घरफिचर्ससारांशजीवन का मतलब तो आना और जाना हैं

जीवन का मतलब तो आना और जाना हैं

Subscribe

दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी हैं, ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी हैं, हे ऐकणार्‍याचे डोळे आपसूकच ओलावतात. या गाण्याचे गीतकार संतोष आनंद.... कधीकाळी प्रसिद्धीचं मोठं वलय असलेला व्यक्ती आज एकटा आहे. लग्नानंतर १० वर्षांनी मुलगा झाला. हुशार होता म्हणून आयएएस अधिकार्‍यांना क्रिमिनॉलॉजी शिकवायचा. २०१४ साली वरिष्ठांनी त्रास दिला म्हणून पत्नीसह त्याने आत्महत्या केली आणि संतोष आनंद एकटे पडले. आता आयुष्यात छोटी नात आणि तेच राहिलेत. ना पैसा आहे ना प्रसिद्धी. ज्यांच्यामुळे मुलाने जीव दिला त्यांना कुठलीही शिक्षा नाही आणि हे स्वत: आता चालूही शकत नाहीत.

टीव्हीवर ज्या कार्यक्रमात खरं काहीच नाही अशा कार्यक्रमांना आपल्याकडं रिअ‍ॅलिटी शोज म्हटलं जातं. त्यातल्या त्यात जेव्हा या गाण्याच्या स्पर्धा येतात, तेव्हा स्पर्धकांच्या आवाजापेक्षा त्यांची पर्सनल स्टोरी किती मसालेदार आहे याकडं जास्त लक्ष दिलं जातं. असं सगळं असतानाही कधी कधी याच शोच्या माध्यमातून त्या रिअ‍ॅलिटी शब्दाची लाज राखत काही चांगल्या गोष्टी घडतात. साधारणत: २ वर्षांपूर्वी सोनीच्या एका सिंगिंग शोवर एक वृद्ध व्यक्ती आली. त्या व्यक्तीची ओळख संतोष आनंद अशी करून देण्यात आली.

वाढलेलं वय, थरथरते हात, बोलताना अडखळणं आणि व्हीलचेअर अशी अवस्था पाहिली. लोकांना वाटलं की हा व्यक्ती सहानुभूती घ्यायला आला असेल, पण जेव्हा त्याने नेहा कक्करने देऊ केलेली आर्थिक मदत नम्रपणे नाकारली तेव्हा त्यात दडलेला मोठा माणूस अनेकांनी पाहिला. एखादा गीतकार जे शब्द लिहितो तेच शब्द त्याच्या वैयक्तिक आयुष्याला किती तंतोतंत लागू होतात याचं उदाहरण म्हणजे संतोष आनंद. सिनेमा म्हणजे कल्पकता, सिनेमा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात निर्माण झालेली आणि मग पडद्यावर साकारलेली कलाकृती, पण याच सिनेमातलं एक गीत ज्या लेखकाने लिहिलं, ते गीत अजरामर तर झालंच पण ते गीत त्या लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील तितकंच महत्त्वाचं ठरलं.

- Advertisement -

म्हणून जेव्हा संतोष आनंद थरथरत्या आवाजात टीव्हीवर येऊन म्हणतात की, दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है, ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है, तेव्हा पाहणार्‍याचे डोळे आपसूकच ओलावतात. संतोष आनंद कधीकाळी प्रसिद्धीचं मोठं वलय असलेला व्यक्ती आज एकटा आहे. लग्नानंतर १० वर्षांनी मुलगा झाला. हुशार होता म्हणून आयएएस अधिकार्‍यांना क्रिमिनॉलॉजी शिकवायचा. २०१४ साली वरिष्ठांनी त्रास दिला म्हणून पत्नीसह त्याने आत्महत्या केली आणि संतोष आनंद एकटे पडले. आता आयुष्यात छोटी नात आणि तेच राहिलेत. ना पैसा आहे ना प्रसिद्धी. ज्यांच्यामुळे मुलाने जीव दिला त्यांना कुठलीही शिक्षा नाही आणि हे स्वत: आता चालूही शकत नाहीत. म्हणूनच की काय जेव्हा कधी हे गाणं कानावर पडतं, तेव्हा या गाण्याचा लाचार गीतकार डोळ्यांसमोर उभा राहतो, पण केवळ या एका गाण्यापुरतं मर्यादित करियर संतोष आनंद यांचं नव्हतं. याच गीतकाराने २६ हून अधिक सिनेमांसाठी १०९ गाणी लिहिलीत.

१९७० साली पूरब और पश्चिम सिनेमापासून आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या संतोष आनंद यांना ओळख मिळाली ती १९७२ साली. कारण याच वर्षी त्यांचा शोर सिनेमा रिलीज झाला, ज्यातील एक प्यार का नगमा हैं, हे गाणं सुपरहिट झालं. हे तेच गाणं आहे जे आजही ऐकलं जातं. याच सिनेमाच्या निमित्ताने त्यांची ओळख लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत झाली आणि त्यांनी त्यानंतर सोबत बरेच सिनेमे केले. १९७४ साली रोटी कपडा और मकान सिनेमातील मै ना भुलुंगा गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. याच सिनेमातलं त्यांचं और नहीं बस और नही, हे गाणंदेखील चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये पथ्थर से टक्करसाठी गाणी लिहिली. तो सिनेमा तितका चालला नाही, पण त्यातील फिर जाओ काशी फिर जाओ काबा आणि दोस्त वही, ही गाणी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. मग आलं साल १९८१ आणि संतोष आनंद यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सिनेमा रिलीज झाला.

- Advertisement -

दिलीप कुमार, हेमा मालिनीपासून मनोजकुमारपर्यंत तगडी स्टारकास्ट असलेला क्रांती सिनेमा संतोष आनंद यांच्यासाठी खास ठरला. या सिनेमातली बहुतांश गाणी संतोष आनंद यांनी लिहिली होती. हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला होता. जिंदगी की ना टूटे लडी, अब के बरस आणि चना जोर गरमसारखी गाणी तर हिट झालीच, पण जे गाणं आजही नवरात्रीत ऐकायला मिळतं ते दुर्गा है मेरी माँ, अंबे है मेरी माँ, गाणंदेखील संतोष आनंद यांनीच लिहिलं आहे. याच वर्षी रिलीज झालेल्या प्यासा सावन सिनेमातील त्यांचं मेघा रे मेघा रे, हे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गाणं सुपरहिट झालं. १९८२ मध्ये ऋषी कपूरचा प्रेमरोग आला. त्यातली गाणीदेखील संतोष आनंद यांनी लिहिली. याच सिनेमातील मोहब्बत है क्या चीज, गाण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, पण मला वैयक्तिक या सिनेमातील त्यांचं दुसरं गाणं म्हणजे ये गलिया ये चौबारा, यहा आना ना दोबारा, हे गाणं जास्त आवडतं. त्यांचं हे गाणं आजच्या पिढीला लक्षात राहील असं आहे.

प्रेमरोग सिनेमानंतरदेखील संतोष आनंद यांनी जख्मी शेर, मेरा जवाब, लव ८, पथ्थर दिल, बडे घर की बेटी, मजलूम, संतोष, नागनागिन, सूर्या, दो मतवाले, रणभूमी, नागमणी, जुनून, संगीत आणि तहलकासारख्या सिनेमांसाठी गीतलेखन केलं. यापैकी ठळक सिनेमातील त्यांचं दिल दिवाने का डोला दिलदार के लिये, हे त्यांचं गाणं सुपरहिट ठरलं होतं, पण क्रांती आणि प्रेमरोगसारख्या सिनेमांसारखं यश या सिनेमांना मिळालं नाही. त्यासाठी उजाडावं लागलं ते साल १९९३. याच वर्षी आलेल्या एका सिनेमाने संतोष आनंद यांना पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं. हा तोच सिनेमा आहे, ज्यावरील मिम्स आजही सोशल मीडियावर पाहता येतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हमखास टीव्हीवर लागणार्‍या या सिनेमाचं नाव होतं तिरंगा. राजकुमार, नाना पाटेकर यांच्या भूमिका, प्रलयनाथ गुंडास्वामी, फ्युज कंडक्टर यांसारख्या गोष्टीमुळे हा सिनेमा लोकांच्या लक्षात राहिलाच, पण या सिनेमातील मेरी जान तिरंगा है, हे गाणंदेखील लोकांच्या स्मरणात राहिलं. हे गाणं स्वातंत्र्यदिनी आजही ऐकलं जातं, पण संतोष आनंद यांनी लिहिलेलं याच सिनेमातील दुसरं एक गाणंदेखील आज तितकंच प्रसिद्ध आहे.

पिले पिले ओ मोरे राजा, हे गाणं आज कुठल्याही ओल्या पार्टीला गेलं तर ऐकायला मिळतं. त्यांच्या लेखनातील ही बाजू अनेकांना माहिती नाहीये, पण त्यांनी अनेक पार्टी साँग्सदेखील लिहिलीत. तिरंगानंतर त्यांनी इंडस्ट्रीत इतकं काम केलं नाही. त्यांचा शेवटचा सिनेमा १९९८ साली आलेला प्रेम अगन. त्यानंतर त्यांनी सिनेमांसाठी लिहिलं नाही म्हणा किंवा काम मिळालं नाही म्हणा, पण तिथूनच संतोष आनंद हे नाव या रूपेरी पडद्यावरून गायब झालं. गेल्या दोन वर्षांत अनेकांना हे नाव पुन्हा स्मरणात आलं. औचित्य एका रिअ‍ॅलिटी शोचं असलं तरी त्या नावाची ओळख प्रेक्षकांना पुन्हा झालीय. आज त्यांची आर्थिक, शारीरिक अवस्था तितकी चांगली नाही. त्यांची सद्यस्थिती ही केवळ त्या एका गीतकाराचं प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यांच्यासारख्याच काळाच्या ओघात मागे राहिलेल्या अनेक गीतकार, संगीतकार आणि सिनेकलाकारांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. म्हणूनच त्यांना बघून त्यांच्याच गाण्याच्या काही ओळी आठवतात. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो, आना और जाना है, दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है, ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी हैं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -