-अर्चना दीक्षित
सौंदर्य स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, जिंकणे आणि हरणे याला महत्त्व न देता आपण या स्पर्धेसाठी काय योग्य तयारी करू शकतो? स्वत:मध्ये कसे सकारात्मक बदल घडवू शकतो? काय केले तर आपली छाप पडू शकते? या स्पर्धेसाठी लागणारं बोलणं, चालणं, वागणं कसं असावं? या अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि समजा एखादा स्पर्धक जिंकला किंवा जिंकली, तर त्यानंतर त्या स्पर्धकाची भूमिका काय असेल हेही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण काय होतं, आपण स्पर्धा जिंकल्यावर आपल्याला अनेक गोष्टींची ऑफर येते, येण्याची शक्यता असते. ऑफर म्हणजे अनेक संधी उपलब्ध होतात. कधी कदाचित तुम्हाला कुठल्या जाहिरातीसाठी विचारले जाऊ शकतं.
कुठल्या सिनेमासाठी विचारले जाऊ शकते. कुठल्या टीव्हीच्या सीरियलसाठी विचारले जाऊ शकते किंवा काही नाही तर कुठल्या उद्घाटन सोहळ्यासाठीदेखील विचारले जाऊ शकतं. तर आपण या जबाबदार्या स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या? किंवा जर स्वीकारल्या तर त्या किती प्रमाणात स्वीकाराव्यात हे आपली गरज बघून म्हणा किंवा आपल्याला शक्य असेल तरच या गोष्टी स्वीकाराव्यात. उगाचच वाहवत जाऊन कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा ती गोष्ट आधी योग्य आहे की नाही याचीदेखील खात्री करावी. अशा प्रकारच्या संधी मिळत आहेत म्हणून कोणतीही कामं करणं योग्य नाही. जे आपल्या मनाला पटत नसेल, तर ते काम करू नये.
तुम्हाला असे म्हणणारे अनेक जण आहेत या क्षेत्रात तू नाही तर दुसरं कोणी करेल, तर म्हणून इर्षेने पेटून किंवा मत्सराने पेटून ते काम करण्यापेक्षा मला हे काम करण्याची खरंच गरज आहे का, मला ही संधी स्वीकारण्याची खरंच गरज आहे का? याचा नीट विचार केला जावा. मगच या क्षेत्रात हळूहळू करत आपले पाऊल पुढे पुढे सरकवावे. कोणी म्हणतंय म्हणून किंवा प्रतिस्पर्ध्याला जास्त संधी मिळत आहेत आणि मला संधी मिळत नाहीत व मला संधी मिळण्यासाठी मी काहीही करेन ही भावना मनात न ठेवता मला खरोखरंच या संधीचा उपयोग आहे का, हा खूप मनापासून विचार केला गेला पाहिजे.
कारण दबावाने केलेले काम याला काहीच अर्थ नसतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी वाहवत जाऊन केलेले काम यालादेखील काहीच अर्थ नसतो. शांत विचार करून या क्षेत्रात पाऊल पुढे टाकायचं असतं. मी जिंकले म्हणजे आता सगळं जग माझ्या मुठीत आहे ही भावना बिलकुल डोक्यात ठेवायची नसते. कारण जिंकल्यानंतर आपली खरी परीक्षा असते. लोक काय म्हणतील, तू एवढे जिंकलेस, या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतलास, ती जिंकलीस आणि पुढे काय तुला संधी नाही मिळत वाटतं, का तुला काही करायचं नाही, असे अनेक तोंडाने बोलणारे लोक आहेत, पण त्या संधीचं काय करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आणि अशा लोकांना कशा प्रकारची उत्तरे दिली पाहिजे हेदेखील आपल्यावरच असतं.
या क्षेत्रात बर्याच वेळा असेही होते की जी सौंदर्यवती जिंकते तिला पुढे संधी मिळतेच असे नाही किंवा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेतला जातो असंदेखील होत नाही. उलट प्रतिस्पर्धी व्यक्तीला काही करून दाखवायची संधी मिळत असते. अशा परिस्थितीत खूप वेळा नैराश्य येते आणि मग नको ते विचार डोक्यात येऊन मन चुकीचे निर्णय घेऊन चुकीच्या मार्गावर अनेक जण जाण्याची शक्यता असते. त्यावेळी संयम ठेवून निर्णय घ्यावा लागतो. आज ना उद्या आपल्याला नक्कीच संधी मिळेल आणि तिचा फायदा घेऊन मी नक्की स्वत:चं अस्तित्व निर्माण करेन, हा आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे. सरतेशेवटी मला हेच म्हणावे असे वाटते…
उद्याचा सूर्योदय माझाच असेल
कारण सूर्यास्ताला मी मागेच टाकलंय
आत्मविश्वासाचा सोमरस प्राशन करून
प्रारब्धाचा मी स्वीकार केलाय
असतील व्याधी, असतील संकटे
जरी असोत यातना दु:ख भयंकर
हसतमुखाने मी सहन केलंय
कारण मला माहीत आहे
उद्याचा सूर्योदय माझाच असेल
आणि सूर्यास्ताला मी मागेच टाकलंय
असेल तेवढे कर्म करून
कष्टांचा मी स्वीकार केलाय
जरी नसेल नात्या-गोत्यांचे जाळे
त्याचाही मी स्वीकार केलाय
कारण मला माहीत आहे
उद्याचा सूर्योदय माझाच असेल
आणि मी सूर्यास्ताला मागेच टाकलंय.