घरफिचर्ससारांशप्रदूषणमुक्त दीपोत्सव !

प्रदूषणमुक्त दीपोत्सव !

Subscribe

भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे. निसर्गाची पूजा करणारी आपली संस्कृती असताना आपण निसर्गाचा विध्वंस का बरे करत आहोत? फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. वायू प्रदूषणाबरोबरच दिवाळीत ध्वनी प्रदूषण वाढतं. फटाके जाळल्यानंतर 125 डेसिबल पेक्षाही मोठ्या प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातलेली आहे.मात्र , तरीही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर होताना दिसतो.

दीपोत्सव ….भारतीय हिंदू संस्कृतीमधील एक प्रकाशाचा उत्सव. एका पणतीने दुसर्‍या पणतीला चेतवून प्रकाशाने अंधःकार भेदत प्रकाशाच्या पाऊलवाटा समाजाला दाखवून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे क्षितिजापार गगनभरारी घेण्याची जिद्द मनात निर्माण करणारा सण, उत्सव म्हणजे दिवाळी, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात !’ अशी विश्वात्मक प्रार्थना करणार्‍या समुदायाचा विचारधन सण म्हणजे दिवाळी !!

आनंदाची लयलूट, प्रचंड उत्साह, सकारात्मक आशावाद, क्षितिजापार झेपावण्याची जिद्द देणार्‍या या वर्षीच्या दीपावलीला मात्र एक दुःखाची, वेदनेची किनार आहे, मनात एक विलक्षण दुःखाची सल आहे. भळभळती जखम घेऊन फिरणार्‍या अश्वत्थाम्याच्या वेदनेची सल, दुःख घेऊन ही दिवाळी समोर आली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीने आपल्या परिघातील कुणीतरी मित्र, नातेवाईक अचानक आपल्यातून निघून गेला आहे. अचानक वीज कोसळावी व होत्याचे नव्हते असे होऊन जावे, सर्व संसार उघड्यावर पडावा, असे भयावह चित्र निर्माण झाले आहे. कुणाची तरी पत्नी, बहीण, कुणाची तरी मुले उघड्यावर पडली आहेत.

- Advertisement -

प्रचंड वेदनेची ही सल घेऊन येणार्‍या या दीपोत्सवाला आपल्याला काहीतरी दुर्दम्य आशावाद, इच्छाशक्ती घेऊन सामोरे जायचे आहे. संसार उघड्यावर पडलेल्या आपल्या भगिनींना सक्षम करण्यासाठी काहीतरी खारीचा वाटा उचलायचा आहे. त्यातून दोन हेतू साध्य होतील, एक-कुणाच्यातरी जीवनात आपण प्रकाश निर्माण करू, दोन- फटाकेमुक्त अर्थात प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून आपण पर्यावरणाला हातभार लावू. यात अनेक फायदे आहेत. आपल्याकडून समाजात चांगला संदेश जाईल. आणि आपल्या पाठीशी कुणीतरी उभे आहेत याची जाणीव या लोकांना झाली की त्यांची जगण्याची उमेद वाढेल. या दीपोत्सवातही आपल्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ आहेत, आपल्याला सामाजिक जाण व भान आहे. आपल्या संवेदना उत्कट आहेत हा संदेश आपल्याला देता येईल. फटाक्यांचे वाचवलेले पैसे हे संसार उभे करण्यासाठी उपयुक्त ठरतील. आपल्या मुलांच्या कोवळ्या मनावर जर हे प्रगल्भ संस्कार झाले तर आपणही खर्‍या अर्थाने जबाबदार पालकत्व निभावले आहे, असे विलक्षण समाधान आपल्याला मिळेल.

फटाकेनिर्मितीत वापरल्या जाणार्‍या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात, त्यातूनही समाजाची मुक्तता होईल. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते. फटाके फोडल्यामुळे कार्बन-मोनॉक्साईडसारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो. कॉपरमुळे श्वसननलिकेत त्रास होतो. कॅडमियममुळे किडनीला धोका निर्माण होतो. शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2016 साली पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 1 लाख 1 हजार 788 मुलांचा मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाला. आरोग्य संघटनेचा हा अहवाल ‘एअर पोल्युशन अ‍ॅण्ड चाईल्ड हेल्थ – प्रिसक्रायबिंग क्लिन एअर’ या नावानं प्रसिद्ध आहे. लहान मुलांच्या मृत्यूचे कारण होते पीएम 2.5.
गर्भवती महिलांना प्रदूषणाचा धोका अधिक असतो. लहान मुलांवरही दुष्परिणाम होतातच. दमा, अस्थमासारखे श्वसनविकार असलेल्यांचा तर श्वासच गुदमरतो. फटाक्यांमध्ये 15 विषारी घटक असतात ज्यामुळे सारे दुष्परिणाम होतात.आपल्या देशात 1 लाख मृत्यूंमागील 89.9 टक्के मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात. कोरोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे, असा खुलासा हरित लवादाने (एनजीटी ) केला आहे. अर्थात सारेच फटाके प्रदूषण पसरवत नाहीत. हरित फटाक्यांमुळे प्रदूषण पसरत नाही किंवा अत्यंत कमी पसरते, असे राष्ट्रीय हरित लवादाने वारंवार स्पष्ट केले आहे. अशा प्रदूषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का ? हा विचार प्रत्येक पालकांनी करायला हवा.

- Advertisement -

फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पनाच अनेकांना करवत नाही. केवळ फटाकेच नाहीतर दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची रेलचेल, सकाळ-संध्याकाळी नवे नवे गोड पदार्थ, रात्री लख्ख प्रकाशाची आरास व सोबत कानठळ्या बसवणार्‍या फटक्यांचा आवाज, असे चित्र म्हणजे दीपोत्सव का ? असा आनंद घेताना आपण अनेकांना दुःख देवून जातोच ना? अतितीव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायम स्वरूपी बहिरेपण देवून जातात. तर अनेक लहान मुलांना, बालगोपालांना शारीरिक अपंगत्व देवू शकतात. त्यामुळे दिवाळी ध्वनी व रासायनिक प्रदूषण मुक्त होण्यासाठी समाजमनाची मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी समाजात विविध माध्यमातून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे. निसर्गाची पूजा करणारी आपली संस्कृती असताना आपण निसर्गाचा विध्वंस का बरे करत आहोत? फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. वायू प्रदूषणाबरोबरच दिवाळीत ध्वनी प्रदूषण वाढतं. फटाके जाळल्यानंतर 125 डेसिबल पेक्षाही मोठ्या प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातलेली आहे.मात्र , तरीही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर होताना दिसतो. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधीच्या व्याधी वाढतात. वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता असते. सर्व प्राणीमात्रांसाठी, समाजासाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकूल पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केली पाहिजे. तसेच यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ आपण घेतली पाहिजे.

सर्वसामान्यांना फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 बाबत आणि ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूक करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे शिवधनुष्य समाजातील सृजनशील पालकांनी आणि सेवाभावी सामाजिक संस्थांनी पेलायला हवे. चुकीच्या रूढी-परंपरा मोडून काढण्यासाठी आपण या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्धार करूया. आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गगनभरारी घेऊया. कोरोनाच्या आपत्तीमध्ये उघड्यावर पडलेल्यांच्या पंखात बळ भरूया. त्यांच्या संवेदनामध्ये सहभागी होऊया. त्यांना मायेचा ओलावा देऊन प्रकाशने अंधःकार भेदला जातो हा समाजमनाचा विश्वास जागता ठेउया …आणि त्यांच्या वेदनेचा हुंकार होऊन दीपोत्सवाला खरा अर्थ देऊया.
केवळ कोरोनाच नव्हे तर मानवी तेजोभंग करणार्‍या प्रत्येक अंधःकारमय संकटात आपले मतभेद, रूढी-परंपरा बाजूला ठेवून आपण परिवर्तन घडवायला हवे. आपले समाजभान जागरूक असेल तरच हे घडू शकेल, अन्यथा कर्कश्य आतषबाजीचा दीपोत्सव आणि वैचारिक अधःपतनाची फटाक्यांची प्रदूषणयुक्त दिवाळी साजरी होणारच.

–वृषाली कडलग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -