घरफिचर्ससारांशवडखळ - एक हरवलेला थांबा!

वडखळ – एक हरवलेला थांबा!

Subscribe

विकासाच्या रेट्यात अनेक जुन्या खुणा पुसल्या जातात, काही नवीनही तयार होतात. पण नव्या खुणांशी आपली ओळख पटायला वेळ लागतो. मग जुनी खूण आठवणींच्या नभातून खुणावते. वडखळ ही अशीच एक खूण...

प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर काही अनिवार्य! अनेकदा एक वाक्य आपण नेहमी ऐकतो. ते म्हणजे, ‘प्रवासाची मजा मुक्कामावर पोहोचण्यात नाहीच, ती आहे प्रवासातच’. हा प्रवास मजेशीर करतात ते हे असले थांबे. नाही नाही, यातून कोणताही तत्त्वज्ञानविषयक अर्थ काढू नका. मी अगदी रस्त्यावरच्या प्रवासाचीच गोष्ट करतोय. ट्रेनमधल्या म्हणालात, तरी चालेल!

असाच एक थांबा म्हणजे वडखळचा थांबा! व-ड-ख-ळ कोणताही आकार, उकार किंवा ईकार नसलेलं हे चार अक्षरी गाव! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून अगदी सात-आठ किलोमीटरवर असलेलं हे गाव एरवी दुर्लक्षित राहिलं असतं. पण जुन्या मुंबई-गोवा महामार्गाने ज्या गावांना काहीएक ओळख दिली, त्यातलं महत्त्वाचं गाव म्हणजे वडखळ!

- Advertisement -

‘गाडी हुंबयसून निघाली आनि थेट मानगावला पोचलो,’ तळकोकणात जाणार्‍या कोणत्याही चाकरमान्याकडून हे वाक्य याच्या आधी तुम्ही ऐकलं असणं शक्यच नाही. कोकणात जाणारी गाडी मुंबईतली वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते. पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासीसुद्धा जरा गार हवा आल्याने सुस्तावतात ते अगदी पेणचा स्टँड येईपर्यंत. आता पेणचा एसटी स्टँड हादेखील एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. पण तिथे मंडळी जरा फ्रेश वगैरे झाली की, गाडी पुन्हा थोडी लयीत येते आणि अचानक समोर वाहनांचा भलामोठा गोतावळा दिसतो. ‘च्यायला, या वडखळला ट्रॅफिक आहे वाटतं,’ बसमधला एखाद कोणीतरी बोलतो. पहिल्यांदा प्रवास करत असाल, तर वडखळचा परिचय होतो, तो असा!

वडखळला स्वत:चं असं एक व्यक्तिमत्त्व आहे. आता या परिसरात आजूबाजूला जिंदाल स्टील वर्क्स या कंपनीचे शेकडो मजूर वावरताना दिसतात. त्यांच्या चेहर्‍यावर धुळीचा राप असतो, नजर खोल गेलली असते. हाती येतील ते कपडे घालून धुळीने भरलेलं हेल्मेट आणि तसेच गमबूट घालून ते मुकाट्याने खाली मान घालून कामाच्या ठिकाणी जात असतात. वडखळ हे त्या मजुरांसारखंच आहे. फार तर डोक्यावर मळलेली गांधी टोपी, गुडघ्यापर्यंत वर आलेलं धोतर किंवा पंचा, मळलेला धुळकट सदरा, दाढीचे खुंट आलेला माणूस… वडखळवर मनुष्यत्त्वाचा आरोप करायचा, तर ते असं दिसेल.

- Advertisement -

पण इतर वेळी धूळ, तेल आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल ही एवढीच काही वडखळची ओळख नाही. अलिबाग किंवा कोकणात जाणारी एसटी पूर्वी वडखळच्या त्या छोटाखानी एसटी थांब्याच्या आत शिरायची. जेमतेम दोन मिनिटं थांबायची आणि मग पुढे मार्गस्थ व्हायची. पण त्या दोन मिनिटांमध्येही उसाचा रस, आलेपाकाच्या वड्या, गरमागरम वडे, चहा, वेफर्सची पाकिटं वगैरे विकणार्‍यांची झुंबड उडायची. वडखळचा विलोभस चेहरा तेव्हा दिसायचा. स्वत:ची गाडी असणारे लोक पेण वगैरे भानगडीत न पडता वडखळला हमखास थांबा घ्यायचे. मुंबईच्या कचाट्यातून सुटून पुढे 30-40 किलोमीटर आलं की, मुख्य कोकण रस्त्याला लागण्याआधीचा हा थांबा!

वडखळच्या त्या छोटेखानी स्टँडसमोर एक पेट्रोल पंप आहे. बाजूला आमंत्रण नावाचं अत्यंत रूचकर पदार्थ खाऊ घालणारं हॉटेल आहे. स्टँडच्या एका बाजूला मुंबईच्या दिशेने बाजार लागतो. अलिबाग पट्ट्यातल्या सुप्रसिद्ध पांढर्‍या कांद्यांच्या माळा, चिक्की, पेणचे पापड, सुकट मासळी असे पदार्थ तिथे हमखास विकायला ठेवलेले असतात. आता, असायचे, असं म्हणावं लागेल. स्टँडच्या दुसर्‍या बाजूला दोन-तीन बर्‍यापैकी हॉटेलं होती. तिथल्या एका हॉटेलमध्ये खाल्लेल्या वड्याची चव अजूनही जिभेवर आहे. वडा, भजी, चहा आणि मिसळ या चतु:सूत्रीवर या हॉटेलांनी वडखळच्या व्यक्तिमत्त्वात रंग भरले होते.

इथे चहा प्यायला की, कोकणच्या पुढल्या प्रवासाला मंडळी सज्ज होत. तीच गत कोकणातून मुंबईकडे परतणार्‍यांची! मुंबईच्या गर्दीत हरवून जाण्याआधी गावच्या वातावरणाच्या काही शेवटच्या आठवणींमध्ये रेंगाळण्याचं ठिकाण म्हणजे वडखळ! चहाच्या प्रत्येक घुटक्यासोबत त्या आठवणींचा निचरा केला की, मग मन आणि शरीर ताजंतवानं होऊन मुंबईच्या वाटेला लागतं.

वडखळ नाक्यावरचा रस्ता माझ्या आठवणीत तरी कधीच चकाचक किंवा विनाखड्डे दिसलेला नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करणार्‍या माणसाच्या हाताला जसे घट्टे असतात, तसेच खड्डे या वडखळ नाक्यावरच्या रस्त्याच्या भाळी कोरलेले आहेत. त्यामुळे कोकणात जाताना किंवा येताना वडखळ नाका सतत, ‘हळू चालवा, रे बाबांनो’, असं सांगतोय, असंच वाटतं.

आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम बहुतांश झालं आहे. ते सुरू होणार होतं, तेव्हा वडखळला कसा काय चौपदरी रस्ता करणार, असा एक प्रश्न डोक्यात आला होता. पण काही दिवसांपूर्वी या मार्गावरून गेलो. कर्नाळा वगैरे कधी गेलं, तेदेखील कळलं नाही. आता वडखळला चहा घ्यायला थांबू, असा होरा होता. पण कसंच काय! वडखळ आलं कधी आणि गेलं कधी, काहीच पत्ता लागला नाही. कारण वडखळ रस्त्यात लागलंच नाही. जुन्या प्रियकराला चुकवण्यासाठी त्याच्या गल्लीऐवजी लांबचा वळसा घालून गेल्यासारखी गाडी वडखळच्या बरीच लांबून गेली आणि एकदम चुकचुकल्यासारखं झालं.

एक मन म्हणत होतं की, बरं झालं. वडखळच्या वाहतूक कोंडीतून सुटका झाली. पण दुसर्‍या मनाला तिथल्या त्या गरमागरम वड्याचा गंध खुणावत होता, पांढर्‍या कांद्यांच्या माळांचा थंडावा सुखावत होता. परत येताना मुद्दामहून वडखळ लागेल, अशा हिशोबाने आलो. वडखळची रयाच गेल्यासारखी झाली. एकेकाळच्या दिमाखदार हवेलीच्या भिंतीचे पोपडे उडावेत आणि तुळयांना वाळवी लागून ती हवेली उद्ध्वस्त व्हावी, असं काहीसं वडखळचं झालं होतं. चहावाल्याने आपला ठेला गुंडाळला होता. गरमागरम वडे देणारं ते हॉटेल बंद झालं होतं. कांद्यांच्या माळा दीनवाण्या होऊन नुसत्याच लटकत होत्या.

नव्या महामार्गावरून प्रवास वेगवान झाला, यात काही वादच नाही. पण एक जुना थांबा कायमचा हरवला, याची चुटपूट लागून राहिली. त्या दिवशी रस्त्यात वडखळ लागलंच नव्हतं. आता मी माझ्या हरवलेल्या वडखळचा पत्ता शोधतोच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -