Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स सारांश अभी पिच्चर बाकी है....

अभी पिच्चर बाकी है….

Related Story

- Advertisement -

ओटीटीच्या जमान्यात आता मोबाईलमधला सिनेमा भिंतीवर चिकटवता येत नाही, तर मायापुरी, चंदेरी जास्तच इच्छा असेल तर स्टारडस्ट फिल्मफेअरची कात्रणं गोळा करण्याची इच्छा राहिलेली नाही. तीन दशकांपूर्वीचं आणि आजही सुरू असलेलं मायापुरी सिनेप्रेमींसाठी बायबल ठरावं, इतकं मोलाचं होतं. मायापुरीच्या अंकात हिरो हिरोईनींचे पत्ते आणि पोस्टरं सापडत होती. वर्षातून एकदा श्रीदेवी, हेमाची छबी असलेलं दरवाजामागे चिकटवायचं कॅलेंडर मायापुरीत छापलं जात होतं.

तर सिनेतारकांना मोबाईलपेक्षा कपाटात किंवा मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस किंबहुना घरातल्या कानाकोपर्‍यात गव्हाच्या पिठाची खळ बनवून डकवण्याचा हा काळ, कालांतराने पावसाळ्यात गळक्या छतामुळे मुंबईतल्या गिरणी कामगार, लेबर कँप वस्तीतल्या छतातून गळणारा पाऊस मवालीच्या दरवाजाला चिकटवलेल्या श्रीदेवीच्या गालावरून खाली ओघळून निघून जात असताना हळूवारपणे टॉवेलने टिपला जाई. श्रीदेवी किंवा हेमाच्या गालावर त्यामुळे ओरखडे पडू नयेत, अशी प्रांजळ आत्मियता त्यात असे.

- Advertisement -

तर हार्बर लाईनच्या खारमधून तत्कालीन व्हीटी (आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस) कडे लोकलमधून जाताना सँडर्स, डॉकयार्ड रोड भागातील झोपड्यांवर पांघरलेली सिनेमाची पोस्टरं श्रमिकांच्या घरांचं पावसापासून रक्षणही करायची, पोस्ट कार्ड साईजमधली पोस्टरं खास मित्र मैत्रणींनी पोस्टानं पाठवला जात होती. त्यामुळे दुकानात चार आण्यात मिळणार्‍या या पोस्टरच्या मागे स्टँप चिकटवायला अन् नाव लिहायला पोस्टकार्डसारखी रचना केलेली होती.

गेल्या वर्षी रॉक्सी थिएटरजवळच्या मुंबईतल्या एका इराण्याच्या हॉटेलात जाण्याची वेळ आली. तिथं जुन्या सागवानी लाकडाच्या अलमारीच्या काचेत 1986 च्या आवारगींचं पोस्टरं अजूनही कायम होतं. सहावीला असताना पेन्सिल बॉक्स, त्याला आम्ही कंपास बॉक्सच म्हणत होतो. त्याच्या आयताकृती झाकणावर तेजाबचं हेच पोस्टर होतं.

- Advertisement -

वह्यांवर एकमेकांमोर तलवार रोखलेले धरमवीर मधले धर्मेंद्र, जितेंद्र होते. निळ्या रंगाचं खोडरबर डोक्याला घासून तेलकट केल्यावर वर्तमानत्रातलं टूरटूर, बिघडले स्वर्गाचे दार, कुणी तरी आहे तिथं नाटकाची काळ्या शाईतली पोस्टरांवर दाबल्यावर ती चित्रं सुलटी खोडरबरवर उमटत होती.

शहंशाहचा 16 की 17 किलोच्या पेहरावाचं कुतूहल वाटायचं, जरकीनच्या खिशात हाता घातलेला अमिताभ चारआण्याला मिळणार्‍या रंगीत छपाई कागदानं शाळेच्या पांढर्‍या शर्टाच्या खिशावर इस्त्रीनं पाणी लावून छापलेला. त्यामुळं शाळेतल्या बाईंनी कधी खिसा काढायला लावला. त्याच वेळी इतर अनेकांच्या खिशावर शंकर, श्री दत्तदेवही अवतरीत व्हायचे. साईबाबांची जागा तर हक्काची.

बहुतेकांच्या शर्टावर बाबांना जागा मिळायची. जवळच्या अहिंसा किंवा भीमनगरातल्या मित्राच्या खिशावर डोळे मिटलेला बुद्ध किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा रंगित फोटो आताच्या टॅटूसारखांच इस्त्रीनं छापलेला.अनेकांच्या दप्तरांत, कंपाशीत दप्तरात देवदेवतांचे फोटो आणि पुस्तकवह्यात तळहातावरील रक्ताभिसरणातून कोलांटउडी घेणारा जिलेटीन पेपरचा फँटम पैलवान…

जावेद नावाच्या एका खास मित्राच्या दप्तरांत सिनेमाची जवळजवळ शंभर दीडशे पॉकेट पोस्टरं होती. हुकूमतचा हातात साप घेतलाला धर्मेंद्र, वतन के रखवालेतले मिथुन श्रीदेवी, शानमधला शाकाल, अमिताभ, शशी, शत्रुकान शीना बघायला सगळेच जावेदच्या बाकड्यावर मधल्या सुटीत गोळा व्हायचे. जावेद बांदर्‍याच्या भारत नगरात राहायला होता. जिथं आता बिकेसी वसू लागलंय, अमिताभच्या देशप्रेमीमध्येही कामगारांची भारत नगर ही वस्ती होती. त्याचं शूटिंग बांदर्‍याच्याच भारत नगरमध्ये झाल्याचं आम्हाला त्यावेळी मोठ्यांकडून सांगितलं जात होतं. तर चार आण्याला मिळालेल्या रिळांच्या फिल्मातून भिंग लावून भिंतीवर पांढरा कागद डकवून सिनेमा करण्याची हौस होती. सोरटमधून सिनेमा रिळांचे कापलेले तुकडे मिळवून आरशाच्या प्रकाशात त्यावेळी पिक्चरचा फिल आणला जात होता. जवळच्याच एका मित्राकडे चोरबाजारातून आणलेलं रिळ प्रोजेक्टर होतं. त्यानं ते चोरबाजारातून आणल्याचं सांगितल्यावर चोरबाजार म्हणजे कुठलंतरी खतरनाक ठिकाण वाटायचं. त्याला फिल्मी रिळं लावून जोरानं फिरवायचं तर अ‍ॅक्शन रिप्लेसारखा सिन समोरच्या पडद्यावर पडत होता. आप आये बहार आयेतला राजेंद्रकुमार चालत चालत वळतो.

एवढाच तो सीन त्यासाठी हातभर रिळ तीन सेकंदात संपून जायचं. मुंबईतल्या ग्रँट रोड, कुर्ला या भागात असल्या विशिष्ट वस्तू विकत मिळत होत्या. शान आणि शोलेच्या कथाप्रसंगाची पेन्सिल गिरमिटमध्ये कातरताना एकएक सिन कापला जाताना वाईट वाटायचं. 30 वर्षापूर्वी सिनेमा घर, शाळा, कपाटं व्यापून होता. बांदर्‍याच्या ड्राईव्ह इन (ओपन) थिएटरचं पोस्टर दर शुक्रवारी बदलंत होतं. गांधीनगरची म्युनसिपालटीची शाळा सुटल्यावर हे पोस्टर पहायला टोळक्यानं जात असू. आता जिथं बांदरा इस्टातलं सिनेमॅक्स आहे तिथं पिक्चरची टाकी म्हणजेच कलामंदिर होतं. अमिताभच्या अंधा कानूनचं पोस्टर तिथून विकत आणलं होतं. तर चारआण्याच्या सुपर स्टार चॉकलेटातून मिळालेल्या पोस्टरचे तुकडे नंबरनुसार जोडून चित्र पूर्ण करण्याचं एक छोट्या पुस्तकासारखा फॉर्म भरण्याचं वेड त्याकाळी होतं.

अ‍ॅडना नावाच्या चॉकलेटातून ब्रूस ली साकारला जायचा, तर सिलवेस्टर स्टॅलनचं पोस्टर पूर्ण व्हायला खूप वेळ लागायचा. हातात भली मोठी गन घेतलेला आणि कपाळाला काळा फडका बांधलेला पीळदार रॅम्बो मारामारीत अमिताभचाही बाप वाटायचा. यातला लकी नंबर कधीच चॉकलेटमध्ये लागत नसे. त्यामुळे पोस्टरही पूर्ण होत नसे. हे पोस्टर पूर्ण केल्यावर टीव्ही, व्हीसीआर, क्रिकेट बॅट, ट्रान्झीस्टर असली बक्षीसं लागल्याचं छातीठोकपणं दुकानदाराकडून सांगितलं जाई. पण ही पोस्टर्स कधी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे पोस्टर्स पूर्ण करणारा एक नंबर जोडण्यात वर्षही निघून जाई. क्रिकेट पोस्टर्सच्या नावानंही हे चॉकलेट मिळत होतं. आता इंटरनेट, युट्युबच्या युगात आता पिक्चरचा खेळ संपूनही तीन दशकं उलटली आहेत पण मनाच्या भिंतीवर डकवलेली ही पोस्टर्स आहे तशीच आहेत.

बरेचदा गावाकडच्या जत्रेतल्या पोस्टर्सची गंमत होई. दाखवलेल्या सिनेमातल्या पोस्टरचा आणि सिनेमातल्या प्रसंगाशी संबंध नसे, फिरोज खानच्या यलगारमधल्या पोस्टरवर असलेला भला मोठा सर्प प्रत्यक्षात चित्रपटात नव्हता, तर नसीबमधली छान छान दिसणारी हेमामालिनी गुलजारांच्या किनाराच्या सोज्ज्वळ हेमामालीनीवर पोस्टवर डकवली जात असे. श्रीदेवी, रेखा, अगदी माधुरीपर्यंत अनेक नायिकांच्या वाट्याला हा पोस्टवरचा डकवलेला डबलरोल यायचा. पोस्टरवच्या हिरोच्या नेमक्या उजव्या भुवयीखालीच स्टाईलबाज कसा काय मार लागतो किंवा ओठाच्या कोप-यातूनच किंचित रक्त कसं काय येतं, असले प्रश्न विचारणं सिनेमॅटीक जुर्म होता. बरेचा पोस्टर्स रंगवणारेच सिनेमात नसलेला नायक सिनेबाहेरच्या पडद्यावर रंगातून साकारत होते.

कोरोनामुळे ओटीटीवर सिनेमे रिलिज होताना थिएटर सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मल्टीप्लेक्समध्ये सिनेमे पाहाण्यापेक्षा तिथल्या खाण्यात रस निर्माण झाल्याने रस्त्यावरचा किंवा बिजली बादल बरखा किंवा कुठल्याही चित्रमंदिरात नाईंटी एमएम स्क्रिनवर सिनेमस्कोपच्या कौतूकातून इस्टमनकलर सिनेमा पाहिलेल्या मोबाईलच्या चौकटीचं विशेष अप्रूप वाटत नसाव, पडद्यावरचा सिनेमा थिएटरमध्ये आणि रस्त्यावरच्या दोन चाळीत पडदा बांधून प्रोजेक्टर लावून कुतूहलाचा फोकस पाडणारा एकेकाळी सर्वांचा होता, आता तोही आपल्यापुरता आपापल्या मोबाईलच्या चौकटीत बंद झाला आहे. ज्याचा त्याचा आपला आपला….

- Advertisement -