घरफिचर्ससारांशप्रेक्षक संवादाचा अनोखा पुढाकार..!

प्रेक्षक संवादाचा अनोखा पुढाकार..!

Subscribe

माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठी ज्याची गरज आहे तो म्हणजे आत्मिक संवाद. अशावेळी रंगकर्मी म्हणून आम्ही एक सकारात्मक आणि ठोस पुढाकार घेतला. कलाकार आणि प्रेक्षकांमधील चौथी भिंत तोडली आणि थेट प्रेक्षक संवाद सुरू केला. प्रेक्षक आमच्यासाठी केवळ रसिक म्हणून नाही जे केवळ टाळ्या वाजवतील आणि निघून जातील. तर प्रेक्षक हे आमच्यासाठी पहिले आणि सशक्त रंगकर्मी आहेत. म्हणूनच नाटकाच्या प्रस्तुती अगोदर प्रत्येक प्रेक्षकांशी भेटून त्यांच्याशी नाटकाच्या संकल्पनेविषयी संवाद सुरू केला. कलाकार प्रत्यक्ष भेटायला येतात आणि आपल्याशी वैचारिक संवाद करतात ही प्रक्रिया प्रेक्षकांसाठी अत्यंत नवीन आणि अनोखी होती.

रंगकर्म यामध्ये सर्वात महत्वाचे स्तंभ म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक. या दोन ध्रुवांमध्ये नाटक प्रवास करत असते. कलाकार आणि प्रेक्षकांना जोडून ठेवतो तो रंगसंवाद. रंगसंवाद या संकल्पनेची खरी ओळख आणि प्रचंड ताकद जाणवली ती थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांतामध्ये. संवादाला आपल्या मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. परस्परांशी होणारा संवाद ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. आज संवादाची असंख्य माध्यमं, संसाधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण खरंच आपला आपापसांत संवाद होतो का? आज नफा आणि तोटा या चक्रात अडकलेले मानवी जीवन खरेदी विक्रीच्या पलिकडे जातच नाही. जागतिकीकरणाने आज जग जवळ आले असे म्हटले जाते. पण खरंच जवळ आले की मानवीय संवेदनेपासून दूर गेले आहे. आज जग संवाद हीन होत चालले आहे. वरवर होणार्‍या संवादाने गरज भागत नाही तर लालसा वाढत जाते. समाधान मिळत नाही तर ईर्षा वाढत जाते. आज रचनात्मक संवाद अभावाने होतो. याउलट विध्वंसाकडे जास्त वळतो. आजचा काळ हा संवाद नसलेला, आव्हानात्मक आणि स्पर्श नसलेला काळ आहे.

माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठी ज्याची गरज आहे तो म्हणजे आत्मिक संवाद. अशावेळी रंगकर्मी म्हणून आम्ही एक सकारात्मक आणि ठोस पुढाकार घेतला. कलाकार आणि प्रेक्षकांमधील चौथी भिंत तोडली आणि थेट प्रेक्षक संवाद सुरू केला. प्रेक्षक आमच्यासाठी केवळ रसिक म्हणून नाही जे केवळ टाळ्या वाजवतील आणि निघून जातील. तर प्रेक्षक हे आमच्यासाठी पहिले आणि सशक्त रंगकर्मी आहेत. म्हणूनच नाटकाच्या प्रस्तुती अगोदर प्रत्येक प्रेक्षकांशी भेटून त्यांच्याशी नाटकाच्या संकल्पनेविषयी संवाद सुरू केला. कलाकार प्रत्यक्ष भेटायला येतात आणि आपल्याशी वैचारिक संवाद करतात ही प्रक्रिया प्रेक्षकांसाठी अत्यंत नवीन आणि अनोखी होती. या संवादाची सुरुवात आम्ही स्वतःच्या घरापासूनच केली. परिवाराला यात सहभागी बनवले. मग ओळखीचे यांच्याशी रंगसंवाद सुरू केला. या प्रक्रियेतून अनोळखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू झाला. या संवादाने व्यक्तींच्या विचारांशी, असंख्य मानसिकतांशी, स्वभावांशी आणि व्यक्तिमत्वांशी ओळख झाली. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हेही उमगले.

- Advertisement -

या समृद्ध अनुभवांच्या भूमीवर आमचे रंगकर्म उभं राहते. त्यावेळी माझ्या कलाकाराची ताकद अफाट वाढत जाते. ही संवादाची देवाणघेवाण कलाकार आणि प्रेक्षक या दोघांच्या विचारांचे मंथन करते. परंपरागत चालत आलेली रंगभूमीची चौकट मोडत प्रेक्षकांमध्ये नाटकाला पाहण्याची नवीन दृष्टी जागवली. आम्हांला असेही प्रेक्षक लाभले ज्यांनी त्यांच्या आयुष्यात आजवर नाटक पाहिलेच नव्हते. पण या पुढाकाराने ते नाटकाच्या प्रक्रियेशी कायमचे जोडले गेले. असेही प्रेक्षक भेटले ज्यांना रंगमंचावर अभिव्यक्त होण्याची इच्छा होती. असे प्रेक्षक रंगकर्मी म्हणून सहभागी झाले. प्रेक्षकांना आयोजक होण्याची ताकदही या प्रक्रियेने दिली. कलाकारांचा विश्वास अजून दृढ झाला आणि विचारांची व्यापकता वाढत गेली. कलाकार आणि प्रेक्षक थेट संबंध आल्याने आत्मबळ वाढले. प्रेक्षक संवादाचा हा परीघ वाढतच गेला.

सुरुवातीला कोणाशी बोलणार, कसे बोलणार, हे प्रश्न होते. प्रेक्षकांसाठी आम्ही थेट कोणत्याही बाजारू माध्यमाचा वापर न करता प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. हळूहळू सामान्य प्रेक्षकांपासून, साहित्यिक, राजनैतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील प्रेक्षकांशी हा वैचारिक संवाद सुरू झाला. कलाकार म्हणूनही आणि एक व्यक्ती म्हणूनही आम्हांला हा संवाद सक्षम करत आहे. यात अनेक अनुभव आले जसे की, तुमचा रंग कोणता, विशेष चळवळीसाठी काम करणारे आहेत का, हौशी, प्रायोगिक, कमर्शियल नाही करत का, अशा अनेक प्रश्नांच्या किंवा मानसिकतेच्या समोर रंगकर्मी म्हणून ठामपणे उभे राहिलो. कलाकार हा समाजाचा आरसा असतो. रंग म्हणजे विचार आणि विचारांचे कर्म करणारा हा रंगकर्मी कोणत्याही एका पक्षाचा नसतो. रंगभूमीचे प्रस्थापित मापदंड मोडून स्वतः कला विश्वात स्वातंत्र्याचा परचम फडकवू लागलो. भारतीय मातीतील वैचारिक प्रगतिशील रंगकर्माचे वारसदार बनलो.

- Advertisement -

हा संवाद प्रस्तुती अगोदर आणि प्रस्तुतीनंतरही सुरू असतो. ज्या रंगमंचावर आम्ही प्रस्तुती केली त्याच रंगमंचावर प्रेक्षकांना बोलावताना तो स्पर्श, ती स्पंदनं प्रेक्षकही अनुभवतात. प्रयोग झाल्यावर सगळे प्रेक्षक रंगमंचावर येऊन प्रयोगातून मिळालेली जाणीव सर्वांसमोर मांडतात. प्रेक्षक केवळ नाटकाचा अनुभव जगत नाहीत तर त्या अनुभवाने प्रेरित होऊन आपली भूमिका ठाम करतात आणि त्यानंतरच प्रेक्षागृहाबाहेर पडतात. कलाकार आणि प्रेक्षक एकमेकांना सक्षम करण्यासाठी स्वतः उभे राहतात. ह्या प्रेक्षक संवादात केवळ आपले शहर नाही तर वेगवेगळ्या गावात, शहरात जाऊन हा संवाद सुरू असतो. प्रेक्षक नाटकाला येवो की ना येवो, पण ही मंथन प्रक्रिया त्याच्या मेंदूत सुरू होते जे आम्हा कलाकारांचे साध्य आहे. केवळ अभिनय स्वरूपात नाही तर व्यक्ती म्हणून कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस जातो. त्यामुळे कलाकारावरील विश्वास अधिक दृढ होतो. प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे सामाजिक विषयांवरील तसेच आयुष्याच्या प्रश्नांचे, जगण्याचे ध्येय एका दिशेला पुढाकार घेते.

नाशिक, पुणे, ठाणे, दादर, पनवेल, औरंगाबाद, दिल्ली अशा कितीतरी ठिकाणी जाऊन आम्ही हा प्रेक्षक संवाद साधत होतो. प्रत्येक जागेचा एक वेगळा इसेन्स, प्रभाव तिथल्या प्रेक्षकांशी बोलताना जाणवायचा. नावीन्याला स्वीकारणारे, मनापासून स्वागत करणारे, कधी काळजी करणारे, विचारांसाठी नेहमीच तयार असलेले प्रेक्षक आम्हांला भेटले. हे प्रेक्षक केवळ एका प्रयोगापुरता नाही तर आयुष्यभरासाठी आम्हा कलाकारांशी जोडले गेलो आहेत. या प्रक्रियेने प्रेक्षकांच्या अंतर्मनात जागा निर्माण झाली आहे. सत्तेत असलेले, वैचारिक, नीती निर्माण करणारे, बुद्धिजीवी, आंदोलनकारी, सामाजिक विश्लेषक, सांस्कृतिक कर्मी, मीडिया, नाटककार, रंगकर्मी या सगळ्यांशी संवाद साधत त्यांच्या अंतर्मनाला साद घालत एका नवीन दिशेकडे, कला प्रतिबद्धतेकडे पाऊल टाकले. कलेचे, रंगमंचाचे मूळ ध्येय काय आहे? यावर चर्चा करून प्रेक्षकांमध्ये रुजवलेल्या बाजाराने उभं केलेल्या एंटरटेनमेंटला खोडायचं होते. रंगभूमीला पाहणार्‍या तथाकथित कला समीक्षकांच्या समिक्षेवर अवलंबून न राहता प्रेक्षकांना नाटक पाहण्याची एक उन्मुक्त दृष्टी मिळाली आणि ह्या दृष्टीचा थेट सकारात्मक-कलात्मक प्रभाव आता रंगभूमीवर दिसून येत आहे आणि नाटककारांनीही आता नाट्य प्रयोगात प्रेक्षकांचा जिवंत सहभाग घेण्याची सुरुवात केली आहे..

रंगकर्माला पुढे नेणारे पाऊल टाकत रंगभूमीवर नाटकाला एक प्रॉडक्ट म्हणून पाहणार्‍या मानसिकतेवर, वृत्तीवर आम्ही प्रहार केला. बाजाराच्या जाळ्यात फसलेल्या रंगभूमीला पुनरुत्थानाकडे वळवले. आज सांगायला हजारो टीव्ही चॅनेल्स आहेत, इतर सोशल माध्यमं आहेत. पण संवादाला एकही नाही. म्हणूनच या संवादहीनतेला संवेदनशील करून वैचारिक वळण देण्याची सुरवात आम्ही केली. वैचारिक संवादाची मांडणी केली. प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना वैचारिक प्रक्रियेशी जोडत आहोत. रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहेत! रंगभूमी घडवताना सजग आणि सूज्ञ प्रेक्षक आणि स्वतःही घडत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -