घरफिचर्ससारांशवाट पाहण्याशिवाय हातात काय उरलंय?

वाट पाहण्याशिवाय हातात काय उरलंय?

Subscribe

गेले वर्षभर आपण सगळेच एका मोठ्या संकटाशी मुकाबला करत आहोत. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्याची कोरोनाच्या कचाट्यातून सुटका झालीय. अगदी माणसांचं दैनंदिन रहाटगाडगं असो वा समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन, कलाक्रीडेचे क्षेत्र असो...कोरोना जळी स्थळी काष्ठी पाषाणी व्यापून राहिला आहे. मग आपले नाटक याला कसे अपवाद असेल? त्यातही जेव्हा जगण्या मरण्याचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा आवश्यकतेच्या अनुषंगाने सर्वात शेवटचे प्राधान्य कशाला असेल तर ते कलेच्या क्षेत्राला. पण आता त्यातून आपणच आपल्याला सावरण्याची वेळ येऊन ठेपलीय. रंगमंचावरील कलावंत असोत वा प्रेक्षक, दोघांनाही आता यापुढील वाटचाल कोरोनासोबत करावी लागणार आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर येण्याची वाट पाहवी लागणार आहे.

1 जानेवारी 2020 या दिवशी आपणा सगळ्यांनी नव्या दशकाच्या उंबरठ्यावर पाय ठेवले. त्यावेळी साहजिकच आपण सारे सरत्या दशकातल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातल्या घडून गेलेल्या घटनांचा आपल्यावर झालेल्या साधकबाधक परिणामांचा विचार करण्यात आणि आढावा घेण्यात मग्न असू. त्याचवेळेस, येणारे दशक आपल्यासाठी काय नवे घेऊन येणार आहे याची उत्सुकता आणि कुतूहलही आपल्या मनात नक्कीच चाळवले असेल. दशकाच्या प्रारंभीच कोरोनाच्या प्राणघातक विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे झाला आणि त्याने आगामी काळाचे जणू सुतोवाच केल्यासारखं झालं. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी देशभर जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेला येत्या मार्च महिन्यात वर्ष पूर्ण होईल. सबंध जगाचंच रहाटगाडगं एका अनिश्चित काळापर्यंत थांबल्यासारखी परिस्थिती या एका वर्षात आपण सगळ्यांनी अनुभवली. एका विशाल अर्थचक्राचा भाग असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या ते लहानातल्या लहान उद्योग आणि व्यवसायांच्या गतीमध्ये अनपेक्षित अडथळा निर्माण करणारा गेल्या वर्षभराचा काळ हा अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल.

याच वर्षाने संपूर्ण जगाची कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी सरळसोट विभागणी केली. यावरून हे संकट किती तीव्र आहे याची कल्पना आपल्याला एव्हाना आली असेल. साहजिकच आपल्या देशात, प्रामुख्याने महाराष्ट्रात ‘व्यावसायिक रंगभूमी’ या नावाने सुपरिचित असलेला नाट्यव्यवसायसुद्धा कोरोनाच्या तडाख्याने संकटात सापडला. त्या निमित्ताने प्रत्येक संकटानंतर घडतात तशाच आताही, यापुढे नाटकाचे भवितव्य काय आणि कसं असेल, या बद्दलच्या चर्चा आणि चिंतने संबंधित तज्ञांच्या वर्तुळात घडली. तरीही या सगळ्या चर्चा आणि चिंतनातून निघालेल्या अंदाजांना पुरून उरतं ‘नाटक’ अस्तित्वात असणारच आहे. उलट माणसांवर ओढवलेल्या या संकटाचे परिणाम जोखत, त्यावर यथायोग्य मार्ग काढत आणि प्रसंगी या परिणामांना सामावून घेत नाटक आपली वाट काढत नि:संशय पुढे जाईल. परंतु, प्रत्येक मोठ्या अपघातानंतर एक ‘पॉज’ घेत सिंहावलोकन करत राहणं, हा प्रत्येक व्यवसायाच्या तगून राहण्याच्या प्रक्रियेमधला महत्वाचा भाग आहे.

- Advertisement -

कोरोनापूर्व परिस्थिती
भारतीय नाटकाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेची मूळं तपासत तिचा इतिहास इथे सांगायचा नाहीय. पण कोरोनापूर्व काळात ‘नाटक’ या दृकश्राव्य कलेतील प्रेक्षकांच्या सहभागाचा प्रवास दोन ठळक बिंदुंनी आखता येईल. पहिला बिंदू म्हणजे तो काळ जेव्हा नाटक हेच लोकांच्या मनोरंजनाचे प्रमुख आणि एकमेव साधन होते. नाटकाच्या परंपरेचा आणि त्याला असणार्‍या लोकाश्रयाचा इतिहास सांगणारी अनेक पुस्तके आणि ग्रंथ आज उपलब्ध आहेत. जिज्ञासू वाचकांनी त्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा. दुसरा बिंदू म्हणजे काळाच्या ओघात तंत्रज्ञानाचा झालेला विकास आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने नाटकाला पर्याय म्हणून लोकांना उपलब्ध झालेले सिनेमा, टेलीविजन ते अलीकडच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत तयार झालेले मनोरंजनाचे इतर स्त्रोत होय. नाटक आणि इतर दृकश्राव्य माध्यमांची आपापसात स्पर्धा नसली किंवा तुलना जरी केली नाही, तरी या इतर माध्यमांनी नाटकाच्या लोकाश्रयाला काही प्रमाणात बाधा आणली, हे कुणी नाकारणार नाही.

महाराष्ट्रातील व्यावसायिक रंगभूमी ही देशभरातील एकमेव रंगभूमी असावी जिथे एका नाट्यगृहात दिवसाच्या तीनही सत्रांत तीन वेगळ्या नाटकांचे प्रयोग होत असत. अर्थात, त्यावेळेस नाटक पाहायला येणार्‍या प्रेक्षकांत सहकुटुंब येणार्‍या प्रेक्षकांची संख्या भरपूर असे. मुख्य म्हणजे माणसांकडे निवांतपणा मुबलक होता. अगदी आपल्या कामाच्या वेळा सांभाळूनही दिवसभरात नाटक पाहण्याचा स्वस्थपणा माणसांच्या जगण्यात होता. नाटकाच्या प्रेक्षकांपैकी बहुसंख्य लोक मध्यमवर्गातून आलेले असत. काळाच्या रेट्यात या लोकांच्या नोकर्‍यांचं स्वरूप बदलत गेलं. त्यातच संयुक्त कुटुंबव्यवस्था हळुहळू लयाला जात तिचा आकार आक्रसला.

- Advertisement -

कुटुंबाची जबाबदारी म्हणा वा आर्थिक स्वावलंबनाच्या कल्पनेने, घरातल्या कर्त्या पुरुषांसोबत बायकांनाही नोकरी करणं भाग पडत गेलं. कामाच्या तासांना असणारी आठ तासांची मर्यादा विस्तारत अगदी बारा ते अठरा तासांपर्यंत पोहचली. पूर्वी मोठ्या संख्येने नाटक पाहायला येणार्‍या मध्यमवर्गीय माणसांची संख्या रोडावण्यामागे हे एक महत्वाचं कारण होतं. साहजिकच, नाटक पाहण्यासाठी द्याव्या लागणार्‍या पुरेशा वेळेच्या आणि स्वस्थतेच्या अभावी लोक मनोरंजनासाठी आपल्या सोयीच्या पर्यायांकडे वळू लागले. दरम्यान, ऐंशी आणि नव्वदच्या दशकातला केबल व्यवसाय आणि त्यानंतरच्या उपग्रह वाहिन्यांच्या उदयाने लोकांना घरबसल्या मनोरंजनाचा स्त्रोत उपलब्ध झाला. आता तर हातातल्या मोबाईल फोनवरसुद्धा मनोरंजनाचे हवे ते कार्यक्रम हव्या त्या वेळी पाहता येतील, अशी सोय माध्यमक्रांतीमुळे झाली आहे. या प्रवासात प्रत्येक वळणावर ‘नाटक’ हे माध्यम आता यापुढे कसं तगून राहील, याबद्दलच्या साधकबाधक चर्चा होत राहिल्या. असं असलं तरी नाटक आपली वाट शोधत राहिलं. अगदी शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवसांपुरतं ‘वीकेण्ड थिएटर’ का असेना, पण नाटकाचा आपला असा एक प्रेक्षकवर्ग टिकून राहिला होता आणि आहे.

कोरोनोत्तर परिस्थिती
गेल्या वर्षातल्या जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. मार्च महिना येईतो रूग्णांची संख्या वाढती राहिली आणि ती आटोक्यात ठेवण्यासाठी भारत सरकारने देशव्यापी टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे लोकांच्या थेट सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यावरच या टाळेबंदीमुळे गदा आली. एकमेकांच्या संपर्कात येणं अपरिहार्यच असलं तर ‘सोशल डिस्टंन्सिग’च्या मर्यादा पाळणं बंधनकारक आहे. माणसांनी एकत्र येण्याच्या प्रसंगांत आजही ही अट लागू आहे. असं असताना नाट्यव्यवसायावर या अटीचा परिणाम होणं साहजिकच होतं. नाटक ही मुळी समूहाने एकत्र येऊन सादर करण्याचीच कला आहे. मग कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेल्या अटी नाटकासाठी जाचक न ठरत्या तर नवल !

गेले वर्षभर आपण सगळेच एका मोठ्या संकटाशी मुकाबला करत आहोत. संकटसुद्धा असे तसे नाही तर जीवघेणे. उठता बसता खाता पिता झोपता जागता कोरोना एके कोरोनाचाच बोलबाला आहे. कोरोना सध्यातरी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा केंद्रबिंदू झाला आहे. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्याची कोरोनाच्या कचाट्यातून सुटका झालीय. अगदी माणसांचं दैनंदिन रहाटगाडगं असो वा समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन, कलाक्रीडेचे क्षेत्र असो…कोरोना जळी स्थळी काष्ठी पाषाणी व्यापून राहिला आहे. सगळ्यांनाच आणि सगळंच कवेत घेऊन बसला आहे. मग आपले नाटक याला कसे अपवाद असेल ? त्यातही जेव्हा जगण्यामरण्याचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा आवश्यकतेच्या अनुषंगाने सर्वात शेवटचे प्राधान्य कशाला असेल तर ते कलेच्या क्षेत्राला. पण आता त्यातून आपणच आपल्याला सावरण्याची वेळ येऊन ठेवलीय. रंगमंचावरील कलावंत असोत वा प्रेक्षक, दोघांनाही आता यापुढील वाटचाल कोरोनासोबत करावी लागणार आहे.

गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष रंगभूमीवर भरीव असं काही घडलं नसलं तरी, तिला सदैव जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणार्‍या रंगकर्मींच्या जगण्यावर कोरोनाच्या प्रादुर्भावाचे खूप गंभीर परिणाम झाले. मुख्य म्हणजे नाटकांचे प्रयोगच थांबल्याने त्यांचे अर्थचक्रच मंदावले आणि मग एका क्षणी ते पूर्णपणे थांबले. प्रायोगिकतेच्या पलीकडे नाटक हासुद्धा एक व्यवसाय आहे. जिथे व्यवसाय असतो तिथे नफा-तोटा-नुकसानीच्याही शक्यता असतात. अशाच नुकसानीचा एक भाग म्हणजे रंगमंच कामगारांच्या (बॅकस्टेज आर्टिस्ट) उत्पन्नावर संकट येणे. कोरोनामुळे सर्वात जास्त फटका कुणाला बसला असेल तर तो या हातावरच पोट असलेल्या रंगमंच कामगारांना. त्यांना या संकटकाळी मदत मिळणे सर्वात निकडीचे होते. त्याकामी पुढाकार घेत नाट्यव्यवसायाशी संबंधित संस्थांनी मिळून आपापल्या परीने जी होता होईल ती मदत बांधिलकीच्या भावनेतून उभी केली, ती बहुमोल अशीच म्हणता येईल.

19 मार्च 2020 पासून ते आजवर आपण पूर्णत: वा अंशता, टाळेबंदीची अवस्था अनुभवत आहोत. आणखी किती काळ असं राहावं लागणार आहे याबद्दलही शंका आहेच. टाळेबंदीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नाट्यगृहे औपचारिकदृष्ठ्या पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दृष्टीने निर्बंध शिथिल केले. तरीसुद्धा नाट्यगृहांची व्यवस्थापने सगळ्या बाजूने सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. ती पूर्णपणे उघडण्याची घाई अजिबात दिसत नाहीय. दुसरीकडे रसिक प्रेक्षकही आपली पाऊले जरा जपूनच टाकण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. अशी दोन्ही बाजूंनी सावधगिरी बाळगण्याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय, मुंबईतील व्यावसायिक तसंच प्रायोगिक रंगभूमी आणि उर्वरित देशपातळीवर रंगकर्म अजून पूर्वपदावर आल्याचे दिसत नाहीय. असं असलं तरी काही संस्थांनी सर्वतोपरी खबरदारी दाखवत आपले उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.

या कठीण काळात सगळ्यांच्याच अंतरंगात एक प्रकारची अस्वस्थता घर करून आहे. कलाकारांच्या बाजूने पाहता या अस्वस्थतेचा निचरा प्रत्येकालाच करता येतोय असंही नाही. काही शांतपणे बसून आहेत. काहींची झटापट होतेय, पण काही करता येत नसल्यामुळे चरफडत बसून आहेत. काहींना ती सहन होत नसल्याने टाळेबंदीतली सगळी बंधने नाईलाजाने मोडत बाहेर फिरत आहेत. ज्यांना तिचा निचरा करता येतो त्या कलावंतांनी विधायक मार्गांचा अवलंब केला आहे. कुणी कविता लिहितोय. कुणी कथा लिहितोय. कोण पूर्वसुरींच्या साहित्याच्या अभिवाचनाचे ऑनलाईन प्रयोग करतो आहे. प्रत्येकाने आपापला मार्ग शोधत या अस्वस्थतेची निरगत लावायचा प्रयत्न केला आहे. हे सगळं मला खूप स्तुत्य वाटतं. पण हा काही प्रत्यक्ष रंगभूमीवर खेळल्या जाणार्‍या प्रयोगांना पर्याय होऊ शकत नाही, हेही मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं.

आज संपेल, उद्या संपेल, फार फार तर महिन्याभरात संपेल असं म्हणता म्हणता एक अख्खं वर्ष उलटून गेलंय. जगाचे सगळे व्यवहार काही पूर्णत: सामान्य होताना दिसत नाहीयत. जिथे अर्थचक्रच मंदावलेले असताना मनोरंजनाचे क्षेत्र प्राधान्याने पूर्वपदावर यायला आणखी किती काळ जाईल ? आता तरी त्याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. मनोरंजनाचे क्षेत्र हे जरी अवाढव्य अर्थचक्राचा एक भाग असले, तरी त्यावर असलेले आपल्या सगळ्यांचे अवलंबित्व हे ‘अत्यावश्यक’ या श्रेणीत मोडत नसल्यामुळे हा उशीर होतोय, अशी एक समजूत करून घेत शांत बसून राहण्यापलीकडे आपल्याला काही करता येत नाहीय. आता इथून पुढे नाट्यकलेचे दिवस कसे असतील, अशी चिंता व्यक्त करणारेही बरेच लोक भेटले. पण त्याविषयी चिंता करण्याचे काही विशेष कारण मला दिसत नाही. शेवटी हा सगळे व्यवहार सुरळीत होईपर्यंतचा मामला आहे. एकदा का ते तसे झाले की मग नाट्यकलेचे भविष्य वगैरे सारखे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. फार फार तर नाटक व्यवहाराला कोरोनाच्या निमित्ताने आलेली ही एक कुंठितावस्था आहे, असं आपण म्हणू शकतो. एरवी व्यवहार सुरळीत असले की आपल्याला कुठल्या भवितव्याबद्दल किती प्रश्न पडतात ? सहसा पडत नाहीत. तेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावरचे प्रयोग सातत्याने सुरू होण्याची वाट पाहणं एवढंच तुर्तास आपल्या हाती उरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -