घर फिचर्स सारांश उत्तराखंड छोटा चार धाम

उत्तराखंड छोटा चार धाम

Subscribe

अधिकमास.. म्हणजेच पवित्र पुरुषोत्तम महिन्यास प्रारंभ झालाय. ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या अखंड निवास असलेल्या देवभूमीतील गंगोत्री या दुसर्‍या धामास आज अधिक श्रावण चतुर्थीच्या पावन दिनी आठवणींच्या मोहन माळेतून ओघळलेल्या ‘स्मृतीमण्यांना’ तुमच्यासमोर सहर्ष सादर करण्यास अत्यानंद होत आहे.

–स्मिता धामणे

जहाँ पवन बहे संकल्प लिए
जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं
जहाँ ऊंचे नीचे सबरास्ते
बस भक्ती कें सूर में.. गाते हैं
भक्ती कें सूर में गाते हैं

- Advertisement -

३ जून २०२३ शनिवार रोजी बरकोट येथे मुक्काम करून सकाळी पाच वाजताच निघण्यास तयार झालो. तिकडे झुंजूमुंजू फार लवकर होते. चहा घेऊन हिरवेगार वृक्षराजीने नटलेले डोंगर, सुंदर दर्‍या, वळणावळणाचे रस्ते, दाट बर्फ अंथरून घेतलेले विशालकाय पर्वत.. या सर्वांना मागे ठेवून छान छान फोटो काढलेत. कारण गाडी सुरू होण्यास काही अडचण येत होती. तात्पुरता प्रॉब्लेम सोडवून आम्ही प्रवासास सुरुवात केली. ईश स्तोत्रे, स्तवनांच्या सामूहिक पठणाने प्रभात भक्तीमय होत होती. धुकेयुक्त पण कोरडे वातावरण निसर्गाचा भरघोस आनंद खुल्या व दिलदार मनाने आम्हास बहाल करत होते. रस्त्यात बटाटा भाजी आणि पुरीचा आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासाकरिता प्रस्थान केले.

जाम लागणे तसेच गाडी समस्येमुळे अत्यंत हळू.. अंताक्षरी.. आवडेल ती गाणी छान मोठ्याने म्हणणे.. शब्दावरून गाणी म्हणणे.. असा आनंदमय प्रवास करत एका वळणावर गाडी खूप वेळ थांबल्यावर आम्ही सर्व मैत्रिणींनी उतरून सुंदर फोटो.. व्हिडोओग्राफी केली. कारण समोरील नजाराही तसाच होता.. स्वच्छ.. सुंदर डोंगरच डोंगर.. देवदार वृक्ष.. स्वतःसोबतच जास्तीत जास्त उंच जाण्याची स्पर्धा करत असताना दिसत होते. त्या गर्द हिरवाईतून दिसणारे नितळ निळे.. मधूनच शुभ्र आकाश त्याचे विविधाकार मनासोबतच हृदयाच्या प्रसन्नतेत मोलाची भर घालत होते. बस सुरू झाली नि आम्ही पुढील प्रवासाकरिता आसनस्थ झालो. मन आनंदाने गुणगुणत होते…..

- Advertisement -

वार्‍याची बेलगाम वाजंत्री
सर्वांच्या तन-मनी नाचती
हिरवाईच्या विविध वृक्षलतांनी
वन राणी साग्रसंगीत भरे ओटी

प्रवास करताना.. मुक्कामाच्या ठिकाणी काहीही अडचण येऊ शकते. त्याचा जास्त विचार न करता आहे त्या परिस्थितीचा जास्तीत जास्त आनंद घ्यायला शिकलो म्हणजे स्वतः आणि इतरांसाठीही सारे सुखकर होते. मनी भावना एकच.. आवश्यक ती माणसे काही अनादी कारण परंपरेने एकत्र आले आहेत. अगदी खरं आहे.. कोण? कोणास? केव्हा? कोणत्या कारणास्तव? भेटेल आणि चांगल्या मैत्रीत परावर्तीत होईल.. याचे उत्तर शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्यच..

गाडी थांबली म्हणजे खाद्यपदार्थ, फळांचा आस्वाद घेत.. तेथील लोकांसोबत संवाद साधत तेथील लोकजीवन समजावून घेत असतानाच ८२ किलोमीटर अंतरावरील उत्तर काशी येथे आलो. साडेपाच वाजले असल्यामुळे ताजेतवाने होऊन फक्त ३०० मीटर अंतरावरील पूर्वीच्या विश्वनाथ नगरीतील सुप्रसिद्ध.. पुरातन विश्वनाथ मंदिर पायीच बघावयास निघालो. पुराणात ‘छोटी काशी’ नि आता ‘उत्तर काशी’ म्हणून ओळख असलेले हे ठिकाण ११५८ मीटर उंचीवर आहे. या मंदिराची स्थापना स्वत: परशुरामांनी केली आहे.

विशेष म्हणजे स्वत: विश्वनाथ भगवान ज्योतिर्लिंग स्थापनेवेळी प्रगट झाले होते. खूप उंच.. साधारण साडे चार फूट उंच व दक्षिणेस झुकलेल्या शिवलिंगाची सायंआरती.. मंत्रपठणांच्या पवित्र स्पंदनांचा अनुभव घेत दर्शन घेतले. समोरील २६ फूट उंचीचे त्रिशूळ मंदिर, सतीचे शक्ती मंदिर, गर्भगृहातील देवी पार्वती, गणेश, साक्षी गोपाळ, बाबा मार्कंडेय यांचे दर्शन घेऊनच गंगोत्री धाम येथे दर्शनास जाण्याची प्रथा आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाइतके पुण्य मिळते.

नंतर अत्यंत वेगाने येणार्‍या, विशाल पात्र असलेल्या ‘कत्यूरी शैली’तील सुंदर.. स्वच्छ घाट.. आरतीचा आनंद घेतला. कोसल नरेश.. भगिरथाने आपल्या ६०,००० पूर्वजांची कपिल ऋषींच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणले म्हणून हे पात्र..भागीरथी. रूमवर जाऊन जेवण.. थोडा आराम करून रात्री दोन वाजताच गंगोत्रीसाठी प्रयाण करण्याचे ठरविले.

साधारण ९४ कि.मी. अंतर.. रस्ता चांगला असूनही समोरून गाडी आली म्हणजे अवघड होऊन जाई. रात्रीसुद्धा चंदेरी हिमशिखरे.. गडद निळे डोंगर मन मोहून घेत होते. पहाटेची कोवळी सूर्यकिरणे सफरचंदांच्या बागा.. सार्‍या परिसराला उजळून टाकत होती. ‘गंगनानी’ नंतर तर सारा निसर्ग.. ‘वर्णनातीत सुंदर’ मनापासून वाटत होते.. थांबावे येथेच अजून.. चार दिवस..

लांब गाडी लावून आम्ही दर्शनासाठी निघालो. सुंदर.. भला मोठा.. लांबच लांब.. घाट.. पाण्याचा खळखळाट लक्षवेधी ठरला. पूजासामान, खाद्यपदार्थांची भरपूर दुकाने पार करत प्रथम घाटावर गेलो. सूर्यकिरणांमुळे हिमनगातील हिम वितळून आलेल्या.. अतीथंड पाण्यात मारलेली डुबकी जरा.. जास्तच ‘ताजेतवाने’ करून गेली. वर असलेल्या गंगोत्री हिमनगातून ‘भागीरथी’ किंवा ‘किरात’ नदीचा उगम.. साधारण २५ कि.मी. अंतरावरून.. उगमाजवळ अत्यंत नाजूक असलेला हिचा प्रवाह.. अतीव वेगवान.. खोल.. खळाळत गर्जना करणारा.. अतीविशाल कसा बनला?? इतके बलाढ्य रूप कसे बरे धारण केले असावे?? याचे महदाश्चर्य वाटत होते.. निसर्गाच्या अतीव चमत्कारांपुढे नतमस्तक होऊन.. कृतकृत्य झाल्याचा भाव मनी दाटून आला..जीवनदायीनी गंगामय्येची शोडशोपचारे पूजा करून.. समस्त हिंदूराष्ट्रावर तिची कृपादृष्टी रहावी..सर्व प्रांताला तिने सुजलाम.. सुफलाम ठेवावे.. अशी प्रार्थना करून ओटी भरून दीपदान अर्पण केले. वर असलेल्या मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून परिसर निरखू लागलो.

मुख्य मंदिरासमोर बर्फाच्छादित पर्वत शृंखलेपुढे गंगेच्या उगमाचे सुंदर पुतळाकृती रचना लक्ष वेधून घेत होती. ४२६७ मीटर उंचीवर असलेले गंगोत्री ग्लेसीअर सूर्यकिरणांमुळे खुलून दिसत होते. ‘याची देही.. याचि डोळा’ किती बघावे.. अन.. हृदयी साठवावे असे झाले. मंदिराच्या मागील बाजूस दाट पाईन.. देवदार वृक्ष आणि दुसर्‍या बाजूने पुढे जाण्यास अत्यंत आतुर असणार्‍या भागीरथीचा विशाल.. गर्जना करत येणारा प्रवाह. १८ व्या शतकात ‘जगद्गुरू शंकराचार्यांनी’ गंगादेवीची मूर्ती स्थापन केली होती. महाभारत युद्धानंतर पांडवांनी येथे यज्ञ केला होता. असे अतीपवित्र ठिकाण. एक नैसर्गिक शीळा ‘शिवलिंग’ रूपात नदीमध्ये आहे. संध्याकाळी थंडी वाढली म्हणजे प्रवाह आपसूकच कमी होऊन शिवलिंगाचे मनोहारी दर्शन होते.

राजा भगीरथाने विष्णूच्या पदस्पर्शातून गंगेला आवाहनीत केले. लक्ष्मीच्या पवित्र हस्तामधून ती प्रवाहित झाली. तिचा वेग इतका होता की, तशीच पृथ्वीवर पाठविली असती तर काहीतरी अनर्थ झाला असता म्हणून भगवान शंकरांनी आपल्या कुरळ्या पण भल्यामोठ्या जटांमध्ये तिला अडकवून ठेवून प्रवाह वेग कमी करून वसुंधरेवर पाठविले. तरीही बलाढ्य असे रूप आम्ही समोर बघत होतो. इतक्या पवित्र स्थळी भेट देऊन आम्ही धन्य झालो. आमचे हृदय, मन, शरीर भरून पावले. हे एक राखीव वनक्षेत्र असल्याचे पाहून मनस्वी समाधान वाटले. निसर्गाचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

येथून पुढे आग्नेय दिशेला वाहत जाऊन उत्तर भारतातून बांग्लादेशात बंगालच्या उपसागराला २५२५ किलोमीटरचा प्रवास करत सर्व प्रदेशास आपल्याजवळ असलेले सर्व भरभरून देत मिळते. तेथे ‘सुंदरबन’ जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तिने बनवलाय.

भागीरथी महादोषनिवरिणी
सकल स्वामिनी तीर्थाचिये

मॅगी व चहा घेऊन सर्व आल्यानंतर ९ किलोमीटर वर असलेल्या जान्हवी आणि भागीरथीच्या संगमक्षेत्रावरील भैरोघाटी.. भैरवनाथांचे अतिप्राचीन मंदिर बघावयास निघालो. तेजपान, कढीपत्ता आणि इतर मसाल्यांची दाट अशी वनराई मंदिरापाशी केव्हा घेऊन आली ते कळलेसुद्धा नाही. राष्ट्रीय राजमार्ग (३४) असल्याने रस्ता छान आहे. याठिकाणी भागीरथी प्रचंड वेगाने खूप खोलवर स्वत:ला घाटीमध्ये झोकून देते. पूर्वी लंकेहून याच मार्गे पायी ‘गंगोत्री’ यात्रा करत.

भैरोघाटी इतकी नितांतसुंदर असल्याचे तेथे जाऊन गगनास भिडू पाहणार्‍या भ्रूगु पर्वत शृंखला, सुदर्शन मातृपर्वत यांचे नेत्रसुखद दर्शन घडल्यावरच कळते. दर्शन घेऊन.. मंदिरात सामूहिक ॐकार करून बाहेर पडलो. जाताना उष्णकुंडाचे दर्शन घेतले. एकीकडे बर्फ आणि दुसरीकडे अतिउष्ण पाण्याचे सदोदित वाहत असणारे कुंड बघून चकित झालो. दर्शनाची आस तीव्र असेल.. मनी काही स्वार्थी हेतू नसेल तर भगवंत आपली इच्छा पूर्ण करतो. याचा प्रत्यय आला. आम्हा सर्वांचे गंगोत्री दर्शनाचे द्वितीय पाऊल यशस्वी झाले.

- Advertisment -