– रमेश लांजेवार
जगातील प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचे महत्त्व कळावे या उद्देशाने नोव्हेंबर 1999 मध्ये युनेस्को येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण 21 फेब्रुवारी 1952 मध्ये ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या भाषा धोरणाचा विरोध केला होता. त्यांना आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवून ठेवायचे होते. प्रदर्शन करणारे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती की बांगला भाषेला अधिकृत दर्जा मिळावा. परंतु अशा परिस्थितीत पाकिस्तानी पोलिसांनी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. परंतु विरोध थांबला नाही. अखेरीस, पाकिस्तान सरकारला बांगला भाषेला अधिकृत दर्जा द्यावा लागला. मातृभाषेच्या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांना श्रद्धांजली देण्यासाठी युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये जनरल कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला व 21 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हापासून संपूर्ण जगात 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जाऊ लागला.
संयुक्त राष्ट्रानुसार, जगात साधारणत: 6900 भाषा बोलल्या जातात. यामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणार्या 10 भाषांमध्ये इंग्रजी, मँडारिन, हिंदी, जपानी, रशियन, बांगला, पोर्तुगीज, अरबी, पंजाबी आणि स्पॅनिश यांचा समावेश होतो. भारताचा विचार केला, तर मातृभाषेला आगळेवेगळे महत्त्व असल्याचे दिसून येते. भारतात प्रत्येक 40 किलोमीटरनंतर भाषा बदलताना दिसते. जसे म्हटले जाते, कोस-कोस पर पानी बदले, चार कोस पर वाणी, त्याप्रमाणे भारतात मातृभाषा बदलताना दिसते. महाराष्ट्राची मातृभाषा जरी मराठी असली तरी प्रत्येक 40 किलोमीटरनंतर लोकांच्या राहणीमानासह भाषा आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गोडवा पहायला मिळतो.
भाषेचा विचार केला, तर भारताची भाषा आणि संस्कृती ही जगावेगळी असल्याचे दिसून येते. भारतात अनेक जाती, पंथ, धर्म यांचे लोक राहतात. भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्याची मातृभाषा वेगळी आहे. त्यातही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक 40 किलोमीटरच्या अंतरावर भाषेचा वेगळा गोडवा जाणवतो. भारतात हिंदी दिल की धड़कन तो मातृभाषा दिल की आवाज, या पद्धतीने मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा सन्मान केला जातो. वर्ल्ड लँग्वेज डेटाबेसच्या 22 व्या संस्करण इथोनोलॉजीनुसार, जगातील 20 सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये हिंदी ही जगातील तिसर्या क्रमांकाची भाषा मानली जाते. जसे मातृत्व आणि पितृत्व महत्त्वाचे आहे, तसेच प्रत्येक देशाची मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा महत्त्वाची आहे. जगात अनेक भाषांचे भांडार आहे, यात दुमत नाही. त्या संपूर्ण भाषा अवगत करायलाच हव्यात, कारण त्यामुळे ज्ञानाचा खजिना वाढतो. परंतु त्या भाषांच्या आड मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.
आजही भारतात इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व दिले जाते, हे दुर्दैव म्हणावे लागेल. भारतातील नामांकित व्यक्ती, उच्चभ्रू वर्ग किंवा बॉलीवूडमधील व्यक्ती इंग्रजी भाषेला प्राधान्य देऊन मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषेला विसरताना दिसतात. यावर सरकारने कुठेतरी अंकुश लावायला हवा, अन्यथा यामुळे मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा अपमान होईल. जगातील कोणताही देश असो, प्रत्येकाची मातृभाषा ही पूर्वजांची अमूल्य देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतेही कार्य करताना किंवा बोलताना मातृभाषेला प्रथम स्थान द्यावे.
प्रत्येकाची मातृभाषा ही त्यांच्या संस्कृतीनुसार अवगत असते. त्यामुळे आपण प्रवास करताना प्रत्येक 40 किलोमीटरनंतर भाषेत थोडाफार बदल झालेला दिसतो. सांगायचे तात्पर्य म्हणजे, देशात किंवा जगात कुठेही गेलो तरी मातृभाषेचा विसर पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. जगातील विविध भाषांचा आणि संस्कृतीचा अभ्यास करायलाच हवा, परंतु आपल्या संस्कृतीला किंवा मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे.
सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतो की आई-बाबा, काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा, मावशी-मावसा हे पारंपरिक शब्द विसरले जात असून मम्मी, डॅडी, पप्पा, मॉम, आंटी यांसारख्या इंग्रजी शब्दांचा अधिक वापर होऊ लागला आहे. मामा-मामी, काका-काकू, मावशी-मावसाजी या नात्यांना विशिष्ट महत्त्व आहे, कारण यामुळेच नातेसंबंध अधिक दृढ होतात. मात्र, आता ही नावे विसरली जात असून सर्वांनाच आंटी आणि अंकल म्हटले जात असल्याचे दिसते. हे मातृभाषेसाठी दुर्दैवी आहे. त्याचप्रमाणे लहान वयातच मुलांना मोबाईलची सवय लावल्यानेसुद्धा मातृभाषेचा विसर पडतो. याचा परिणाम मातृभाषेवर होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. भारतामध्ये 19,500 पेक्षा अधिक मातृभाषा आहेत, हाही भारताचा ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा सटीक वापर केला, तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला अनेक भाषा आपोआपच अवगत होतील आणि भाषेचा मोठा साठा निर्माण होईल. यामुळे प्रत्येकाचे भाषाविषयक ज्ञान वाढण्यास मदत होईल.
भारताचे दुर्दैव असे म्हणावे लागेल की लोकसभेत किंवा राज्यसभेत काही खासदार मातृभाषा किंवा राष्ट्रीय भाषा (हिंदी) न वापरता इंग्रजी भाषेचा अधिक वापर करतात. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने यावर अंकुश लावण्याची गरज आहे. अनेक देशांत त्यांच्या मातृभाषेतच अधिक बोलले जाते-उदाहरणार्थ जपान, चीन, स्पेन, अरब देश, रशिया, जर्मनी, इस्त्रायल इत्यादी. त्यामुळे भारतातील प्रत्येक भाषेला महत्त्व दिले पाहिजे. म्हणूनच इंग्रजी भाषेऐवजी मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा. जर आपण असे केले, तर येणारी पिढी याचे स्वागतच करेल. त्यामुळे देशासह जगातील प्रत्येक व्यक्तीने मातृभाषेचा आदर व सन्मान करावा. मातृभाषा ही प्रत्येक व्यक्तीची आन, बाण, शान आणि ईश्वरी देणगी आहे. ती समुद्रापेक्षाही विशाल व शक्तिशाली आहे, कारण संपूर्ण ज्ञानाचे उगमस्थानच मातृभाषेतून झाले आहे.