घरफिचर्ससारांशस्थित्यंतराचा प्रवास : लोकोमोशन !

स्थित्यंतराचा प्रवास : लोकोमोशन !

Subscribe

मानवाचा त्याच्या आरंभापासून आज आत्ता याक्षणापर्यंत होत आलेला प्रवास, त्या प्रवासात त्याच्या मनोकायिक भूमिकेत झालेले बदल, या प्रवासात माणूस म्हणून त्याच्यात घडत गेलेलं स्थित्यंतर, आपल्या भवतालाला प्रतिसाद देण्याच्या त्याच्या पद्धतींत आलेले वैविध्य आणि साचलेपणा...अशा अनेक टप्प्यांचा सर्जनशील वेध घेणारे एक नाटक नुकतेच मुंबईच्या रंगभूमीवर पाहण्यात आले. ते नाटक म्हणजे स्वप्नील चव्हाण लिखित आणि रवींद्र लाखे दिग्दर्शित ‘लोकोमोशन’.

ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर एक मालिका प्रसारित होत असे : भारत एक खोज. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेत त्या मालिकेत भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेतला गेला आहे. ते पुस्तक जरी भारताच्या इतिहासापुरते मर्यादित असले तरी अखिल विश्वाची सुरूवात कुठून झाली, त्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर आपल्याला थेट ‘माणूस’ नावाच्या प्रजातीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जावे लागेल. इथे त्या मालिकेच्या शीर्षकगीतामधल्या एका कडव्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही,

सृष्टी से पहले सत् नहीं था
असत् भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था……

- Advertisement -

सृष्टीच्या आधी काहीच अस्तित्वात नसलेल्या या पोकळीत मग कालांतराने एकेका सजीव प्रजातीच्या उत्पत्तीगणिक काहीएक आकार तयार होऊ लागला. जसजशी ती उत्क्रांत होत गेली तसतशी लाखो प्रकारच्या वनस्पतींपासून ते जलचर, भूचर, सरपटणार्‍या, चतुष्पाद ते द्विपाद प्राण्यांपर्यंत एक मोठी जैविक साखळी उत्पन्न झाली. असे असले तरी सृष्टीला काहीएक अर्थ कुणी देऊ केला असेल तर तो माणूस नावाच्या विचारी प्राण्याने. ज्याक्षणी सृष्टीत पहिल्या मानवाची पाऊले उमटली असावीत, त्याक्षणी सृष्टीला अर्थपूर्ण अस्तित्व आले. या मानवाचा त्याच्या आरंभापासून आज आत्ता याक्षणापर्यंत होत आलेला प्रवास, त्या प्रवासात त्याच्या मनोकायिक भूमिकेत झालेले बदल, या प्रवासात माणूस म्हणून त्याच्यात घडत गेलेलं स्थित्यंतर, आपल्या भवतालाला प्रतिसाद देण्याच्या त्याच्या पद्धतींत आलेले वैविध्य आणि साचलेपणा…अशा अनेक टप्प्यांचा सर्जनशील वेध घेणारे एक नाटक नुकतेच मुंबईच्या रंगभूमीवर पाहण्यात आले. ते नाटक म्हणजे स्वप्नील चव्हाण लिखित आणि रवींद्र लाखे दिग्दर्शित ‘लोकोमोशन’.

‘अस्तित्व’ आणि ‘मिती चार’, कल्याणच्या सहयोगाने हे नाटक इथल्या समांतर रंगभूमीवर नुकतेच सादर केले गेले. या नाटकाच्या लिखाणाचा बाज लक्षात घेता मराठी समांतर रंगभूमीवर बर्‍याच कालावधीनंतर माणसांच्या भूत तसेच वर्तमानकाळाचे चिकित्सक विश्लेषण करणारी आणि आगामी भवितव्याचे सूचन म्हणता येईल, अशा आशयाची एक संहिता ऐकायला मिळाली आणि तिचा नटांनी तितक्याच समजूतदारपणे केलेला प्रयोग पाहायला मिळाला. किंबहुना, नाटककाराला ही संहिता लिहिताना आणि त्याच्या प्रयोगासाठी जो पैसा हवा होता, तो इथल्या समांतर रंगभूमीवरच मिळाला असता. महाराष्ट्राच्या समांतर (प्रायोगिक म्हणू हवं तर. पण तो शब्द फार क्लिष्ट होईल) रंगमंचावर खेळले जाणारे हे अलीकडील अत्यंत महत्वाचे नाटक आहे.

- Advertisement -

पुढे जाण्याआधी ‘लोकोमोशन’ या इंग्रजी शब्दातून केलेल्या व्याख्येचा अगदी थोडक्यात वाचकांना परिचय करून द्यावासा वाटतो. लोकोमोशन म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया इतकी साधी वाटत असली तरी तीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सुरक्षित आणि सराईतपणे जाणेही अद्याहृत आहे. माणसांच्या या अवस्थांतरांच्या प्रक्रियेत त्याच्या हातून केल्या गेलेल्या कृतीला एक अर्थ प्राप्त होणे, ही एक महत्वाची अट आहे. या प्रवासादरम्यान माणसांची होत जाणारी प्रगती, स्थैर्य आणि भवतालाशी जुळवून घेण्याची क्षमता या गोष्टी ठळकपणे उजागर होत जातात. या सगळ्या प्रक्रियेतून तावून सुलाखून निघण्यासाठी माणसांकडे पुरेसे मानसिक बळ आणि नियंत्रण असणे, ज्या दिशेने जायचे तिकडे जाताना आपला माणूस म्हणून जाऊ शकणारा तोल समर्थपणे राखणे, या प्रक्रियेचा परिणाम म्हणून चहुबाजूने येणार्‍या हरप्रकारच्या दबावाला सामोरे जाणे आणि सरतेशेवटी या सगळ्यांतून मार्ग काढत आपल्या स्वत:च्या आणि त्याचवेळेस भवतालाच्या आपल्याकडून असलेल्या मागण्यांची पूर्तता करत राहणे म्हणजे ‘लोकोमोशन’ होय. ही जरी सैद्धांतिक व्याख्या असली तरी प्रत्यक्ष नाटक पाहतांना जी अनुभूती येते, तिच्याबद्दलही थोडक्यात सांगावेसे वाटते. ‘लोकोमोशन’ म्हणजे मुव्हमेंट किंवा दी अ‍ॅबिलीटी टू मूव्ह. हा एक साधारण अर्थ घेतला तरी पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाची गती ढोबळपणे जनरलाईज्ड करता येईल अशा अर्थाने एकसारखी नसते. आदिम काळापासून ते आजपर्यंतच्या माहिती आणि तंत्रज्ञानाने भारलेल्या काळादरम्यानची प्रत्येक माणसाची युनिक गती, त्याची जगता जगता पुढे मार्गक्रमणा करत जाण्याची आपली अशी एक अनुसरलेली पद्धत, त्यातून आलेले यशापयश, जगण्यातल्या त्याचत्याचपणातून आलेले नैराश्य आणि कंटाळा आणि कधीतर तो कंटाळा हेच आदिसत्य असल्याचे जाणवणे आणि त्यातूनही वाट काढत पुढे जात राहणे. या गतीचा चारही बाजूंनी मागोवा घेत ती पिंजून काढत ‘लोकोमोशन’ नाटक सुरू राहते. अविरत….. या संज्ञेचा दाखला देत स्वप्नील चव्हाण नाटककार म्हणून ‘आपले’ म्हणणे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांच्या गोष्टीमधून आपल्यासमोर मांडतो, ती प्रत्यक्षातच ऐकावी आणि पाहावी.

स्वप्नीलने ज्या विषयाला हात घातलाय, त्यासंदर्भात मी नॉन-फिक्शन साहित्यप्रकारातून बरेचसे वाचले आहे. पण ‘लोकोमोशन’च्या निमित्ताने नॉन-फिक्शन साहित्यात वाचलेले आपल्याला नाटकासारख्या फिक्शनमध्ये ‘ड्रामाटाईज्ड’ केलेले पाहायला मिळते. ही नाटक या माध्यमाची गंमतही आहे आणि बलस्थानही.बर्‍याचदा वाचलेल्या सगळ्या मजकुराचे सादरीकरणाच्या अंगाने काही करता येईल का याचा शोध आपण घेत असतो. पण ती वाट तितकी सोपी आणि सुकरही नसते. स्वप्नीलने सर्वस्वी त्याच्यापद्धतीने मांडलेले आकलन आणि नाटक शेवटी ज्या दृश्याकडे येऊन संपते, त्यातून गोष्ट सांगणारा नाटककार म्हणून उमटवलेली त्याची मोहोर स्पष्ट दिसते. त्याने ती वाट त्याच्यापद्धतीने खूप उत्तम शोधली आहे, असं मला वाटतं. स्वप्नीलची दोन नाटके मी याआधी पाहिली आहेत आणि ती ऐकल्यापाहिल्यानंतर ‘नाटककार’ या बिरूदावर हक्क सांगू शकेल, असा माझ्या पिढीतील तो ताज्या दमाचा ताजं नाटक लिहिणारा तरूण आहे.

रवींद्र लाखेंचे मी जितके म्हणून समग्र रंगचिंतन ऐकले वाचले आहे, त्यानुसार ‘लोकोमोशन’ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित करणे यात कुठलाही योगायोग नाही. ते त्यांच्या फ्लेवरचे नाटक आहे. मोजकंच नेपथ्य, मोजकीच वेषभूषा आणि मोजकंच संगीत ही त्यांची दिग्दर्शक म्हणून असलेली वैशिष्ठ्ये याही नाटकाच्या प्रयोगात पाहायला मिळतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे जे आपण प्रेक्षकांसमोर सादर करतोय, ते नाटक आहे याची उत्तम जाण ठेवत आणि म्हणूनच ते सादर करण्याच्या निरनिराळ्या शक्यता ते इथे अजमावून पाहतात. नाटकातल्या मुख्य पात्रांचे आपापले प्रवेश सादर करून झाल्यावर त्यांनी विंगेत न जाता स्टेजवरच पाठमोरं उभे राहून सबंध नाटकभर मंचावरच असणं यात एक खास ‘लाखे टच’ आहे. त्यांच्या या डिरेक्टिव्हचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपापला शोधावा. त्यासाठी ‘लोकोमोशन’ हे नाटक तुम्ही आवर्जून पाहायला हवंय.

समीर दळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -