-शरद कद्रेकर
वानखेडे स्टेडियमने (१९७५-२०२५) पन्नाशी गाठली यावर विश्वास बसत नाही. कधीच पाच दशके उलटून गेली कळलंच नाही. मी तर वानखेडेला सामने बघायला सुरूवात केली ती १९७४ मध्ये तेव्हा स्टेडियमचं बांधकाम सुरूच होतं आणि छप्पर पण नव्हतं. तेव्हा स्टेडियमला मुंबईचा पश्चिम विभागीय साखळीतील रणजी सामना बघायला मी माझ्या मित्रासोबत वानखेडेला आलो आणि फारोख इंजिनीअर आणि सुधीर नाईक यांची नेत्रसुखद फटकेबाजी बघून मन तृप्त झालं.
इंजिनीअर फटकेबाजीसाठी मशहूर होताच, पण त्या सामन्यात सुधीर नाईक यांनी जी फलंदाजी केली ती अजूनही आठवते. फटका मारल्यावर चेंडू सीमापार जाणार याची खात्री नाईक-इंजिनीयर यांना असल्यामुळे ते चौकार मिळणार याबाबत निश्चिंत असत याची आठवण अजूनही मनात ताजी आहे.
वानखेडेवर प्रथम क्रिकेटचाहता म्हणून अनेक सामने बघितले नंतर क्रीडापत्रकार हा पेशा स्वीकारल्यामुळे प्रेस बॉक्समधून सामने कव्हर करताना अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होता आलं. कित्येक क्रिकेटपटूंशी संवाद साधता आला. वर्ल्ड कप (१९८७) भारताचा उपांत्य फेरीतील सामना (सुनील गावस्कर यांचा अखेरचा सामना पण तेव्हा याची कल्पना नव्हती )
इंग्लंडविरुद्ध झालेला, चुटपुट लावणारा पराभव आणि त्यानंतर २ एप्रिल २०११ शनिवारी रात्री महेंद्रसिंग धोनीच्या षटकाराने साजरा झालेला भारताचा अविस्मरणीय वर्ल्ड कप विजय आणि त्यानंतर झालेला वर्ल्ड चॅम्पियन्सचा जल्लोष, या सार्या घटना प्रत्यक्ष अनुभवता आल्या. हे सुवर्णक्षण निश्चितच यादगार म्हणावेत असेच. तेदेखील आपल्या आवडत्या स्टेडियमवर! वानखेडे हीच कर्मभूमी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रणजी ट्रॉफी आणि मुंबईचं अतूट नातं आहे. यंदा रणजी स्पर्धेचं (२०२४-२५) हे ९० वं वर्ष असून मुंबईने रणजी स्पर्धेत महनीय कामगिरी केली आहे. ४२ वेळा रणजी ट्रॉफीवर मुंबईचंच नाव कोरलं गेलं असून गेल्या मोसमात मुंबईने ४२ वं रणजी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. ते विदर्भाला हरवून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली, वानखेडे स्टेडियमवर खेळताना!
यंदा मुंबईने इराणी कप पटकावला तो तब्बल दोन तपांनंतर! १९९७-९८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून मुंबईने इराणी कप जिंकला होता. २४ वर्षांनी अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघाने बंगलोरमध्ये शेष भारताला हरवून १५ व्यांदा इराणी कप हासील केला. पद्माकर शिवलकर यांनी रणजी सामन्यांमध्ये मुंबईतर्फे खेळताना सर्वाधिक ३५२ विकेट्स घेतल्या होत्या.
मुश्ताक अली स्पर्धेतही मुंबईनेचा बाजी मारली. श्रेयस अय्यरच्या संघाने व्हाईट बॉल स्पर्धेत मुंबईला जेतेपद मिळवून दिलं ते बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर! वानखेडे स्टेडियमवर १९७५-२०२४ दरम्यान २७ कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामन्यात भारताने विजय संपादले तर ८ सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. अगदी दुःखद पराभव म्हणजे यंदा दिवाळीत न्यूझीलंडने रोहित शर्माच्या भारतीय संघाला खडे चारून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
भारतीय संघाचा संस्मरणीय कसोटी विजय म्हणजे अझरच्या भारतीय संघाने जिमी ऍडम्सच्या विंडीज संघाला चारी मुंड्या चीत केले. कोर्टनी वॉलश, बेंजामीन, कफि या वेगवान त्रिकुटाला बेडरपणे सामोरे जात सचिन तेंडुलकर आणि संजय मांजरेकर या मुंबईकरांनी तडफदार खेळ करून शतकी भागी केली आणि भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.
डावखुर्या विनोद कांबळीने इंग्लंडविरुद्ध फटकावलेलं द्विशतक (२२४) संस्मरणीय ठरलं आणि भारताने इंग्लंडचा एक डाव आणि १५ धावांनी पराभव करून इंग्लंडचा प्रथमच ३-० असा फडशा पाडून मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. अजित वाडेकर भारतीय संघाचे यशस्वी व्यवस्थापक (मॅनेजर ) होते आणि भारतीय संघात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि प्रवीण अमरे या द्रोणाचार्य आचरेकर सरांच्या शारदाश्रमच्या त्रिकुटाचा समावेश होता.
तिघांनीही वानखेडेवर शानदार खेळ करून प्रेक्षकांना खूश केले आणि भारताच्या विजयाला हातभार लावला. दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांनीदेखील वानखेडेवर टेस्ट, रणजी सामन्यात धुवाधार फलंदाजी करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. रवी शास्त्रीने बडोद्याविरुद्ध रणजी सामन्यात तिलक राजच्या एका षटकात ६ उत्तुंग षटकार खेचण्याची किमया केली आहे आणि गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसण्याचा मान संपादला वानखेडेवरच. रवीने हा पराक्रम केला १९८४-८५ च्या मोसमात.
मुंबईचे कर्णधार
एल पी जय, होशीदार कॉन्ट्रॅक्टर,होमी वजीफदार, विजय मर्चन्ट, केकी तारापोर, के. सी इब्राहिम, माधव मंत्री, दत्तू फडकर, रूसी मोदी, रंगा सोहोनी, पॉली उम्रीगर, गुलाबराय रामचंद, माधव आपटे, बापू नाडकर्णी, मनोहर हर्डीकर, शरद दिवाडकर,अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, सुधीर नाईक, सुनील गावस्कर, अशोक मंकड, मिलिंद रेगे,एकनाथ सोलकर, रवी शास्त्री, संदीप पाटील, लालचंद राजपूत, दिलीप वेंगसरकर, शिशिर हट्टगडी, चंद्रकांत पंडित, संजय मांजरेकर, राजू कुलकर्णी, समीर दिघे, सचिन तेंडुलकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, पारस म्हाब्रे, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, वसीम जाफर, अजित आगरकर, आदित्य तरे, झहीर खान, अभिषेक नायर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, शम्स मुलाणी.
मुंबईसाठी खेळलेली पिता-पुत्रांची जोडी
विनू मंकड आणि अशोक व राहुल मंकड
विजय मांजरेकर आणि संजय मांजरेकर
वासू परांजपे आणि जतीन परांजपे
मधू पाटील आणि संदीप पाटील
बंधूची जोडी
वसंत अमलाडी आणि मोहिनी अमलाडी
माधव आपटे आणि अरविंद आपटे
रमेश दिवेचा आणि अजय दिवेचा
सुभाष गुप्ते आणि बाळू गुप्ते
दीपक जाधव आणि जयप्रकाश जाधव
रामनाथ केणी आणि लुमा केणी
विजय मर्चन्ट आणि उदय मर्चन्ट
गुलाम परकार आणि झूल्फीकार परकार
किरण पोवार आणि रमेश पोवार
वसंत रायजी आणि मदन रायजी
सर्फराज खान आणि मुशीर खान
आज १२ जानेवारी सकाळपासून वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णजयंती महोत्सवाला सुरूवात होत असून रविवार १९ जानेवारीला या महोत्सवाची सांगता होईल. वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनने केलं असून क्रीडापत्रकार विरुद्ध एमसीए पदाधिकारी संघ यांच्यातील १० षटकांच्या सामन्याने या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल.
त्यानंतर सकाळी ११ ते १२ दरम्यान रणजी स्पर्धेत मुंबईचे कर्णधारपद भूषविणार्या १८ कर्णधारांचा गौरव करण्यात येईल तसेच १५ जानेवारी बुधवारी मुंबईतील ग्राउंड्समन (मैदानांची निगराणी करणारे माळी) यांचा सत्कार करून त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडेल. रविवार १९ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर१९७४ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या रणजी सामन्यातील(मुंबई वि. बडोदे ) खेळाडूंना गौरविण्यात येईल आणि संध्याकाळी अजय-अतुल यांच्या गाण्याच्या सुरेल कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होईल.
-(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत)