घरफिचर्ससारांशतळपती तलवार...

तळपती तलवार…

Subscribe

तलवार हातात असताना चंडीसम भासणारी भवनी देवी तन्मयतेनं ती मॅच पहात होती. जणू तिची समाधीच लागली होती. महाभारतातला एकलव्यही असाच शिकला असेल का? अपेक्षेप्रमाणे ब्रनेटनं टोकीयो ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकले. भवानी देवीच्या चेहर्‍यावर फुललेले हलकेसे स्मित मी चटकन टिपले. एका ऑलिम्पियन ब्राँझ मेडलिस्टकडून ती पराभूत झाली होती. अशी आता इतिहासात नोंद होणार होती. एकलव्याचा वारसा सागंणार्‍या या भवानीदेवीला अर्जुनाइतका मानसन्मान भारतात मिळेल का? तलवारबाजीचे स्टेडियम सोडताना हा प्रश्न मनात रेंगाळत होता.... उत्तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे... ऑलिम्पिक खतम... बात खतम...

‘कामगार आहे, मी तळपती तलवार आहे.. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ … अशी शब्दरुपी तलवार परजणारे महाराष्ट्राचे कवीश्रेष्ठ नारायण सुर्वे हे चंदलवदा आनंदा सुंदरारामन भवानी देवीला माहीत नाहीत…राज्य आणि भाषा वेगळी असली तरी दोघांत एक साम्य मात्र आहे. दोघांनी आपापल्यापरीनं प्रस्थापितांविरुध्द दंड थोपटले. सुर्वेंच्या कवितेतील ती तळपती तलवार मला चंदलवदा आनंदा सुंद भवानी म्हणजे भवानी देवीच्या रुपानं टोकीयोत सापडली. तलवार हातात असताना चंडीसम भासणारी भवनीदेवी स्टेडियममध्ये भेटली तेव्हा खूपच मिश्कील वाटली.

ऑलिम्पिकला पात्र ठरणारी आणि त्यातही दुसर्‍या फेरीत धडकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलीय. आणि याचा गर्व तिच्या कुठल्याही वागण्याबोलण्यात जाणवत नव्हता… चेन्नईत बांबूच्या नकली तलवारीनं सुरू केलेला सराव आज तिला टोकीयो ऑलिम्पिकच्या या ऐतिहासिक कामगिरीपर्यंत घेऊन आलाय… मी तिला तिच्या बांबू सरावाची आठवण करून देताच ती मिश्किल हसली. सर एकवेळ अशी होती की मी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण मी हातची तलवार निसटू दिली नाही आणि बघा आज तुमच्यासमोर उभी आहे…

- Advertisement -

टोकीयोतील मखुहारी मेस्सी हे वर्ल्ड ट्रेड एक्शिबिशन सेंटर 1989 साली उभारण्यात आलंय. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी या ट्रेड सेंटरमध्ये तलवारबाजी आणि तायक्वाँडो खेळासाठी तात्पुरत्या स्टेडियमची उभारणी करण्यात आलीय. भवानी देवीला याच स्टेडियममध्ये गाठलं. मी तब्बल सहा मिनिटे सेल्फी स्टँड हातात धरून तिचा इंटरव्ह्यू थोड्याच वेळापूर्वी संपवला होता. माझी गंमत करत ती म्हणाली सर मैं देख रही थी क्या ग्रीपसे आपने सेल्फी स्टँड पकडा था… हमारे तलवारबाजी में आप खेल सकते है. आम्ही दोघही यावर मनमुराद हसलो…

बोलता बोलता भवानी सहज भूतकाळात रमली. तिच्या घरची परिस्थिती बेतास बेत. वडील शेजारच्याच मंदिरात पुजारी. आई घर सांभाळायची. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुढाकारानं तेथील शाळांत क्रीडा विषय सक्तीचा झाला. शाळेत जलतरण, बॉक्सिंग, स्क्वॉश आणि तलवारबाजी असे चार पर्याय होते. भवानीनं काहीतरी वेगळे करायचे म्हणून स्क्वॉश आणि तलवारबाजी निवडले. वर्ष अखेरीस दोन्ही स्पर्धांची वेळ एकाच दिवशी आल्यानं आईच्या सांगण्यावरून तिनं अखेर तलवारबाजीचा खेळ निवडला. लक्षात घ्या चेन्नईच्या कर्मठ धर्मव्यवस्थेत एक मुलगी तलवार चालवते ही घटनाच सनसनाटी होती. पण भवानीचे आई-वडील तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

- Advertisement -

प्रसंगी तिच्या प्रशिक्षणासाठी दागिने गहाण ठेवले. तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या, तलवारीचे व्रण चेहर्‍यावर उमटले तर पुढे लग्न जमणे अवघड जाईल. यावर भवानी देवीचे उत्तर ठरलेले… जखमा जितक्या खोल, विजय तितकाच आनंददायी… अर्थात आनंदी दिसणार्‍या माणसाच्या चेहर्‍यामागेही दु:ख दडलेले असू शकते. पैसे आणि कोच यांच्याअभावी एकवेळ अशी आली की भवानीदेवीनं खेळच सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण अशावेळी आधी जयललिता आणि नंतर करुणानिधींनी तिला प्रत्येकी 1 लाखाची मदत केली. तिच्या या टॅलेंटवर क्रिकेटर राहुल द्रविडच्या मिशन ऑलिम्पिकसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘गो स्पोर्ट’ची नजर पडली आणि भवानी देवीचं आयुष्यच पालटून गेले. राहुल द्रविडला आज तिनं मनापासून धन्यवाद दिले. द्रविडच्या गो स्पोर्टनं जर तिला मदत केली नसती तर ?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडेही भवानी तलवार होती. ‘जय भवानी…जय शिवाजी’च्या घोषणा आपण नेहमीच देतो. पण महाराष्ट्रासहीत भारताच्या खेडोपाड्यात अनेक भवानी देवी संधीची वाट पहात आहेत. एकतर त्यांच्या वाट्याला द्रविड येत नाही किंवा घरचे पाठिंबा देत नाहीत. पण भवानीदेवीच्या आजच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे अनेक उमलत्या भवानींना बळ मिळालंय इतकं नक्की…

माझा आजवरचा अनुभव असा आहे की मॅच जिंकल्या-हरल्यावर खेळाडू शक्यतो लागलीच निवासस्थानी परततात. पण ही तब्बल आठ तासाहून अधिक स्टेडियममध्ये होती. सकाळी 9 वाजताच्या लढतीसाठी सातवाजल्यापासून ती स्टेडियमवर होती. माझा इंटरव्ह्यू झाल्यावर ती पुन्हा स्टेडियमवर परतली. फ्रान्सच्या ज्या ब्रुनेट मॅनोनकडून ती दुसर्‍या फेरीत हरली होती, तीचीच ब्राँझ मेडलसाठीची मॅच सुरु झाली होती.

भवनीदेवी तन्मयतेनं ती मॅच पहात होती. जणू तिची समाधीच लागली होती. महाभारतातला एकलव्यही असाच शिकला असेल का ? अपेक्षेप्रमाणे ब्रनेटनं टोकीयो ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकले. भवानी देवीच्या चेहर्‍यावर फुललेले हलकेसे स्मित मी चटकन टिपले. एका ऑलिम्पियन ब्राँझ मेडलिस्टकडून ती पराभूत झाली होती. अशी आता इतिहासात नोंद होणार होती. एकलव्याचा वारसा सागंणार्‍या या भवानीदेवीला अर्जुनाइतका मानसन्मान भारतात मिळेल का? तलवारबाजीचे स्टेडियम सोडताना हा प्रश्न मनात रेंगाळत होता…. उत्तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे… ऑलिम्पिक खतम… बात खतम…

–संदीप चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -