घरफिचर्ससारांशअंतर्बाह्य जग आणि मन

अंतर्बाह्य जग आणि मन

Subscribe

आतला आवाज आणि बाहेरचा आवाज ही वेगळी समस्या होऊन बसली. एखादी गोष्ट अंतर्मनाला पटली किंवा मला आतला आवाज आला तर मी करतो असं तज्ज्ञ लोक म्हणतात तेव्हा मला ते नक्की काय म्हणतात हे खरंच कळत नाही, पण ही आतली आणि बाहेरची काहीतरी वेगळी भानगड आहे हे मात्र नक्की. एकदा माणूस आपली भूमिका बदलू लागला की, त्याच्या बाह्य वागण्यात आणि आतल्या आत किंवा मनात घडणार्‍या गोष्टींचा मेळ बसला नाही तर.? किंवा लिहिणारा साहित्यिक अशा भूमिका बदलत गेला तर?. आयुष्यात जपणारी तत्व आणि लेखनातील भूमिका यांची सांगड घातली नाही तर ते लिखाण खोटं ठरत नाही का ? असे अनेक प्रश्न मनात येत असतात.

दहावी झाल्यानंतर अकरावीला भांडुपच्या मेनन कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला, ट्रेनने येताना विक्रोळीचा मित्र प्रशांत मोरे भेटला. तो ठाण्याच्या ज्ञानसाधनामध्ये शिकत होता. त्याने त्याला मराठी शिकवायला असलेल्या कवी अशोक बागवे सरांच्या शिकवण्याची एवढी तारीफ केली की, त्यानंतर अनेकवेळा मेनन कॉलेजला जाण्याच्या अगोदर मी ज्ञानसाधनामध्ये जाऊन बागवे सरांच्या तासाला प्रशांतच्या बाजूला बसू लागलो. वास्तविक वर्गाचा पट ऐंशी होता पण वर्गात सुमारे एकशे दहा-एकशे वीस मुलं सहज असायची. ही अधिकची मुलं जवळपासच्या कॉलेजमध्ये शिकणारी होती किंवा त्याच कॉलेजमधली पण इतर वर्गातली होती.

ही गोष्ट सरांच्या लक्षात आलेली असायची तेव्हा वर्गात आले की, बागवे सर आज बहिःस्थ विद्यार्थी भरपूर दिसतात असं म्हणून शिकवायला लागायचे. पण त्यादिवशी हा बहिःस्थ शब्द उच्चारला आणि त्याजोडीला कितीतरी शब्द पुढे सांगत गेले. अंतःस्थ – बहिःस्थ म्हणजे काय, अंतर्गत आणि बहिर्गत आणि मग शेवटी आतले आणि बाहेरचे. प्रत्येक शब्द जरी दिसायला सारखा वाटला तरी अर्थ वेगळाच!. सरांच्या शिकवण्याची ही पद्धत अशीच होती. एकावेळी अनेक शब्द शिकवण्यात येत राहायचे.

- Advertisement -

आतला आवाज आणि बाहेरचा आवाज ही वेगळी समस्या होऊन बसली. एखादी गोष्ट अंतर्मनाला पटली किंवा मला आतला आवाज आला तर मी करतो असं तज्ज्ञ लोक म्हणतात तेव्हा मला ते नक्की काय म्हणतात हे खरंच कळत नाही, पण ही आतली आणि बाहेरची काहीतरी वेगळी भानगड आहे हे मात्र नक्की.

एकदा माणूस आपली भूमिका बदलू लागला की, त्याच्या बाह्य वागण्यात आणि आतल्या आत किंवा मनात घडणार्‍या गोष्टींचा मेळ बसला नाही तर.? किंवा लिहिणारा साहित्यिक अशा भूमिका बदलत गेला तर?. आयुष्यात जपणारी तत्व आणि लेखनातील भूमिका यांची सांगड घातली नाही तर ते लिखाण खोटं ठरत नाही का ? असे अनेक प्रश्न मनात येत असतात. हे सगळ सांगत असताना मला रेल्वेचा प्रवास आठवतो. आताचा नाही पण जग जेव्हा कोरोनाच्या विळख्यात फसले नव्हते तेव्हा सकाळी ऐरोलीवरून ठाण्याला जायची ट्रेन पकडायचो तेव्हा ऐरोली स्टेशनला आल्यावर या ट्रेनमध्ये जागा मिळेल की, नाही ही शंका मनात असायची. त्यात आतले प्रवासी आपल्याला आत घेतील की नाही? ही शंका देखील मनात असायची. एकदा ट्रेन स्टेशनवर आली की, आतल्या प्रवाशांना आत रेटून हा बाहेरचा प्रवासी आत घुसण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा अंदर किधर जगह है…..अरे धक्का मत मारो ना असे संवाद नेहमी कानावर पडायचे. तेव्हा बाहेर असणारा मी अरे थोडा अंदर जावो ना ….एक स्टेशन तो है असं म्हणून एव्हाना आत गेलेला असतो. आता खरी गोम आहे. मी आत आलो की, मी आतला झालो तेव्हा बाहेरच्या लोकांबद्दल मला काहीही बोलायची मुभा असते.

- Advertisement -

हे ऐरोलीचे लोक पनवेल गाडी का पकडतात. त्यापेक्षा त्यांनी वाशी ट्रेन पकडायची ना ! ह्या बाजुवाल्याच्या वाक्याचे मी समर्थन करू लागतो. तेवढ्यात कोण म्हणतो इथे मध्ये विटावा स्टेशन नवीन होणार आहे त्यावर मी ह्या पनवेल किंवा नेरूळ गाडीत ह्या विटाव्याच्या लोकांना घ्यायला नको. ऐरोली स्टेशनला जो बाहेरचा होता तो आतला झाल्यावर किती बदलला. ज्या समस्यांना आत येताना मी तोंड दिलेले असते. आतल्या लोकांची दादागिरी मी सहन केलेली असते, पण मी त्यांचा भाग झाल्यावर सगळं विसरून त्या समुहाचा भाग होतो. हळूहळू गाडी ठाणे स्टेशनवर येते आणि गाडी सुरू असतानाच बाहेरचे लोक आत घुसण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा माझ्यातला आतला माणूस जागा होतो आणि अरे गाडी काय कुठे पळते आहे का ? , गाडी थांबणार ना ! आणि आतल्याना आधी उतरू द्या, मग तुम्ही आत या माझ्यासारखे असे अनेक आतल्या लोकांचे आवाज त्यात मिसळले जातात. पण हे बाहेरचे लोक काही ऐकायच्या मनस्थितीत नसतात. आतल्या लोकांना ढकलून ते बाहेरचे आतले होतात आणि काहीवेळाने आतले बाहेरचे होतात.

ठाण्याचा मोठा पुल ओलांडून स्टेशनच्या बाहेर आल्यावर बस पकडली तरी मघाशी घडलेल्या आतल्या बाहेरच्यांची भानगड काही डोक्यातून जात नाही. संपूर्ण दिवस कामात गेल्यावर कॉलेजमधून निघताना पुन्हा ठाणे स्टेशनला आलो की, संध्याकाळची घरी परतण्याची ट्रेन पकडण्याची सर्वांना घाई आलेली असते. मी स्टेशनवर येतो तेवढ्यात ट्रेन लागलेली असली की, त्या ट्रेनमधून उतरणारे प्रवासी मला एकदम आळशी, मेंगळट वाटू लागतात. त्यांची उतरण्याची गती पाहून मला रहावत नाही आणि अचानक अरे लवकर लवकर उतरा ना …..ट्रेन काय विकत घेऊन ठेवली काय ? असा माझा बाहेरचा आवाज फुटतो आणि आतले बाहेर येण्याची वाट न बघता मी सीट मिळवण्याच्या प्रयत्नात आत घुसण्याचा प्रयत्न करून बसण्याची सीट मिळवून पुन्हा आतल्या गटात सामील होतो. मुंबईच्या जनतेला ही गोष्ट काही नवी नाही. तरी एकदा भूमिका बदलली की, आपला आवाज, आपले वागणे, झालेच तर आपले विचार-आचार किती बदलून जातात. मग नक्की आतला कोण आणि बाहेरचा कोण याचा देखील विसर पडतो.

आज कोरोनाची महामारी चालू असताना निरनिराळ्या बातम्या कानावर येत असतात. कोणी मित्र गेल्याची बातमी, कोणाचे वडील-आई गेल्याची बातमी. सगळे नातेवाईक बाहेरून म्हणत होते आत नक्की काय चाललंय कळत नाही. सगळ्याची मत मतांतरे आपण ऐकत असतो. पण नक्की आपण कुठल्या आतल्या व्यवस्थेबद्दल बोलतो किंवा कशाबद्दल मत व्यक्त करतो. जे मत व्यक्त करतो ते सर्व फक्त आपण मांडलेली गृहिते असतात.

माझा एक मित्र माझ्याबरोबर बीएड झाला. एका कॉलेजमध्ये फारतर दोन वर्षे टिकला असेल. तिथे दोन वर्ष रहातो आणि कोण जास्त पगार देत असेल तर इकडे सोडून लगेच तिकडे रुजू होतो. फेसबुकवर सतत याबाबत अपडेट देत असतो. त्या कॉलेजच्या सहकार्‍यांबद्दल फार चांगलं लिहितो पण तिकडची नोकरी सोडली की, अचानक ती जुनी माणसे त्याच्या काळ्या यादीत जातात. हे त्याच्याबाबत गेले वीस वर्षे होते आहे. मुळात आपली भूमिका मग ती जगण्याची असो किंवा सामाजिक जीवनातील असो ती एकदा मनात फिट्ट बसली की, मग हा आतला आणि बाहेरचा असा फरक रहात नाही.

साहित्याच्या क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात वावरताना असे अनेक प्रकार बघायला, ऐकायला मिळतात. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली तेव्हा मनात विचार आला की, धोनी किंवा दिल बेचारा सारख्या चित्रपटातून त्याने संघर्ष करून एखाद्या चांगल्या पदावर किंवा एखाद्या असाध्य रोगावर मात करणारी भूमिका करणारा हा माणूस कशी आत्महत्या कशी करेल ?….तरी माणसाच्या वास्तवातल्या जगण्याची गोष्ट वेगळी आणि तीन तासाच्या चित्रपटातील भूमिका वेगळी हे सहज लक्षात येते. तरी मनात वाटत राहते की, शेवटी अस वागणे हे भूमिकेशी प्रतारणा नाही का ?

मला राहून राहून माझ्या गावचा नामू वालावलकर आठवतो. घरात कोण आजारी असेल तर किंवा अचानक कोणाचे निधन झाले तर आम्ही बहुतेक आतल्या आत घुटमळत असायचे…त्याचा त्रास होऊन अचानक हार्ट अ‍ॅटकने गेले, असं बोलायची खोटी, लगेच नामू म्हणायचा तसला आतला काय नसता, ही भायरची भानगड असतली. नायतर असो चलतो बोलतो माणूस जायत कसो. नामू आपल्या पद्धतीने बाहेरची भानगड निस्तरण्याचा प्रयत्न करायचा. हल्ली ऑनलाईन शिक्षणाच्या काळात तर आम्ही आमचा आवाज मग तो आतला असो की, बाहेरचा असो आम्ही तो बटन दाबून म्युट करून ठेवला आहे. माझी ही घुसमट आताची पण तुकोबांना ही भानगड केव्हाच उमगली होती म्हणून तर त्यांनी म्हटले आहे

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥
जीवाही आगोज पडती आघात । घेउनिया नित्य नित्य वारू ॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे । अवघियांचे काळे केले तोंड ॥

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -