घरफिचर्ससारांशवारकरी संप्रदाय आणि स्त्रिया

वारकरी संप्रदाय आणि स्त्रिया

Subscribe

वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दलचं एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला स्त्रीच्या रूपात पाहण्याची पद्धत. विठ्ठलाला विठू माऊली म्हटलं जातं. पुरूष देवतेच्या ठायी असलेल्या ममता, वात्सल्य या गुणांमुळे त्याच्याकडे स्त्रीरूपात पाहिले गेल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळेच मूल आईकडे ज्याप्रकारे हट्ट करते, आईशिवाय जसे बेचैन होते, ती अवस्था भक्तांना पांडुरंगाच्या बाबत अनुभवायला मिळते.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मंडळी वारीला जाताना आपण पाहतो. आणि या महिनाभराच्या काळासाठी पुरूष मंडळी जेवढ्या उत्साहाने घरा-दार सोडून वारीला निघतात, तेवढ्याच उत्साहाने महिलांचाही सहभाग या सोहळ्यात पाहायला मिळतो. वास्तविक स्त्रियांवर असलेल्या कौटुंबिक जबाबदार्‍या पाहता एवढ्या मोठ्या काळासाठी बाईने घरापासून लांब राहणे एक प्रकारचे आव्हानच म्हटले पाहिजे. पण वारीमध्ये असंख्य महिलांनी हे आव्हान स्वीकारलेले पाहायला मिळते. ‘आवा चालली पंढरपुरा, वेसीपासुनि आली घरा’, अशा शब्दांत संत तुकारामांनी संसारात अडकून पडणार्‍या स्त्रीचे अतिशय गंमतीशीर वर्णन केलेले असले, तरी संतांच्या शिकवणीनुसार संसार-प्रपंच करत-करतच परमार्थ साधण्याचा वारी हा अतिशय खात्रीशीर मार्ग अनेक स्त्रिया अवलंबताना दिसतात.

यामागच्या कारणाचा विचार करताना असे लक्षात येते, की वारकरी संप्रदायामध्ये असे काही घटक आहेत, ज्यामुळे स्त्री वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणावर या वारीच्या सोहळ्यात सहभागी होतो. किंबहुना, आज मितीला भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात स्त्रियांना कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळ्यांवर जे स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हक्कांसाठी असलेल्या चळवळी, सुधारणा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणावर झाल्या, त्याचे श्रेयही बरेचसे इथल्या वारकरी परंपरेलाच द्यावे लागते. तेराव्या शतकातल्या संतांच्या मांदियाळीत मुक्ताबाईंपासून जनाबाई, सोयराबाई अशा अनेक स्त्री संत होऊन गेल्या. वारकरी संप्रदायामुळे ‘भेदाभेद अमंगळ’ म्हणत तोवर सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रापासून बाजूला पडलेल्या स्त्रियांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात यायचा वाव मिळाला. वैदिक धर्माबरोबरच इतरही अनेक पंथ-संप्रदायांमध्ये परमेश्वर व मोक्षप्राप्तीच्या अधिकारापासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र भागवत संप्रदायात त्यांना तो अधिकार मिळाला.

- Advertisement -

त्यामुळेच जातीभेद, वर्णभेदासह लिंगभेदही नाकारणार्‍या भक्ती संप्रदायात मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग घेतलेला दिसतो. आणि त्यांनी नुसताच सहभाग घेतला नाही, तर परमेश्वराची त्यांच्यावर अपरिमित कृपा असल्याचा त्यांनी दावाही केला. ‘जात्यावर दळायलाच नाही, तर त्यांची वेणी-फणी करायलाही भगवंताने यावे’, इतका हक्क जनाबाईंसारख्या तत्कालीन स्त्री संतांनी परमेश्वरावर दाखवलेला दिसतो. त्यांनी कामांची विभागणी करताना दळण-कांडण किंवा वेणी-फणी याकडे ‘बायकी’ कामे म्हणून पाहिलेले दिसत नाही, उलट ‘पुरूष’ असलेला पांडुरंगसुद्धा ती कामे करतो, असे त्या म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पुरूषांनी घरकामात हातभार लावला तर त्याची बीजे तेराव्या शतकात जनाबाईंनी पेरून ठेवलेली आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

परंतु केवळ परमेश्वराची कृपाच नाही, तर स्त्रियांच्या कर्तृत्वाला व त्यांच्या अधिकारालाही वारकरी संप्रदायाने खुलेपणाने स्वीकारल्याचे पाहायला मिळते. तेराव्या शतकापासूनच स्त्रियांनी केलेल्या रचनांचा इथे स्वीकार केलेला दिसतो. मुक्ताबाई, जनाबाईंच्या अभंगांवर आजही ठिकठिकाणी कीर्तने-प्रवचने होताना दिसतात. तर स्वरचनांच्या पुढे जाऊन सोळाव्या शतकात संत बहिणाबाईंनी अश्वघोषाच्या वज्रसूचीचा मराठीत अनुवाद करून जातीभेदावरचे टीकास्त्र जनसामान्यांना उपलब्ध करून दिले. त्यामुळेच ‘बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा’ असं म्हणत ज्ञानदेवांनी पाया रचलेल्या भक्ती परंपरेच्या देवालयावर एक स्त्री असूनही आपण ध्वजा फडकवत आहोत आणि अतिशय ओजस्वी निरूपण करण्याइतका आपला अधिकार आहे, असे छातीठोकपणे सांगण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात होता. आणि संस्कृतमधील भगवद्गीता व भागवत पुराण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार्‍या संत ज्ञानेश्वर व संत एकनाथांची परंपरा पुढे बहिणाबाईंनी चालवलेली दिसते. हा अधिकार मिळवण्याची मुभा त्यांना भागवत संप्रदायात होती, ही लक्षणीय बाब म्हणायला हवी.

- Advertisement -

हा आत्मविश्वाससुद्धा या परंपरेतूनच आलेला दिसतो. तेराव्या शतकात अवघ्या सतरा-अठरा वर्षांच्या मुक्ताबाई ऐशी वर्षांच्या चांगदेवांच्या गुरू बनू शकल्या. केवळ भक्तीचा नाही, तर मार्गदर्शनाचाही अधिकार स्त्रियांना होता. लिंगभेदाबरोबरच वयाची बंधनेही तेव्हापासूनच वारकरी परंपरेने झुगारलेली दिसतात. मुक्ताबाईंचे तर संप्रदायाचा पाया घालण्यातही योगदान आहे. समाजाकडून मिळणार्‍या हीन वागणुकीमुळे उद्विग्न झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला सांगत मुक्ताबाईंनीच संतत्वाची व्याख्या केलेली दिसते. ‘योगी पावन मनाचा, साही अपमान जनाचा’, असे सांगत त्यांनी संतांनी कसे वागावे याचे एक प्रकारचे ‘गाईडच’ बनवलेले आहे. संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदयात स्त्रियांना आध्यात्मिक क्षेत्रात मिळालेल्या अधिकाराचे मूर्तिमंत प्रतीकच म्हणाव्या लागतील.

मुक्ताबाई तथाकथित उच्चवर्णीय असल्याने त्यांचा आध्यात्मिक अधिकार समाजाने मान्य केला असावा, असे जर चुकून कोणाला वाटले, तर दासी असलेल्या जनाबाईंना नामदेवांनी लिहायला-वाचायला शिकवण्यापासून आज सर्वमान्य असलेली ‘लेकुरवाळ्या विठूरायाची’ प्रतिमा स्वत: जनाबाईंनी चितारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास स्त्रीशूद्रादींना वारकरी संप्रदायाने ज्या मोकळेपणाने स्वीकारले, त्याचीच ग्वाही देतो.

पुढे पंधराव्या शतकात कान्होपात्रांसारख्या समाजाच्या मुख्य प्रवाहाने न स्वीकारलेल्या गणिकेलासुद्धा भगवंताच्या द्वारी कोणतीही दुय्यम वागणूक न मिळता तिथे भक्ती हे एकमेव परिमाण लागू होत असल्याचे आपल्याला दिसून येते. संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे ‘याचि देही याचि डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा’ हा न्याय सर्व भक्तांना सारखाच लागू होतो.

वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दलचं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला स्त्रीच्या रूपात पाहण्याची पद्धत. विठ्ठलाला विठू माऊली म्हटलं जातं. पुरूष देवतेच्या ठायी असलेल्या ममता, वात्सल्य या गुणांमुळे त्याच्याकडे स्त्रीरूपात पाहिले गेल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळेच मूल आईकडे ज्याप्रकारे हट्ट करते, आईशिवाय जसे बेचैन होते, ती अवस्था भक्तांना पांडुरंगाच्या बाबत अनुभवायला मिळते. किंबहुना या परंपरेचा पाया रचणार्‍या संत ज्ञानेश्वरांनाही माऊली या नावानेच संबोधले जाते. इतकेच नाही, तर आजही वारकरी मंडळी एकमेकांना माऊली या नावानेच संबोधतात. सृष्टीचा पालनकर्ता, कर्ता-धर्ता जरी पुरूष रूपात कल्पिलेला असला, तरीसुद्धा ही मंडळी एकमेकांना भक्ती आणि प्रेमाचा सागर असणार्‍या स्त्रीरूपातच पाहतात.

‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी…’ असे म्हणत एक उदासवाणा सूर लागण्याची शक्यता असताना जनाबाई मात्र त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसतात. ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास, साधुसंती ऐसे मज केले’, असे मानून आपले स्त्रीत्व खुलेपणाने स्वीकारत, त्यासहित ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्याचा आनंददायी मार्ग अवलंबताना दिसतात. आणि हाच मार्ग त्यानंतरही वारकरी संप्रदायात स्त्रिया अवलंबताना पाहायला मिळतात.

वारीच्या सोहळ्याचा आध्यात्मिक आणि पारमार्थिक कारणांच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर एखाद्या सामान्य स्त्रीला वारीमधून कोणता आनंद मिळत असेल, हा प्रश्न समोर आल्यावाचून राहात नाही. आणि त्या दृष्टीने वारी म्हणजे स्वातंत्र्याची मोठी पर्वणीच म्हणता येईल. रोजच्या धबडग्यातून काही काळ तरी वेगळा विचार करण्याचे आणि निखळ आनंद मिळवण्याचे निमित्त म्हणजे वारी.. चार-चौघांत मिसळण्याची, आपली सुख-दु:ख इतरांशी वाटून घ्यायची संधी म्हणजे वारी.. मोकळ्या आकाशाखाली नाचत-गात बागडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे वारी.. पावसात मनसोक्त भिजण्याचा अवसर म्हणजे वारी.. एरवी पुरूषांच्या वासनांध नजरांना उबगलेल्या बाईसाठी इथे प्रत्येक जण माऊली म्हणूनच पाहणार, याची खात्री म्हणजे वारी.. आणि पांडुरंगाच्या भेटीच्या निमित्ताने स्वत:चीच स्वत:शी नव्याने ओळख करून घेण्याचा प्रवास म्हणजे वारी.

–अमृता मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -