Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश मुंबईच्या प्रदूषणावर ‘वर्क फ्रॉम होम’ची मात्रा

मुंबईच्या प्रदूषणावर ‘वर्क फ्रॉम होम’ची मात्रा

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने प्रदूषणात दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिवसेंदिवस हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढत असून ड्रीम सिटी असलेल्या मुंबईच्या हवेत आता घातक वायूही मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. ही चिंतेची बाब असून वेळीच यावर उपाययोजना न केल्यास कोरोना काळाप्रमाणे वर्क फ्रॉम होम किंवा लॉकडाऊन करून हवेचे शुद्धिकरण करावे लागेल, अन्यथा मुंबईकरांना (बॅड एअर क्वालिटी इंडेक्स) कोरोनाबरोबरच श्वसनाशी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागेल, असा इशाराच तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईचं शांघाय, सिंगापूर करायच्या नादात शहरात बरीच कामं सुरू आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे ठप्प पडलेल्या कामांना आता वेग आला आहे. जुन्या इमारती पाडून आता पुनर्विकास सुरू असलेल्या शेकडो इमारती तरी आज मुंबईत आहेत, तर मेट्रोचे रखडलेले कामही मोठ्या वेगात सुरू आहे. दुसरीकडे टोलेजंग इमारतींचं कामही रात्रंदिवस सुरू आहे. कोरोनात ठप्प झालेली मुंबई पुन्हा एकदा वेगाने धावू लागली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये ओसाड पडलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम बघायला मिळतोय, पण याच ट्रॅफिक जाममुळे प्रदूषणही कमालीचे वाढत आहे. याकडे मुंबईकरांनी गांभीर्याने पाहायला हवे.

आज मुंबईत कमीत कमी एका घरात दोन गाड्या दिसतात. अशा तुलनेने जर हिशेब केला तर मुंबई लोकसंख्येनुसार त्यांची संख्या लक्षात येण्यासारखी आहे. यामुळे मुंबईत शु्द्ध हवा कमी आणि इंधनामुळे हवेत पसरणारा वायू, हवेत उडणारे सिमेंट वाळूचे सूक्ष्म धूलिकणच जास्त अशी परिस्थिती आहे. प्रत्येक श्वासात ते मुंबईकरांच्या शरीरात प्रवेश करीत आहेत. ऋतू बदलला की प्रदूषणाचा आलेखही बदलत आहे, पण यात प्रदूषण कमी झाल्याचे एकदाही पाहायला मिळालेले नाही. उलट दिवसागणिक मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरतानाच दिसत आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशात दिल्ली या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स सर्वात खराब होता, पण गेल्या कोरोना काळानंतर मुंबईच्या हवेचाही दर्जा घसरला असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक २८० च्या पुढे होता. विशेष म्हणजे जसजशी थंडी वाढेल तसे प्रदूषणही वाढू लागले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा धुरके वाढले आहे. साहजिकच या खराब वातावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याने मुंबईत सर्दी, खोकल्याबरोबरच हृदयाशी संबंधित आजार, दम्याच्या विकारांसह अनेक नवीन विकारांनी मुंबईकर ग्रस्त झाले आहेत.

दोन वर्षांहून अधिक काळ कोरोनाशी लढल्यानंतर आता कुठे सर्व सुरळीत सुरू झाले असतानाच चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेमुळे सगळं जगच हादरलं आहे. त्यातच हे वाढलेले प्रदूषण मुंबई किंवा देशापुरतं सीमित नसून ते आता जगभऱातील शहरांमध्येही दिसू लागलं आहे. यावर न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीने संशोधन केलं. त्यात प्रदूषणासाठी मेट्रो शहरांमध्ये वाढणारं ट्रॅफिकच जबाबदार असल्याचं निदर्शनास आलं. तसेच सध्याच्या प्रदूषणाचा वाढता स्तर हा कोविड काळापूर्वीच्या प्रदूषणाच्या आधीच्या स्तराएवढाच झाल्याचे आढळले आहे. यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी राबवलेला ऑड आणि इवन नंबर पॅटर्न आजच्या परिस्थितीत मुंबईसाठी राबवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायर्नमेंट सायन्स अँड टेक्नोलॉजी ऑफ द युनिव्हर्सिटी ऑटोनोमा दी बर्सिलोनाच्या संशोधकांनीदेखील कोरोनोनंतर जगभरात वेगाने वाढणार्‍या प्रदूषणावर संशोधन केले. त्यानुसार जर कर्मचार्‍यांना आठवड्यातील चार दिवस वर्क फ्रॉम होम देण्यात आले, तर प्रदूषणाचा स्तर १० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच जर प्रत्येक कंपनीने ४० टक्के कर्मचार्‍यांनाच आठवड्यातील चार दिवस वर्क फ्रॉम होम दिले, तर फक्त एनओ-२ स्तरच १० टक्क्यांनी कमी होणार नाही, तर ट्रॅफिकवेळी होणारे ध्वनी प्रदूषणही कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांनीच पुढाकार घेत कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम द्यायला हवे.

कारण हवेतील प्रदूषण प्रामुख्याने वाहनांमधून येणार्‍या धुरामुळेच होते. जेवढ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर उतरतात तेवढेच प्रदूषण वाढते. याचा अनुभव आपण लॉकडाऊन काळातही घेतला. कारण गाडी रस्त्यावर उतरली नाही तर प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नाही, पण त्यासाठी सरसकट सगळी वाहनं रस्त्यावर उतरवूच द्यायची नाहीत असे नाही, तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या कंपन्यांना कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम देणे शक्य असेल त्यांनी ते द्यावे. प्रामुख्याने आयटी क्षेत्रासह अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे कंपनीत कर्मचार्‍यांनी रोज येणे गरजेचे नाही. यामुळे सहाजिकच रस्त्यावर गाड्या कमी धावतील. त्यामुळे प्रदूषण कमी करता येईल.

डिसेंबरपासून देशभरात काही ठिकाणी तीव्र, तर काही ठिकाणी सौम्य थंडीची लाट आली. तेव्हापासूनच हवेत धूलिकणांची घनताही वाढली आहे. त्यातच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईत आगीच्या घटनाही वाढल्या. त्यामुळे वायू प्रदूषणही वाढले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे एकट्या मुंबईतच नाही तर देशातील सगळ्याच शहरांमध्ये टोलेजंग इमारती, पूल, हायवे, रस्त्याचे, इमारतींचे बांधकाम वाढले आहे. त्यामुळे हवेतील धूलिकणही वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कोरोना, गोवरनंतर आता सर्दी-खोकल्याचे विकारही सुरू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणांपुढेही नवीन आव्हान उभे राहिले आहे.

कुठल्याही शहरात जेव्हा हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचा एअर क्वालिटी इंडेक्स तपासला जातो. त्यानुसार ० ते १०० पर्यंतचा इंडेक्स योग्य मानला जातो, तर १०० ते २०० यामधील इंडेक्स हा सर्वसाधारण हवामान असल्याचे दर्शवतो. २०० ते ३०० म्हणजे प्रदूषित वातावरण, तर ३०० ते ५०० वरील हवामान हे वैद्यकीय भाषेत गॅस चेंबरच. अशा वेळी मुंबईतील वाढणारं प्रदूषण हे मुंबईकरांसाठी जीवघेणे ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -