घर फिचर्स सारांश पारमार्थिक ऐश्वर्य !

पारमार्थिक ऐश्वर्य !

Subscribe

युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरीचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे तर पंढरीची वारी हा अवघ्या मराठीजन-मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही आमंत्रण-निमंत्रणाशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारीचा हा सोहळा साजरा होतो. म्हणूनच महाराष्ट्राचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव कोणते, असा प्रश्न उपस्थित केला गेला तर या प्रश्नाचे एकमेव उत्तर असेल, ते म्हणजे पंढरीची वारी. अशा या वारीचे पहिले वैशिष्ठ्य म्हणजे,संपूर्ण भारतात वारी ही फक्त आणि फक्त पंढरपूरलाच होते. भारतातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या दर्शन किंवा भेटीला वारी म्हटले जात नाही. अशा या पंढरीच्या वारीला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे. म्हणूनच पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि पारमार्थिक ऐश्वर्य आहे.

सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माउलींनी ‘माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी वारकरी पूर्ण करत असतात. ज्ञानोबांनी दिंडीचं पुनरुज्जीवन केलं, तेव्हापासून परकीय आक्रमण असो वा नैसर्गिक आपत्ती, वारकर्‍यांच्या दिंड्या टाळ-मृदुंगांच्या घोषात आषाढी-कार्तिकीला पंढरीच्या मार्गावर चालू लागतात. एकादशीला भूवैकुंठ पंढरपूर वैष्णवांच्या मेळ्यानं गजबजून जातं. अवघ्या आकाशात भगव्या पताका फडकताना दिसतात आणि आसमंतात घुमत असतो विठोबा-रखुमाईचा जयजयकार. वारकर्‍यांच्या दिंडीसमवेत टाळ-मृदुंग आणि चिपळ्यांच्या तालावर नाचत, गर्जत, अभंग आणि भजने म्हणत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद म्हणजे मानवी जीवन धन्य करणारा अमृतानुभव आहे असे वारीचे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

या वारीचा इतिहासही खूपच मोठा आणि रंजक आहे. वारीपरंपरेचा उल्लेख असलेले चौथ्या-पाचव्या शतकातील ताम्रपट आजही उपलब्ध असून वारीची परंपरा किती प्राचीन आहे त्याचा हा प्रबळ पुरावा आहे. याशिवाय होयसळ सम्राटांच्या काळातील म्हणजेच शके ११५९ (इ.स. १२३७) चा शीलालेख देखील वारीची प्राचीनता अधोरेखित करतो. याशिवाय संत ज्ञानदेवांच्या अभंगातून वारीबाबत कागदोपत्री लेखी ठोस आधारही मिळतो. ज्ञानदेवांच्या घरातही पंढरीची वारी केली जात होती याचे पुरावे उपलब्ध आहेत. या सर्व पुराव्यांवरून तरी पंढरीच्या वारीला हजार-बाराशे वर्षांचा इतिहास असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

बरं पंढरीची ही वारी एकट्या-दुकट्याने करण्याचा विषय मुळीच नाही, तर शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने सामूहिकपणे करण्याचा आहे. कारण वारीमध्ये वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे. एवढंच नाही तर वारीमध्ये विठु नामा बरोबरच ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, मुक्ताई, जनाई, चोखा मेळा यासारख्या संतश्रेष्ठांच्या नामाचा गजर करत खेळीमेळीने,आनंदाने नाचत,अभंग-भजने म्हणत वारीमार्ग पादाक्रांत केला जातो. या वारीत दु:खं दारिद्य्रानं गांजलेली, संसारतापानं पोळलेली लक्षावधी जनता तांबडं फुटल्यापासून सूर्य मावळेपर्यंत चालत असते. पण वारीचं वैशिष्ठ्य असं की, खेड्या-पाड्यातून केवळ विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकर्‍याच्या जगण्यात वेगळंच चैतन्य फुललेलं असतं जणू त्या चैतन्याचा सळसळता प्रवाहच. म्हणूनच या दिंड्यांचे नुसते दर्शनही दर्शनार्थ्यांचे चित्त प्रसन्न करणारे असते.

आपल्या गावा-घरात शेती आणि शेतीपुरक उद्योगात गुंतलेल्या प्रत्येकालाच वारीच्या वाटेवर ‘माऊली’ असंच संबोधलं जातं, मग ती पाच वर्षाची चिमुरडी असो वा आयुष्याची संध्याकाळ अनुभवणारे ऐंशीपार आजोबा असो. ही सगळी लहानथोर माणसं, बाया-बापड्या सगळ्या ‘माऊली’ या एकाच नावानं ओळखल्या जातात. हा आजही डोळ्यादेखत घडणारा ‘चमत्कार’च नाही का? आणि हे फक्त वारीतच बघायला, अनुभवायला मिळतं.

- Advertisement -

वारीविषयी संत ज्ञानदेवांचा एक अभंग प्रसिध्द आहे. त्यात ज्ञानोबा म्हणतात

‘माझी जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥ ’

पंढरीच्या वारीची ही आवड आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, ‘भेटेन माहेरा आपुलिया ।’ असे म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले ‘माहेर’ असल्याचे स्पष्ट करतात. ‘माहेर’ या शब्दातच पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे. विशेष म्हणजे ही वारी संपूर्ण भारतात जशी फक्त पंढरपूरलाच होते तसंच पंढरपूर सोडून देशातील अन्य कोणत्याही देवस्थानाला किंवा तीर्थक्षेत्राला कोणत्याही संत-महात्म्यांनी ‘माहेर’ म्हटलेले नाही, हेदेखील पंढरीचे वैशिष्ठ्य आहे. कारण पंढरपूर हे माहेर आणि कर कटेवरी घेऊन विटेवरी उभा तो पंढरीनाथ विठ्ठल ही सर्व संतांची,वारकर्‍यांची ‘माउली’ आहे.

बरं, कशी आहे ही वारी ? काय असतं या वारीत? कसा दिनक्रम असतो वारीचा? कसा साजरा होतो हा आनंद सोहळा ? याचं संत ज्ञानदेवांप्रमाणेच संत नामदेव, जनाबाई, चोखोबा, एकनाथ, तुकारामांसारख्या अनेक संतांनी त्यांना जसं भावलं तसं सुरेख वर्णन करून ठेवलंय.,

ज्ञानदेव म्हणतात,
कुंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर ।
भेणे पळती यम किंकर । नामे अंबर गर्जतसे ॥
अजि म्या देखिली पंढरी । नाचताती वारकरी ।
भार पताकांचे करी । भीमातीरी आनंद ।

तर नामदेव महाराज, जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत, ते संसारी धन्य होतात हे अधोरेखित करताना, नामा म्हणे धन्यझाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ॥ असे वर्णन करतात.

दिंडीत वारकर्‍यांच्या जगण्या-वागण्यातही एक सहजसुलभता असते, त्यामागे संतांच्या या अभंगांची प्रेरणा असते. भल्या पहाटे काकड आरतीने, ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा’ अशी आळवणी सुरू होताच दिंडीकर्‍यांची लगबग बघण्यासारखी असते. ही दिंडी मुक्कामावरून मार्गस्थ होण्याचे काही नियम व संकेत असतात. एवढा मोठा गोतावळा असूनही कुठेही आरडाओरड नाही, धक्काबुक्की नाही की गोंधळही नाही. या सगळ्यांच्या शिस्तबद्ध हालचालींचे नियंत्रण चोपदारांच्या हातातील दंडाच्या इशार्‍यावर होते.

कुठे थांबायचं? कुठे विसावा घ्यायचा? कुठे भजन, कुठे हरिपाठ सुरू करायचा याचे इशारे चोपदाराच्या हातातील दंडाच्या खुणांनी निश्चित केले जातात.

या सगळ्या गर्दीतही संतांना विशेष मान-सन्मान दिला जात असला तरी त्यात कुठेही अतिरेक नसतो.

‘वर्ण अभिमान विसरली याती। एकमेकां लोटांगणी जाती’ अशी या वैष्णवांची मनोभावना असते. इथे कोणीही लहान-थोर उच्च-नीच, किंवा दंभ-अभिमानी नसतो. प्रत्येकाच्या मनात फक्त एकच ओढ असते, सावळे सुंदर, रुप मनोहर पाहण्याची आणि एकच अपेक्षा असते. जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा, देवा सांगु सुख-दुःख, देव निवारील भूक. वारकर्‍यांची ही लोकविलक्षण भक्ती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला वारीत जाण्याशिवाय पर्याय नाही.

वारीत विठ्ठल नामाच्या जयघोषाबरोबरच होणारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलीक वरदा हारी विठ्ठलचा हा गजर फक्त वारकर्‍यांचा सांप्रदायिक नामजप नसून ते भक्तीचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे.

नामदेवरायांच्या शब्दांत सांगायचं तर
‘कीर्तन नर्तन वाचे जनार्दन।
न पावसी पतन येरझारी’

ज्ञानदेवाच्या मते नामघोषामुळे विश्वाची दु:खं नाहीशी होतात आणि सकळजग ब्रह्मसुखानं दुमदुमून जातं. जनाबाई तर हे सहजसोपं अध्यात्म ‘नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे’ इतकं रोजच्या जगण्याशी एकजीव करा, असं सांगतात. एकनाथ महाराजही अधिकारवाणीनं, ‘आवडीने भावे हरिनाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे।’
असं आश्वासन देतात.

पंढरीच्या दिशेने मजल-दरमजल करीत मार्गक्रमण करणार्‍या या दिंड्यांमध्ये दररोज होणार्‍या भजनांमध्ये संत तुकारामांच्या अभंगांची संख्या काहीशी अधिक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. कारण, ‘तुकोबा हे तुमच्या-आमच्यासारखे प्रापंचिक होते. लग्न, संसार, व्यवसाय, आर्थिक चढ-उतार आणि कौटुंबिक आघात या सगळ्या गोष्टी त्यांनीही अनुभवल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या बारीक-सारीक गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या अभंग रचनांमधून प्रकट होते. म्हणूनच तुकारामांचे शब्द हृदयाला भिडतात.

तुकाराम महाराजांबद्दल, ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस’, असे बहिणाबाईंनी उगाच म्हटलेले नाही. म्हणूनच तुकाराम महाराज आणि त्यांच्या अभंग रचना जनसामान्यांना अपल्याशा वाटतात. तुकोबा आध्यात्मिकदृष्ठ्यादेखील उच्च पदावर आहेत. त्यांचे मानवी व्यवहार निरीक्षण अचूक आहे. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्हींचे सारख्याच उत्कटतेने दर्शन व अनुभूती घेतली पाहिजे. असा आग्रह त्यांच्या अभंगातून प्रतीत झालेला दिसतो. तुकोबा म्हणतात, परमार्थात प्रगती करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करायची गरज नाही. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची..न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण’ असा सहज आणि सोपा मार्ग ते सांगतात. म्हणूनच असेल कदाचित, वारकर्‍यांच्या तोंडी तुकोबांचे अभंग जास्त प्रमाणात असतील. मनुष्याच्या जीवनाला अध्यात्म आणि परमार्थाशिवाय पूर्णतः नाही, मात्र परमार्थाचे आचरण करण्यासाठी संसार सोडून देण्याची गरज नाही. संसार करतानाही परमार्थ साधता येतो हे नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून पटवून दिले आहे.

संत नामदेव, संत एकनाथ, संत दामाजी, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत निळोबा, संत सजन कसाई, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा, संत जनाबाई हे सारे संत प्रापंचिक संत होते. संसार करूनही परमार्थ साधना साध्य करता येते त्यासाठी संसार सोडून संन्यास घेण्याची गरज नाही, याचे हे सर्व संत म्हणजे उत्तम उदाहरण आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

विठ्ठल आणि वारकरी यांच्यातील नातं माय-लेकरासारखं आहे. लेकराला आपल्या आईला भेटण्याची जेवढी ओढ लागलेली असते तशीच आईलाही आपल्या लेकराला डोळेभरून पाहण्याची आस लागलेली असते. तशीच वारकर्‍यांना जेवढी पांडुरंगाला भेटण्याची आस लागलेली असते, तेवढीच किंवा काकणभर जास्त ओढ विठ्ठलाला भक्तांच्या भेटीची असते. नामदेव महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख। पाहताही भूक तहान गेली’

म्हणजे मूर्तीमंत सुखालाही, साकार सुखालाही ज्याच्या श्रीमुखाकडे पाहून सुख वाटेल, असं विठ्ठलाचं सावळं, गोजिरं रूप पाहिल्यावर आपली तहान-भूक हरपणारच! मग अशी विठु माऊली प्रत्यक्ष भेटल्यावर जिवाला दुसरं समाधान, दुसर्‍या वासना उरणं शक्यच नाही.

ज्ञानोबा तर

‘हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी,’ असा प्रेमाचा सल्ला देतात. तुकोबा तर त्याहून पुढे जाऊन म्हणतात, ‘गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी। भुक्ती मुक्ती दोन्ही न मागो तुज’ अशी ही देव आणि भक्तांमधील अवर्णनीय निरपेक्ष एकरूपता आपल्याला वारीच्या वाटेवर पदोपदी पाहायला मिळते.

भक्तांच्या भाव-भक्तीसाठी आणि वारीसाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला पांडुरंग आणि ‘सुखी संसाराची सोडुनिया आस’ चालत निघालेला वारकरी हे महाराष्ट्राचं ‘वैभव’ आहे आणि हे वैभव पहायचं, अनुभवायचं असेल तर पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे आणि आनंदवनभुवनीचा साक्षात अनुभव घेतला पाहिजे.

- Advertisment -