Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशAshwatthama Yatra : सातपुड्याच्या माथ्याला, ‘अश्वत्थामा’च्या यात्रेला!

Ashwatthama Yatra : सातपुड्याच्या माथ्याला, ‘अश्वत्थामा’च्या यात्रेला!

Subscribe

भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या माथ्यावरील मणी काढून घेतल्यानंतर अश्वत्थामा आजही मानवी दु:खाचे प्रतीक म्हणून रक्तबंबाळ अवस्थेत सातपुड्यात भटकतोय. चिरंजीवी असल्याने समस्त मानवी सुख-शांतीच्या विवंचनेत आपल्या जखमेवर पट्टी लावण्यासाठी तो आजही वितभर कापडाची चिंधी आणि पणतीभर तेल मागतोय. अमरत्वाचा शाप आणि भळभळणार्‍या जखमेची चिरंजीवी वेदना घेऊन ‘ईडा पिडा टळो’ म्हणत आपल्या दुखर्‍या जखमेवर फुंकर घालत याचना करणार्‍या अश्वत्थामाची भेट घेण्यासाठी ऐन दिवाळीत सातपुड्याच्या डोंगररांगांमधून लाखो आदिवासी बांधव येतात.

-रणजितसिंह राजपूत

धनत्रयोदशीच्या आणि नरकचतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीला अनुसरून मराठीच्या घराघरांत धनाची पूजा नि कारेटी फोडली जात असताना उत्तर भारतापासून दख्खनी महाराष्ट्राला अलगद बाजूला काढणार्‍या अहिराणीच्या सातपुडा पर्वतरांगांत ही अश्वत्थामाची आगळी वेगळी यात्रा सुरू होते. अस्तंभा ऋषीची यात्रा असं तिला म्हटलं जातं. अस्तंभा हे सातपुड्यातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबारपासून गुजरात आणि मध्य प्रदेशातील लांबलांबच्या ठिकाणांहून लाखो आदिवासी दरवर्षी या तिथ्यांना नेमाने यात्रेला येतात. वाद्य संगीताचीही साथ असल्याने त्याचा आनंद लुटत ते आपल्या परिक्रमेला निघतात.

- Advertisement -

नंदूरबार जिल्ह्यातील धडगावपासून तीस कि.मी.वरील असली या गावापासून पुढं चालत राहिलं की रस्त्यावर देराणी-जेठानी देवस्थान, तेथे काही काळ विश्रांती घेतल्यानंतर गोटामाळ, गोर्‍या माळ, मग सातघोळाचा चढ, त्यानंतर नकट्या देवाचं स्थान मग जुना अस्तंभा… हा जुना अस्तंभा म्हणजे समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर असलेल्या सातपुड्याच्या सर्वोच्च अन् दुर्गम अस्तंभा शिखराची सुरुवात. साधारणत: मध्यरात्रीनंतर हातात टेंभे अथवा टायर जाळून डोंगर चढायला सुरुवात होते.

टोळी-टोळीने हातात टेंभे घेऊन डोंगरावर लोक जाताना डोंगरावर तारकापुंज अवतरल्याचा भास होतो. पायवाट सोडा साधी वहिवाटसुद्धा नाही, अगदी जीव मुठीत घेऊन वाट करावी लागते. जुन्या अस्तंभ्यात शिखरावर पोहचल्यानंतर त्या ठिकाणी अश्वत्थामाची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे, तेथे असलेल्या भीमकुंडापाशी पिंजर नि तांदूळ वाहून यात्रेची सांगता होते. हे भीमकुंड म्हणे आपल्या महाभारतातल्या भीमानं तहान लागल्यामुळं गदा हाणून तयार केलेलं पाण्याचं कुंड, अशी एक आख्यायिका आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर अश्वत्थामा पशुधन, आरोग्य व संपत्तीचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

- Advertisement -

त्यामुळे बहुतेक लोक आजही यात्रेला जाताना सोबत गाई-म्हशींचे दोर, बैलाच्या गळ्यातील कंठा घेऊन जातात. तर परतताना डोंगरावरील रोईच्याचे गवत आणतात. हे गवत घराच्या दरवाज्यावर लावल्यास रोगराई, दु:ख, पीडा घरात येत नाही, अशी श्रद्धा आहे. शिखराच्या दुसर्‍या बाजूनं उतरलं तर मामा-भांजे नावाची अद्भुत जागा लागते. मग डुगडुग्या पत्थर पार केला की मोठ्ठी उतरण. मग देवनदी. मग चांदसैली, माकड टेकडी, कोठार! गच्च जंगलांनी, नद्याओढ्यांनी, डोंगर-दर्‍यांनी वेढलेला हा सगळा परिसर पार करताना यात्रेकरू ‘पत्थरवाले की जय’, ‘मामा भांजे की जय’ असा घोष करत असतात.

कोण हे अस्तंभा ऋषी? कोण हा पत्थरवाला? आणि कोण हे मामा-भांजे? ऐन दिवाळीत ही यात्रा तरी कसली? तिथले लोक असं सांगतात की, अस्तंभा ऋषी म्हणजे कौरव नि पांडवांचे गुरू दोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा. ज्यांना कधीच मरण येणार नाही, अशा सात चिरंजीवांपैकी एक. घरातलं अठरा विश्व दारिद्य्र दडवण्यासाठी आईनं सातूच्या पिठात पाणी घालून केलेलं पेय दूध म्हणून पिणारा अश्वत्थामा. दौपद्रीच्या पाचही पुत्रांना अंधार्‍या रात्रीत कापून काढणारा अश्वत्थामा.

ब्रह्मास्त्रासारखं अमोघ अस्त्र कौशल्यानं वापरून बारा वर्षं मनुष्यसंहार करणारा योद्धा अश्वत्थामा. कौरवांचा अखेरचा सेनापती. पत्थरवाला म्हणजेही तोच अश्वत्थामा. जन्मत:च भाळावर मणी म्हणजे पत्थर असलेला अश्वत्थामा. श्रीकृष्णानं तो मणी काढून घेतल्यानंतर त्याजागी झालेली भळभळती जखम घेऊन वणवणणारा अश्वत्थामा. त्या ठणकत्या, ओल्या जखमेत भरण्यासाठी येणार्‍या-जाणार्‍याकडं तेल आणि चिंधी मागणारा अश्वत्थामा. जंगलात चुकलेल्यांना वाट दाखवणारा अश्वत्थामा… अस्तंभा…

या वणवणणार्‍या अस्तंभ्याला पुजायला पिढ्यान्पिढ्या सातपुड्याच्या परिघातले आदिवासी नित्यनेमानं येतात. धनत्रयोदशीपासून सातपुड्याच्या रांगा कुलपुरुष अस्तंभ्याच्या जयजयकारानं दुमदुमून जातात. कदाचित हा विरोधाभास वाटेल. कदाचित विसंगती, पण हा विरोधाभास समजून घ्यायला हवा. या देशात गेल्या हजारो वर्षांपासून चाललेल्या संस्कृतीसंघर्षातून, दोन समूह-वंशांच्या जीवघेण्या संग्रामातून हा विरोधाभास निर्माण झालाय.

म्हणूनच आपण एकीकडे गणपतीपुढे वामन अवताराच्या आरत्या ओवाळतो, तर दिवाळीत त्याच वामनानं गाडलेल्या बळीराजाच्या नावानं नवं संवत्सर सुरू करून ‘इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो,’ असं म्हणतो. श्रीरामाला देवत्व बहाल करताना त्याने ठार केलेल्या वालीचं मोठेपण आपल्या बोलण्या-चालण्यात अजूनही रुतून राहिलेलं असतं; त्याशिवाय का असहाय्य वाटल्यानंतर मराठी माणसं ‘कोणी वाली उरला नाही’ असे उद्गार काढत असतात? आणि उत्तरेत रावणदहन चालू असताना दक्षिणेत रावणाची भक्ती केली जाते? सटवाईचा फेरा असं म्हटलं जाताना कालपरवा जन्माला आलेल्या बाळाच्या उशाशी लेखणी ठेवून सटवी काय ललाटलेख लिहिते याचं अप्रूपही आपल्याला वाटतं.

ज्या गुरू द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून गुरुदक्षिणा घेतली आणि एकलव्याचं शिष्यत्व आणि क्षत्रियत्व शापित केलं, त्या द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा. तरीही सातपुड्यातील आदिवासी बांधवांनी अनादी काळापासून मोठ्या श्रद्धेने त्याला देवत्व बहाल केलं, आणि ते आजतागायत पेललं. का? तर ज्या गुरूने विद्या दिली त्या गुरूचे, त्याच्या वंशाचे रक्त मात्र जमिनीवर सांडू द्यायचे नाही, या गुरूप्रती असलेल्या अस्सल क्षत्रिय भावनेतूनच! जगाच्या पाठीवर कुठल्या शिष्याने पिढ्यान्पिढ्या अशी गुरूदक्षिणा दिली असेल? हे असं होतं.

कारण त्यामागं पिढ्यान्पिढ्यांच्या हारजीतीचा, आक्रमणांचा, वंशच्छेदांचा, एक जिताजागता इतिहास असतो आणि इतिहास नेहमी जेत्यांच्या नावानं लिहिला जातो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, या न्यायानुसार सगळ्या बेरजा, सगळे गुण जेत्याच्या नावावर जमा करण्याचं आणि सगळा उणेपणा, सगळे अवगुण हरलेल्याच्या माथी मारण्याचं तंत्रही सरसकट अवलंबलं जातं.

मग आपल्या सुपीक जमिनीवर आक्रमण करणार्‍यांशी भिडणार्‍या बळीला पाताळात गाडलं जातं. राज्याच्या सीमांचं रक्षण करणार्‍या वालीचा शिरच्छेद केला जातो. साधना करणार्‍या एकलव्याचा अंगठा कापला जातो. जिंकलेल्यांना देव म्हटलं जातं आणि हरलेल्यांना राक्षस म्हटलं जातं. गावगाड्यातले देव गावाच्या मध्यभागी मंदिरात स्थापले जातात आणि म्हसोबा, बिरोबाला गावाबाहेर पडावं लागतं. अश्वत्थामा त्याला कसा अपवाद असेल?

कुलदेवता देवमोगरा देवीनंतर अस्तंभ्याला मानणार्‍या आदिवासींच्या दृष्टीनं तो खलपुरुष नाही यात म्हणूनच नवल वाटण्यासारखं काही नाही. किंवा मामा-भांजे म्हणून ज्यांचा जयजयकार केला जातो ते म्हणजे शकुनीमामा आणि कौरवही असू शकतील! शेवटी हा हारजीतीचाच तर खेळ आहे आणि आजच्या लढाईतही आपल्या नागरी, प्रगत संस्कृतीनं त्यांना कोपर्‍यातच तर ढकलून दिलेलं आहे. अभावग्रस्त दशेत त्यांना नेऊन सोडलं आहे. त्यांच्याच जमिनींवर आक्रमणं करून त्यांना पाताळात गाडण्याचं तेवढं बाकी ठेवलं आहे…

अश्वत्थामा हा अमरत्वाचा शाप लाभलेल्या सातांपैकी पहिला चिरंजीव. असं म्हणतात ते खरंच असावं. आणि तो सातपुड्यात भटकतो हेही खरं असावं. त्याला शोधावं लागत नाही. सातपुड्यातल्या प्रत्येक गांव आणि पाड्यापाड्यांवर तो असतो. बोटभर चिंधीसाठी आणि शतकानुशतके कणभर अन्नासाठी, टीचभर पोटासाठी रानोमाळ वणवणणारा… हा अस्तंभा, अश्वत्थामा… अस्तित्वासाठी लढ्याची साधनंच हिरावून घेतली गेल्यानं फुटक्या कपाळानं वावरणारा…

भाळावरची भळभळती जखम घेऊन ऐन दिवाळीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तो तेल मागत फिरतो… तुमच्या-आमच्या दारासमोरच्या पणतीत चिंधी भिजेल एवढं तेल ! तुमच्या-आमच्या सुखासाठी… इडापिडा टाळण्यासाठी !

-(लेखक महाराष्ट्र शासनात वरिष्ठ अधिकारी आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -