उगा शिक्षा माझ्या कपाळी

हिमालयातील ट्रेक्स किंवा शिखरांवरील आरोहणात नैसर्गिक जास्त आणि मानवी चुकांमुळेसुद्धा अपघात घडण्याची शक्यता तिथे बहुतांश संभवते. पण,सह्याद्रीमध्ये निसर्ग पूर्णतः अनुकूल असतो. वादळ-विजा-वारा-अतिवृष्टी पाऊसपाणी-पूर-भूसख्खलन-वणवा अशी अनेक नैसर्गिक काही कारणे असलीत तरीही ती अकस्मात टपकत नाहीत. त्याची चाहूल आणि सावरण्यास पुरेसा वेळ उपलब्ध असतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या कारणांमुळे सह्याद्रीत अपघात झाल्याची उदाहरणे अजूनपर्यंत तरी कुणी दिलेली नाहीत आणि पुढेही कुणी देऊ नयेत. तशी कारणे कुणी आयोजकांनी दिलीच तर पहिला बेशक त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, नंतर अपघाती कारणांचा शोध घ्यावा.

काल-परवाच राजगड-राजमाची-चंदेरी गडांवरील युवकांच्या मृत्यूने काही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेयत. बरोब्बर वर्षापूर्वी अरुण सावंतसारख्या दिग्गज गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू होतो, पण त्या घटनेची नेमकी कारणमीमांसा फोड न केल्याने लोकमनात गिर्यारोहण म्हणजे अपघात-मृत्यू यावर जणू शिक्कामोर्तब होते. एवढी बेफिकीरता ?
गिर्यारोहणासारखे सर्वांगसुंदर क्रीडा क्षेत्र या अशा अपघाती मृत्यूमुळे काळवंडले जातेय का? अशा कोणत्या कारणांमुळे हे अपघात होतायत, ज्याला पायबंद घातला जाऊ शकत नाही ?
या क्षेत्राला कुणीच वाली नाहीय का ?
एक ना अनेक प्रश्नांच्या घेर्‍यात आज गिर्यारोहण क्षेत्र उभे आहे. मृत्यू झालेल्या युवकांच्या पालकांनाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला याची उत्तरं द्यावीच लागतील.
पण याची उत्तरं देणार कोण ?
लेखाच्या सुरुवातीची तिन्ही कारणे, या घटनांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार आहेत.
गिर्यारोहणातील एखाद्या अपघाताची बातमीही ‘ठळक न्यूज’ बनते. याचा अर्थ गिर्यारोहण क्षेत्राचा दबदबा, त्या साहसी क्रीडा प्रकाराचे आकर्षण आणि निसर्गाची आवड तरुणांमध्ये अधिक असल्याचे मान्य करावयासच लागेल. मग ते प्रस्तरारोहणाचे साहस असो अथवा निसर्ग-किल्ल्यांवरील भटकंती असो.
मात्र,गिर्यारोहण या सहज सुंदर छंदामागे जेवढी जोखीम आहे तेवढेच त्यामागे-पुढे शास्त्र-तंत्र आहे. ते अवगत असणे अत्यावश्यक होय.तरच यातील सर्वोच्च आनंद शिखराच्या उंचीस भिडतो.
आज भारतात अतिशय उच्च प्रतीचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत. जिथे देशातीलच नव्हे तर परदेशातील गिर्यारोहक भारतात येऊन महिनाभराचे तेही बेसीक प्रशिक्षण घेतायत.त्यापुढील ऍडव्हान्स, सर्च अँड रेस्क्यू, मेथड ऑफ इन्स्ट्रुक्टर हे प्रशिक्षण ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार किंवा हिमालयातील शिखर चढाई मोहिमा करावयाच्या असल्यास किंवा करिअर म्हणून करावयाचे असल्यास घेतले जाते.
याचा अर्थ, गिर्यारोहण हे म्हणतोय तेवढे सोप्पे किंवा टाइमपास क्षेत्र नक्कीच नव्हेय.
मात्र,अलीकडे नवख्यांकडून माहिती वा प्रशिक्षणाविना होत असलेल्या काही ट्रेक्स मोहिमा आणि कुणीही अगदी गावपाड्यातही माफक अनुभवावर आयोजित करीत असलेले धंदेवाईक साहसी कार्यक्रम त्यामुळे अपघाताच्या शक्यता आणि घटना वाढीस लागतायत.याची झळ गिर्यारोहण क्षेत्रास बसतेय.
अपघाताची काही ठळक कारणे अगोदर लक्षात आणू देतो.एकतर नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे आपल्याच मानवी चुकांमुळे.

हिमालयातील ट्रेक्स किंवा शिखरांवरील आरोहणात नैसर्गिक जास्त आणि मानवी चुकांमुळेसुद्धा अपघात घडण्याची शक्यता तिथे बहुतांश संभवते. पण,सह्याद्रीमध्ये निसर्ग पूर्णतः अनुकूल असतो. वादळ-विजा-वारा-अतिवृष्टी पाऊसपाणी-पूर-भूसख्खलन-वणवा अशी अनेक नैसर्गिक काही कारणे असलीत तरीही ती अकस्मात टपकत नाहीत. त्याची चाहूल आणि सावरण्यास पुरेसा वेळ उपलब्ध असतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या कारणांमुळे सह्याद्रीत अपघात झाल्याची उदाहरणे अजूनपर्यंत तरी कुणी दिलेली नाहीत आणि पुढेही कुणी देऊ नयेत. तशी कारणे कुणी आयोजकांनी दिलीच तर पहिला बेशक त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, नंतर अपघाती कारणांचा शोध घ्यावा.

सह्याद्री मधील आत्तापर्यंतच्या काही मृत्यू घटनांच्या मागील कारणे आणि मानवी चुकाच कशा भोवल्यात त्याची काही उदाहरणे देतो.

एखादा गिरीदुर्गावरील ट्रेकसुद्धा आता अपघाती स्थळ होतो. कारण बहुतांश किल्ल्यांची प्रवेशद्वारे शेवटच्या मराठे ब्रिटिश संघर्षात ब्रिटिशांनी तोफा डागुन उध्वस्त केल्यामुळे आजही किल्ल्यांच्या माथ्यावर जाणे इतिहासप्रेमींस अवघड होतेय. तर काही किल्ल्यांचे चढ मार्ग वारा-वादळ-पावसाच्या मार्‍यात अधिकच दुर्गम झालेयत. बहुतांश म्हटल्यावर उदाहरणे किती म्हणून द्यायची? हडसर, हरिहर, राजदेर, चांदवड, जीवधन, गोरक्ष गड,मदनगड,श्री मलंगगड एक ना अनेक. चांदवड -मदनगडाचा सुरुवातीचा टप्पा, श्रीमलंग गडाची कुराणबावडी कडूनची उभी नाळ, इखारियाची चिमणी प्रस्तरारोहणहे, जीवघेणे साहस ठरते.

अश्या किल्ल्यांवर तिथवर पोहोचलोय म्हणून उर्वरित साहस करायचे असे वाटून कुणी प्रयत्न केल्यास फक्त आणि फक्त अपघातच होणार. त्यातही मूलभूत प्रशिक्षण आणि रोप्स-हारनेससारखे साहित्य असेल तर निभवता येईल. पण नसेल तर काय? मग तो प्रयत्न करणे म्हणजे प्रथम चूक होय.

काही वेळेस फाजील आत्मविश्वास यामुळे लिंगाणासारख्या शिखरांवरसुद्धा अपघात झालेयत. प्रस्तरारोहणात लिंगाणा क्लाइंबिंग सोप्पी श्रेणी असली तरीही ती ऍडेड प्रकारात मोडते. म्हणजेच फ्री क्लाइंबिंग करीत अधेमधे पिटन्स, पेग्स कातळभिंतीत मारीत त्यात रोप अँकर करीतच शिखर माथा गाठावयास हवा. कारण 900 फूट उंची दरम्यान कुठेही हातपाय निसटलाच तरीही तुम्हीं रोपमुळे सुरक्षित असाल. जर रोप नसेल तर मृत्यूचही दुसरी चूक. लिंगाण्यावरून संतोष गुर्जरचा अपघात या प्रकारातील होता.

प्रस्तरारोहण मोहिमांत गेल्या काही दशकात चुका झाल्याचे प्रकार दिसणार नाहीत. कोकणकड्याच्या किंवा वाघदरी-ड्युक्स नोज,बाण,वांदरलिंगीसारख्या महाकाय बेलाग-बुलंद शिखरांवर गिर्यारोहकांनी अगदी लीलया बाजी मारलीय. कारण शिखर प्रस्तरारोहण करणारा हा यातील सर्व तंत्र शास्त्र जोखलेला परिपूर्ण आरोहक असतो. शिवाय बिले मुळे हवी ती रिस्क घेण्याचे कसब आरोहकापाशी असते.आम्हीं ती घेतो. त्यामुळे चढाई करता करता कितीही उंचीचा फॉल झाला तरीही फॉलिंग टेक्निक घेत बिलेवर सुरक्षित असतो. मात्र इथेही आरोहक, बिलेमन आणि सपोर्ट टीम यांचे वैयक्तिक बिले स्वतंत्र वेगवेगळेच असावयास हवेत.(कोणत्यातरी हॉलिवूड मुव्हीत एकाच रोपवर सगळे क्लाइंबिंग करीत असतानाचे दाखविलेय मग फॉल होतो आणि एक एक करीत मृत्यू होतो हे सर्वस्वी चुकीचे स्टंटस दाखविलेत. ते केवळ सिनेमापुरता एकवेळ समजू शकतो. पण प्रत्यक्ष तसे नसते.) काही वर्षांपूर्वी माथेरान वन ट्री पॉइंटवर झालेला तिघांचा मृत्यू या प्रकारातील होता.
(बिले प्लेटवर फॉल कंट्रोल होत असल्याने प्रस्तरारोहक एखाद्या रूफ एजवर किंवा ओव्हर हँगवर काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीचेही आरोहण प्रत्यक्षात करीत असतो. तेच तर या खेळातील जोखमीचे पण स-भान साहस असते.)
काही अपघात तर अगदीच क्षुल्लक अशा ठिकाणी आणि त्याहून जास्त क्षुल्लक कारणांमुळे झालेयत.

काही संस्थांच्या आयोजनात शिबीरार्थी संख्या जास्त वाढविण्याचा अट्टाहास, हे सुध्दा एक कारण होय. शिबिरातील मुलांची काळजी न घेतली गेल्याने सुद्धा मृत्यू ओढवल्याची आपल्याकडे उदाहरणे आहेत. जसे राजमाची किल्ल्यावर पूर्वी सचिन वाड या विद्यार्थ्यांचा किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात पडून झालेला किंवा परवा राजमाचीच्या तलावात युवकाचा झालेला मृत्यू, रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्र भुयाराकडे जात असताना दया भोसले-मिलिंद ठाकुरचा समुद्राच्या लाटेत झालेला मृत्यू या दुर्घटना त्या त्या आयोजक संस्थेच्या निष्काळजीपणा मुळेच झाल्या होत्या.

काही अपघात तर गडांवरच्या वाटा चुकल्याने जसे, माहुली-चंदेरी गडांवर झालेत. सोबत पुरेसे पाणी नसल्याने जसे हरिश्चंद्रगडाच्या बेलपाडा-नळीच्या अवघड वाटेवर झालेत. आणि काहीवेळा तर साधी सामान्य चूक सुद्धा भोवू शकते, हे मागील वर्षीच अरुण सावंतच्या दुर्दैवी मृत्यूने अधिक अधोरेखित केली गेलीय. आपला कितीही वर्षांचा कितीही खोली-उंचीचा या क्षेत्रातील अनुभव असुदेत, पण साधी चूकही ती सावरण्यासाठी इथे वेळ देत नाही. गाफीलतेने बिले न घेतल्याने पायाखालील वाळू पुळण माती मिश्रित स्क्रि वरून पाय निसटल्याने झालेला हा फॉल.
माझ्या 32 वर्षांच्या अनुभवावर मी खात्रीने सांगतोय, गिर्यारोहणातील अपघात हे मानवी चुकांमुळे झालेयत.तिथे निसर्गाला किंवा संपूर्ण गिर्यारोहण साहसी क्षेत्राला दोष अजिबात देऊ नये.
दोष द्यायचाच तर त्या त्या संस्थेला देऊन वेळीच अशांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. म्हणजे पुढे अधिक सावधानता घेण्यास प्रत्येकजण बांधील झाला असता.
गिर्यारोहणाशी संबंधित त्या त्या घटनेवर त्वरित अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने त्या घटनेचा खुलासा न करणे हीसुद्धा चूकच होय. महासंघानेच अशा दुर्दैवी घटनांच्या नंतर त्या दोषी संस्थांवर बंदी आणावयास हवी होती. किंबहुना पालकांना सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावयास लावून न्याय मिळवून द्यावयास हवे होते. पण असे झाले नाही. कारण वाईटपणा घेणार कोण ?ही सुद्धा चूकच होय.
मी स्वतः याच क्षेत्रात असूनही काही वर्षांपूर्वी अशा घटनांवर लिहून माझे कर्तव्य बजावत असता धमक्यांना सामोरा गेलोय. ज्या क्षेत्राने नाव गाव सन्मान ओळख दिलीय त्या क्षेत्राप्रति माझे कर्तव्य बनते.
बेशिस्त व्यावसायिक वृत्तीवर आळाही बसलाच पाहिजे आणि दुर्दैवी घटनांही थांबल्या पाहिजेत तरच गिर्यारोहण क्षेत्राकडे लोकं साशंकतेने पहाणार नाहीत.
आज जागतिक स्तरावरील जैववैविध्यतेवरील कोणतेही संशोधन घ्या, त्याचा मूळ पाया गिर्यारोहणातील खडतर प्रशिक्षण,अनुभव होय. इतके सर्वतोपरी सुंदर साहसी क्रीडा क्षेत्र असतांही, गिर्यारोहणातील मृत्यूची बातमी अधिक ठळक होते आणि घायाळ करते.
तरीही गिर्यारोहण संस्था, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ एखादे गिरीमित्र संमेलन किंवा शोकसभा घेण्यापलीकडे काहीच करीत नाही हा उघड संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.
कारण, दुर्दैवी मृत्यू घटनांना पायबंद घालण्यासाठी काहीच कारवाई होत नाही हा अक्षम्य दोषच होय.
हा दोष तुमचा नाही तर कुणा सामान्य अनभिज्ञ लोकांचा का ?
याची उत्तरं तुम्हालाच द्यावी लागतील.
वर्षानुवर्षे हे असेच चाललेय. कारण, चालवून घेणारे मातब्बर गिर्यारोहक-गिरिप्रेमी या घटनांकडे ‘आपण भलं,आपलं भलं’ या पलीकडे तितकेसे गांभीर्याने पहात नाहीयत आणि गिर्यारोहकांमध्ये एकवाक्यतेचा अभाव म्हणून हे गिर्यारोहणासारखे सुंदर क्रीडा क्षेत्र बदनाम करण्यात नकारात्मक चर्चेचासुध्दा वावर मुक्तपणे होतोय.

शिबीर आयोजक नेतृत्वाने-टीमने गिर्यारोहणातील मूलभूत शास्त्र तंत्राचे प्रशिक्षण घ्यावयासच हवे, हा नियमच करावयास हवा. जे केवळ निसर्ग-इतिहास भ्रमंतीसाठी जातायत त्यांनी आपण जिथे जातोय त्या किल्ला-शिखर परिसराची, ट्रेक्स आयोजन करणार्‍या संस्थेच्या अनुभवाची, नेतृत्व-पूर्वतयारी-पुरेसे साहित्य-अत्यावश्यक औषधे-स्थानिक ग्रामस्थ या सर्वच बाबतीत पूर्ण माहिती आगाऊ मिळवणे आवश्यक असते. तेव्हाच मग निसर्गानुभूती सर्वोत्तमच मिळेल यात संदेह नाही.

बाकी किती संख्येने किल्ल्यांवर जावे किंवा जाऊ नये हे गिर्यारोहक संस्थांना किंवा निसर्ग इतिहास प्रेमी युवकांना शिकवण्याचा शासनाने प्रयत्न करू नये. निसर्गाच्या सानिध्यात किंवा इतिहासाच्या ध्यासातून, इथे शारीरिक-मानसिक कष्ट घेऊन येणारे नक्कीच फॅड म्हणून येत नाहीत. यात विविध विषयांचे अभ्यासक-संशोधक उपासक असतात. किंबहुना ‘शिवमंत्रा’मुळे भारावून जाऊन बर्‍याच किल्ल्यांवर, निकटच्या गाव-वस्त्यांवर याच दुर्ग-साहस प्रेमी गिर्यारोहण संस्था अनेक विधायक, समाज उपयोगी कामेही करीत आहेत. त्यामुळे शासकीय स्तरावर या साहसी क्षेत्रावर निर्बंध आणण्याचाही कुणी प्रयत्न करू नये.

यापुढे तरी महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांनी आपले अहंभाव बाजूस ठेवून आपापल्या वेगवेगळ्या चुली न मांडता एकत्रितपणे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे काम अधिक कार्यक्षम करणे अत्यावश्यक झालेय. जिथे राज्यातील प्रत्येक गिर्यारोहण संस्थेची स-शुल्क नोंदणी होईल. अशा शिखर संघटनेकडे प्रत्येक संस्थेच्या शिबीर- ट्रेक्स मोहिमांची पूर्व आणि पश्चात नोंद होईल. गरज पडल्यास त्यांना हवेच तर अत्यावश्यक मार्गदर्शन-साहित्य उपलब्ध होईल.जे कुणी या शिखर संस्थेशी संलग्न वा बांधील होणार नाहीत त्यांची धर्मादाय तक्रार करून ठेवावी.

जे आवश्यक ते घडत नाहीय आणि नको त्या गोष्टींचा शिरकाव, म्हणूनच दुर्दैवी घटना झाल्यायत. हा दोष स्वीकारून त्वरित बदल घडवावा आणि तो दिसावा.तर आणि तरच या सर्वांग सुंदर गिर्यारोहण क्षेत्राचे भले होईल.तो,सुदिन लवकरच यावा. नव्हे, येईलच अशी आशा करूया !