घरफिचर्ससारांशअस्वस्थ सुधाकर !

अस्वस्थ सुधाकर !

Subscribe

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील त्रिकोणी मराठी कुटुंबातल्या बेचाळीस वर्षाच्या आयुष्यात हरलेल्या, उमेदीच्या वयात कधीतरी नाटकात रंगकर्मी असलेल्या आणि हरवलेल्या किंबहुना दारुच्या नादाला लागल्याने गमावलेला भूतकाळ वर्तमानात ओढून ताणून जगण्याचा प्रयत्न करणारा अनिल पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला आहे. त्यामुळेच त्याचं वर्तमानातल्या वास्तवाशी पटत नाही. जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडलेलो आहोत, कुटुंबाची घराची जबाबदारी पेलवायला आपण संपूर्णपणे नालायक ठरलेलो आहोत, हे वास्तव त्याला अस्वस्थ करतेय, या वास्तवाला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यात नाही. या नालायकपणाचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी घरातली पत्नी आणि मुलगा ही हक्काची साधनं त्याच्याकडे आहे.

संपूर्णपणे पराभूत मानसिकतेचा अनिल दारुपाई विक्षिप्त, हेकेखोर, बेफिकीर, हिंसक आणि प्रचंड स्वार्थी झालेला आहे. स्वतःतला कमकुवतपणा लपवण्यातल्या पुरुषी अहंकारातून भवतालच्या जगासोबत फटकून वागणार्‍या अनिल म्हात्रेची सकाळ होते तीच दारुच्या गुत्त्यावर जाण्याच्या तयारीत, डोळे उघडल्यावर सकाळी चहाच्या वेळेत त्याला दारुचा ‘एकच प्याला’ रिचवल्याशिवाय त्याचा दिवस उजाडत नाही. हे मागील आठ दहा वर्षांपासून सुरू आहे. त्याची पत्नी भारती ही नोकरी करून घर चालवणारी सामान्य गृहिणी आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करून घरचीही जबाबदारी संभाळते. अनिल आणि भारतीला एकोणीस वर्षांचा मुलगा रोहन आहे. रोहन कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय, त्याला सीए व्हायचंय. त्यासाठी त्याची अभ्यासाची तयारी सुरू आहे. अनिलच्या दारुच्या व्यसनामुळे घरात भारती आणि अनिलमध्ये कायमच भांडणतंटा होतो.

अनिलचं दारु पिऊन येऊन गलिच्छ शिविगाळ करत भारतीला मारझोड करणं हा रोहनच्या जगण्याचा भाग झालेला आहे. या घरातल्या तणावाच्या वातावरणामुळे कायमच भेदरलेला, रोजच्या भांडण हाणामारीची आणि बापाची धास्ती घेऊन आपल्या अभ्यासात रमण्याचा प्रयत्न करणारा रोहन त्यामुळेच कायम दबावात असतो. त्याच्या तारुण्यसुलभ वयाची कुठलीही उमेद त्याच्या चेह-यावर नाही. तर भारतीने या घरातल्या भांडणतंट्याला आपलं नशीब समजून त्यासोबत तडजोडीचं आयुष्य स्वीकारलं आहे. असं असतानाही तिच्या मनात नवर्‍याबाबत आत्मियता आहे. मात्र त्यासोबतच त्याच्या दारुमुळे तिच्या मनात अनिलचा तिरस्कार नाही, मात्र त्याच्या दारुच्या व्यसनामुळे प्रचंड तिटकारा आहे. अनिलच्या दारुच्या व्यसनामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड घृणा आहे, परंतु सामाजिक दबाव आणि लग्नाची बांधलेली आयुष्यभराची गाठ म्हणून ती अनिलचं बेफिकीर वागणं निमूटपणे सहन करतेय. तिची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती आहे. दुसरीकडे अनिलच्या वागण्यात फरक पडत नसल्याने या त्रिकोणी घरात एक प्रकारची उदासीनता, उद्विग्नता आणि घरपण हरवल्यासारखा मूक भकासपणा आहे.

- Advertisement -

अनिलला मात्र त्याच्या या बेफिकीर, व्यसनीपणाच्या घरात होणार्‍या परिणामाविषयी कुठलंही सोयरंसुतक नाही. त्याचा बेजबाबदारपणा कायमच आहे. त्याच्या वागणुकीत एक प्रकारचा पुरुषी अहंकार कायम डोकावतोय, कदाचित तो त्यालाही जाणवत असावा मात्र दारुच्या व्यसनातून सुटका होत नसल्याने त्याने आपल्या बेफिकीर वागणुकीला अहंकारामागे लपवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. दारुशिवाय दिवसाचीच सुरुवात होत नाही. आजच्या दिवसात दारु प्यायला कशी मिळेल एवढंच त्याचं रोजचं जगणं आहे. या पलिकडे त्याचं जग नाही. त्याला उधारीवर दारु पाजणारा शांताराम गुत्तेवाल्याने उधारी वाढल्याने त्याला दारु द्यायला नकार दिलाय, गुत्त्यावरची बोहनी उधारीवर करायला तो तयार नाही. ‘का पितोस एवढा अन्या,’ बोलून तो त्याला समजावतो, त्यावर अनिलचं एकच उत्तर कायम ठरलेलं आहे.

‘चुकवतो शांत्या दोनचार दिवसात, बायकोचा पगार झाल्यावर, आता दे एक ग्लास…खालीपीली सकाळी सकाळी भेजा खाऊ नको,’ शांताराम गुत्तेवाला बबन पोर्‍याला सांगून एक ग्लास काऊंटवरच द्यायला लावतो. ‘हा लास्ट अन्या…आता पुना उदारीवर येऊ नको, नायतर तुझ्या घरी येऊन बायकोला…’ अन्या थोडासा उद्वीग्न, रागात पण दारुचा ग्लास भरला जात असताना त्या आवाजाने शांत होतो. बॉटम अप मारून एक शेर ‘ऐकवतो…जिसने नही पी शराब…उसकी जिंदगी खराब,’ बोलून निघून जातो. जाण्याआधी शांत्यासमोर गाणं गुणगुणतो, ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते…जाए तो जाए कहाँ…दुनिया तो दुनिया तू भी पराया..हम यहाँ ना वहाँ…’ ‘शांत्या- चल निघ आता मारली ना…चल निघ, सकाळी सकाळी धंद्याची खोटी करू नको. ’ अनिल देशी बारचा पडदा बेफिकीरीने ढकलून गुत्त्याबाहेर पडतो.

- Advertisement -

एका दुकानाच्या शटरखाली दारु पिऊन झोपून पडलेला अनिल म्हात्रे, शर्टाची बटनं उघडी, कपडे चिखलमातीने माखलेले, तोंडातून लाळ अशा अवस्थेत असताना त्याच्या घरातली स्थिती नेहमीसारखी सामान्य आहे. भारतीला कामावर जाण्याआधी रोहनसाठी नास्ता बनवायचा आहे. दुपारच्या जेवणासाठी तिनं कुकर लावलाय, हे सगळं काम करतानाही ती कुठल्याशा अनामिक चिंतेत आहे. शून्यात पाहात असताना ती कुठल्याशा स्वप्नील जगात रमलीय. अनिलसोबत ती स्कूटरवर मागे बसलेली असताना तिचं मन हळव्या नातेसंबंधांच्या आणि अनिलसोबत असलेल्या स्वप्नील अशा रोमँटिक विचारात रमलेलं आहे. अनिलसोबतच्या रोमँटिक ट्रान्समध्ये असताना दार वाजल्याने किंवा स्वप्नातल्या एखाद्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाला जोडून आलेल्या कुकरच्या शिट्टीने भारती भानावर येते, अनिलनं त्याचं प्रेम कधीचंच दारुच्या ग्लासत बुडवून मारून टाकलेलं होतं. आता त्याच्याकडून स्वतःला ओरबाडून घेणंच आपल्या नशिबात असल्याचं वास्तव तिच्या मनाचा ताबा घेतं. त्याच वेळी घराच्या दरवाजाची धडधड तिच्या स्पदनांची धडधडही वाढवतेय.

आतापर्यंत अभ्यासात मग्न असलेला रोहन भानावर येतोय. अचानक दार वाजल्यावर मायलेक दोघेही ठाम वास्तवात येतात. रोहनच्या डोळ्यात आता बापाची भीती आहे. हा नराधम येऊन आता आईला शिवीगाळ करेल, मारझोड करेल या भीतीनं तो जागेवरच गारठलेला आहे. तर भारतीही भेदरलेली आहे. आज अनिल काय नवा धिंगाणा घालणार या धास्तीने दोघेही एकमेकांकडे पाहत असताना, धाड धाड दाराच्या आवाजाने भारती भानावर येऊन दार उघडते, तर अनिल बेफिकीर होऊन घरात कलंडतो. त्यावेळी भारती त्याला आधार देऊन आतल्या खोलीत नेण्याचा प्रयत्न करत असताना, तो तिला ‘चल हट ** साली..’ बोलून झिडकारतो आणि हेलकांडत आतल्या खोलीत जाऊन पडतो, भारती त्याच्या पायातली एक राहिलेली चप्पल बेडवरून उचलून बाजूला फेकते. त्यानंतर अनिलची दारुच्या नशेत शिवीगाळ…‘कमावते म्हणून जादा नाटक करतेस साली…पैसा तो ** भी कमाती है.

आपण कोनै…अन्या म्हात्रे बोलतात आपल्याला, अरे आपन पितो आपल्या पैशाची पितो, नायतर बायकोच्या पैशाची, कोनाची उधारी ठेवत नाय आपण कधी….ए शांत्या साल्या, हलकट, निच ***…’ ‘नाही झेपत तर कशाला पिता एवढी,’… भारतीचं विचारणं, त्यावर ‘तू कोण आपल्याला विचारणारी, बायको हैस तर बायकोसारखी राहा, पैसा कमावते तर पैशाचा माज दाखवू नको,’ पैसा तर ** पण कमावते, तू तर रोज पितोस रे ***…सगळी गल्ली मोहल्ल्यात भीक मागून झाली तुझी, तिथं बोलायला फाटते तुझी, घरात येऊन तुला बायको लागते, ‘ माझ्या घरात राहतेस आणि वर….आता तोंडाचं गटार बंद कर पड तिकडे, ए बायको…आपण त्या शांत्याला सुनावला, साला ***, त्याला धडा शिकवणार आपण, अनिल आता भारतीवर दरवाजाआड जबरदस्ती करतोय…हा भेसूर आवाज रोहनपर्यंत पोहचतो. तो प्रचंड उद्वीग्न, राग, हतबल भेदरलेला, प्रचंड तणावात होता, पहाटेपर्यंत याच तणावाने त्याला जागं ठेवलं होतं.

पुन्हा दुसर्‍या दिवशी नेहमीसारखी सकाळ झाल्यावर त्यात काहीच बदल नाही, पुन्हा तेच ते, तोच पाढा रोजचा, अनिल सकाळीच भारतीच्या पर्समधले पैसे काढून रिकामी पर्स तिच्या तोंडावर मारून घराबाहेर निघालाय, येतो उशिराने बोलून बेफिकीरीत एक चप्पल शोधतोय, ‘काल हरवून आलास तिसरा जोड,’ भारती आठवण करून देते..‘फिकर नॉट…रोहन आहे ना माझा छोकरा…’ त्याची सँडल घालतो आणि घराबाहेर निघतो. या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे जरी झालेली असली तरी हा दिवस अनिलच्या आजपर्यंतच्या नशेबाज बेफिकीर वागण्याचा काही भेसूर परिणाम घेऊन येणारा असल्याची कल्पना कुणालाही नाही.

अगदी भारती आणि रोहनलाही नाही, दुपारी दारु ढोसून अनिल घरी आलेला आहे…बाहेरच्या जगाला शिवीगाळ करत. दार त्याच दहशतीने धडधड वाजलंय, भारतीने नेहमीच्या धास्तीने याही वेळेस दरवाजा उघडलाय, पण यावेळी हा निर्णायक टप्पा आहे. हा अखेरचा क्षण आहे ज्यावेळी सर्व सहनशीलतेची परिसीमा होते, त्या पलिकडे मन निबर होऊन गोठून जातं, या क्षणी नातं, प्रेम, घटनेचा परिणाम असलं काहीही डोक्यात उरलेलं नसतं, या धोकादायक क्षणात भारती आणि रोहनची एक क्षण नजरानजर होते, घरात भेलकांडत आलेल्या अनिलच्या डोक्यात भारतीकडून लोखंडी रॉडचा जोरदार प्रहार झालाय. अशा परिस्थितीत अनिल नशेतही हतबद्ध होतो, हे अर्तक्य, अविश्वसनीय आहे. तो आधारासाठी मुलगा रोहनकडे धावतो, पण रोहन त्याला जुमानत नाही, अनिल आता जमिनीवर पडलेला आहे आणि रोहनने त्याचे कमरेखाली पाय धरलेले असताना अनिलच्या रोजच्या छळामुळे निबर मनाची झालेली भारती त्याच्या डोक्यावर प्रहार करतेय….हे स्वप्न आहे की सत्य…एक प्रश्नचिन्ह आहे.

पुढे पुन्हा दार धडधडलंय, पुन्हा तीच भीती, तीच धास्ती, तीच उद्वीग्नता, तोच राग, तीच हतबलता आणि दिवसाची तीच सुरुवात नेहमीसारखी. भारती आणि रोहनची नजरानजर, पण या नजरेत आज वेगळंच काहीतरी आहे….जे आजपर्यंत नव्हतं, ही हतबलता कायमची संपवण्याची जबर क्षणिक इच्छा किंवा ही वेदना कायमची संपवण्याचा कट, काहीही म्हणावं…पण हा त्रास इथं संपायलाच हवा…या माणसासकट.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -