मुसाफिर

Subscribe

एकच घर, पण कथा अनेक. या अशा काही कथा एकत्र बांधून आपण चित्रपट बनवला तर? हृषिदांनी ही कल्पना आपला मित्र दिलीपकुमारला सांगितली. दिलीपकुमारने त्यांना वेड्यात काढले. ऐसी पिक्चर बनवाएगा..तो मरेगा तु.. असं भाकीत वर्तवले, पण तरीही दिलीपकुमारने त्यांना साथ दिली. त्या चित्रपटात कामही केलं. हृषिदांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. त्याकाळी तो चालला नाहीच. त्याची ओळख पटायला काही काळ जावा लागला. आज ‘मुसाफिर’ एक क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. एकच खोली आणि त्यात राहणारे अनेक मुसाफिर, एकानंतर एक असे येणारे. खरंतर ती खोली म्हणजे एक प्रतीक होतं जगाचं.

मध्यंतरी आमच्या शेजारच्या सोसायटीत एका फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत होता. असेल घरगुती भांडण म्हणून आजूबाजूच्यांनी दुर्लक्ष केलं. एक-दोन वेळा असं झालं. मग एकदा त्या घरातले भांडत भांडत बाहेर पॅसेजमध्ये आले. त्यांच्या मोठ्या आवाजाने इतरांना त्रास होऊ लागला. मग हाच प्रकार वारंवार होऊ लागला. तसे ते फ्लॅटचे मालक नव्हते, भाडेकरू होते. अति झालं तेव्हा सोसायटीच्या चेअरमनने मीटिंग घेऊन त्यांना समज दिली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सर्वांच्या संमतीने त्यांना फ्लॅट खाली करायला सांगितला. पुढच्या आठवड्यात तुमचं सामान येथून हललंच पाहिजे, अशी ताकीद त्यांना दिली.

त्यांचं म्हणणं की, आम्हालाच इथे राहायचं नाहीय, पण लगेचच आम्ही जाणार तरी कुठे, हा फ्लॅट मिळवून देण्यासाठी एजंटला आम्ही पैसे दिलेत. पुन्हा एजंट शोधायचा, पुन्हा टेम्पो भाडे, आम्हाला काहीतरी मुदत द्या.. वगैरे वगैरे. त्यांनी काही दिवसांनी ती जागा सोडली. दुसरीकडे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. कसं आयुष्य असतं ना काहींचं. अकरा महिन्यांचा करार करून फ्लॅट ताब्यात घ्यायचा. सहा-सात महिने झाले की मालकाला करार वाढवून देण्यासाठी विनवण्या करायच्या. त्यांनी नाही ऐकलं तर पुन्हा दुसरीकडे भाड्याच्या जागेचा शोध घ्यायचा. त्यांचाही नाईलाज असतो. कधी स्वतःचा फ्लॅट घेण्याची ऐपत नसते. कधी बदलीची नोकरी असते. बदली झाली की आपलं सामान आवरायचं, नवीन गावी जायचं, पुन्हा नव्याने संसार मांडायचा.

- Advertisement -

मला नेहमी प्रश्न पडतो की, अशांना आपल्या राहत्या जागेबद्दल प्रेम वाटत असेल? ती जागा आपली वाटत असेल? एखाद्या रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग रूममध्ये कसं आपण तात्पुरतं थांबतो, एका अर्थाने तसंच ना हे. बदलीची ऑर्डर हातात पडली की निघायचं. अकरा महिन्यांचा करार केला असेल तर सहा-सात महिन्यांनी पुन्हा जागेचा शोध घेत फिरायचे. यावरून आठवलं की दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी तेव्हा नवोदित होते. बिमल रॉय यांच्यासोबत चित्रपट संकलक म्हणून काम करत होते. मुंबईत अगदी नवीनच होते. कोणाच्या तरी ओळखीने त्यांना एक भाड्याने खोली मिळाली. त्यांनी खोली ताब्यात घेतली. खोलीच्या भिंतींवर खूप काही कारागिरी केलेली होती. एका भिंतीवर पेनाने एकाखाली एक नावं लिहिलेली होती. दुधवाल्याचा हिशोब, लाँड्रीत कपडे टाकले त्यांच्या नोंदी, तारखा, कुणा लहान मुलांनी काढलेल्या रेघोट्या, चित्र. त्यांच्या मनात सहजच विचार आले या खोलीत माझ्या आधी किती जण येऊन राहून गेले असतील. एकजण सोडून गेला, मग दुसरा आला. प्रत्येकाच्या आयुष्यात इथे काही ना काही घटना घडल्या असतील. कुणांचं प्रेम फुललं असेल, तर कुणाची भांडणं. एखाद्याच्या बाळाचा जन्म झाला असेल, तर कुणाचा मृत्यू.

एकच घर, पण कथा अनेक. या अशा काही कथा एकत्र बांधून आपण चित्रपट बनवला तर? त्यांनी ती कल्पना आपला मित्र दिलीपकुमारला सांगितली. दिलीपकुमारने त्यांना वेड्यात काढले. ऐसी पिक्चर बनवाएगा..तो मरेगा तु.. असं भाकीत वर्तवले, पण तरीही दिलीपकुमारने त्यांना साथ दिली. त्या चित्रपटात कामही केलं. हृषीदांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. त्याकाळी तो चालला नाहीच. त्याची ओळख पटायला काही काळ जावा लागला. आज ‘मुसाफिर’ एक क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. एकच खोली आणि त्यात राहणारे अनेक मुसाफिर, एकानंतर एक असे येणारे. खरंतर ती खोली म्हणजे एक प्रतीक होतं जगाचं.

- Advertisement -

या जगात आपण येतो, काही काळ राहतो आणि जग सोडून जातो. म्हणजे आपण इथे एक मुसाफिर म्हणून तर असतो. ५०-१०० वर्षे जगण्याचा हा प्रवास. हे जग सोडून जाताना माणूस त्याच्या आठवणींना सोडून जात असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाण्यांमधून हे सत्य सांगितले आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात आलेल्या जितेंद्रच्या ‘अपनापन’ या चित्रपटात एक सुंदर गाणे आहे. गीतकार आनंद बक्षींनी लिहिलेलं गाणं आजही आपल्याला गुणगुणावंसं वाटतं. ते सदाबहार गाणं म्हणजे…

आदमी मुसाफिर है
आता है जाता है
आते जाते रस्ते में
यादें छोड जाता हैं

–सुनील शिरवाडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -