घरफिचर्ससारांशजात शोधण्याचा ट्रेंड!

जात शोधण्याचा ट्रेंड!

Subscribe

तब्बल तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी भालाफेकमध्ये भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून देणार्‍या नीरज चोप्राच्या वाट्यालादेखील हेच आलं. त्याची जात शोधून एका विशिष्ट समाजाने जल्लोष करायला सुरुवात केली. तसे तर महापुरुषांना आम्ही जातीत बंदिस्त करण्याचे सोडले नाही. हे तर खेळापुरते खेळाडू आहेत. त्यामुळे तो कोणत्या जातीचा आहे. हे जाणून घेणार आणि आपण जर त्याच जातीचे किंवा धर्माचे असू तर झेंडा मिरवण्यात धन्यता मानतो. हादेखील एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. गुगलवर प्रत्येकवेळी खेळाडूची जात शोधली जात आहे.

पाठीमागच्या काही दिवसांपासून जिकडे तिकडे ऑलिम्पिकचीच चर्चा सुरू आहे. ऑलम्पिक सुरू झाल्यानंतर आपल्या देशाला किती पदकं मिळतात. याची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत असतात. एखाद्या खेळाडूला पदक मिळाले तर त्याचा आनंदोउत्सव संपूर्ण देशवासीय थोड्याबहुत प्रमाणात साजरा करत असत. हे आजपर्यंतचं चित्र होतं. अलीकडे हे चित्र बदलत आहे. जेव्हा एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळायला जातो, तेव्हा लोकांनी पदकाबद्दल, त्या खेळाडूच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे सोडून इतर गोष्टींमध्येच रस दाखवायला सुरुवात केली आहे. तुमच्या लक्षात आले असेल मी कशाबद्दल बोलतोय. होय सध्याचा गुगल ट्रेंड हेच सांगतो आहे की, लोकांना ऑलम्पिक 2021 मध्ये सहभागी होणार्‍या भारतीय खेळाडूंची जात जाणून घेण्यात जास्त उत्सुकता आहे. आणि नंतर जल्लोष साजरा केला जातो.

या ट्रेन्डमध्ये सर्वाधिक सर्च केली जात आहे, ती रिओ ऑलम्पिक मध्ये रौप्यपदक आणि टोक्यो ऑलंपिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ! लोकांना तिच्या खेळाबाबत, तिच्या आयुष्याबाबत, यशस्वी प्रवासाबाबत सर्च करण्याऐवजी तिची जात शोधण्यात रस आहे. एक ऑगस्टला तिने पदक जिंकल्यानंतर सर्वात जास्त सर्च केला गेलेला कीवर्ड होता ‘पी .व्ही. सिंधू कास्ट’ आणि हे जाणून घेण्यामध्ये आंध्र प्रदेश ,तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातचे लोक पुढे असलेले दिसतात. (गुगल सर्च इंजिनमध्ये कोणते शब्द शोधले जात आहेत. किंवा कोणते ट्रेन्डिंग आहे याची माहिती ट्रेंड्स डॉट गुगल डॉट कॉम वर मिळते.) 2016 मध्ये जेव्हा कुस्तीपटू साक्षी मलिकने उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. तेव्हा साक्षीच्या जातीबद्दल गुगलवर शोध सुरू होता. या वर्षी जानेवारीमध्ये ‘साक्षी मलिक जात’, ‘साक्षी मलिक जाती ’ यासारखे कीवर्ड गुगलवर टॉप ट्रेंडमध्ये होते.

- Advertisement -

तब्बल तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी भालाफेकमध्ये भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून देणार्‍या नीरज चोप्राच्या वाट्यालादेखील हेच आलं. त्याची जात शोधून एका विशिष्ट समाजाने जल्लोष करायला सुरुवात केली. तसे तर महापुरुषांना आम्ही जातीत बंदिस्त करण्याचे सोडले नाही. हे तर खेळापुरते खेळाडू आहेत. त्यामुळे तो कोणत्या जातीचा आहे. हे जाणून घेणार आणि आपण जर त्याच जातीचे किंवा धर्माचे असू तर झेंडा मिरवण्यात धन्यता मानतो. हादेखील एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अगदी लहान वयात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिस्पर्ध्यांशी विजयी लढत देऊन पदक मिळवून आलेल्या या खेळाडूंनी देशाला मिळवून दिलेला मान, देशाला मिळवून दिलेला गौरव, त्यांचं खेळाप्रतीचं समर्पण, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टींना गौण ठरवले जाऊन सध्या त्यांच्या जातीला प्राधान्य दिले जाते आहे.

खरे तर ही शोकांतिका आहे की, एकविसाव्या शतकात असूनसुद्धा आपण जातीयवादाची झालर पांघरून बसलो आहोत. हे चित्र आत्ताचेच आहे असे नाही. खेळाडूंची जात शोधण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही. 2010 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीपिका कुमारी महतोने तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते, सध्या ती जगातील टॉप रँकिंग आर्चर आहे. 2012 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिची जात गुगलवर मोठ्या प्रमाणात शोधली गेली. त्याच बरोबर क्रिकेटर संजू सॅमसंगची जात शोधण्याचे प्रमाणही सर्वाधिक असल्याचे समोर आले. गुगलच्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात संजू सॅमसन हा कीवर्ड ट्रेडिंग होता. याच मालिकेत वेगवेगळ्या खेळातील नामांकित खेळाडू आहेत.

- Advertisement -

याहून विदारक स्थिती म्हणजे टोक्यो ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाला. अगदी काहीच तासात हरिद्वारमधील दोन उच्च जातीचे पुरुष, रोशनबाद गावातील स्टार स्ट्रायकर हॉकीपटू वंदना कटारियाच्या घराबाहेर उभे राहिले. त्यांनी शिव्या देत व फटाके फोडत नाचायला सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की, भारतीय हॉकी संघ पराभूत झाला, कारण संघात मोठ्या प्रमाणात दलित खेळाडूंचा समावेश होता. आणि म्हणून फक्त हॉकीच नव्हे तर प्रत्येक खेळांमधून दलित खेळाडूंना बाहेर काढायला हवे.. ही गोष्ट हास्यास्पद जरी असली तरी त्यातील गंभीरता लक्षात घेणे गरजेचे आहे. यावरून हेदेखील कळते की आपण कोणत्या मार्गाने जात आहोत.

खरेतर वंदनाने तिच्या खेळातील प्रदर्शनातून इतिहास रचला. तिने सलग तीन गोल करून आतापर्यंतचा विक्रमदेखील केला. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील हॉकीचा इतिहास सोनेरी आहे. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाची ही कामगिरी अत्यंत मोलाची आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढत झगडत संघातील प्रत्येक खेळाडूने हा टप्पा गाठलेला आहे. परंतु सद्यस्थितीत जातीयवादाचे पेरले जात असलेले हे विष खेळाडूंच्या संघर्षाला कवडीमोल ठरवून त्यांच्या जिद्दीचा व समर्पणाचा अपमान करत आहे.

ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार करायचे, वेगवेगळ्या खेळांमधून मुलांमध्ये खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करायचे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण खेळाडूंच्या जातीची शोधमोहीम सुरू केली आहे… गुगलवर जे लोक खेळाडूंच्या जातीचा शोध घेत आहेत ते अशिक्षित किंवा ग्रामीण लोक नाहीत. जे असे करत आहेत त्यांना इंग्रजी येते. मोबाईल लॅपटॉप किंवा असे कोणतेही उपकरण आणि इंटरनेट डेटा वापराचे ज्ञान त्यांना आहे. याचाच अर्थ यात सुशिक्षित व्यक्तींचा व युवकांचा सहभाग पाहायला मिळतो. एकूणच खेळाडू जर चांगला खेळत असेल तर तो आमच्या जातीचा किंवा धर्माचा आहे म्हणून चांगला खेळत आहे. असे बोलले जाते. एवढेच नाही तर अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक पोस्ट आणि स्टेटसला देखील तसे पाहायला मिळते.

वर्षानुवर्ष जिद्दीने मेहनत करून, सराव करून, स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध लादून, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा खेळाडू देशासाठी खेळतो, तेव्हा तो जातीचा किंवा धर्माचा नसतो तर तो भारतीय असतो, हे विसरून चालणार नाही. परंतु भारतीयांना मात्र वेगळ्याच गोष्टीची चिंता सतावते आहे. खेळाडूला पदक मिळाल्यास तिरंगा फडकवून, राष्ट्रगीत गाऊन जगाला भारतीय कोण आहेत हे अभिमानाने दिसते. पण आपल्याला राष्ट्राच्या अभिमानापेक्षा जातीचा पोकळ स्वाभिमान महत्त्वाचा वाटतो…! आपण एखाद्या जातीबद्दल आणि धर्माबद्दल ज्यावेळी असा पोकळ स्वाभीमान बाळगतो त्यावेळी आपण हजारो वर्ष पाठीमागे जातो. एकीकडे म्हणायचे I Am The global citizen of world आणि दुसरीकडे एखाद्या विशिष्ट पदावर पोहोचलेली किंवा यशस्वी व्यक्ती दिसली की त्याची जात शोधायची. प्रश्न पडतो हा कोणता वैश्विकपणा…? आजच्या जगामध्ये टिकायचे असेल तर जात, धर्म, पंथ आणि भाषेची जुनाट विचारांची परंपरा सोडून द्यावी लागणार आहे. अन्यथा आपण जागतिक स्पर्धेत कुठेच टिकणार नाही. किमान आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तरी संकल्प करूया, जातीविरहित समाजरचनेचा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -