खाद्यपदार्थांनी पावासाचे स्वागत !

मृग नक्षत्राच्या दिवशी म्हणजे सात जूनला शेवग्याच्या पानांची डाळ घालून केलेली भाजी आणि गरमागरम दशमी...किंवा ताकातली भाकरी आणि लसणाची चटणी आणि दही कांदा...असे जेवले नाही तर मला पावसाळाभर काही तरी चुकल्यासारखं वाटत रहातं. हे झालं कोल्हापूरचं, तसेच पावसाळ्याचं स्वागत कोकणामध्ये गरमागरम वाफोल्यांनी करतात. वाफोली नारळाच्या चटणीबरोबर खातात. तीन चार दिवसांपर्यंत वाफोल्या छान मऊ रहातात. काही जणांकडे वाफोल्यांच्या पीठात खोवलेले खोबरे घालतात आणि वाफवण्याच्या ऐवजी वर आणि खाली निखारे ठेवून खरपूस भाजून घेतात. त्याला ‘खापरोळ्या’ म्हणायचे. खापरोळ्या नारळाच्या दूधाबरोबरही छान लागतात.

जून महिन्याच्या सुरूवातीला, ऐन दुपारी पाऊस सुरू झाला…की तो गारव्याचा शिडकावा…. मातीचा सुगंध यायला लागला की आम्ही भांड्यात पावसाचे पाणी गोळा करत असू. त्या पहिल्या पावसाच्या पाण्याचा गरमा गरम चहा…आणि कांद्याची विंचू भजी… अहाहा..सुख…म्हणजे तरी दुसरं काय असतं… !

आमच्या कोल्हापुरात, पावसाळ्यासोबत हवेतला गारठाही वाढतो. अशा ओल्या गारठ्यात… तिखट जहाल आणि मसालेदार मिसळ पाव. म्हणजे कमालीचा आनंद! उकडलेली मोड आलेली मटकी, त्यावर उकडलेले बटाटे, कांदा, मग ते मिश्रण बुडून जाईल असा रस्सा. आम्ही त्याला कट म्हणतो त्यात खोबरं, लसूण आल्याचे वाटण, आणि गरम मसाला घातलेला असतो. (हा कट म्हणजे प्रत्येक बनवणार्‍याचे वैशिष्ठ्य असते.) आणि त्यावर शेव, चिवडा, फरसाण, बारीक कांदा, कोथिंबीर आणि ओले खोबरे आणि लिंबू शिंपले की मिसळ बनते. मग ती मिसळ शुभ्र कापसासारख्या मऊ ब्रेडबरोबर खायची. ही मिसळ चवदार तर असतेच आणि शिवाय ती पावसाळ्यासाठी आरोग्यदायीही असते. विशेषतः मिसळीचा गरमा-गरम कट…त्यात पाव बुडवून खाताना घसाही शेकला जातो आणि त्यातल्या गरम मसाल्यामुळे सर्दी, खोकला, थंडी, ताप कुठल्या कुठे पळून जातो…

मृग नक्षत्राच्या दिवशी म्हणजे सात जूनला शेवग्याच्या पानांची डाळ घालून केलेली भाजी आणि गरमागरम दशमी…किंवा ताकातली भाकरी आणि लसणाची चटणी आणि दही कांदा…असे जेवले नाही तर मला पावसाळाभर काही तरी चुकल्यासारखं वाटत रहातं. हे झालं कोल्हापूरचे, तसेच पावसाळ्याचे स्वागत कोकणामध्ये गरमागरम वाफोल्यांनी करतात. वाफोली करण्यासाठी तांदळाचे ताजे पीठ वापरतात. तांदूळ आणि जिरे, अगदी थोड्या मेथ्या,असे किंचित भाजून रवा काढतात. एक वाटी रवा असेल तर अर्धी वाटी साखर पाण्यात विरघळवून त्यात तांदळाचे निम्मे पीठ शिजवतात. पीठ जाडसर शिजले की त्यात उरलेले कोरडे पीठ, दूध आणि साय घालून रात्रभर ठेवतात. पीठ छान मऊ होते. दुसर्‍या दिवशी त्यात दही, मीठ आणि थोडेसे पाणी घालतात. पसरट थाळीला तेल लावून त्यावर ते मिश्रण पातळसर पसरवून ते वाफवून घेतात. साधारण १५ मिनिटात मलुसलुशीत वाफोली तयार. वाफोली नारळाच्या चटणीबरोबर खातात. तीन चार दिवसांपर्यंत वाफोल्या छान मऊ रहातात. काही जणांकडे त्या पीठात खोवलेले खोबरे घालतात आणि वाफवण्याच्या ऐवजी वर आणि खाली निखारे ठेवून खरपूस भाजून घेतात. त्याला ‘खापरोळ्या’ म्हणायचे. खापरोळ्या नारळाच्या दूधाबरोबरही छान लागतात.

एका पावसाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसात मी गोव्यात बरेच दिवस राहिले होते. वळवाच्या पावसामुळे उगवलेली तेरं (अळूचा एक प्रकार) आणि रूजलेली हिरवी काजूगरे…दोन्ही भाज्यांच्या चवी पंचवीस वर्षांनंतरही मा़झ्या मनात आणि जिभेवरही ताज्या आहेत. अक्षयतृतीयेला पेरलेले वेल यावेळी फुलावर येतात, त्यांच्या कळ्यांच्या आणि फुलांच्या भाज्या आणि भजी या दिवसात आवर्जून केली जातात. याच दिवसात फणस पिकत असल्यामुळे फणसाची सांदणे, खांतोळ्या आणि उकडलेल्या आठळ्यांची रसभाजी.. आठळ्या भाजून आणि मग फोडून त्यात कांदा आणि खोबर्‍याचे तुकडे टाकून केलेली भाजी… ही तर अगदी पोह्यासारखीही खाता येते. मात्र भाजलेल्या आठळ्या फोडायला घरात दोन चार तरी माणसं हवीत. पिकल्या फणसाचे पापड, आंब्याची आणि फणसाची साठं..कोकमीची सरबते….सर्व याच दिवसात तयार होते घाटावरच्या माणसांच्या दृष्टीने या दिवसात कोकणात खाण्यापिण्याची चंगळ असते.

या वेळेसच घोटे म्हणजे छोटे आंबेही तयार होतात. घोट्यांचे सासव, घोटे आणि अंबाड्याचे किंवा करमलाचे तिखट गोड रायते..अननस, करवंदांचे ताजे मुरांबे, ताजी लोणची…अनेक प्रकार, पुढे येणार्‍या पावसाळ्यासाठी साठवायचे असतात. माझी एक मैत्रीण कोस्टल कर्नाटकातल्या कुंदापूरची… ती सांगायची, तिच्या इथे पावसाळ्यात दूध मिळायचे नाही. मग दुधाच्या कॉफीची तल्लफ भागवावी म्हणून त्यावेळी त्यांच्याकडे तिळाच्या किंवा नारळाच्या दुधाची कॉफी करतात. अशा प्रकारची कॉफी अगदी जून महिना लागल्यापासून करायची त्यांच्याकडे पध्दत होती.

तुर्कस्तान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यांसारख्या देशातही पावसाचे स्वागत कॉफीने करायची पध्दत आहे. तुर्कस्तानात त्या कॉफीत बटर आणि वाईनही घालतात. या दिवसातले अजून एक आकर्षण म्हणजे पावसाच्या सुरूवातीच्या उगवणार्‍या रानभाज्या… याच दिवसात उगवून येणारी डोंगराळ भागातले शेवळे आणि छत्तीसगडसारख्या ठिकाणी येणारी कोयरेलची भाजी… दोन्हीही भाज्या शिजताना भरपूर पाणी सुटते, त्यामुळे लवकर शिजतात आणि उन्हाळ्यात जमलेली शरीरातली उष्णता कमी करतात आणि बहारीची चव असते.

एक गंमत सांगायची म्हणजे माझ्या आयुष्यातील कितीतरी वर्षातले जूनचे पहिले आठवडे, मी फारच वेगवेगळ्या ठिकाणी घालवलेले आहेत. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाच्या, उन्हाळी सुट्टीत म्हणजे मे महिन्याच्या अखेरीला गजापूर- पांढरपाणी म्हणजे विशाळगडच्या प्रदेशात आम्ही मित्र मैत्रिणी निरूद्देश भटकत होतो. त्याच रात्री घरी परतायचे म्हणून कपडे वगैरेही बरोबर नव्हते. अचानक ढग जमून आले आणि पावसाने अगदी कहर मांडला… आम्ही अगदी चिंब भिजलो… ह्यो काय नवतीचा पाऊस का काय म्हणायचा! असे तिथला प्रत्येक जण म्हणायला लागला. त्या पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या रात्री गजापूरच्या एका घरात रात्री मुक्काम करावा लागला. घरातली चार पोरे आणि आम्ही गच्च भिजलेले चार पाच पाहुणे… त्या दिवसात तिथे वीजही नव्हती. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी त्या माऊलीने सुंठ आणि जायफळ घालून चांगले पातेले भरून मूगाचे माडगे रांधले आणि आम्हीही ते भरपेट प्यायलो आणि ओल्या कपड्यातही ऊब आणली.

तसेच एकदा, अशाच जूनच्या सुरूवातीच्या दिवसात विदर्भ आणि मध्य प्रदेशातल्या खेड्यात मला काही कामासाठी रहावे लागले होते. त्या दिवसात, तिथल्या घरांमध्ये आमच्या पाहुणचारासाठी भरपूर तूप घातलेले सरगुंडे (जाड शेवया) आणि आंब्याचा पातळ रस करत असत आणि मीही प्रत्येक ठिकाणी प्रथमच खात असल्यासारख्या त्या रसातल्या शेवया ओरपून खाल्लेल्या होत्या. तेव्हापासून मला आंब्याचा रस पुरी/चपातीपेक्षा उकडलेल्या शेवयांबरोबरच अधिक आवडतो. या शेवटी शेवटी होणार्‍या त्या थोड्या पातळ आमरसाबरोबर खायला ज्वारीची धिरडी आणि तांदळाची उकड भरलेली पोळीही भारी लागते.

पहिल्या पावसासाठी म्हणून संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी ताज्या वाळवणाचे तळण, मासे, मटणाचे नैवेद्य, मोमो, मोमोचा सुक्या मेव्याचे सारण घातलेला सिडू नावाचा गोड भाऊ, अक्षरश: अनंत प्रकारचे सूप्स आणि भाज्या किंवा मटणाच्या स्टॉकमध्ये शिजवलेले अस्सल चवीचे स्टयू करतात. खरे तर या वेळी शेतीची कामे संपवण्याची प्रत्येकाला घाई असते. त्यामुळे रोजच्या जेवणासारखे या पावसाळ्याच्या स्वागताचे पदार्थही साधेसुधेच असतात. अर्थातच त्या नैवेद्याच्या पदार्थांचा उद्देश म्हणजे पावसाळ्यात शरीराला लागणार्‍या पोषकांचा साठा करणे आणि उन्हाळ्यात जमलेल्या उष्णतेचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये… म्हणून प्रतिबंधक असेही असतात. जे देश, मौसमी हवामानाचे..त्यांची शेती आणि एकंदरीत सर्व अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून.. असल्यामुळे त्यांना वरूणराजाप्रती कृतज्ञ असावेच लागते. पण शेवटी माणसे ती माणसेच..परमार्थाबरोबर आपलाही स्वार्थ पाहिल्याशिवाय थोडीच राहणार….

–मंजूषा देशपांडे