घरफिचर्ससारांशअभिनेते ते नेते...एक भ्रमनिरास प्रवास

अभिनेते ते नेते…एक भ्रमनिरास प्रवास

Subscribe

तृणमूल काँग्रेसकडून 2014 ते 2016 या काळात राज्यसभा सदस्य राहिलेल्या मिथुनने भाजपप्रवेश केल्यावर बंगालच्या राजकारणावर त्याचा परिणाम काय होईल ते लवकरच दिसेल. पाच दशकांपूर्वी डाव्यांच्या चळवळीत अंगावर झेललेल्या हल्ल्यांच्या खुणा कौतुकाने दाखवणार्‍या मिथुने कमळ हातात धरल्यावर नेते आणि अभिनेत्यांचे पक्षबदलू राजकारण एकच असल्याच्या चर्चा सोशल माध्यमांवर रंगल्या. अभिनेते नेते होण्यामागचे हेतू हे कायम राजकीयच राहिले असल्याचा इतिहास आहे. अनेक अभिनेते हे नेते झाले, मात्र त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जणांनी सभागृहातील चर्चेत उल्लेखनीय सहभाग घेतला. तर केवळ पक्षाने व्हिप बजावल्यावर त्याच दिवशी बहुमतासाठी सभागृहात दाखल झालेल्यांची संख्याची जास्त आहे.

बोफोर्स प्रकरणात अमिताभचे नाव आल्यावर काँग्रेससोबत झालेल्या मतभेदातून अमिताभने समाजवादी पक्ष आणि अमरसिंहांशी जवळीक केली. त्यामुळे जुने मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी दुखावले होते. ऐंशीच्या दशकात दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अमिताभने राजीव गांधींना राजा आणि स्वतःला सामान्य प्रजा म्हणवून घेत या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. अमिताभ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मैत्रीचे किस्सेही राज्याच्या राजकारणात चर्चिले गेले. कुलीच्या सेटवर अमिताभला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका शिवसेनेची असल्याचे अमिताभने अनेकदा कौतुकाने सांगितले होते. राजकारणात गेल्यावर पूर्ण वेळ काँग्रेसशीच बांधिलकी जपलेल्या सुनील दत्त हे खूपच उशिराने काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री झाले.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्तला टाडाखाली अटक केल्यावर बाळासाहेबांनी राजकारणाबाहेर जाऊन सुनील दत्त संजय दत्तची पाठराखण करून आपली सुनील दत्तसोबत असलेली मैत्री जपली. हेमा मालिनींसाठी भाजपने मथुरेचा लोकसभा मतदारसंघ राखून ठेवला होता. हेमा मालिनींनी कृष्णभक्ती आणि पडद्यावर साकारलेली मीरा आणि राधेच्या व्यक्तीरेखा यामुळे मथुरेतून त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले. भाजपनेच गुरुदासपूरमधून धर्मेंद्र आणि पूत्र सन्नी देओल यांच्या निवडीची जबाबदारीही भाजपने खांद्यावर घेतली होती. केवळ ग्लॅमरच्या जोरावरच सत्तेची जागा पक्की करण्याचे राजकारण सर्वच पक्षांनी थोड्याफार फरकाने साध्य केले. भाजपचे जुने जाणते नेते राम नाईकांचा पराभव करणारा काँग्रेसकडून निवडणूक लढवणारा गोविंदा त्यानंतर सभागृहात फिरकलाच नाही. तर राजकारणात उतरून आपण चूक केल्याची उपरती त्याला खूप उशिराने झाली.

- Advertisement -

दक्षिणेकडील व्यक्तीकेंद्रित भावनिक आणि भडक राजकारणामुळे व्यक्ती किंवा विभूतीपूजेला कमालीचे महत्व असते. तिथं पडद्यावरचा हिरो प्रत्यक्ष जीवनातही बदल घडवणारा हिरोच असल्याची खात्री तिथं पक्की असते. अभिनेता आणि नेता असा फरक तिथं केला जात नसतो. त्यामुळेच तिथं नेते झालेल्या अभिनेत्याबाबत कमालीची संवेदनशीलता असते. नेता किंवा अभिनेत्याचा मृत्यू झाल्यास आत्महत्या करणार्‍या फॅन्स आणि कार्यकर्त्यांची संख्या दक्षिणेकडे तुलनेने जास्त असते. या संवेदनशीलता मतांच्या राजकारणात सहज बदलली जाते. जयललिता, चिरंजीवी ही त्यातलीच उदाहरणे. दक्षिणेकडे सुपरस्टार तिथल्या फॅन्सच्या जगण्याचा भाग झालेले असतात. त्यामुळेच जयललिता, एन. टी. रामाराव ही चित्रपटक्षेत्राशी निगडित नावे तिथे राजकारणातही कमालीची यशस्वी होतात.

पडद्यावरील स्टारडममधील लोकानुययाचे राजकीयकरण करणे दक्षिणेकडे तुलनेने सोपे असते. कमल हसनने मय्यकल निधी मय्यमची सूत्रे हाती घेतल्यावर त्याच्या राजकीय विधानांना कमालीचे महत्व येते ते त्यामुळेच. तामिळनाडूतील विधानसभेसाठी प्रयत्नात असलेल्या कमल हसनने राजधानीत सुरू असलेले देशव्यापी शेतकरी आंदोलन आणि केंद्राच्या आर्थिक धोरणातील दिशाहिनता त्याच्या सोशल मीडियावरील टीका टिप्पणीतून अचूक हेरली आहे. कमल हसन जरी राजकारण सक्रीय असला तरी राजकारण आपल्यासाठी नाही, अशी उपरती वेळेआधी दक्षिणेकडील रजनीकांतना वेळेआधी झाली, चित्रपटांना रामराम करून राजकीय पक्ष काढण्याची तयारी रजनीने सुरू केली होती. मात्र आरोग्याच्या कारणाने आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्याने वेळीच स्पष्ट केले.

- Advertisement -

विधानसभेसाठी राज्यांचा चेहरा स्पष्ट करणारे अभिनेते आवश्यक असतात. ही अर्हता मानली जाते. त्यामुळेच राज्याची संस्कृती, सीमावाद, भाषा, इतिहास यांचा विचार केंद्राच्या तुलनेत अधिक असतो. एक दोन दशकांपूर्वी उर्मिला मातोंडकरांनी, अभिनेत्री काजोलसमवेत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात उपस्थिती लावली होती, त्यावेळी मराठी नाट्य आणि संस्कृती, भाषेविषयी नाट्य संमेलनाच्या मंचावर उर्मिलाने तडाखेबंद विचार व्यक्त केले होते. त्यावेळीच मराठी वर्तमानपत्रांनी आणि राजकारणाने उर्मिलेचे कौतुक केले. त्या काळात मनसे आणि शिवसेना अशी विभागणी मराठी राजकारणाची झालेली नव्हती. नाट्य संमेलनाच्या मंचावरच उर्मिलेचा भविष्यातील राजकीय प्रवास संस्कृतीपासून भाषावादी राजकारणाच्या दिशेने होणार असल्याचे स्पष्ट झाले. परंतु घरात पुरोगामी, राष्ट्र सेवा दल आणि कामगार चळवळीची पार्श्वभूमी असल्याने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेनेत थेट सहभागी होणे शक्य नव्हते.

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाशी फारकत घेतलेल्या शिवसेने राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यावर उर्मिलाच्या राजकीय विचारनिर्णयातून हा धोका नाहीसा झाल्यावर पुढे काँग्रेसमार्गे शिवसेना हा उर्मिलाचा प्रवास सुकर झाला. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातही दादा कोंडकेंच्या मराठी सिनेमांसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली होती. शिवसेनेच्या तुलनेत मनसेच्या राज ठाकरेंनी मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रातील सिनेमागृहातील हिंदीचा पडदा बंद करून ही परंपरा पुढे नेली. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचे महत्व वादातीत आहे. परंतु राज ठाकरेंचे मित्र मानले जाणारे दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे शिवसेनेशीही जवळीक असल्याने मांजरेकर नक्की कुणाचे…अशा आशयाच्या बातम्या विधानसभेसच्या निवडणुकीआधी छापल्या गेल्या होत्या. तर राज ठाकरेंशीच असलेल्या मैत्रीमुळे नाट्य अभिनेते विनय येडेकर ‘मातोश्री’च्या दारात म्हणजेच बांदरा पूर्व मतदारसंघात मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. विधानसभेच्या निवडणुकीआधी नाना पाटेकर शिवसेनेत दाखल होण्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्याला नानाने कधी दुजोरा दिला नाही. सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत. मात्र राजकारणात थेट उतरण्याचा आपला विचार नसल्याचे नानाने स्पष्ट केले.

सुशांत सिंह आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या समाजमाध्यमातील विधानांना महत्व आले. कंगनाच्या विधानांना राजकीय वळण देण्यात भाजपने यश मिळवले आणि कंगना भाजपची प्रवक्ती असल्याचा आरोप झाला. त्यातून पुढे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप आणि अखत्यारित असलेल्या यंत्रणांमध्ये शीतयुद्ध रंगले. कंगनावर मुंबई महापालिकेची झालेली कारवाई आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांबाबत केंद्रातील आर्थिक तपास यंत्रणांकडून झालेल्या कारवाया या केंद्र आणि राज्यातील तपास यंत्रणांच्या राजकीयीकरणाचा भाग असल्याचे आरोप होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, परेश रावल यांनी मोदी आणि केंद्र सरकारचे समर्थन केल्यावर त्यांच्यावरही विरोधकांनी टीका केली. एफटीआयमधील गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरून झालेला वादंग हे या संस्थांच्या राजकीयीकरणाचे उदाहरणच होते. केंद्रीय सत्तेच्या बाजूने असलेले सुरेश ऑबेरॉय, मनोज कुमार, स्मृती इराणी यांचा गट एका बाजूला तर राज बब्बर, उर्मिला, स्वरा भास्कर, जावेद अख्तर आदी मंडळी दुसर्‍या बाजूला अशी ही हिंदी पडद्याची आज विभागणी आहे.

कार्यकाल संपत असताना राज्यसभेत आपले अखेरचे भाषण करताना ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी केलेले भाषण नेते आणि अभिनेत्यांमधील राजकीय फरक संपवून माणूस म्हणून दोघांना एकाच समपातळीवर आणण्यासाठी मोलाचे आहे. अख्तर म्हणाले, आपल्या देशात सत्ताधारी आणि विरोधकही एकाच सभागृहात समोरासमोर बसतात, ही आपल्या लोकशाहीची मजबूत बाजू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक लोकशाही, आर्थिक धोरणे, मनुष्यबळ आपल्याकडे मुबलक आहे. तरीसुद्धा भूकबळी, अत्याचार, भ्रष्टाचार, दंगली, जात आणि धार्मिक गटवाद्यांकडून होणारी हिंसा आपल्या देशात चिंतेचा प्रश्न आहे. आपली लोकशाही आणि राज्यघटना जगात आदर्श मानली जात असली तरी आपल्याच देशात निर्माण झालेले आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावीच लागतील, या प्रश्नांपासून आपल्याला पळून जाता येणार नाही. या प्रश्नांची जाणीव असणं महत्वाचे आहे. नेते आणि अभिनेत्यांच्या पलिकडे जाऊन देशाचा एक सजग नागरिक आणि माणूस होणं जास्त महत्वाचं आहे. अभिनेते जरी सत्तेसाठी नेते होत असले तरी त्यांनी हे माणूसपण जपायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -