Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश मौनाची भाषांतरे

मौनाची भाषांतरे

फास्टफूड आणि ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात हा बदल होणे स्वाभाविक आहे तरी फास्टफूड जेवढे शरीराला घातक तेवढीच शॉर्टकट लिपी कदाचित भाषेला घातक होऊ शकते. उद्या सकाळी उठलो आणि ह्या जगातून शब्द नाहीसे झाले तर व्यक्त कसे होणार? अशा एका अशाश्वत भीतीने गेले काही दिवस मला घेरले आहे. जिथे शब्द नाहीत तिथे वाक्य नाही. आणि मग पुस्तकाचा प्रश्नच नाही. सगळेच हवेतल्या हवेत. बोलण्याचा नव्हे तर व्यक्त होण्याचा प्रश्न नाही. तसेही आज आपण ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात आहोत. इथे व्यक्त होण्यापेक्षा आपण म्युट युवरसेल्फ हे बोलण्याच्या आधीच सांगितले जाते. त्यामुळे व्यक्त होण्याचा आवाज आम्हीच कुठेतरी दाबून धरला आहे की काय, असा प्रश्न पडतो.

Related Story

- Advertisement -

आजी म्हणायची लहानपणी मी रडायला लागलो की, ती पाटल्यादारी जाऊन कुणग्यात काम करत असलेल्या आईला बोलावून मला दूध पाजायला सांगायची. बहुतेक सगळ्या लहानमुलांच्या बाबतीत हे असेच होते. मूल रडू लागलं की, आई त्याला भूक लागली असेल हे गृहीत धरून दूध पाजते. ही समजूत अशीच आहे. मी संध्याकाळी दूध पाजून झालं तरी रडत असे. मग जो तो आपल्यापरीने त्याचा अर्थ काढत असे. माई आजी पोर घाबरलो आसतलो असं म्हणायची. थोरली काकी प्वॉट दुकत आसतला असा अर्थ काढायची. भाऊ आजोबा तर घरातून निघून मधु वालावलकरला बोलवायला जायचे आणि त्याच्या सांगण्यानुसार अंगावरून मीठ-मोहरी उतरून काढायचे. वास्तविक ही सर्व त्यांनी त्यांनी धरलेली गृहिते होती. यात त्यांनी फक्त आपल्या पद्धतीने त्यांच्या शंकेची केलेली उकल होती. यात सत्यांश किती होता काय माहीत? हे लहानमुलांच्या बाबतीत होणे स्वाभाविक आहे. तसा हा सार्वत्रिक अनुभव आहेच.

कॉलेजमधले मुलांचे डेज सुरू होते. कॉलेजमध्ये असले काही दिवस असले की, जल्लोष असतो. त्यात मनोरंजन म्हणून मुलं हिंदी किंवा मराठी गाण्यांची न बोलता हातवारे करून समोरच्याला कुठलं गाणं आहे ओळखायला लावत होती. अगदी मूक-बहिरा असल्यासारख्या गोष्टी चालू होत्या. मुलांनी मूक अभिनय केला की, समोरची मुलं ते गाणं पटकन ओळखत होती. ही समोर बसलेली मुलं हे गाणं कसं ओळखतात?, त्यांना ही भाषा कशी अवगत झाली असेल?, मी मुलांना विचारलं तेव्हा त्यांनीच सांगितलं की, प्रत्येक गाण्यात किंवा वाक्यात एक अशी काहीतरी गोष्ट असते की, ती नुसती अभिनय केला तरी समोरच्याला कळून येते. मुलांच्या बोलण्यात खूप तथ्यांश होता. कोणत्याही गोष्टीत अशी एक गोम असतेच की, ज्याचा अर्थ कळला की त्या वाक्याचा किंवा बोलण्याचा हेतू कळतो.

- Advertisement -

पण हल्ली मास्तर तुमची भाषा कंची? असं म्हणावेसे वाटते. हल्ली इंग्लिश शिकवणार्‍या एका प्राध्यापक मित्राने सांगितलेला किस्सा आठवला आणि वरची कोटी आठवत राहिली. तो प्राध्यापक मुलांच्या उत्तरपत्रिका तपासत होता. मुलांनी नक्की काय लिहिले आहे याचा त्याला बोध होईना. पत्र लिखाणात please हा शब्द plz असा लिहिला होता. what is going on ? तर whats gonna ? अशा विचित्र पद्धतीने लिहिला गेला होता. संपूर्ण पेपर लाल शाईने रंगला होता. हे केवळ एका मुलाच्या बाबतीत नाही तर बहुतेक पेपर लिहिणार्‍या सगळ्याच मुलांच्या बाबतीत झालं होतं. त्याला ह्या शब्दांचा अर्थबोध होईना. मुलांना नक्की काय लिहायचे आहे आणि प्राध्यापकाला काय समजायचे आहे याची गल्लत होत होती. उत्तरपत्रिका मुलांना वाटून झाल्यावर लाल शाईने रंगलेले पेपर घेऊन मुलं शंका विचारायला म्हणून त्या प्राध्यापकाकडे गेली तेव्हा मुलांनी हे शब्दांचे शॉटकट आहेत आणि आम्ही एकमेकांना मेसेज करताना अशीच लिपी वापरतो. तरुण मुलांमध्ये वावरताना ह्या गोष्टी आपल्या लगेच लक्षात येतात. जगात आज नक्की काय चाललंय हे त्यांच्याशिवाय चांगलं तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. आज समाजमाध्यमावर ही तरुणपिढी ह्या लिपीचा आधार घेऊन वावरत असते. त्यामुळे कळत नकळत ती लिपी. ती बोली त्यांच्या व्यवहारी जीवनातदेखील नकळतपणे येऊन जाते. ह्यात ही लिप्यांतरे आता व्यवहाराचा घटक तर बनणार नाहीत ना ? अशी एक शंका माझ्या मनात नेहमीच डोकवत असते.

फास्टफूड आणि ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात हा बदल होणे स्वाभाविक आहे तरी फास्टफूड जेवढे शरीराला घातक तेवढीच ही शॉर्टकट लिपी कदाचित भाषेला घातक होऊ शकते. उद्या सकाळी उठलो आणि ह्या जगातून शब्द नाहीसे झाले तर व्यक्त कसे होणार? अशी एक अशाश्वत भीतीने गेले काही दिवस मला घेरले आहे. जिथे शब्द नाहीत तिथे वाक्य नाही. आणि मग पुस्तकाचा प्रश्नच नाही. सगळेच हवेतल्या हवेत. बोलण्याचा नव्हे तर व्यक्त होण्याचा प्रश्न नाही. तसेही आज आपण ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात आहोत. इथे व्यक्त होण्यापेक्षा आपण म्युट युवरसेल्फ हे बोलण्याच्या आधीच सांगितले जाते. त्यामुळे व्यक्त होण्याचा आवाज आम्हीच कुठेतरी दाबून धरला आहे की काय ?

- Advertisement -

लहानपणी गावात जना म्हणून एक स्त्री होती. काहीशी वेडसर. तिला काहीच कळायचे नाही. अंगावरच्या कपड्याचे भान नाही. केस पिंजारलेले. कित्येक दिवस नव्हे तर कित्येक महिने केसाला तेल लागले नसावे. तिला बोलता येत नव्हते आणि ऐकू तर बिलकुल येत नसे. कोणाकडे ती कामाला गेली की, त्या माणसाचे भलतेच हाल व्हायचे. तिला अमुक काम कर म्हणून सांगायचे कसे? शेवटी ते काम करण्याची कृती करून दाखवून तो माणूस किंवा ती स्त्री तिला कामाचे स्वरूप समजून देऊ लागले. कृतीतून बोध देणे ही जी अध्यात्मात संकल्पना आहे त्याचा परिपाक मला नेहमी जनाकडून काम करून घेताना मिळायचा. माणूस शब्दांनी व्यक्त होत नसेल तर त्याच्या भावना कशा कळत असतील बरे. जयवंत दळवींचा कादंबरी किंवा नाटकात किती तरी वेडे होते ते सगळे वेडे बहुतेक भिंतीकडे बघत बसणारे होते किंवा बसून पायाखालच्या मुंग्या मोजणारे होते. यांना शब्दांची देणगी मिळाली नसेल का ?, ह्या अव्यक्त भावनेत माणूस कसा जगू शकेल?

आमच्या शेजारी पाटकरकाका रहात होते. दर गुरुवारी त्यांचे मौनव्रत असायचे. कधी गुरुवारी त्यांच्याकडे गेलं की, त्यांना खुणेने सांगायचे की, आपल्याला काय हवे. मग ते देखील खुणेने उत्तर द्यायचे. अगदीच खुणेचा अर्थ कळत नाही असे त्यांना वाटले की, मग ते कागदावर लिहून द्यायचे. याचा अर्थ असाच ना, की व्यक्त व्हायचे तर शब्द लागतात. हल्ली फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्यक्त होत असताना लोक इमोजीचा म्हणजे चिन्हाकित भाषेचा आधार घेतात आणि व्यक्त होतात. मागे एकदा असाच प्रकार झाला. शाळेच्या मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणी पोस्ट टाकली. त्यावर लोकांनी आपआपल्या परीने व्यक्त व्हायला सुरुवात केली. तेवढ्यात एकाने त्या पोस्टवर कमेंट म्हणून कुठलातरी इमोजी टाकला आणि वादाला तोंड फुटले. वास्तविक इमोजी टाकणार्‍याने त्याला समर्पक वाटला म्हणून पोस्टवर इमोजी टाकून आपली भावना व्यक्त केली, पण पोस्ट ज्याने टाकली त्याला त्या इमोजीचा अर्थ कळला नाही. पुढे दिवसभर ग्रुपवर दोघांची भांडणे. त्यात कोणी पोस्ट लिहिणार्‍याची बाजू घेतली तर कोणी इमोजी टाकणार्‍याची. शेवटी त्या दिवशी कलह होऊन अनेकांनी ग्रुप सोडला.

इमोजी ही मौनाची भाषा. त्यात हसणारे चेहरे, रडणारे चेहरे, नाक मुरडणारे चेहरे आहेत. पण त्याचा अर्थ किंवा त्यामागची भावना प्रत्येकाला कळेल असे नाही, त्यातून व्यक्त होण्यापेक्षा त्यातून गैरसमज पसरणे जास्त होते. ही भाषांतरे लोकांना कळतील असे नाही. आज तोंडाला मुखपट्टी बांधण्याच्या दिवसात ह्या खुणा, त्यांचे अनुशेष उलगडताना मुखपट्टीसारखी आम्ही डोळ्यालादेखील एक पट्टी नकळत बांधली आहेच ना!, ती डोळ्यांची पट्टी काढून अक्षरांच्या माध्यमातून व्यक्त होत असताना काळ किती झपाट्याने पुढे जात आहे. आजूबाजूचे वातावरण किती असंघटितपणे काम करत आहे, त्यात सांस्कृतिक वलय किती झपाट्याने बदलत जात आहे. आणि त्यात माणूस म्हणून जगत असताना शब्दांचा आधार न घेता भ्रमाच्या मागे आपण जात आहोत की, काय असा एक नकळत भास मला होत आहे.

कोणाला म्हणायचे आहे एक आणि कोणी अर्थ वेगळा काढला तर काय होईल हे तुकोबांना आधीच कळले असावे म्हणून तर त्यानी लिहिले.

कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एक न ये ॥
तैसे मज नको करू कमळापति । देई या संगती सज्जनाची ॥
तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरू पळे आण झाली आता ॥
तुका म्हणे येर येरा जे विच्छिन । तेथे वाढे सीण सुखा पोटी ॥
काळाच्या दृष्टीने ती येणार्‍या काळाची भाषा असेल, पण शेवटी ती मौनाची भाषांतरे म्हणूनच वावरतील. ही मौनाची भाषा अक्षरांची जागा घेऊ शकत नाही हे मात्र खरे.

- Advertisement -