घरफिचर्ससारांशसमतोल पर्यावरणाचा विचार !

समतोल पर्यावरणाचा विचार !

Subscribe

जे निसर्गत: आपल्याला प्राप्त आहे मग त्याचा बिनधास्तपणे हवा तेवढा आणि हवा तसा वापर करा, अशी अत्यंत चुकीची मनोवृत्ती बहुतांश अंशी आपल्याकडे दुर्दैवाने रूजल्याचे पाहायला मिळते. केवळ याच सवयीमुळे आज ‘पाणी जपून वापरा’ अशा आशयाची जनजागृती आपल्याला करावी लागते. सुंदर निर्मळ आणि मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत जीवन जगण्याचा जसा आपल्याला अधिकार आहे तसाच तो येणार्‍या पिढ्यांनाही आहे या दृष्टिकोनातून विचार करायला आपण कधी शिकणार आहोत? ज्या दिवशी या दृष्टिकोनातून माणूस विचार करण्यास आरंभ करेल तो दिवस म्हणजे समतोल पर्यावरणाच्या दिशेने माणसाचे पडलेले पहिले पाऊल असेल.

-अमोल पाटील

‘निसर्ग आपली भूक भागवतो हाव नाही’ हे लहानपणापासून ऐकत व वाचत आलेले वाक्य जर माणसाने नीट समजून घेतले असते तर आज जो काही निसर्गाचा व पर्यायाने पर्यावरणाचा र्‍हास झालेला पाहायला मिळत आहे तो दिसला नसता. निसर्ग जेवढा आबाधित, सुंदर, सक्षम व निर्मळ राहील तेवढीच अखिल जीवसृष्टी आबाधित व सक्षम राहील हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असतानाही माणसाकडून नैसर्गिक प्रक्रियेत होत चाललेली ढवळाढवळ, इथल्या पर्यावरणावर वारंवार होत असलेले आक्रमण आणि स्वहस्ते स्वजीवनात निर्माण करून घेतलेले प्रदूषणासारखे महाभयंकर आव्हान व त्यातून निर्माण होत चाललेले हवामानबदल असे हे सारे आजचे भीषण वास्तव आहे.

- Advertisement -

ज्यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर ही समस्या आणखी रौद्र रूप धारण करू शकेल. आज माणसाच्या जीवनातील आजार दूषित हवामान आणि दूषित पाण्यामुळे एकंदरीत हवा, जल आणि ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे भयंकर प्रमाणात होत चाललेली लोकसंख्या वाढ आणि दुसरीकडे माणूस आपल्या अज्ञानामुळे या निसर्ग प्रक्रियेत झपाट्याने करत असलेला हस्तक्षेप, यामुळे एकंदरीत पर्यावरणीय समतोल ढासळल्याचे प्राथमिक निरीक्षण आपल्या लक्षात येईल.

निसर्गाच्या नियमाला अनुसरून म्हणजेच निसर्गाशी सुसंगत जीवन जगल्यानंतर माणसाच्या जीवनात नंदनवन फुलते, परंतु जेव्हा हेच निसर्गनियम डावलून माणूस जगू पाहतो तेव्हा त्यांच्या जीवनात रोज काहीतरी भयंकर घडल्याशिवाय राहत नाही. कमालीची होत चाललेली तापमानवाढ, पूर, अतिवृष्टी, वादळे, भूस्खलन, ढगफुटी, प्रदूषण वाढ, उष्णतेची तर कधी थंडीची लाट हे सारे पर्यावरणाच्या दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या समतोलामुळे निर्माण होत चाललेली नैसर्गिक संकटे आहेत हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही.

- Advertisement -

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका जर सध्यस्थितीत कुणाला बसत असेल तर तो शेतकरी वर्गाला बसत आहे. यामुळेच शेतकर्‍यांना कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. पेरणी केल्यानंतर मेघराजाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा हा जेव्हा वेळेवर पाऊस पडत नाही तेव्हा हताश होतो आणि पेरल्यानंतर योग्य वेळी जर पावसाचे आगमनच झाले नाही तर नाईलाजाने त्याला दुबार पेरणीचाही सामना करावा लागतो. पेरणार नाही तर खाणार काय अशी दुहेरी समस्या असताना आपसुकच तो कर्जबाजारी होतो.

कसेबसे पेरून झाले तरी त्या पिकाची रास होऊन धान्य घरी येईपर्यंत काही भरवसा नसतो. अतिवृष्टी झाली तर मुखाशी आलेलं हेच धान्य डोळ्यांदेखत वाहून जाताना पाहण्याची वेदना त्या बळीराजाला सहन करावी लागते. शेती व्यवसाय अडचणीत सापडण्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी एक कारण हे हवामानबदल आहे हे अभ्यासाअंती लक्षात येईल. महापुराच्या वेळेस गावेच्या गावे बेघर होतात. भूस्खलनामुळे अनेक गावं, घरं ही नेस्तनाबूत झालेल्या घटना ताज्या आहेत. दूषित हवेमुळे कितीतरी श्वसनासंबंधीचे आजार माणसाला होत आहेत. जे हवा प्रदूषणाबाबत आहे तेच ध्वनी प्रदूषणाचेही आहे. हे सारे घटक आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत.

जे निसर्गत: आपल्याला प्राप्त आहे मग त्याचा बिनधास्तपणे हवा तेवढा आणि हवा तसा वापर करा, अशी अत्यंत चुकीची मनोवृत्ती बहुतांश अंशी आपल्याकडे दुर्दैवाने रूजल्याचे पाहायला मिळते. केवळ याच सवयीमुळे आज ‘पाणी जपून वापरा’ अशा आशयाची जनजागृती आपल्याला करावी लागते. सुंदर, निर्मळ आणि मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत जीवन जगण्याचा जसा आपल्याला अधिकार आहे.

तसाच तो येणार्‍या पिढ्यांनाही आहे या दृष्टिकोनातून विचार करायला आपण कधी शिकणार आहोत? ज्या दिवशी या दृष्टिकोनातून माणूस विचार करण्यास आरंभ करेल तो दिवस म्हणजे समतोल पर्यावरणाच्या दिशेने माणसाचे पडलेले पहिले पाऊल असेल असे म्हणायला हरकत नाही. कारण साधारणपणे जिथे समस्यांचा उगम असतो काही अंगी त्याच ठिकाणी त्या समस्येचे उपायही नीट शोधता सापडण्याची दाट शक्यता असते.

शहरातील कट्ट्याकट्ट्यावरील मैत्रीपूर्ण अनौपचारिक गप्पांमध्ये गावच्या निरागस आणि निर्मळ जीवनाचे गोडवे गाणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविडनंतर कित्येक जणांनी आपलं बस्तान गावाकडे ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत हलवल्याची अनेक उदाहरणे सापडतील. वर्क फ्रॉम होम करणार्‍यांची संख्या यात उल्लेखनीय आहे. एकेकाळी शहरी जीवनाचे स्वप्न मनी बाळगणारी तरुण मंडळी आज आपली पावलं ग्रामीण जीवनशैलीकडे आवडीने वळवताना दिसण्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी अजून तरी गावाकडे शहरी जीवनमानाच्या तुलनेने असलेलं निर्मळ पर्यावरण, मोकळी हवा, शुद्ध पाणी आणि शेती व त्यातील उत्पादनाचा थेट संबंध निश्चितच आहे.

विशेषत: शहरी जीवनात आजकालच्या भेसळसंदर्भातील ऐकण्यात व वाचण्यात येणार्‍या घटना पाहता कितीही पैसे मोजले तरी आपण घेत असलेले दूध आदी पदार्थ हे भेसळयुक्त असणार नाही ना? हे सांगणे आवघड आहे. मुंबईसारख्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतात. नियमितपणे पैसे खर्च करूनही त्यांना सुखाचा प्रवास मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

समस्यांचे रडगाणे गात बसण्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठीची धडपड व सुस्थितीकडे झेपावण्यासाठीचे प्रयत्न करणे कधीही उचितच मानले पाहिजे. अलीकडे माणसे परस्परांचे वाढदिवस आनंदाने साजरे करताना पाहायला मिळतात. या वाढदिवसाला एकमेकांना भेटी देण्याचा नवा पायंडा जोमाने सुरू असलेलाही आपल्याला पाहायला मिळतो.

या भेटीमध्ये पुस्तक भेट देणे जसे आदर्शवत मानले गेले तसे पुस्तकासोबत एखादे रोपटेही दिले गेले पाहिजे आणि हा प्रयोग ज्यांनी कुणी केला असेल किंवा भविष्यात करणार असतील त्यांची ही कृती निसर्गाप्रति आणि ज्ञानाप्रति कृतज्ञतेची ठरणारी आहे हे प्रांजळ सत्य आहे. जेव्हा विशेषत: तरुणाईला वाचनाचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटेल व ते त्या दिशेने कृतियुक्त पावले उचलतील तेव्हा या विश्वाचे ज्ञान आणि आनंदाच्या क्षेत्रात नंदनवन फुलायला वेळ लागणार नाही हे खरे.

जन्मभर निसर्गाकडून घेऊन जीवन जगणारे आपण जेव्हा आपल्या कृतीतून वृक्ष लागवड, स्वच्छता, ध्वनी, हवा व जलप्रदूषण रोखण्यासाठीच्या आवश्यक नियमाचे पालन, झाडे, नदी, शेती, डोंगर, मैदाने, पशुपक्षी आदी सर्वांच्या निकोप संवर्धनाची जबाबदारी समजून घेऊ तेव्हाच आपण निसर्गाप्रति कृतज्ञ ठरू, अन्यथा या बाबींचे भान न ठेवता सुसाट बेभान होऊन जगलेले जीवन हे निसर्गावर आक्रमण करणारे ठरेल.

अशा वर्तनाद्वारे केलेले निसर्ग प्रक्रियेतील आक्रमण म्हणजे माणसाने माणसाचे जगणे स्वहस्ते निसर्ग संकटांना आमंत्रण देऊन उद्ध्वस्त केले. हे ओळखून वेळीच सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे भान एका उन्नत मानव जीवनासाठी, शांत, निवांत, आनंददायी विश्वासाठी आवश्यक आहे, प्रत्येकाने हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

निसर्गाकडुनी भरपूर घेतले
आता वेळ तया देण्याची
वृक्षतोडऐवजी वृक्ष लागवड
ही कृती पर्यावरण समृद्धीची

-(लेखक पर्यावरण विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -