Homeफिचर्ससारांशRising Crime : काळ सोकावायला नको म्हणून....

Rising Crime : काळ सोकावायला नको म्हणून….

Subscribe

गुन्हेगारांना सत्ताधार्‍यांचे पाठबळ असेल तर ‘बीड’सारखे अराजक पसरायला वेळ लागत नाही. मानवतेला काळिमा फासणारे अमानवी चेहरे यातूनच उदयाला येतात आणि उत्तरोत्तर अधिक बलशाली, उन्मत्त, उन्मादी हुकुमशहा बनत जातात. कित्येक जिल्हे, राज्य यातून प्रकाशझोतात न आलेले असे अजून किती ‘आका’ असतील कुणास ठाऊक? एकूणच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र बदलतोय पण हा बदल रुचण्या-पचण्यासारखा नाहीच. महाराष्ट्र ही प्रागतिक विचाराची, परिवर्तनाची नांदी देणारी स्फूर्तीदायक भूमी आहे. त्यामुळे काळ सोकावयला नको म्हणून वेळीच काळजी घ्यायला हवी.

-डॉ.प्रतिभा जाधव

अलीकडे आपल्या राज्यापासून ते अगदी जगभरातील बातम्या ऐकून, वाचून, पाहून सुन्न अन शून्य व्हायला होतं. एक काळ असा होता की नवीन, अपूर्व काही वा हिंसक घटना कानावर आल्या की आश्चर्य, विस्मय, दुःख, काळजी वाटून जीव व्याकुळ व्हायचा पण सांप्रतकाळात आल्या दिवसाला विविध घटना घडतात तर काही घडविल्या जातात. ह्या घटनांची ही वारंवारिता घटिताचे पराकोटीचे सामान्यीकरण करते जे आज होते आहे.

मानवी चित्ताची, मेंदूची अन जाणिवांचीदेखील अस्वस्थ होण्याची, संतापाची, प्रतिक्रिया अन प्रतिसाद देण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. त्यापलीकडे सारं गेलं म्हणजे माणसात एक प्रकारची उदासीनता वा निर्विकारता जन्मास येऊ लागते. एक प्रकारची हतबलता व निरुपाय मानवी मनं व्यापू लागते. ‘नित मरे त्याला कोण रडे!’ ह्यासम काहीसे होऊ लागते.

मला आठवतंय त्याप्रमाणे ३० मार्च १९९० रोजी एकतर्फी प्रेम प्रकरणातून ‘रिंकू पाटील हत्या प्रकरण’ घडले होते अन त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. तेव्हा ही अशी घडलेली आणि माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेली पहिली घटना असावी. उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील नावाच्या किशोरवयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती.

या घटनेच्या वाईट स्मृती जवळपास ३१ वर्षांनंतरही अनेक जणांच्या मनात कायम आहेत. रिंकू पाटीलला उल्हासनगरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं होतं. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या महाराष्ट्रातील घटनांची आठवण काढताना उल्हासनगरची रिंकू पाटील, सांगलीची अमृता देशपांडे, विद्या प्रभुदेसाई, मोनिका किरणापुरे, प्राची झाडे व इतर काही नावे ठळकपणे समोर येतात.

त्या-त्यावेळी घटनेबद्दल जनमानसात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. समाजात गुन्हेगारांप्रती प्रचंड संताप होता. व्यवस्थेत अशा घटनांप्रती बर्‍यापैकी गांभीर्य व सजगता होती. सत्तेचा प्रभाव वा भय अधिकार्‍यांमध्ये नव्हते. गुन्हेगारास जात-धर्म वा पक्ष नसतो हे मानणारा जाणणारा तो काळ असावा. आज चित्र अगदी व्यस्त दिसते. अशाही वातावरणात काही बोटावर मोजण्याइतके नीतिमान अधिकारी आपल्या कर्तव्यांप्रती जागरूक दिसतात. अर्थात त्यांच्याही वाटेत अनेक आव्हाने, अडचणी उभी करण्याचा प्रयत्न होतोच.

संभ्रमित, असुरक्षित करणारे भवताली वातावरण असले की लोक, बोलायला भूमिका घ्यायला, जाहीर मत व्यक्त करायलाही घाबरतात. एकाधिकारशाहीत न्याय दुरापास्त होतो. आज विश्वास कुणावर ठेवावा? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती दिसते. हे सगळे स्मरण्याचे कारण म्हणजे बदलापूर प्रकरणातही असाच जनक्षोभ उसळला व तो रास्तच होता. गुन्हेगारास कायद्याने कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण जनक्षोभ शांत करण्यासाठी किंवा कुणाला तरी सलामत ठेवण्यासाठी फेक एन्काऊंटर केले जात असेल तर ती गंभीर बाब आहे. न्यायालयाने हे फेक एन्काऊंटर असल्याचे म्हटले आहे.

हैदराबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी प्रकरणातही घटनास्थळी भेट देण्यासाठी नेलेल्या आरोपींचाही असाच एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यामुळे तात्पुरता जनक्षोभ निवळला तरी ‘काळ सोकवायला नको’ हा विवेक फार थोड्यांकडे असतो. अशात एखादा निरपराध गोळीचा बळी ठरला मग? तुलनेत अशा प्रकरणांची संख्या वारंवारिता वाढत असल्याचे दिसले तर न्यायव्यवस्थेने काय करावे?

तिचे कर्तव्य काय? असे जंगलराज माजले तर? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. न्यायप्रक्रियेलाही गती यायला हवी. अलीकडे गुन्ह्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, त्याचेही सामान्यिकरण होतेय. मात्र त्यात बळी ठरलेला वा भरडला गेलेलाच त्याची दाहकता, चटके अनुभवू शकतो. इतरांना तर ‘परदु:ख शीतल’च असते.

अनेकदा जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा यावर आधारित पक्षपातही होऊ शकतो वा सत्तेचे वरतून दडपणही असू शकते. अगदी खैरलांजी, उन्नाव, हाथरस, कठुआ, ते बिल्किस बानोपर्यंत हा सारा आलेख येतो. गुन्हेगाराला त्याच्या कुकर्माची शिक्षा देताना त्याची जात-धर्म, प्रदेश, सत्तेशी असलेले लागेबांधे आड यायला नको, पण आपल्याकडे घडते ते अगदी व्यस्त.

सत्ताधारी वा त्यांच्या आप्त, मित्र वर्तुळातील आरोपी वा गुन्हेगार असला तर तक्रारदारालाच छळले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा घटनांमुळे गुन्हेगार निर्ढावतात, पुढच्या गुन्ह्यासाठी मोकाट सुटतात. गुन्हेगारांना सत्ताधार्‍यांचे पाठबळ असेल तर ‘बीड’सारखे अराजक पसरायला वेळ लागत नाही. मानवतेला काळिमा फासणारे अमानवी चेहरे यातूनच उदयाला येतात आणि उत्तरोत्तर अधिक बलशाली, उन्मत्त, उन्मादी हुकुमशहा बनत जातात.

कित्येक जिल्हे, राज्य यातून प्रकाशझोतात न आलेले असे अजून किती ‘आका’ असतील कुणास ठाऊक? एकूणच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र बदलतोय पण हा बदल रुचण्या-पचण्यासारखा नाहीच. महाराष्ट्र ही प्रागतिक विचाराची, परिवर्तनाची नांदी देणारी स्फूर्तीदायक भूमी आहे. ह्या भूमीचे मूळ स्वरूप, वैशिष्ठ्य, तत्व, जपण्याची जबाबदारी आत्मीयतेने आणि दिमाखात ‘महाराष्ट्र माझा’ म्हणणार्‍या प्रत्येकाची आहे. नाही तर काळ सोकावेल. पुढील पिढीपुढे मान खाली घालून निरुत्तर होण्याची वेळ आपल्यावर येईल हे ध्यानात घेणे गरजेचे!