Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश गीतकार म्हणजे काय रे भाऊ?

गीतकार म्हणजे काय रे भाऊ?

पूर्वी सिनेमांच्या बॅनर्सवर दिग्दर्शक, नायक, नायिका यांचे फोटो असायचे. काळ बदलला आणि पोस्टर्सवर खलनायक आला, निर्माते, संगीत दिग्दर्शक आले. सिनेमा अधिक प्रगत झाला आणि पटकथा लेखक, वितरक यांची माहिती येऊ लागली. पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती नेहमीच मागे राहिलाय, सिनेमात गाणी नसतील तर तो सिनेमा सामान्य प्रेक्षकांना आवडेल काय? हिंदी सिनेमे लक्षात राहतात ते त्यात असणार्‍या अजरामर गाण्यांमुळे, गाणं कोणी गायलं? हे तर गायकाचा आवाज ओळखून कळून जाते. संगीत दिग्दर्शक कोण? हे कॅसेटवर लिहिलेलं असायचं, पण गाणी लिहिली कोणी? याबद्दल फार माहिती उपलब्ध नसायची एव्हाना आजही तितक्या प्रमाणात ती उपलब्ध नाही.

Related Story

- Advertisement -

घरात असो किंवा सिनेमात कुणाला किती महत्व द्यायचं याचा एक प्राधान्यक्रम ठरलेला असतो. उदाहरणार्थ घरात वडील कमावते आहेत तर पहिला मान त्यांचा, मोठा भाऊ नुकताच नोकरीला लागलाय तर दुसरा त्याचा, लहान भाऊ लाडाचा असतो म्हणून तिसरा मान त्याचा, मग मोठी बहीण, मग तुम्ही आणि शेवटी काही राहिलंच तर आई खरं पाहिलं तर घर बनवते ती आई, पण जेव्हा प्रश्न मान घेण्याचा येतो, तेव्हा मात्र ती अलगद बाजूला सारली जाते. सिनेमांच्या बाबतीतदेखील तसंच होत आलेलं आहे, एखादा सिनेमा बनवणं ही एक प्रक्रिया आहे ज्यात हजारो लोक एकत्र आलेले असतात, त्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही मदत होतेच ज्यामुळे सिनेमा बनतो.

पण जेव्हा प्रेक्षकांकडून प्रश्न सिनेमा कुणाचा आहे रे ? असा येतो तेव्हा उत्तरं काय मिळतात किंवा आतापर्यंत काय मिळत आलीत. भारतात हिंदी सिनेमा चालतो तो सिनेमात काम करणार्‍या नायकाच्या नावावरून किंवा त्याच्या अभिनयावर.. फार कमी वेळा दिग्दर्शकाच्या नावावर सिनेमा चालतो, नायिकेच्या नावावर तर त्याहूनही कमी वेळा मग जर सिनेमा लोक बघतात ते केवळ 3 लोकांपैकी एका व्यक्तीच्या नावावर, तर मग बाकी शेकडो हजारो लोकांचं काय? 2 सेकंदाचा सीन असलेला एखादा नट, लाईट हाताळणारा लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, स्पॉट बॉय या सर्वांचं काय ? काही लोक म्हणतील की सिनेमा सुरू होताना किंवा संपल्यावर त्यांची नावं पडद्यावर येतात.

- Advertisement -

पण ती नाव वाचण्याची तसदी किती प्रेक्षकांनी आतापर्यंत घेतली आहे? पूर्वी सिनेमांच्या बॅनर्सवर दिग्दर्शक, नायक, नायिका यांचे फोटो असायचे. काळ बदलला आणि पोस्टर्सवर खलनायक आला, निर्माते, संगीत दिग्दर्शक आले. सिनेमा अधिक प्रगत झाला आणि पटकथा लेखक, वितरक यांची माहिती येऊ लागली. पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती नेहमीच मागे राहिलाय, सिनेमात गाणी नसतील तर तो सिनेमा सामान्य प्रेक्षकांना आवडेल काय? हिंदी सिनेमे लक्षात राहतात ते त्यात असणार्‍या अजरामर गाण्यांमुळे, गाणं कोणी गायलं? हे तर गायकाचा आवाज ओळखून कळून जाते. संगीत दिग्दर्शक कोण? हे कॅसेटवर लिहिलेलं असायचं, पण गाणी लिहिली कोणी? याबद्दल फार माहिती उपलब्ध नसायची एव्हाना आजही तितक्या प्रमाणात ती उपलब्ध नाही.

भारतीय गीतकार म्हटलं की आपल्याला हमखास 2/4 नावच आठवतात. आजच्या पिढीला तर ती ही आठवतील का ? हाच मोठा प्रश्न आहे, बरं जी आठवतील ती त्यांच्या गाण्यांमुळे नाही तर इतर गोष्टींमुळे लक्षात राहतील. सध्या एक असाच गीतकार सोशल मीडियावर गाजतोय, मनोज मुंतशिर हे त्याचं नाव. जे बर्‍याच लोकांना इंडियन आयडॉल नावाच्या शोमुळे माहिती झाले आहे. ज्यांना शो माहिती नव्हता त्यांना त्याच्या मुघलांबद्दलच्या विधानामुळे तो माहिती झालाय. पण मनोज मुंतशिर, गुलजार, इर्शाद कामिल, जावेद अख्तर, अमिताभ भट्टाचार्य, समीर अंजान अशी काही नावं सोडली तर इतर हिंदी गीतकार किती लोकांना माहिती असतील याबद्दल मी साशंक आहे. आता यामागे कारणही तसच आहे, गीतकारांना फार मानधन कधी दिलं जात नाही, ते मिळालं तर क्रेडिटदेखील मिळत नाही.

- Advertisement -

म्हणून असे अनेक गीतकार आहेत ज्यांची गाणी तर आपल्या ओठावर असतात, पण त्यांचं नावं कधी चुकूनही वाचण्याची शक्यता वाटत नाही. मागच्या वर्षी इंडियन आयडॉल शोमध्येच संतोष आनंद नावाचे एक गीतकार आले होते, त्यांची अवस्था संपूर्ण भारताने पाहिली होती. त्यांनी लिहिलेली गाणी सदाबहार आहेत. एक प्यार का नग्मा असो किंवा तिरंगामधील त्यांची गाणी आपल्याला आजही लक्षात आहेत, पण ही गाणी अशा कुठल्यातरी व्यक्तीने लिहिलेली असतील ही बाब संतोष आनंद इंडियन आयडॉलमध्ये येण्याच्या अगोदर किती लोकांना माहिती होती? हे असं का घडलं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? गाणं कानावर पडलं की गायक, त्यावर नाचणारा नायक, म्युजिक देणारा संगीत दिग्दर्शक आठवतो, पण ज्या व्यक्तीच्या शब्दाने गाण्याला अर्थ प्राप्त करून दिला, त्याबद्दल फार गांभीर्याने पाहिले जाते असे नाही.

हिंदी सिनेमांना गीतकारांची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध हिंदी, उर्दू कवी लेखक शायरपासून ते संगीत दिग्दर्शकापर्यंत अनेकांनी हजारो गाणी सिनेमांसाठी लिहिली आहेत. पंडित इंद्रचंद्र, गोपालदास नीरज, निदा फाजली, शैलेंद्र, साहिर लुधियानवी, आनंद बक्षी, किदार शर्मा, कैफ आझमी यांचा काळ असू देत किंवा गुलजार, जावेद अख्तर, समीर अंजान, प्रसून जोशी, मनोज मुंतशिर, इर्शाद कामील, अमिताभ भट्टाचार्य यांचा काळ भारतीय सिनेमांच्या इतिहासात असे शेकडो गीतकार आहेत ज्यांनी आपल्या लेखणीतून अशा गाण्यांना जन्म दिला जे पुन्हा अजरामर झाले. पण त्या गीतकारांना ना कधी जास्त प्रसिद्धी मिळाली ना जास्त पैसा, संतोष आनंदसारख्या व्यक्तीची झालेली अवस्था असू देत किंवा इतर अनेक गीतकारांची अवस्था, ही सगळी परिस्थिती इंडस्ट्रीचे वास्तव दाखवून देते. असं नाही की आपल्याकडे गीतकार मोठे झालेच नाही, जर असं घडलं असतं तर गुलजार, जावेद अख्तर, मनोज मुंतशिर यांसारखी नावं सुद्धा आपल्याला माहिती झाली नसती.

पण हे ही तितकंच खरं आहे की प्रसिद्धी मिळालेल्या गीतकारांची संख्या अत्यल्प आहे. कुठं तरी असं वाचण्यात आलं होतं की लेखकाने एकदा त्याच गाणं लिहून दिग्दर्शकाकडे देऊन टाकलं, की ते विसरून जायला पाहिजे. जसं आई बाळाला 9 महिने पोटात ठेवते आणि जन्म दिल्यावर ते बाळ जन्मभर वडिलांच्या नावाने ओळखलं जातं. नंतर तेच बाळ कुणाचा भाऊ, बहीण, प्रियकर,नवरा, बाप, आजोबा बनतो पण आई कधीच त्याच्यावर हक्क सांगत नाही. अगदी तसंच गीतकारानेसुद्धा आपलं गाणं लिहून संगीत दिग्दर्शकाकडे देऊन विसरून जावं हे सगळं मान्य असलं तरी ज्याप्रमाणे आईला आपल्या बाळाची ओढ असते, आपल्या पोराने आपल्यासोबत बोलावं बसावं, अशा अपेक्षा असतात… तशाच कितीही नाकारलं तरी गीतकाराच्या आपल्या गीताबद्दल असतील, शेवटी त्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तरी चालतील… पण गीतकार म्हणजे कोण ? हे किमान संपूर्ण भारतीय प्रेक्षकांना माहिती व्हावे ही अपेक्षा पूर्ण व्हायला हरकत नाही.

- Advertisement -