घरफिचर्ससारांशविस्मृतीत गेलेला प्रवास...

विस्मृतीत गेलेला प्रवास…

Subscribe

मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागल्यापासून आपण अनेक गोष्टी विसरलो आहोत. पण सर्वात जास्त काही विसरायला झालं असेल, तर तो म्हणजे प्रवास! काही सन्माननीय अपवाद वगळता आपल्यापैकी बरेच जण शहराच्या काय, पण राहत्या भागाच्याही बाहेर गेलेले नाहीत...

माणूस हा अनंत काळाचा प्रवासी असतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे एका गोष्टीकडून दुसर्‍या गोष्टीकडे जाणारा प्रवासच असतो. त्या आध्यात्मिक प्रवासाशी आपल्याला फार काही देणंघेणं नाही. पण भौतिक प्रवास मात्र बर्‍याचदा सर्वांना हवाहवासा वाटणारा! अनेकदा तर मुक्कामापेक्षा प्रवासाची गंमत जास्त, असं वाटेल एवढा प्रवास महत्वाचा असतो.

सुदैवाने लोहमार्ग, रस्ते, पाणी, आकाश अशा सगळ्या मार्गांनी बक्कळ प्रवास करण्याचा योग आतापर्यंत वाट्याला आला. यातले सगळेच प्रवास काही सुखावह होते, असं नाही. पण प्रवासाला निघायचं, ही कल्पनाच मोहरून टाकणारी होती. लहानपणी परिस्थिती अगदी सुखवस्तू नसली, तरी हलाखीची म्हणावी, अशीही नव्हती. आई-वडिलांना प्रवासाची म्हणा किंवा पर्यटनाची म्हणा, आवड होती. त्यामुळे दर दिवाळीत आम्ही पर्यटनासाठी लांबचे प्रवास करायचो. कॉलेजला जायला लागल्यापासून घराच्या शहरापासून ते मुंबईपर्यंतचा लोकल ट्रेनचा प्रवासही पाचवीला पुजला होता. गावाला जायचं, तर एसटीचा प्रवास, गावी पोहोचल्यानंतर आधी बैलगाडी आणि गाव सुधारलं तसा टमटम रिक्षाचा प्रवास, अगदीच हुक्की आली तर लाँचचा प्रवास असे अनेक प्रवास घडले.

- Advertisement -

दैनंदिन प्रवास तसे कंटाळवाणेच! मग तो लोकल ट्रेनचा असो, एसटीचा असो किंवा अगदी विमानाचाही असो. एक रटाळपण त्यात येतं. तरी लोकल, एसटी किंवा मेट्रोचे प्रवास जरा कमी एकसूरी असतात. स्टेशनमधला किंवा एसटी स्टँडातला गोंधळ अभूतपूर्व असतो. अनेक आवाजांचं ते संमेलन असतं. सर्वात मोठा आवाज असतो तो उद्घोषणांचा! आता रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, एसटी स्टँड आणि विमानतळ या सगळ्या ठिकाणच्या उद्घोषणांचा गाभा एकच असला, तरी स्वरूप किती वेगवेगळं असतं.

मुंबईतील लोकल ट्रेनची उद्घोषणा असेल, तर त्या मंजूळ आवाजातली बाई एका लयीत ‘आठ.. वाजून.. पस्तीस मिनिटांची… कसार्‍याला जाणारी… जलद लोकल…प्लॅटफॉर्म क्रमांक…पाचवर येत आहे’ असं काहीसं बोलत असते. ही उद्घोषणा होते ती मात्र तीन भाषांमध्ये! पण तेच एक्सप्रेस गाडी येणार असेल, तर सुरुवातीला ‘ट्यँड्यँ’ असं काहीतरी म्युझिक वाजतं आणि अत्यंत संथ लयीत एक बाई ‘शून्य.. एक.. तीन… चार… सहा.. डाऊन… मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमुकअमुक…’ वगैरे मजकूर प्रसवते. पण हेच जरा काही बदल झाला, तर या सगळ्या आवाजांशी अगदी फटकून असलेला एक पुरुषी आवाज स्टेशनभर घुमतो, ‘प्लॅटफॉर्म क्रमांक चार की गाडी आज प्लॅटफॉर्म क्रमांक छे पर आएगी’. त्याला हे सांगायची मुलखाची घाई असते.

- Advertisement -

सगळ्यात धमाल आवाज असतात ते एसटी स्टँडवरचे. ‘गाडी क्रमांक अठ्ठावन्न बावन्न, मुंबई-सातारा मार्गे पुणे फलाट क्रमांक चारवरून सुटणारे’, अशा स्वरूपाची ती उद्घोषणा असते. त्यात एखादी एसटी दुसर्‍या एसटीच्या समोर लागली असेल, तर संबंधित ‘डायवर’ला स्वच्छ ऐकू जाईल, अशा आवाजातल्या उद्घोषणाही कमालीच्या रंजक असतात. आजकाल तर एसटी स्टँडवरही ठरावीक अंतराने थांबत थांबत बोलणार्‍या महिलांच्या मंजुळ आवाजातच उद्घोषणा ऐकू येतात.

विमानतळाचा खाक्याच निराळा! इथे कसं सगळं सुटाबुटात चाललेलं असतं. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आणि विमानतळ यांना मनुष्यरूप चिकटवायचं, तर मुंबईतलं रेल्वे स्टेशन हे पाचवारी पातळ नेसून घाईघाईत कामावर निघालेल्या एका नोकरदार स्त्रीसारखं वाटतं. हेच आडगावाचं रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टँड म्हणजे पांढरा शर्ट, पांढरा लेंगा, गांधी टोपी घालून ओठात बिडी ठेवून पारावर गप्पा छाटायला बसलेल्या पांडबा किंवा म्हादबा यांच्यासारखं असतं. एक प्रकारचा अघळपघळ लोभसपणा त्यात असतो. विमानतळ मात्र कायम सुटाबुटात वावरणारा, टायची गाठ घट्टं बसल्याने नाईलाजाने मान ताठ असणारा साहेब वाटत आलाय.

प्रवासाला निघालेल्यांचीही वर्गवारी अगदी सहज करता येते. सराईत प्रवासी लगेच कळतात आणि नवख्या प्रवाशांचं नवखेपण लपवण्याची धडपडही चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. आता रेल्वेने प्रवास करणारा एखाद्या सराईत प्रवाशाला त्याचा डबा नेमका कुठे येणार, हे कोणालाही विचारायची गरज पडत नाही. एसटी स्टँडवरच्या असंख्य स्टॉल्सपैकी टेसदार वडा कुठे मिळतो, हे त्याला ठाऊक असतं आणि विमानतळावर दोन रुपयांमध्ये भरपेट खाऊपिऊ घालणार्‍या लाऊंजमध्ये तो अगदी सहज जाऊन पोहोचतो.

नवख्या प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडते. एक तर बॅगा सावरण्याची त्यांची कसरत लपत नाही. रेल्वे स्टेशन असो, विमानतळ असो किंवा एसटी स्टँड असो, हे लोक पत्ता चुकलेल्या माणसांसारखे बिचारे आणि अगतिक दिसतात. स्वच्छतागृहाची पाटी लावली असली, तरी त्यांना ते कुठे आहे हे विचारावंच लागतं. शेजारी उभ्या असलेल्या माणसापासून ते लांबवरच्या स्टॉलवाल्यापर्यंत ते सगळ्यांना ‘गाडी याच प्लॅटफॉर्मवर येणार ना’ हे दहा दहा वेळा विचारतात. ट्रेन किंवा बसमधली जागा आरक्षित असली, तरी हे नवखे प्रवासी बस किंवा ट्रेन आली की, त्यावर तुटून पडतात. कधी एकदा आत शिरून जागा पटकावतो, असं त्यांना झालेलं असतं. याउलट सराईत मात्र, सगळी गर्दी निवळली की, आरामात जाऊन आपल्या जागी बसतात. विमानतळावर प्राणापेक्षाही बोर्डिंग पास जपणारे नवखे प्रवासीच असतात. सराईत लोक मात्र तो बोर्डिंग पास घडी करून खिशात वगैरे ठेवून डुलक्या काढायला लागलेले असतात.

एसटी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये आणखी एक वर्गवारी असते. आरक्षित आणि अनारक्षित! हेदेखील लगेच ओळखू येणारे लोक. आरक्षित तिकीट असलेले लोक जरा निवांत असतात. चहाच्या स्टॉलवर उभ्या असलेल्या दोन प्रवाशांमधून आरक्षित तिकीट असलेला आणि अनारक्षित प्रवासी ओळखू येतो. आरक्षितवाले चहाचा भूरका मारताना जरा जास्तच ‘सुर्रर्रर्रर्रर्र….’ करतात. पण अनारक्षित प्रवास करणार्‍यांचा एक डोळा एसटी कधी येतेय किंवा गाडी आली का, इथे असतो. चहा कितीही गरम असला, तरी त्याचे घोट पटापट घेण्याकडे त्यांचा कल असतो. हे लोक रेल्वे स्टेशनवर साधारण इंजिनाच्या जवळच्या डब्यांच्या किंवा सर्वात मागच्या डब्यांच्या आसपास घुटमळत असतात. क्वचित एखादा टीसीजवळ जाऊन पुढील प्रवास सुखाचा करण्याच्या विवंचनेत असतो.

प्रवासाला निघालेल्या लोकांची कारणंही ‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ एवढी भिन्न असतात. काही जण पर्यटनाला निघालेले असतात, काहींच्या नातेवाईकांकडे लग्न असतं, काही औषधोपचारांसाठी दुसर्‍या शहरात चाललेले असतात, काही शिक्षणासाठी, काही दुसर्‍या शहरात बदली झाली म्हणून बायकामुलांना मागे ठेवून एकटेच निघालेले असतात, काहींना फक्त छोटंसं काम करून संध्याकाळी आपल्या शहरात परतायचं असतं, एखादी मुलगी लग्न करून सासरच्या गावी निघालेली असते, तर एखादी आई मुलीच्या बाळंतपणासाठी चाललेली असते, काही प्रिय व्यक्तींच्या भेटीसाठी जात असतात… भगवद्गीतेत सापडतील, एवढे मनुष्यस्वभाव प्रवास करताना ट्रेन, बस, जहाज किंवा विमानात एका ठायी जमलेले असतात. पंचेंद्रीय उघडी ठेवून केला, तर प्रवासासारखा शिक्षक नाही. प्रवास माणसाला समृद्ध करतो, तो उगाच नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -