घरफिचर्ससारांशबायनॉरल बीट्सची नशा !

बायनॉरल बीट्सची नशा !

Subscribe

बायनॉरल बीट्स हे एक विशिष्ट प्रकारचे संगीत सध्या नशेचे रूप घेत आहे. खरं तर, एरवी संगीत हे अत्यंत सुरक्षित असे स्ट्रेस बस्टर आहे. पण बायनॉरल बिट्स हे संगीत मात्र मादक पदार्थासारखे काम करत असल्याचे आढळून आले आहे. हो, ह्या संगीताची नशा चढते. बायनॉरल बिट्स हे इंटरनेटवर सहज उपलब्ध असणारे संगीत असून त्यातून निघणार्‍या अल्फा, बिटा, गॅमा इत्यादी लहरी मेंदूवर मादक पदार्थांसारखे काम करतात. साधारण साठ टक्क्यांहून अधिक व्यक्ति ह्या नशेचे बळी ठरत आहेत.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक तरुण काळाप्रमाणे धावण्याच्या प्रयत्नात आहे. ‘तणाव’ ही गोष्ट आता तरुणाईच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. व्यावसायिक, कौटुंबिक, आर्थिक अशा अनेक प्रकारच्या तणावांना तरुण रोज सामोरे जात असतात. त्यातच प्रेमभंग, साथीचे जीवघेणे आजार, त्यामुळे होणारी आर्थिक, आणि इतर हानी, बदललेल्या जीवनशैलीमुळे बिघडलेले आरोग्य ह्या सर्व समस्या दात विचकत पुढे उभ्या असतातच. ह्या सगळ्यांपासून आपले संरक्षण करण्यासाठी मग युवा पिढी व्यसनांकडे वळते.

व्यसन. व्यसन म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर दारू, सिगरेट, अफू, गांजा, इत्यादी अमली पदार्थ अशा गोष्टी आल्या असतील. बरोबर आहे. परंतु हे प्रकरण आता इथवर थांबत नाही. त्याही पुढे जाऊन ‘डिजिटल ड्रग’ हा नाव व्यसनाचा प्रकार आता समोर येऊ लागला आहे. आश्चर्य वाटले ना? पण दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे. हे डिजिटल व्यसन नक्की कसले आहे, कशा प्रकारचे आहे?

- Advertisement -

बायनॉरल बीट्स हे एक विशिष्ट प्रकारचे संगीत सध्या नशेचे रूप घेत आहे. खरं तर, एरवी संगीत हे अत्यंत सुरक्षित असे स्ट्रेस बस्टर आहे. पण बायनॉरल बिट्स हे संगीत मात्र मादक पदार्थासारखे काम करत असल्याचे आढळून आले आहे. हो, ह्या संगीताची नशा चढते. बायनॉरल बिट्स हे इंटरनेटवर सहज उपलब्ध असणारे संगीत असून त्यातून निघणार्‍या अल्फा, बिटा, गॅमा इत्यादी लहरी मेंदूवर मादक पदार्थांसारखे काम करतात. साधारण साठ टक्क्यांहून अधिक व्यक्ति ह्या नशेचे बळी ठरत आहेत. ‘बायनॉरल’ म्हणजे दोन कान आणि ‘बिट्स’ म्हणजे ठराविक लयीतील ध्वनी. ह्या प्रकारात कानात इयरफोन्स घातल्यावर दोन्हीही कानांमध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ध्वनी ऐकू येतात. यामुळे आपल्या मेंदूमध्ये संभ्रम निर्माण होऊन तो दोन्ही आवाज एक करण्याचा प्रयत्न करतो. ह्यामुळे आपोआप मेंदूत एक तिसरा वेगळाच आवाज निर्माण होतो जो फक्त आपण ऐकू शकतो. ह्या सर्व प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असताना आपल्याला वेगळीच शांतता जाणवते, आणि नशेच्या अवस्थेत गेल्याचा अनुभव मिळतो.

हे व्यसन सर्वात आधी अमेरिकेत २०१० साली आढळून आले. तेव्हापासून अशी अनेक प्रकरणे बाहेर आली. ह्या नशेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते आहे. त्यामुळे ह्यावर जास्तीत जास्त संशोधन करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून केला जातो आहे. तरीही ह्याबाबत अजून फारशी ठोस माहिती किंवा कसले निष्कर्ष समोर आलेले नाहीत. पण हे संगीत नशा चढवणारे असल्याने ह्याबाबतीत काळजी घेणे आवश्यक मात्र आहे. हे संगीत यू ट्यूबवर सहज उपलब्ध असल्याने ह्याच्या कचाट्यात तरूणवर्ग सहज अडकू शकण्याची संभावना अधिक असते. तसेच, इयरफोनमध्ये ऐकले जात असल्याने इतर कुणाला ह्या प्रकाराबद्दल काही कळणे अवघड असते. त्यामुळे हे व्यसन लक्षात येणेही कठीण आहे. परंतु पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन सायबर फॉरेन्सिक तज्ञ तन्मय दीक्षित हे करत आहेत.

- Advertisement -

बायनॉरल बिट्स हे सरळ साध्या शब्दात भासमान संगीत आहे. जे तुमच्या मेंदूवर थेट परिणाम करते. हे संगीत जर तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उंचीच्या आवाजात ऐकले, तर ते मेंदू आणि कानांना गंभीर इजादेखील पोहोचवू शकते. हे संगीत काही लोक रात्री शांत झोप यावी म्हणूनही ऐकतात. ह्या प्रकारातील संगीताबद्दल अनेकजण त्यांना फायदे झाल्याचेही सांगतात. परंतु त्यांच्या नकळत ते व्यसनाला सामोरे जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एका व्यक्तीने ह्यावर प्रयोग केले. तिने केलेल्या काही चुका इतरांनी करू नये यासाठी पुढील सल्ले दिले आहेत:
१) हे संगीत ऐकताना अत्यंत कमी आवाजातच ऐकावे. नाहीतर ते धोकादायक ठरते.
२) सुरुवातीस साधे ट्रॅक्स ऐकावेत. जास्त वजनदार ट्रॅक ऐकू नये.
३) २४ तासात ९० मिनिटांच्या वर हे ऐकू नये.
४) तसेच, एकच ट्रॅक ऐकावं. विविध ट्रॅक्स एकसोबत ऐकू नये. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.

वरील व्यक्तीने असे सांगितले की, बायनॉरल बिट्स काही दिवस सतत ऐकल्यावर तिला खूप जास्त प्रमाणात डोळे आणि डोकेदुखीला सामोरे जावे लागते. तिच्या मेंदूच्या ठराविक भागाला वेदना जाणवत होत्या. तसेच, तिने त्वचेच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी असलेले संगीत ऐकल्यावर तीन ते चार दिवसांनी त्वचेवरही विरुद्ध परिणाम होत असल्याचे जाणवले.

आणखी एका व्यक्तीने तर याहूनही भयानक अनुभव सांगितले आहेत. त्या व्यक्तीस खरोखर ह्या बिट्सचा खूप वाईट अनुभव आला. संबंधिताने काही दिवस सलग बायनॉरल बिट्स ऐकले. यानंतर दोन-तीन महिने सगळे काही व्यवस्थित होते. परंतु, एक दिवस अचानक त्या व्यक्तीला आपल्यामागे काहीतरी भयानक शक्ती वावरतेय असे वाटू लागले. स्वतःच्याच घरात इतरांमध्ये मिसळण्यास अडचण येऊ लागली. पण, हे आपण ऐकत असलेल्या संगीतमुळे आहे, हे लक्षात न आल्याने त्या व्यक्तीने ट्रॅक्स ऐकणे चालूच ठेवले. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्या व्यक्तीला चक्क काळी सावली दिसू लागली. सतत भीती वाटू लागली. नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. तिने आत्मपरीक्षण केल्यावर तिच्या लक्षात आले, की हे आपण ऐकत असलेल्या बिट्सचे साइड इफेक्ट्स आहेत. त्या व्यक्तीने हे संगीत ऐकणे बंद केल्यावर सर्व काही ठीक झाले. म्हणजेच बायनॉरल बिट्सचे मनावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात ह्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.

खरं म्हणजे, बायनॉरल बिट्स ऐकल्यावर लोकांना जी शांतता अनुभवायला मिळते, मूड आनंदी होतो, असे त्यांना वाटते, ते क्षणिक असते. याचा अर्थ असा होत नाही की, त्याने आपल्या समस्या सुटतील. पण इंटरनेटवर ह्या प्रकाराचे इतके मार्केटिंग केलेले दिसून येते, की बायनॉरल बिट्स ऐकून आपले जीवन बदलून जाते, सगळे छान होऊ लागते, असा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतो. त्यामुळे अनेक जण हे ट्रॅक्स ऐकतात. आणि ते ऐकून त्यांना काही दिवस चांगले वाटते, म्हणून त्यांचा विश्वासही बसतो. पण त्याचे आपल्या आतील शरीरात, मेंदूवर काय आणि किती प्रमाणात भयंकर परिणाम होत आहेत, ह्याची त्यांना कल्पनासुद्धा नसते.

त्यातच, काही जणांचा असा समज आहे, की बायनॉरल बिट्स ह्या ध्यानाच्या वेळी ऐकल्यास ध्यान लागण्यास मदत होते. पण, हे फारसे खरे नाही. कारण ध्यानासाठी पूर्णतः शांतता असणे आवश्यक असते. किंवा फार तर बासरी, तंबोरा यांसारखे मधुर आणि शांत ध्वनी असणारे संगीत ऐकता येईल. किंवा मंत्र, श्लोक इत्यादीही उपयोगी पडू शकतात. पण, बायनॉरल बिट्स ऐकून आपल्याला फक्त असे वाटते की आपण एकाग्र झालो आहोत. प्रत्यक्षात त्या आवाजामुळे खरे ध्यान लागू शकत नाही. उलट त्याच्या लहरींमुळे मेंदूला त्रास होतो. ज्यांचे ध्यानात लक्ष लागत नाही ते फक्त हा शॉर्ट कट वापरायला बघतात. पण ध्यानासारख्या गोष्टीला शॉर्ट कट नसतो. ध्यानात आपण आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. बायनॉरल बिट्स ह्या फक्त त्या आवाजांची नक्कल असतात. पण त्या खर्‍या बाहेरच्या आवाजांमध्येच येतात. ह्या बिट्समुळे काहींना डोकेदुखी, बैचेनी, झोप न लागणे, अशा तक्रारी जाणवलेल्या आहेत.

ह्या विषयावर अजून संशोधन चालू आहे. त्यामुळे त्याबाबत काहीच ठामपणे सांगता येत नाही. तरी आपण सर्वांनी अशा सवयींपासून दूर राहणेच श्रेयस्कर आहे. नैसर्गिक पद्धतीने ध्यान करणे हे कोणत्याही नशेपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे तुमचा तणाव दूर करू शकते. आपल्याकडे मंत्र, शास्त्रीय संगीत, मेडिटेशन असे कितीतरी प्रकार आहेत, जे ताणावापासून मुक्ती देण्यास जास्त सक्षम आहेत. त्यामुळे आपण ते पर्याय अवलंबूया आणि खर्‍या अर्थाने तणावमुक्त होऊया.

–तन्मय दीक्षित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -