Homeफिचर्ससारांशVinod Kambli : कोण होतास तू...काय झालास तू...

Vinod Kambli : कोण होतास तू…काय झालास तू…

Subscribe

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन बालमित्रांची जी काही भेट झाली, त्या प्रसंगावरून सध्या सोशल मीडियावर दोघांच्या समर्थकांकडून उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. सचिनने क्रिकेटमधील उंची गाठून तो भारतरत्न झाला, तर विनोदकडे तशीच गुणवत्ता असूनही कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, अशी वेळ का आली, याचाही विचार करावा लागेल.

– जयवंत राणे

क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ज्यांना ओळखले जायचे त्या रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती स्मारकाचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमाला आचरेकर सर यांचे शिष्य सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेजण व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर त्याच्या जागेवरून उठून विनोद कांबळी जिथे बसला होता तिथे गेला. त्याने कांबळीच्या पाठीवरून हलकेच हात फिरवला. जेव्हा कांबळीच्या लक्षात आले की हा तर त्याचा बालमित्र सचिन आहे. त्यावेळी त्याने त्याचा हात हातात घेऊन काहीतरी सचिनशी बोलला. त्यानंतर कांबळीने सचिनचा उजवा हात त्याच्या दोन्ही हातांनी जोरात धरला आणि त्याने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सचिनने आपला हात सोडवून घेऊन तो आपल्या जागेवर जाऊन बसला. त्यावेळी कांबळी सचिनकडे नाराज होऊन पाहत राहिला. ही चित्रफीत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सचिन जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आहे आणि विनोद कांबळी हा त्याचा बालमित्र आणि सुरुवातीला उत्तम क्रिकेटपटू असल्यामुळे या चित्रफितीवरून नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा धो धो पाऊस पडत आहे. काही जण सचिनला, तर काही जण कांबळीला दोष देत आहेत.

सचिनने आपला बालमित्र विनोद कांबळी याच्यासोबत बसून दोन शब्द बोलायला त्याचे काय जात होते. त्याची सध्या वाईट अवस्था झालेली आहे. त्यामुळे अशा कठीण काळात त्याला सांभाळून घ्यायला हवे होते. हीच खर्‍या मित्राची ओळख आहे, तर काही जणांनी ही वाईट अवस्था कांबळीने स्वत:हून ओढवून घेतलेली आहे. त्याला सचिन काय करणार, तो जर व्यवस्थित असता तर सचिन त्याच्यासोबत बसून बोलला असता. त्याचसोबत अगदी इरेला पेटलेल्या कांबळी समर्थकांनी तर त्याला जातीय वळण दिले. सध्या सोशल मीडियावर आचरेकर सरांच्या स्मारक उद्घाटन कार्यक्रमाची चित्रफीत फिरत आहे. त्यावर सातत्याने सचिन आणि विनोद या दोघांविषयीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात पुन्हा क्रिकेट हा आपल्याकडे सर्वांचा आवडता खेळ असल्यामुळे या दोन क्रिकेटपटूंच्या बाजूने आणि विरोधात क्रिकेट रसिक अहमहमिकेने भाग घेत आहेत. कदाचित हे जर अन्य कुठल्या खेळातील खेळाडू असते तर क्रीडा रसिकांची इतकी अटीतटी दिसली नसती. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो धर्म मानला जातो. हा असा खेळ आहे की जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा अंतिम सामना कुठल्या देशाच्या संघाशी सुरू असेल तेव्हा भारतातील सर्वधर्मीय लोक एक होतात आणि आपल्या देवाकडे भारतीय संघाच्या विजयासाठी मनोभावे प्रार्थना करतात.

सचिन आणि विनोद नामवंत क्रिकेटपटू असल्यामुळेच देशविदेशातील भारतीयांना त्यांच्याविषयी जास्त कुतूहल आहे. त्यात पुन्हा ते त्यांचे क्रिकेटचे गुरू रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी एकत्र आले. त्यावेळी जो प्रसंग घडला त्यामुळे त्याकडे क्रिकेट रसिक अधिक खेचले गेले. सचिन आणि विनोद या दोघांकडे निसर्गाने प्रचंड क्रिकेट गुणवत्ता दिलेली होती, पण सचिनने आपल्याकडील गुणवत्ता मेहनतीने उत्तरोत्तर विकसित करीत नेली, तर दुसर्‍या बाजूला सुरुवातीला सचिनपेक्षाही काकणभर सरस वाटणारा विनोद मात्र मिळालेल्या यशाच्या पुरात वाहून गेला. त्याचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. तो प्रसिद्धी आणि पैशांच्या प्रवाहात स्वत:चे पाय जमिनीवर टिकवू शकला नाही. जेव्हा आयुष्यात माणसाला पैसा आणि प्रसिद्धी मिळते तेव्हा आपला तोल सांभाळण्याची गरज असते. जसे जीवनात आलेले अपयश पचवावे लागते, तसे जीवनात आलेले यशही पचवावे लागते. ते जर पचवता आले नाही, तर त्याचे अपचन होते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. विनोदचे नेमके हेच झाले. त्याला मिळालेले यश पचवता आले नाही. त्यामुळे त्याची आजची हीनदीन अवस्था झाली आहे. एका बाजूला सचिनने त्याला मिळालेेले यश व्यवस्थित पचवले. त्यात तो वाहून गेला नाही म्हणून तो आज क्रिकेटविश्वात विक्रमवीर म्हणून नावारूपाला आला. तो भारतरत्न म्हणून सन्मानित झाला, तर दुसर्‍या बाजूला त्याच्यासारखीच गुणवत्ता लाभलेला विनोद कांबळी उत्तरोत्तर भरकटत गेला. त्यामुळे त्याच्याकडे असलेली गुणवत्ता वाया गेली.

सचिन आणि विनोद हे एकाच गुरूचे दोन शिष्य, पण दोघांचे जीवन दोन टोकांना पोहचले आहे. सचिन मानसन्मानाच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या उच्चकोटीला पोहचला आहे, तर विनोदची अवस्था आज दयनीय झालेली आहे. त्याच्याकडे पाहून वाईट वाटते. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, असे शब्द आपल्या मनातून बाहेर येतात. विनोदने जर संयम राखून सचिनसारखा आपला स्तर उंचावत नेला असता, तर तोही आज क्रिकेटविश्वात विक्रमवीर ठरला असता. त्याला जागतिक कीर्ती मिळाली असती. मानसन्मान आणि आर्थिक संपन्नता लाभली असती. आचरेकर सरांचे नाव त्यानेही उज्ज्वल केले असते. सरांना त्याचा अभिमान वाटला असता. सरांच्या स्मृती स्मारक उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तो सचिनसारखाच मानाने बसला असता. विनोदने जेव्हा सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराये, हे गाणे म्हटल्यावर तो केविलवाण्या चेष्टेचा आणि दयेचा विषय ठरला नसता. तो जर आज सुस्थितीत असता तर सचिन त्याच्याजवळ येऊन बसायला आणि बोलायला दचकला नसता. सचिन त्याला भेटायला गेल्यानंतर विनोदने त्याचा हात करकचून दाबून धरला आणि ओढू लागला. तेव्हा पुढे आणखी काहीतरी तो करेल आणि सगळ्यांसमोर शोभा होईल म्हणून सचिनने आपला हात सोडवून घेतला. त्याला विनोदबद्दल आपलेपणा वाटत नसता, तर तो आपल्या जागेवरून उठून विनोद जिथे बसला होता तिथे जाऊन त्याची विचारपूस त्याने केली नसती हे लक्षात घ्यावे लागेल.

सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील यशाच्या इतक्या उंचीवर पोहचला आणि विनोद कांबळीकडे तशीच गुणवत्ता असूनही तो मागे का पडला, त्याची अशी दयनीय अवस्था का झाली, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर या दोघांचे गुरू रमाकांत आचरेकर सर यांनीच दिलेले होते. आचरेकर सर यांना सचिन आणि विनोद यांच्यातील फरकाचा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अगदी एका वाक्यात उत्तर दिले होते. ‘गांभीर्याचा अभाव. सचिनमध्ये गांभीर्य आहे, तर विनोदकडे ते नाही.’ त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की माणसामध्ये गांभीर्य नसेल तर त्याच्याकडे निसर्गाने कितीही गुणवत्ता दिली असली तरी ती वाया जाते किंबहुना तो माणूस ती वाया घालवत असतो. केवळ चांगला आवाज असून चालत नाही, मोठा गायक होण्यासाठी त्याला गांभीर्यपूर्वक दररोज रियाज करावा लागतो. असेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. मानवी जीवनात यशाची नशा ही फार भयंकर आहे.

त्यामुळे यशाची नशा चढू देता कामा नये. यश डोक्यात गेले की माणसाचे डोके ठिकाणावर राहत नाही, मग तो माणूस काहीही करू लागतो. कसेही जगू लागतो. उधळपट्टी करतो. संपत्तीच काय तर त्या नशेत तो अख्खे जीवन उधळून लावतो. जेव्हा तो काहीही करू लागतो तेव्हा त्याची अधोगती सुरू होते. चांगले दिवस यायला खूप मेहनत घ्यावी लागते, पण वाईट दिवस यायला फार वेळ लागत नाही. शिखरावर चढायला संयमित प्रयत्न करावे लागतात, पण शिखरावरून कोसळून खाली पडायला काही क्षण पुरेसे असतात. सचिन आणि विनोद ही जीवनाची दोन टोके आहेत. त्यामुळे कुठल्याही माणसाला त्यातून बोध घेता येऊ शकतो. निसर्ग तुम्हाला देतो, पण त्याने दिलेल्या गुणवत्तेचे जर तुम्ही चांगल्या प्रकारे संगोपन केले तर तुम्ही आयुष्यात मोठी उंची गाठू शकता, अन्यथा गुणवत्ता वाया जाते. फक्त वाया जाते इतकेच नव्हे तर जीवनाची पार वाताहत होऊन जाते. ते व्हायचे नसेल तर पैसा आणि प्रसिद्धी यात वाहून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवायला हवेत. नाहीतर आपल्या जीवनाचा केवळ विनोद नव्हे, तर चेष्टा होऊन जाते.