घरफिचर्ससारांशसोनेरी भूतकाळ...अस्वस्थ वर्तमान!

सोनेरी भूतकाळ…अस्वस्थ वर्तमान!

Subscribe

एकेकाळी ऑलिम्पिकचे सुवर्णयुग अनुभवणारा हॉकीसारखा खेळ भारतात अस्ताच्या मार्गावर का गेला? याची कारणे शोधून ते हे वास्तव स्वीकारायला कुणी तयार नाही, ही खरी आपली शोकांतिका आहे. हिरवळीच्या मैदानावरील हॉकी जाऊन कृत्रिम मैदानातील हॉकी येऊन दशके उलटली आणि भारतीय प्रशिक्षक जाऊन परदेशी प्रशिक्षकांनी सूत्रे हाती घेऊन एक मोठा काळ लोटला तरी भारतीय हॉकीला आपले गतवैभव मिळवता येत नसेल तर नक्कीच काही तरी गडबड सुरू आहे. सातत्याने परदेशी प्रशिक्षक नेमून जो वरवरचा मुलामा दिला जात आहे, त्यातून हॉकी अजूनही चमकदार आहे, असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात गंजलेल्या धातूवर आपण हा मुलामा लावतो आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल.

भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा आपले नशीब अजमावण्यासाठी उतरणार आहे. हा लेख तुम्ही वाचाल तोपर्यंत टोकियोत मनप्रीत सिंहच्या टीम इंडियाने सलामीच्या लढतीत शनिवारी न्यूझीलंडशी दोन हात करून निकाल समोर आलेला असेल. सध्या जगातिक रँकिंगनुसार भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर असून 1980 मॉस्को ऑलिम्पिकनंतर प्रथमच भारताला पदक मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीत आतापर्यंत 11 पदके जिंकली असून त्यापैकी 8 सुवर्ण असून 1 रौप्य आणि 2 ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे. हा झाला सोनेरी भूतकाळ… मात्र वर्तमान अस्वस्थ करणारा असून गेली 40 वर्षे भारतीय हॉकीची पदकाची झोळी रिकामी आहे. 1980 नंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन रिकाम्या हाताने येणारी टीम इंडिया भारतीय हॉकीप्रेमींच्या काळजाला चटके देतोय. खरेतर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ. हा खेळ आम्ही जगाला शिकवला, पण त्याच खेळातील बोचरे अपयश आज आपल्याला बदलती आक्रमक, वेगवान हॉकी आत्मसात करता येत नाही, या दाहक वास्तवाची जाणीव करून देत आहे.

एकेकाळी ऑलिम्पिकचे सुवर्णयुग अनुभवणारा हॉकीसारखा खेळ भारतात अस्ताच्या मार्गावर का गेला? याची कारणे शोधून ते हे वास्तव स्वीकारायला कुणी तयार नाही, ही खरी आपली शोकांतिका आहे. हिरवळीच्या मैदानावरील हॉकी जाऊन कृत्रिम मैदानातील हॉकी येऊन दशके उलटली आणि भारतीय प्रशिक्षक जाऊन परदेशी प्रशिक्षकांनी सूत्रे हाती घेऊन एक मोठा काळ लोटला तरी भारतीय हॉकीला आपले गतवैभव मिळवता येत नसेल तर नक्कीच काही तरी गडबड सुरू आहे. सातत्याने परदेशी प्रशिक्षक नेमून जो वरवरचा मुलामा दिला जात आहे, त्यातून हॉकी अजूनही चमकदार आहे, असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात गंजलेल्या धातूवर आपण हा मुलामा लावतो आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल. आपण प्रामुख्याने एखाद्या स्पर्धेत मिळालेल्या यशावर हॉकीची प्रगती तोलत असतो. एशियाडमध्ये आपण सुवर्ण जिंकले म्हणजे आपली हॉकी ‘वर्ल्ड क्लास’ झाली अशी टिप्पणी हॉकीतील हे तथाकथित धुरीण करू लागतात.

- Advertisement -

हे निव्वळ हास्यास्पद असते. तिकडे हॉलंड, जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जीयम देशांशी खेळताना अजूनही आपली पुरती दमछाक होते तेथे आपण आशियातील कमकुवत झालेल्या मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवून जगात सरस असल्याची फुशारकी मारत बसतो. ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणे हेच आता आपल्यादृष्टीने मोठे कर्तृत्व ठरू लागले आहे. ज्यांनी एक काळ गाजवला तो भारतीय संघ आता ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यात धन्यता मानू लागला आहे. एखादा खेळ कायम अव्वलस्थानी राहू शकत नाही, हे मान्य पण भारतीय हॉकीची अवस्था आज झाली ती मुळातच आपल्या ढिसाळ आणि बेजबाबदार अशा हॉकी प्रशासनामुळे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच आपल्या या प्रशासकांनी मारून टाकली. आज हॉकीला प्रायोजक मिळणे मुश्किल झाले आहे. सरकारकडून मिळणार्‍या निधीवर हॉकीचा कारभार सुरू आहे. असे असूनही पुन्हा सरकारविरुद्ध बोंबा मारण्याचा प्रकार हॉकी प्रशासकांकडून होतो आहे. परदेशी प्रशिक्षक आणून हॉकीला संजीवनी मिळणे कठीण आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. मात्र अजूनही मोठे यश म्हणजे ऑलिम्पिक आणि विश्वचषक हॉकीत पहिल्या तीन संघात स्थान मिळवण्यात भारताला यश आलेले नाही. म्हणूनच फक्त प्रशिक्षक बदलून भारतीय हॉकीचे रुपडे बदलता येणार नाही. यासाठी रोगाच्या मुळावर घाव घातला गेला पाहिजे. पण विद्यमान प्रशासकांना त्यात अजिबात रस नाही. देशभरातील अनेक संघटनांना सहसदस्य करून घेण्यात ते धन्यता मानत आहेत. ज्या अधिकृत संघटना होत्या, त्यांना रद्द करून त्यातील बंडखोरांच्या किंवा खुर्ची मिळवू इच्छिणार्‍यांच्या संघटनांना सहसदस्यत्व द्यायचे आणि हॉकी वाढत असल्याचे चित्र उभे करायचे असा प्रकार सुरू आहे. या सहसदस्यांना मतांचा अधिकार नाही म्हणजे त्यांना हॉकीतील कारभाराविषयी बोलण्याचाही अधिकार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाप्रमाणे भारतीय हॉकी संघटना बदलली नाही. जगात हॉकीचे नवे वारे वाहत असताना आपली हॉकी संघटनेचे पदाधिकारी आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी धडपडत होते आणि आजसुद्धा परिस्थिती बदललेली नाही.

- Advertisement -

हॉकी संघटनेचे पदाधिकारी बदलत नसताना आता आशा आहे ती टोकियोच्या मैदानावर भारतीय संघ आपली कामगिरी कशी उंचावतो? याकडे आता भारतीयांचे लक्ष लागले आहे. कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पहिल्या चार संघात भारत असून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाल्यास यंदा पदकाच्या आशा वाटत आहेत. मनप्रीत 2017 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार झाला. हे त्याचे तिसरे ऑलिम्पिक असून कर्णधार म्हणून हे पहिलेच ऑलिम्पिक असेल. मनप्रीतच्या कामगिरीचे विशेष म्हणजे तो निव्वळ कर्णधार नाही तर टीम इंडियाचा मुख्य आधार आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2017 आशिया चषक, 2018 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 एफआईएच सीरिजच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. आघाडीच्या फळीत खेळणारा 26 वर्षीय मनप्रीत कुठल्याही संघाची बचाव फळी भेदू शकतो. त्याच्या आक्रमक खेळाला इतरांची साथ मिळाल्यास टोकियोत भारतीय संघ मोठी कामगिरी बजावू शकतो. गेली दोन वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रॅहम रीड यांनीसुद्धा चांगली तयारी करून घेतली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात शारीरिक आणि मानसिकरित्या भारतीय खेळाडू सक्षम राहतील, याची काळजी घेतलीय.

सोनेरी भूतकाळाचा अस्वस्थ वर्तमान बदलून मनप्रीतच्या भारतीय संघाने टोकियोत पहिल्या तीन संघात स्थान मिळवून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यास भारताच्या लाखो क्रीडाप्रेमींच्या काळजात हा संघ कायमचे स्थान मिळवेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -