू, ज्याला यंत्र म्हणतात, जे नांव चुकीचे आहे. ते विकत घेऊन घरात, कार्यालयात ठेवल्यास जीवनातील जवळजवळ सर्व समस्या सुटून संसार सुखाचा होईल, अशा प्रकारच्या जाहिराती कोणत्याही माध्यमातून करणे बेकायदेशीर ठरणार आहे. त्यानंतरचे असे प्रसिद्धी व्यवहार अपराध ठरतील.

यासंबंधीची एक याचिका राजेंद्र अंभोरे यांनी २०१५ मध्ये दाखल केली होती. अशाच एका जाहिरातीला भुलून त्यांनी रुपये ५२००/- चे एक यंत्र, जे बाबा मंगलनाथ यांनी आध्यात्मिक शक्तीने सिद्ध केले असल्याने ते विकत घेतल्यास समस्यांचे निराकरण होईल असा दावा टेलिशॉपिंग कॉर्पोरेशन या विक्री संस्थेने अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल व इतर काही मान्यवरांचा जाहिरातीत वापर करून केला होता. यथावकाश त्यातील फोलपणा लक्षात आल्याने त्यांनी सर्व संबंधितांना म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, विक्री संस्था, पैसे घेऊन जाहिरात करणारे मान्यवर यांना प्रतिवादी करत न्यायालयात खेचले.

सर्वसाधारणपणे असे खटले वकिली सल्ल्याने आपसात तडजोड (अलिखित देवाणघेवाण) होऊन मागे घेतले जातात. याही बाबतीत तसेच होणार होते. तीन वर्षांनंतर अंभोरे यांनी विनाअट तो खटला मागे घेण्यास संमती दर्शवली होती, परंतु त्याचे स्वरूप ग्राहक आणि फ्रिज/धुलाई यंत्र विकणारा विक्रेता, सदोष यंत्रणा असे नसल्याने तो चालूच ठेवावा, अशी समंजस भूमिका न्यायालयाने घेतली हे दिलासादायक आहे.

१९५० नंतर प्रत्येक क्षेत्रात यंत्रांची चाके घरघरू लागली. त्याने अनेक मानवी कष्ट कमी झाले आणि वेळ, पैसा आणि शारीरिक श्रम याची बचत होऊ लागली. जिथे शक्य होते त्या प्रत्येक ठिकाणी छोटी-मोठी यंत्रे किंवा उपकरणे मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. त्यातील बरीचशी विजेवर चालणारी असल्याने वीजनिर्मिती, वितरण, वहन याचे अनेक प्रयोग होऊ लागले, ज्यामुळे यंत्रांचे साम्राज्य मानवी जीवनात सर्वदूर पोहोचले.

मानवी समस्या म्हणजे शारीरिक व्याधी, मानसिक आजार, आर्थिक कोंडी, मालमत्तेचे वाद इत्यादी, अशा यंत्राने दूर होऊ लागल्या असत्या तर ती सारी यंत्रे मोठ्या उद्योगपतींनी मोठी रक्कम देऊन घेतली असती. म्हणजे त्याची जाहिरात करून विकण्याची वेळ आलीच नसती. माझ्याकडे असे एक यंत्र आहे, पण मला ते भेट मिळाले आहे. त्याला तीन वर्षे झाली. त्याची किंमत आठशे ते हजार रुपये असावी, असा माझा अंदाज आहे.

कारण ते भेट देणारा, माझ्यापेक्षा खूपच धनवान आहे. त्यामुळे माझ्याकडे संपन्नता आली असे घरातील कोणालाही चुकूनही वाटलेले नाही किंवा तुमच्या भरभराटीचे रहस्य काय? असेही कुणी चेष्टेने सुद्धा म्हणाले नाही. स्वप्नातसुद्धा असा काही भास मला झाला नाही!! ते कुठे ठेवावे असे विचारल्यावर उत्तर देणे, देणार्‍याला सुचले नाही, म्हणून ते देवघरात ठेवले. पण परिणाम शून्य. ते पितळ्याचे असल्याने त्याला जुन्या बाजारात वजनाच्या हिशोबाने फार तर सत्तर रुपये मिळतील.

देवधर्म नाकारावा की स्वीकारावा हे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिले आहे. मात्र देवाच्या किंवा धर्माच्या नावावर कुणी दुसर्‍याचे शोषण करत असेल तर त्याला विरोध करणे आपले संविधानिक कर्तव्य आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलिकर यांनी दिलेल्या निकालाने ही भूमिका अधिक ठळक झाली आहे.

जाहिरातबाजी न करताही अशा शेकडो बारीकसारीक वस्तू प्रत्येक जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवस्थानांबाहेर विकल्या जातात, तो बाजार शेकडो कोटी रुपयांच्या घरात आहे. कुणाला तरी रोजगार मिळतो म्हणून त्याला विरोध करणे माणुसकीला धरून नाही, असा अतार्किक समज पसरवून तो वर्षानुवर्ष चालू आहे आणि आता दुप्पट वेगाने वाढतो आहे.

यंत्रमानव तयार करण्याची क्षमता असतानाही, अशी यंत्रे विकून पोट जाळणार्‍यांनी दुसरे काही उपयुक्त काम करावे ही सुबुद्धी जागृत देवदेवतांनी त्यांना द्यावी यासाठी त्यांना हात जोडून विनंती. आपल्या भक्तांचे भले व्हावे असे ३३ कोटी देवांना नक्कीच वाटत असेल, त्यातील काहींनी त्यांना फसवणार्‍या भोंदूंचा बंदोबस्त करायला काय हरकत आहे. धातूचे पत्रे किंवा ठोकळे म्हणजे यंत्र. ते चालत नाही. मात्र विकणार्‍यांची चलती होते.

ते विकत घेणारे बरेचसे उच्च शिक्षित. त्याला यंत्र का म्हणायचे, हा माझा प्रश्न. निरुत्तर होऊन आकाशाकडे बोट दाखवणे हेच उत्तर. आता आपण कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करत आहोत. अशी यंत्रे देवघरात ठेवल्याने नैसर्गिक बुद्धीला गंज येईल. ती यंत्र तांब्याची, पितळ्याची असतात, त्यांना काहीच होत नाही. न्यायालयाने सांगूनसुद्धा, आजही टीव्हीवर अशा जाहिराती लिखित स्वरूपात अनेकदा दिसतात. त्या बंद व्हाव्यात असे कुणालाही वाटत नाही. अधिक काय बोलावे. माझे मागणे मोठे नाही.