– डॉ. उषा रामवाणी-गायकवाड
आस्तिकतेचा विचार संस्कारांनी दृढ होतो. कुटुंब, मित्र, संगती आणि सभोवतालच्या वातावरणामुळे कळता झाल्यावर कळतनकळत देव, राक्षस, भूत यांचा बागुलबुवा माणसाच्या मनात निर्माण केला जातो. देवाचं न करणार्याचं काही वाईट झालं तर तो देवाधर्माचं करत नव्हता म्हणून असं झालं, असे तर्क दिले जातात.
हळूहळू माणूस देवाच्या अधीन जाऊन त्याची भक्ती कट्टरतेत, कर्मठतेत, धर्मांधतेत रूपांतरित होते. चुकीचा इतिहास त्याच्या अज्ञानात भर घालतो. लहान मुलांच्या मनोविकासाच्या काळात त्याची मानसिक जडणघडण ‘विवेकबुद्धी’ने विकसित न करता ती देवशरण भावनेने विकसित केली जाते. परिणामी माणूस पलायनवादी, बेजबाबदार, आळशी होतो. त्याचा आत्मविश्वास खच्ची होऊन त्याच्यात न्यूनगंडाचा प्रवेश होतो.
वेदांचे प्रामाण्य मानत नाही, वैदिक सिद्धांतांवर तर्कवितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची निंदा करतात ते नास्तिक. टीकाकार मेधातिथि व कुलुक भट्ट हे शास्त्राची अवज्ञा करणार्यांना नास्तिक म्हणतात. जैनमत, बौद्धमत आणि चार्वाकमत यांना भारतीय धर्मपरंपरेच्या परिभाषेत नास्तिक मानले जाते. निरीश्वरवादी चळवळीला अलीकडच्या काळात खर्या अर्थाने शक्ती मिळाली रिचर्ड डॉकिन्सच्या ‘द गॉड डिल्यूजन’ या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने, त्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या जगात खळबळ माजली.
शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस कॉलिन्सने विज्ञान एकीकडे आणि देवधर्म एकीकडे अशी भूमिका घेतली. देवाचं अस्तित्व मी नाकारणार नाही असं त्याने ठामपणे सांगितलं. उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड डॉकिन्स यांनी त्याच्याशी जाहीर वाद केला. त्यानंतर ह्युमन जिनॉम, डॉकिन्स, डॅनिएल डेनेट, ख्रिस्टोफर हिचेन्स, सॅम हॅरीस, डग्लस अडॅम्स अशा अनेकांची फळीच निरीश्वरवादी मताचा जोरकस पुरस्कार करू लागली.
वेदकाळी बृहस्पती हे बुद्धिमंतांचे मेरुमणी होते. ते नास्तिकवादाचे आद्य प्रवर्तक. चार्वाक निरीश्वरवादी दार्शनिक होते. ते वेदनिंदक म्हणूनही प्रसिद्ध होते. भगवान बुद्धांनी, बाबासाहेबांनी, पेरियार रामस्वामी वगैरेंनी देव नाकारला. राजा राममोहन रॉय, आगरकर, लोकहितवादी, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न करून प्रबोधन केलं. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रथम १८८२ साली ‘सोसायटी फॉर सायंटिफिक रिसर्च’, तर १८८७ साली अमेरिकेतही अशीच संस्था स्थापन झाली.
नास्तिक म्हणजे देव किंवा कुठलंही ईश्वरी अस्तित्व नाकारणारे, बुद्धिप्रामाण्य स्वीकारणारे. तर्कनिष्ठ, वैचारिक ठामपणा आणि सारासारविवेकबुद्धी, तारतम्य ही बुद्धिप्रामाण्याची अंगं. बुद्धिप्रामाण्यवादाचा वेग आपल्याकडे मंदच आहे. नास्तिक हा शब्द फक्त देव या संकल्पनेशीच निगडित किंवा मर्यादित नाही. त्यात जात, धर्म, पंथ, वर्ग, वर्ण या व्यवस्थेमधल्या अनिष्ट रूढी, परंपरांना विरोध करण्याची क्षमता असते. नास्तिकांचे विचार आणि कृती प्रागतिक, पुरोगामी असतात. आस्तिक बनणं सोपं, पण नास्तिक होणं खूप अवघड, कष्टसाध्य वैचारिक प्रवास आहे.
नास्तिक होण्यासाठी भरपूर अभ्यास आणि पावलोपावली वैज्ञानिक चिकित्सा करावी लागते. नास्तिकता जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण करते. विवेकी व्यक्ती ईश्वराचं अस्तित्व नाकारून किंवा ते असेल तर ते सिद्धच व्हावं असा आग्रह धरते. विवेक संपला की व्यक्ती मानसिक गुलाम होते. स्वयंप्रज्ञ माणसं ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य मानत नाहीत. ती गतानुगतिक नसतात. त्यांची बुद्धी जात्याच सत्यशोधक असते. ते श्रद्धांची चिकित्सा करतात. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक नास्तिकता दिन’ म्हणून पाळला जातो.
अनेक महान विचारवंतांनी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले. प्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणतात की, ईशनिंदेबाबत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहितीये). मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरतो. विश्वात कोणी सिद्ध केलं की देव आहे, तर मी स्वत:चं सर्वस्व त्याला देऊन टाकीन. महान तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतात की, ईश्वर हे केवळ शोषणाचं साधन आहे. महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्सच्या मते ईश्वराचा जन्मच मुळात एका मोठ्या षड्यंत्राने झालेला आहे. ‘जो देव देवळात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय पाडणार?’ अशा शब्दांत संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांना खडसावतात.
शहीद भगतसिंग म्हणतात की, या देशातले आस्तिक तरुण माझ्या नजरेत नामर्द आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मते नास्तिक माणसाचा स्वत:वर विश्वास असतो आणि तो इतरांवर प्रेम करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी तर ‘देवाला रिटायर करा!’ म्हणत गदारोळच उठवलेला. बिल गेट भारतीय लोकांविषयी म्हणतात की, ‘या देशातल्या मंदिरं आणि मस्जीदमध्ये जाणार्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल’. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील अन् तेल दगडावर ओततील’. ‘देव दगडात नसून माणसात आहे.
देव-देवळं आणि देवाधर्माच्या नावानं चाललेली कर्मकांडं ही पुरोहितांची रोजगार हमी योजना आहे. देवळात आपलं शोषण होतं, हेच भक्तांना कळत नाही. देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदिरात नाही…’ हे प्रबोधनकार ठाकरे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवत आले. छत्रपती शिवाजी महाराज, गांधीजी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या प्रखर बुद्धिनिष्ठांचं आज दैवतीकरण सुरू आहे. पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींनी प्रवाहाविरुद्ध अनेक वैचारिक भूमिका घेतल्या. त्यासाठी रोष पत्करला, प्रसंगी शारीरिक हल्लेही सहन केले. गांधी, डॉ. दाभोलकर, डॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी हेच धर्मांध लोक जबाबदार आहेत.
कोरोनाच्या जागतिक महामारीत जगातले सर्वशक्तिमान देव लॉकडाऊन होऊन परमेश्वर श्रद्धांच्या भिंतींना जबर हादरे बसले. प्रत्यक्षात ईश्वरामुळे समाजातली कुठलीही अनैतिकता वगैरे आजवर कमी झाली नाही. उलट सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांसाठी ईश्वराचा मोठा आधार घेतला जातो. वर्षानुवर्षे भक्तगण ईश्वराची निष्क्रियता पाहत आलेत. कोणत्याही संकटाच्या प्रसंगी कोणताही देव किंवा देवदूत मानवाच्या मदतीला धावला नाही. मदतीला चिकाटीने धावतात ती फक्त माणसं आणि माणसांनी शोधलेलं विज्ञान.
सर्वच धर्मांत देवाच्या नावाने थोतांड, असहिष्णुता आणि हिंसा आहे. समाजातल्या काही आळशी आणि कर्तृत्वशून्य माणसांनीच देवाधर्माचा बागुलबुवा उभा केला. भाबडे लोक डोकं गहाण ठेवून आग्रहाने ईश्वर मानतात. त्याची पूजाअर्चा करतात, देवळं बांधतात, त्याच्या नावे दान देतात. आपल्या देशात ३३ कोटी देव आहेत.
माणसाच्या भोळेपणाचा, आगतिकतेचा, श्रद्धाळूपणाचा प्रच्छन्न बाजार मांडून गबर होणारे अनेक धर्मांतले हजारो साधूसंत, भटजी, ज्योतिषी, आध्यात्मिक गुरू, देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल, ‘कॉर्पोरेट गुरू’ वगैरे भारतात गल्लोगल्ली आहेत. श्रद्धेच्या नावाखाली ते अंधश्रद्धेचा बाजार मांडतात. देव त्यांचं काहीही वाकडं करीत नाही. सगळी पापं करून धार्मिक मार्गाने पापक्षालन करून नवी पापं करायला ते मोकळे होतात. वेळप्रसंगी भक्त देवळांबाहेर लांबच लांब रांगांमध्ये तिष्ठत उभे राहतात.
पंढरपूरची वारी करतात. देवाधर्माच्या नावाखाली माणूस वेळ आणि पैसा खाणारी कष्टदायक कर्मकांडं करतो. खरंतर परमेश्वर या कल्पनेचा लौकिक जीवनाशी, त्यातल्या सुखदु:खांशी, प्रश्नांशी काहीही संबंध नाही. देशात भूक, गरिबी, बेरोजगारी, रोगराईने जनता त्रस्त आहे. भारतातले ९९ टक्के लोक देवभोळे आहेत. त्यातले बहुसंख्य पुण्य कमावण्याच्या नादात मूठभर धनदांडग्यांचं आणि देवस्थानांचं भलं करण्याच्या मागे असतात. गरिबाला मदत करण्याऐवजी दगडाच्या देवासाठी ते सर्वस्व अर्पण करतात.
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी वटहुकूमाद्वारे मंदिरांतल्या पैशांचा वापर त्यांच्या संस्थानांमध्ये विहिरी खोदण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी आणि दवाखान्यांची सोय करण्यासाठी केला पाहिजे, अशी आज्ञा केली. धार्मिक कारणासाठी समाजाचा व्यर्थ जाणारा पैसा विधायक, रचनात्मक, सकारात्मक आणि समाजाभिमुख कार्यासाठी खर्च करून गरिबात देव पाहणंच उचित ठरेल. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली, पण साधं पिण्याचं पाणीही आपण गरीब जनतेला देऊ शकलो नाही.
देव कोणीही पाहिला नाही. देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला त्यांना इतरांना तो दाखवता आला नाही. देव आहे हे विज्ञानाने अजूनही सिद्ध केलेलं नाही. आपल्याकडे गतानुगतिक जातिव्यवस्था, सनातनी मानसिकता यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही. विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग, कारणमीमांसा आणि तर्काधारित आहे. जगण्या-मरण्याचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा माणसाला विज्ञान, तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. विज्ञानालादेखील अनेक बाबींची उकल करता येत नाही. तरी विज्ञानापेक्षा मोठं काहीच नाही.
देशात खर्या अर्थाने खरी लोकशाही रुजवण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, भावी पिढीच्या उद्धारासाठी, देशाला बलशाली बनवण्यासाठी निरीश्वरवादी, नास्तिक आणि विवेकवादी लोकांना एकत्र करून वैज्ञानिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. मानव जात, मानवी मन, मानव धर्म, मानवी संस्कृती एकच आहे. खरोखर नतमस्तक व्हावं वाटावं अशी सभोवती आणि इतिहासात खर्या अर्थाने सामान्यांतील असामान्य देवमाणसं आहेत याची जाणीव ठेवायला हवी. जगण्यात मानव जातीचं कल्याण आणि मानव जातीच्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आहे, असा निर्धार कायम ठेवायला हवा.
-(लेखिका संपादक, संशोधक आहेत.)