–अशोक लिंबेकर
भारत हा खेड्यांचा देश आहे, तेव्हा खेड्याकडे चला, असे प्रतिपादन महात्मा गांधीनी केले आणि १९२० नंतरच्या कालखंडात भारतीय आधुनिक समाजधुरीणांचे लक्ष ग्रामीण जीवनाकडे गेले. हा प्रारंभ होता असे नव्हे! कारण या आधीही भारतीय संतानी ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ या वृत्तीने विश्वकल्याणाच्या दृष्टीने आपल्या साहित्यनिर्मितीतून आणि भजन कीर्तनाच्या पारमार्थिक लोक माध्यमातून हा प्रयत्न केला होता. ही प्रबोधन परंपरा महाराष्ट्रात संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबा, वारकरी संताची मांदियाळी, समर्थ रामदास, ते आधुनिक काळातील विनोबा, सेनापती बापट, गाडगेबाबा ते थेट या प्रस्तुत विषयाचे नायक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत येते.
यातील मध्यकाळातील संतांनी माणसाच्या पारमार्थिक व भक्तीजीवनाच्या, मानवतेच्या विकासाचे तत्वज्ञान निर्माण करून त्याचा प्रचार प्रसार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या आधुनिक राष्ट्रसंतानी नव्या काळाची पाऊले ओळखून कृतीशीलपणे याच परंपरेला नवे वळण देत, या परंपरेच्या साहित्य रचनेची व आविष्करणाची पद्धत स्वीकारून आदर्श ग्रामस्वराज्याचे स्वप्न आपल्या ‘ग्रामगीतेतून’ साकारले. त्यांचा हा विचार निव्वळ पारमार्थिक नसून तो इहवादी व भौतिक जीवनाशी निगडित आहे. मानवी जीवनाच्या समृद्धतेचे, त्यांच्या कल्याणाचे व त्यांच्या समग्र उन्नतीचे चित्र या विचारातून आविष्कृत झाले आहे. म्हणूनच आजच्या वैश्विकीकरणाच्या युगातही ते तितकेच महत्वाचे आहे. आज जग हेच एक खेडे बनले आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या विश्वसंकोचाच्या युगात तुकडोजी महाराजांचे हे विचार फक्त ग्रामविकासापुरते मर्यादित न राहता ते जागतिक विकासाचेच प्रतिपादन करतात.
ग्रामीण विकास म्हणजेच राष्ट्रविकास! खरे राष्ट्र हे ग्रामातच सामावलेले असते ही वस्तुस्थिती असताना आज सर्व विकासाचा केंद्रबिंदू मात्र शहरी भागामध्ये स्थिरावताना दिसत आहे. स्मार्ट सिटीचे निर्माण आवश्यकच आहे, परंतु मूलभूत पायाकडे दुर्लक्ष करून केवळ शिखराचाच आपण विकास करत बसलो तर हा चकचकीत मनोरा अत्यंत तकलादू ठरेल, अशी भीती वाटते. म्हणूनच स्मार्ट ग्रामाशिवाय कोणताही सर्वांगीण विकास होऊ शकत नाही हे सूत्र नेहमी ध्यानी ठेवले पाहिजे. त्यासाठी आज औद्योगिकीकरणाचा, उद्योग-व्यवसायाचा जे केंद्र शहरात स्थिरावले आहे ते आता गावाकडे वळवायला, विस्तारायला हवे. कृषीनिष्ठ उद्योग, व्यवसायाच्या निर्माणातून हा विकास साधायला हवा. त्यासाठी आपणास आता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील गाव निर्माण करावा लागेल. त्याची प्रसादचिन्हे अलीकडच्या काळात अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या कृतीशील प्रयत्नातून दिसत आहेत, परंतु हे चित्र अपवादभूत आहे ते सार्वत्रिक नाही, अशा विधायक प्रयत्नांच्या कक्षा आता रुंदायला हव्यात!
संत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीतेची’ रचना करून नवभारताच्या निर्मितीचे व ग्राम सुधारणेचे महत्व या ग्रंथातून प्रतिपादिले. त्यांच्या प्रगल्भ ग्रामानुभवातून ही ग्रंथ निर्मिती झाली आहे. केवळ ग्रंथनिर्मिती करूनच ते थांबले नाहीत तर त्याला आश्रमातील स्वयंसेवकाच्या कार्यातून कृतीशीलतेची जोड दिली. या ग्रंथात एकूण ४१ अध्याय असून त्यात आठ पंचकांचा समावेश आहे. या ग्रंथातून ग्रामविकासाच्या आधारभूत घटकांचे ओवीबद्ध विवरण त्यांनी केले आहे. ग्रामरक्षण, ग्रामस्वच्छता, ग्रामशुद्धी, ग्रामसेना, जलसंपदामहत्व व जलसंवर्धन, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धानिर्मुलन, श्रमशक्तीचे महत्व, स्वावलंबन, स्त्री-गौरव, सामाजिक सलोखा व समता या ग्रामीण जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या विविध घटकांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे.
त्यांचे हे सर्व विश्लेषण म्हणजे ग्रामीण विकासाच्या प्रेरणेचा मूर्तिमंत झरा आहे. ग्रामीण विकासाचे कृतीशील तत्वज्ञान या ग्रंथात मांडून त्यांनी सर्वांगीण ग्रामोन्नतीचे स्वप्न महाराष्ट्राच्या समाजमनात पेरले. त्यांच्या या विचारातूनच अलीकडे अनेक योजना कार्यान्वित झाल्या आहेत. तंटामुक्त ग्राम, सामुदायिक विवाह प्रथा, ग्राम सुरक्षा दले, अशी काही वानगीदाखल उदाहरणे देता येतील. या अर्थाने त्यांची ग्रामगीता म्हणजे आधुनिक ग्रामवेदच ठरते. सेनापती बापट यांनीही गावगीता लिहिली होती, त्याच धर्तीवर हा ग्रंथ म्हणजे ग्रामविकासाचे एक आदर्श प्रतीक आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन अनेक विद्वानांनी या ग्रंथाची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
उदा. संत साहित्याचे थोर अभ्यासक प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी ग्रामगीतेच्या निर्मितीमागील प्रेरणा स्पष्ट करताना म्हटले आहे. ‘लोकमान्य टिळक, डॉ.बेझंट, महात्मा गांधी या सर्व राष्टीय पुढार्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळी एक गोष्ट लोकांच्या नजरेसमोर पुन्हा-पुन्हा ठेवली व ती म्हणजे भारताची सुधारणा म्हणजे नुसती, मुंबई, पुणे यासारख्या शहरांची सुधारणा नव्हे. तर भारतातील सुमारे सात लाख खेड्यांची सुधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारत सुधारला असे म्हणता येणार नाही. या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन श्री संत तुकडोजी महाराज यांनी खेड्यापाड्यात हिंडून ती सुधारण्याचा प्रयत्न चालवला आहे. संत तुकडोजी महाराज यांचे क्रांतदर्शी द्रष्टेपण येथे दिसून येते.
आपल्या घराच्या, गावाच्या प्रगतीपासूनच खर्या प्रगतीचा ओनामा होत असतो. म्हणूनच ते म्हणतात ‘मानव मात्रांचे प्रथम माहेर । आपुले गाव त्यातील घर । यातुनी प्रगती करीन सुंदर । पुढे जावे विश्वाच्या ।’ संत तुकडोजी महाराज येथे अत्यंत साध्या भाषेत मूलभूत विचार मांडतात. सर्व ग्रामवासियांनी आपले गाव हेच आपले तीर्थक्षेत्र समजून जर आदर्श ग्रामनिर्मितीचा संकल्प केला तर नक्कीच यातून राष्ट्र विकास साधला जाईल. यासाठीच त्यांनी सर्वाना आवाहन केले, ‘अरे ! उठा उठा श्रीमंतानो, अधिकार्यांनो, पंडितानो । सुशिक्षितांनो, साधुजनानो । हाक आली क्रांतीची । गावागावाशी जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा, ग्रामोन्नतीचा दिवा । तुकड्या म्हणे ।’ तमाम महाराष्ट्राला ही कळकळीची साद घालत त्यांनी ग्रामगीतेचा नंदादीप प्रज्वलित करून महाराष्ट्राचे समाजमनात चेतना जागविली.
आपले करंटेपण हेच की तुकडोजींचा हा ग्रामधर्म आपण समजून घेऊ शकलो नाही, अंमलात आणू शकलो नाही. या ग्रंथातील ओविओवितून ग्रामविकासाचा निनाद आहे. राष्ट्रविकासाची तळमळ आहे आणि आदर्श ग्राम्रराज्याचे स्वप्न तरळते आहे. ज्याप्रमाणे आपण अतिशय भक्तिभावाने अनेक ग्रंथाचे पारायणे करतो तशीच या ग्रंथाचे पारायणे होऊन यातील विचार कृतीशीलपणे अमलात आला असता तर या धरेवर राष्ट्रसंताच्या मनातील आदर्श ग्रामजीवनाचा स्वर्ग अवतरला असता.
ग्रामगीतेच्या ३९ अध्यायामध्ये संत तुकडोजी महाराज यांनी भू-वैकुंठ या शीर्षकाखाली ग्रामराज्याची संकल्पना रेखाटली आहे. त्यांचे हे प्रकरण म्हणजे ग्राम विकासाचा गाभाच जणू! महात्मा गांधींच्या कल्पनेतील स्वराज्य, रामराज्य कसे असावे याचे प्रतिपादन यात आहे. याच अध्यायात ते म्हणतात ‘ग्रामराज्याची रामराज्य । स्वावलंबन हेची स्वराज्य । बोलिले महात्मा विश्वपुज्य । विकास त्यांचा सुंदर हा ।’ महात्मा गांधींबद्दलचा आदरभाव येथे व्यक्त करतात त्याबरोबरच या अध्यायातून त्यांनी जो उपदेश केला आहे त्यातून त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे व प्रागतिक विचारांचे दर्शन घडते. आपल्या कृतीतून आपण आपले गावच वैकुंठ बनवू शकतो हे सूत्र आशयाच्या केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी ग्राम विकासाचा गाभाच येथे सांगितला आहे.
उदा.ते म्हणतात, ‘सर्व जणांचे समाधान । याहुनी स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष -मत्सराविण। बंधुभावे सर्व जेथे ।’ जर संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे नांदला तर ‘आनंदाचे डोही आनद तरंग’ अशी सार्वत्रिक भावना होईल. सर्वांसाठी एकच शाळा, गावात आलेला पाहुणा तो ग्रामा अतिथी, समतावाद, गावाचे आर्थिक नियोजन, ग्राम अर्थसंकल्प, संततिनियमन, सहकार व सहकार्य, व्यसनबंदी, एकत्र उत्सव, उनाडकी व दंडेलशाहीला निर्बंध, तंटामुक्ती, अशा विविध बाबींची चर्चा यात आहे. आपले गाव हेच एक राज्य आहे ही स्वयंपूर्ण गावाची संकल्पना येथे मांडली आहे.
म्हणूनच अत्यंत अभिमानाने त्यांनी म्हटले आहे, आमुचे ग्रामची एक राज्य । सर्वांचे माहेर अविभाज्य । सामुदायिक विवाहाचे समर्थन करताना त्यांनी लिहिले आहे, ‘गावच्या मुला -मुलींचे लग्न । सामुदायिक पद्धतीच प्रमाण । लग्नात होणार्या अमाप खर्चाबद्दल त्यांनी म्हटले, लाग्नादिकासाठी कोणा । उडवू न द्यावे गावच्या धना । शहरामध्ये शिशुसंगोपन गृहे, पाळणाघरे निर्माण झाली आहेत, त्याचाही विचार तुकडोजींनी येथे केला आहे. त्यांच्या साक्षेपी व सर्वव्यापी प्रतिभेचे दर्शन येथे घडते. ‘गावाने करावे शिशुसंगोपन । म्हातार्या, प्रेमळ बायांकडोन । जयाचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचे ।’, तुकडोजींच्या दूरदृष्टीचे व त्यांच्या नियोजन सामर्थ्याचे हे द्योतक आहे.
आजच्या वाढत्या संकुचित आणि व्यक्तीनिष्ठ विचारांच्या युगधर्मामध्ये संत तुकडोजींचे विचार हे आदर्शवादी वाटतील, परंतु राष्ट्रविकासासाठी त्यांची नितांत आवश्यकता आहे. कालक्रमानुसार त्यांच्या आजच्या युगाशी संवादी अशा विचारांच्या जागराची आज गरज आहे. यासाठी तरुणांनी एकत्र येऊन या राष्ट्रसंताचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे वारकरी पंथाच्या माध्यमातून हरीभक्तिचा गजर होतो तसाच आता ग्रामभक्तीचा व पर्यायाने ग्राम विकासाचा कृतीशील गजर होणे आवश्क आहे. त्यासाठी ग्रामगीता ही ग्रामविकासाचा ग्रामवेदच आहे.