रंगकर्मी म्हणून घडताना…रंगभूमी घडवताना !!

थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत आमच्यासाठी प्रेक्षक सर्वात पहिला रंगकर्मी आहे. प्रत्येक प्रेक्षकाला नाटक बघताना हा माझा विषय आहे. माझ्या प्रश्नांविषयी नाटक भाष्य करते आहे. याची जाणीव होते. आणि आपल्याकडे विषयाला जाणून नाटक बघायला येणारे प्रेक्षक संस्कार आहेत. या प्रक्रियेत फेमस चेहरा पाहण्यापेक्षा संकल्पनेला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मी अनुभवले आहे. या सिद्धांतांतर्गत आम्ही कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद करून अशा प्रेक्षकांना रंगभूमीशी आणि नाटकाशी जोडले आहे ज्यांनी आयुष्यात नाटक कधी पाहिलेच नव्हते.

रंगभूमी! विविध रंगांनी सजलेली रंगभूमी. रंग म्हणजे विचार आणि विचारांचे कर्म करणारी माझी रंगभूमी. प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी म्हणजे त्याची जन्मभूमी. जिथे तो कलाकार म्हणून निर्माण होतो, जगतो. या रंगभूमीने असंख्य कलाकार घडवले आणि या विश्वाला पुरस्कृत केले. जसं आई आपल्या बाळाला घडवत जाते.त्यानंतर एक वेळ अशी येते की मूल आपल्या आईला जननी म्हणून घडवते. तसेच एक कलाकार म्हणून रंगभूमीला समृद्ध करणे आणि घडवणे हा कलाकाराच्या सृजनप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे.

मी रंगभूमीवर अभिनय करायला सुरुवात केली त्यावेळी अभिनयाचे ध्येय माझ्याकडे नव्हते. रंगभूमीचे आणि माझे नाते दृढ करण्याचा संकल्प नव्हता. रंगभूमीचा स्पर्श आणि माझा स्पर्श मला काय सांगतो याची जाणीव नव्हती. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेत मी कलेला आणि कलाकाराला नवीन दृष्टीने पाहू लागले. कला जी माणसाला माणूस म्हणून बनवते. कलाकार जो काळाला आकार देतो. ही नवीन दृष्टी मला एक व्यक्ती आणि एक कलाकार म्हणून अंतर्बाह्य सकारात्मक परिवर्तनासाठी प्रेरित करणारी ठरली. मुळात रंगभूमी माझी आणि मी रंगभूमीची ही संकल्पना जगण्याची सुरवात झाली.

कला म्हणजे केवळ मनोरंजन या सर्वात मोठ्या भ्रमाला एक कलाकार म्हणून मी ब्रेक केलेच त्यासोबत प्रेक्षकांच्या याच साच्यात बसवणार्‍या मानसिकतेलाही तोडले. समाजाचा आरसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाला वाचा फोडणारी, परिस्थितीला विश्लेषित करून तिला उलगडून जगण्याचा मार्ग दाखवणारी रंगभूमीची खरी ओळख थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेत मला जाणवली.

‘वैचारिक नाटक चालत नाही, केवळ विनोदी नाटक पाहायला प्रेक्षक येतो’ असे रंगभूमीला नष्ट करणारे भ्रम कोण पसरवतात? विचार करण्यास प्रेरित करणारी नाटके प्रतिबद्धतेने आम्ही करत आलो आहोत आणि अशी नाटकं पाहण्यासाठी प्रेक्षकवर्गही तयार केला आहे. मुळात नाटक म्हणजे विचार या तत्वाला समजून सृजना केली तर सृजनशील प्रेक्षक निर्माण होतात जे समाजाच्या उन्नतीसाठी आधार बनतात.

छेडछाड क्यों? ते लोकशास्त्र सावित्री या नाटकापर्यंतच्या प्रवासात असंख्य प्रेक्षक आम्हाला भेटले ज्यांनी या विवेकवादी, वैचारिक नाटकांचे मनःपूर्वक स्वागत केले. नाटकाला केवळ गल्लाभरू मानसिकतेने पाहून, कलेचा व्यापार करून, पोट भरण्यापुरता रंगभूमीला मर्यादित ठेवून रंगभूमी घडत नाही. रंगभूमीच्या मातीत प्रत्येक कलाकार अंकुरित होऊन वटवृक्ष बनतात. प्रेक्षक आपल्या आयुष्याचा तप्त उन्हात चालताना या वटवृक्षाच्या सावलीत शांत होतात. हे सावली बनण्याचे तत्व रंगभूमीला समृद्ध करते.

नाटकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची संकल्पना, विषय. ज्या ताकदीने, दृष्टीने विषय मांडला जातो प्रेक्षकांच्या मनात निरंतर प्रस्फुटित होत राहतो. नाटक म्हणजे केवळ ‘प्रसिद्ध चेहरा’ नाही. सिनेमा सिरीयलमधील कलाकार टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्याविषयी असलेले आकर्षण हे नाटकाचे केंद्रबिंदू ठरणे हे रंगभूमी आणि आपल्या सुजाण प्रेक्षकांविरुद्ध निर्माण केलेले जाळे आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत आमच्यासाठी प्रेक्षक सर्वात पहिला रंगकर्मी आहे. प्रत्येक प्रेक्षकाला नाटक बघताना हा माझा विषय आहे. माझ्या प्रश्नांविषयी नाटक भाष्य करते आहे. याची जाणीव होते. आणि आपल्याकडे विषयाला जाणून नाटक बघायला येणारे प्रेक्षक संस्कार आहेत. या प्रक्रियेत फेमस चेहरा पाहण्यापेक्षा संकल्पनेला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मी अनुभवले आहे. या सिद्धांतांतर्गत आम्ही कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद करून अशा प्रेक्षकांना रंगभूमीशी आणि नाटकाशी जोडले आहे ज्यांनी आयुष्यात नाटक कधी पाहिलेच नव्हते.

रंगभूमी, कलाकार आणि प्रेक्षक यांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे लेखक. आमच्यासाठी पहिले लेखक मग दिग्दर्शक त्यानंतर अभिनेता किंवा अभिनेत्री यांचा नंबर लागतो. दिग्दर्शक हा शब्द आपल्याला दिशा दर्शवणारा म्हणजे संहितेची दिशा दर्शवणारा असाच अर्थ सांगतो. आज रंगभूमीवर लेखकाला प्राधान्य किती दिले जाते हे प्रश्नचिन्ह आहे? लेखकाची संकल्पना साकारत रंगभूमीवर नाटक आकार घेते. विवेकवादी लेखक आणि त्याचे लेखन चालत नाही हेही भ्रम पसरवणारे नेमके कोण?

नक्कीच आपण म्हणतो की काही अपवाद असतात. अपवादात्मक वैचारिक नाटकं चालतात. पण मी मुख्यधारेविषयी बोलतेय. विचारांना अपवादात्मक बघणे म्हणजे आपल्या आयुष्याला एका साचेबद्ध चौकटीत पाहणे. एक कलाकार म्हणून नाटकाच्या समग्र आयमांना आम्ही समजत आहोत. अभिनयासोबत लिखाण, वाचन, चर्चा, संवाद आणि शोध. हे सगळे आयाम आम्हाला रंगभूमीला समजून घेण्यास प्रेरित करतात.

कलाकाराचे frustration किंवा कला एक प्रॉडक्ट आणि कलाकार फॅक्टरीचा वर्कर या बंधनातून मुक्त करण्यासाठी आम्ही रंगभूमीवर अनहद नाद unheard sounds of universe या नाटकाचे मंचन केले. एक ते दीड वर्ष स्वतःची कलात्मक अवधारणा, अभिनय, नाटक, रंगमंच यांचा नव्याने अभ्यास केला. आज किती नफा आणि माझा काय फायदा याच्या पलीकडे नजर जात नाही. रंगभूमीवरील काही नाटकांची नावे ही संकल्पना आधारित येतात का हा प्रश्न आहे? थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत अनहद नाद या नाटकातून कला आणि कलाकाराला खरेदी विक्रीच्या जाळ्यातून उन्मुक्त करण्याचा पुढाकार आम्ही घेतला. आणि हेच अंतिम सत्य आहे असेही नाही. कारण कलाकार म्हणजे सतत शोध. आमचा निरंतर शोध सुरू आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स अनुसार दोन तत्व महत्त्वाची-एक कलाकार आणि दुसरा प्रेक्षक. कलाकार आम्ही आहोत आणि प्रेक्षकांसाठी आम्ही थेट कोणत्याही बाजारू माध्यमाचा वापर न करता प्रेक्षकांशी संवाद साधला. कलेचे, रंगमंचाचे मूळ ध्येय काय आहे? यावर चर्चा करून प्रेक्षकांमध्ये रुजवलेल्या बाजाराने उभं केलेल्या एंटरटेनमेंटला खोडायचं होतं. कला आणि रंगमंचाचे ध्येय जाणणारे प्रेक्षक घडवायचे होते.

बर्‍याच वेळा मी ऐकत आले की वैचारिक म्हणजे प्रायोगिक नाटक, व्यावहारिक गणितं म्हणजे ते कमर्शियल नाटक. मुळात नाटक हे नाटक असतं. सगळ्या नाटकांना आर्थिक बाजू असते. प्रत्येक नाटक सामाजिक संदेश घेऊनच येते. त्यात प्रायोगिक किंवा व्यावसायिक किंवा सामाजिक प्रबोधन करणारे असे वेगवेगळे साचे का असावेत? अशा साच्यांमध्ये नाटकाला बसवून नाटकाचे मूळ ध्येय हरवते. नाटकाचे मूळ ध्येय माणुसकीला जागवणे, संविधान संमत समाज निर्माण करणे हे असावे. कलाकार जिथे उभा राहतो तिथे रंगमंच निर्माण करतो. त्यामुळे कलाकार म्हणून आम्ही नेपथ्य, lights, संगीत, वेशभूषा यात न अडकता अभिनय आणि विचारांनी रंगभूमीवर कल्पनाशक्तीने रंगविश्व उभारले.

नाटक पाहताना आलेल्या अनुभूतीला लगेच प्रकट करणारे प्रेक्षक या नाटकाच्या समग्रतेचे दृष्टिकोन उघडतात ही खरी समीक्षा. मुळात समीक्षण म्हणजे गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणे. नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे नेणे जास्त जरुरी आहे. नाटक या सार्‍याच्या पलीकडे आहे आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे पोहोचवते आणि व्यक्तीच्या अनुभवांच्या सीमा तोडून एक समज निर्माण करते. या प्रक्रियेत प्रत्येक नाट्यप्रस्तुती नंतर प्रेक्षकांना रंगमंचावर बोलावण्यात येते आणि विषयांशी संबंधित विचार प्रक्रिया संवादाच्या माध्यमातून होते. याने प्रेक्षक आणि कलाकार यांतील दरी संपुष्टात येऊन एक अनन्य साधारण नाते निर्माण होते. प्रेक्षक केवळ टाळ्या वाजवून निघून न जाता, थिएटर ऑफ रेलेवन्सच्या तत्वानुसार रंगकर्मी होऊन जातात आणि प्रक्रिया पुढे नेण्यास सहाय्यक ठरतात. एक व्यक्ती म्हणून, समाजातील एक घटक म्हणून प्रत्येक प्रेक्षक एक भूमिका निभावत आहेत. थिएटर ऑफ़ रेलेवन्सने प्रेक्षकांना नाटक पाहण्याची तात्विक दृष्टी दिली, की तुम्ही केवळ टाळ्या वाजवून निघून जाऊ नका तर रंगमंचावर येऊन नाटकाद्वारे अनुभवलेले स्पंदन, ऊर्जा संवाद साधून आपण पुन्हा एकत्र जगुया आणि या विश्वाला स्पंदीत करूया.

–अश्विनी नांदेडकर