घरफिचर्ससारांशविज्ञानाचा ज्ञानप्रकाश!

विज्ञानाचा ज्ञानप्रकाश!

Subscribe

२८ फेब्रुवारी १९२७ रोजी सर सी. व्ही. रामन यांनी ‘प्रकाशाच्या विकीरणा’विषयी केलेले संशोधन सर्वांसमोर मांडले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ हा दिवस विज्ञान दिन म्हणून गौरविला जातो. सर सी. व्ही. रामन यांच्या स्मृतीला अभिवादन करणे हे या दिनाचे उद्दिष्ट असले तरी याचबरोबर भारतामध्ये विज्ञानाच्या विकासासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, काय करण्याची गरज आहे याचाही आढावा घेण्याची ही संधी असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे मूल्य वाढवितात, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आर्थिक सक्षमतेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यासाठी चिंतन आवश्यक आहे.

–सुजाता बाबर

जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान हे यावर्षीच्या आपल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे सूत्र आहे. विज्ञान मग ते कोठेही विकसित झालेले असो, कोठेही संशोधन केलेले असो त्याचे फायदे हे सर्वत्रच होतात. आजकाल अनेक समस्या कोणा एकट्या-दुकट्या देशाच्या राहिल्या नसून जागतिक होत आहेत. कोविड १९ हे ताजे उदाहरण आहेच, परंतु जागतिक उष्मा, हवामान बदल, अन्नधान्याची गुणवत्ता, बालमृत्यू, कुपोषण, मूलभूत सुविधा, तंत्रज्ञान विकास अशा अनेक समस्या जागतिक आहेत आणि त्यामुळे यावर्षीचे सूत्र जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणाला चालना देण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व सांगते.

- Advertisement -

२८ फेब्रुवारी १९२७ रोजी सर सी. व्ही. रामन यांनी ‘प्रकाशाच्या विकीरणा’विषयी केलेले संशोधन सर्वांसमोर मांडले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ हा दिवस विज्ञान दिन म्हणून गौरविला जातो. डॉ. सी. व्ही. रामन हे विज्ञानामधील नोबेल मिळविणारे एकमेव भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रकाश विकीरणाचा शोध हे विशेषत: रसायन आणि भौतिकशास्त्रासाठी प्रभावी संशोधन साधन ठरले.

भारतात १९ व्या शतकाच्या अंतिम दशकात वैज्ञानिक उपक्रमांना सुरुवात झाली. यात प्रामुख्याने जगदीशचंद्र बोस, प्रफुल्ल चंद्र राय आणि रामेंद्रसुंदर त्रिवेदी यांनी अनमोल योगदान केले, पण हे उपक्रम बंगालपुरतेच मर्यादित होते. योगायोगाने दक्षिण भारतामधून आलेल्या १९ वर्षांच्या चंद्रशेखर वेंकट रामन यांची कर्मभूमीही बंगाल झाली. ते कोलकात्याला आले तेव्हा भारतीय लेखा सेवेत काम करीत होते. १८७५ मध्ये कोलकात्यात इंडियन असोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्स नावाची संस्था स्थापन झाली होती. संस्थेची उत्तम इमारतही होती, परंतु संस्थेला योग्य नेतृत्व नव्हते. रामन यांचे विज्ञान प्रेम त्यांना या संस्थेत आणण्यास यशस्वी झाले आणि संस्थेला नेतृत्व प्राप्त झाले. पुढे या संस्थेने मोलाचे संशोधनकार्य केले.

- Advertisement -

सर सी. व्ही. रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजीचा. त्यांचे वडील त्यावेळच्या मद्रास येथील एस. पी. जी. महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकवायचे. रामन यांच्या मोठ्या भावाचे नाव सी. सुब्रह्मण्यन अय्यर. पुढे याच भावाचे पुत्र चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांनादेखील काकांप्रमाणे नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा शोध ‘चंद्रशेखर मर्यादा’ नावाने प्रसिद्ध आहे. तार्‍यांच्या मृत्यूसंबंधी हे संशोधन खगोलशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचे मानले जाते.

रामन हे बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होते. त्यांनी अवघ्या ११ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मद्रास विद्यापीठातून केवळ चार वर्षांमध्ये भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये पदवी घेतली. वयाच्या १७ व्या वर्षी भौतिकशास्त्रात एम. एस्सी. केले. यानंतर इंडियन ऑडिट आणि अकौन्ट्स सर्व्हिसेसमध्ये काम करायला सुरुवात केली. जून १९०७ मध्ये ते कोलकात्याला आले. भौतिकशास्त्राच्या प्रेमामुळे ते इंडियन असोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्स संस्थेत सकाळी व संध्याकाळी जाऊ लागले. या संस्थेमधून पहिला शोधनिबंध प्रसिद्ध करण्याचे श्रेय रामन यांना जाते. १९३३ मध्ये ते बंगलोर इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे संचालक म्हणून काम पाहू लागले. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्रीय प्रोफेसर झाले. या संपूर्ण प्रवासात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

त्यांचा रामन इफेक्ट नावाने ओळखला जाणारा शोध हा महत्त्वाचा शोध होता. या शोधाने ‘रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ नावाची एक शाखा सुरू झाली. १९४८ मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ७ नोव्हेंबर १९७० पर्यंत त्यांनी तिथे काम केले.

परदेशी साधनांच्या मदतीनेच फक्त संशोधन होऊ शकते यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा स्वत:वर, स्वत:च्या विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर अधिक विश्वास होता. रामन यांच्या काळात आपल्याकडे शिक्षणाच्या सुविधाही खूप मर्यादित होत्या. तरीही अनेक शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केले. यात जे. सी. बोस, एस. एन. बोस, मेघनाद साहा, होमी भाभा, पी. सी. रे आणि बिरबल सहानी यांची नावे घेता येतील.

सर सी. व्ही. रामन यांच्या स्मृतीला अभिवादन करणे हे या दिनाचे उद्दिष्ट असले तरी याचबरोबर भारतामध्ये विज्ञानाच्या विकासासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, काय करण्याची गरज आहे याचाही आढावा घेण्याची ही संधी असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे मूल्य वाढवितात, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आर्थिकतेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यासाठी चिंतन आवश्यक आहे. आय. टी. आणि बायोटेक्नोलॉजी क्षेत्र ही याची चांगली उदाहरणे आहेत. जागतिकीकरण आणि जागतिक व्यापार संघटनेनुसार जी राष्ट्रे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये फार काम करू शकणार नाहीत त्यांना मागे राहावे लागेल. तंत्रज्ञानाने आज सर्व व्यापार मुठीत ठेवले आहेत. नॅनो तंत्रज्ञान किंवा औषधी स्तरातील प्रगती ही याची चांगली उदाहरणे आहेत.

स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे विज्ञानाचा प्रवास हा बराच पुढे आला आहे. तरीही हव्या तशा गतीने आणि सर्वव्यापी तो झालेला नाही. आपले वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळ हे जगात कदाचित सर्वात जास्त आणि श्रेष्ठ असेल. मूळचे भारतीय असलेले खुराना आणि चंद्रशेखर या दोघांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले गेले. सुविधा आजही कमी असल्या तरी जिद्द आणि प्रयत्न आपल्याकडे दिसतात. उत्तम शिक्षक आणि प्रेरणादायी शास्त्रज्ञ यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. राजकीय अस्मिता असल्यास आपण पुढे जाऊ शकतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर आणि इस्रोने हे सिद्ध करून दाखविले आहे.

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची मुख्य उद्दिष्टे म्हणजे दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व सांगणे, मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रातील सर्व उपक्रम, प्रयत्न आणि यश प्रदर्शित करणे, भारतातील वैज्ञानिक विचारसरणीच्या नागरिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांवर चर्चा आणि निराकरण करण्याची संधी देणे आणि लोकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि लोकप्रिय करणे. यानिमित्ताने विविध विज्ञान क्षेत्रांनी एकत्र येणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा, निबंध, प्रयोग, प्रदर्शने आखली जातात. यात सर्व स्तरावरील मुलांना सहभागी करून घेता आले पाहिजे. विज्ञानावर अतिशय सोप्या भाषेत लिहून त्याचा प्रसार करणेही गरजेचे आहे. यासाठी विज्ञान पत्रकारिता ही शाखा अस्तित्वात असली तरी लोकप्रिय नाही.

विज्ञान म्हणजे फक्त विज्ञान शाखा नाही. स्वयंपाकघरही विज्ञानाचे घर आहे. खेड्यापाड्यातही विज्ञानाची प्रचंड ओढ आणि जिज्ञासा आहे. यानिमित्ताने आपल्या देशातील सर्व विज्ञानप्रेमींना, संशोधकांना आणि लोकविज्ञानाला सलाम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -