घरफिचर्ससारांशअजगराच्या पोटात अख्खा देश

अजगराच्या पोटात अख्खा देश

Subscribe

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी-बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिकदृष्ठ्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही फायदा नाही. कारण तिचं सारं जगणं अजगराच्या हातात आहे. एका अजगराच्या पोटात असाच एक अख्खा देश हजारो वर्षापासून सांगण्यापुरता जिवंत आहे. ह्या देशात शेतकरी - कष्टकरी लोकांचं काय आहे? ओबीसी-बहुजानांचं काय आहे? विद्यापीठं त्याची नाहीत. त्यातील अभ्यासक्रम त्यांच्यासाठी नाहीत! बँका त्यांच्यासाठी नाहीत. विधानसभा त्यांच्यासाठी नाही. लोकसभाही त्यांच्यासाठी नाही ! मोठ्या कष्टानं आजपर्यंत जे काही उभं केलं गेलं होतं, ते सारंच्या सारं आता अलगद अजगराच्या पोटात जावून समाविष्ट होत आहे ! हा देश आता नावापुरता शिल्लक राहिला आहे. सारी सत्ता अजगराच्या हाती आहे.

तसं तर, या देशात नामदेवांचंही सरकार नव्हतं, ज्ञानेश्वरांचंही सरकार नव्हतं, तुकारामाचंही सरकार नव्हतं, कबिराचंही सरकार नव्हतं..! पण त्यांचे विचार मात्र अजूनही जिवंत आहेत ! त्यांच्या शिकवणीमुळे लोक त्या बकरीसारखेच का होईना, पण अजगराच्या पोटात अजूनही जिवंत आहेत. आणि म्हणूनच हा देश जिवंत असल्याचा अनुभव आपल्याला मधून मधून येतो आहे. येत असतो. हा समाज जिवंत असण्याचं सारं श्रेय त्या संतांचं आहे ! अन्यथा कोण आपल्या बाजूनं आहे ? फितुरीचा, बेइमानीचा रोग लागला नाही, असं कोणतं क्षेत्र आज सुरक्षित आहे ?

पण.. हे असं किती दिवस चालायचं? अजगराचं पोट फाडून बकरी कधी बाहेर येणारच नाही का ? बकरी अशीच मरून जाईल का ? किंवा मेल्यासारखीच जगत राहील का? किंवा ती तशीच राहावी का? बकरीला कुणी वाली नाही का ? तिचा कुणी राखणदार नाही का? कुणी तिला संरक्षण देणारा नाही का ? किंवा ज्याची जबाबदारी होती, तोच अजगराला सामील झाला आहे का ?

- Advertisement -

अर्थात, बकरी इतकी वर्षे जिवंत राहू शकली, त्या अर्थी.. ती अजगराचं पोट फाडून बाहेरही येवू शकते, यात मात्र शंका नाही! तिला फक्त गांधी आणि बाबासाहेबांची ताकद समजली पाहिजे. तिचा वापर करता आला पाहिजे ! आणि हा निर्णय अर्थातच बकरीला स्वतः घ्यावा लागेल! बकरीच्या पिलांना घ्यावा लागेल ! बकरीच्या नव्या पिढीला घ्यावा लागेल !

या देशात, ओबीसी साधारण 52 टक्के आहेत. एससी, एसटी, एनटी वगैरे धरून 85 टक्के होतात. म्हणजेच, त्यांची एकूण मतदार संख्या सुद्धा 85 टक्के आहे. घटनेप्रमाणे एक व्यक्ती, एक मत हा अधिकार सर्वांना आहे. तरीही हा 15 टक्क्यांचा अजगर 85 टक्क्यांना विळखा घालून कसा काय बसला आहे ? इतकी वर्षे हे 85 टक्के कुठं आहेत? काय करत आहेत?
मुळात 85 टक्के वाल्यांना अजगराचा वाण नाही, पण गुण मात्र लागला आहे. तो आळशी झाला आहे. परावलंबी झाला आहे. स्वतः संघर्ष करण्यापेक्षा अजगराच्या पोटात बसून जे मिळते, त्याचीच त्याला सवय झाली आहे. तेच त्याला गोड वाटायला लागलं आहे. त्याचा स्वतःचा असा काही मेन्यूच शिल्लक राहिला नाही. अजगराच्या तोंडातून आलेला उष्टा झाडपाला खाऊन ही बकरी जगते आहे.. तोच तिचा धर्म आहे ! अजगराचं पोट हाच तिचा देश आहे !

- Advertisement -

बकरीची कमजोरी, बकरीची लाचारी, अजगरानं पूर्णपणे ओळखली आहे. म्हणून मग अजगर संस्था काढतो, शाळा काढतो, बँका काढतो आणि बकरीच्या पिलांना त्यात नोकरी देतो. अजगर आपल्या शाखा काढतो. बकरीच्या पिलांना शाखेवर घेवून जातो. ‘अजगराच्या पोटासारखा सुरक्षित देश दुसरा नाही’ याची बौद्धिकं पिलांना देतो. त्यांचा मेंदू काढून घेतो. छानशी बायको, पोरं, सुरक्षित नोकरी आणि अजगराच्या पोटातल्या सुरक्षित देशाचं नागरिकत्व, असं झकास पॅकेज त्याच्या पुढं ठेवतो ! बकरीच्या पिलांनाही भुरळ पडते. पिलाच्या आईबाबांना सारंच कसं हिरवं हिरवं दिसते आणि फसवं पॅकेज लक्षात न आल्यामुळे पिलासोबत अख्खं कुटूंब अजगराच्या पोटात स्वखुशीनं सामील होते ! पोटालाच आपला देश आणि त्या देशाला विरोध न करणं, हीच खरी देशभक्ती मानायला लागते. एकाचं बघून बाजुची कुटुंबही अजगराच्या धर्माला आपला धर्म मानायला लागतात. अजगराचा पक्ष हाच त्यांचा पक्ष होतो. अजगर जिवंत बकरीला गिळून टाकतो, हे माहीत असूनही आपण त्यांच्या पक्षात असल्यामुळे आपल्याला धोका नाही, असं समजून बरेच बोकड आणखीच निर्धास्त होतात. तडजोड करतात. हळूहळू इतर दुबळ्या, गरीब बकर्‍यांचं हे अर्धवट शहाणे बोकड नेतृत्व करायला लागतात. त्यांना मूर्ख बनवून मग कळपचे कळप अजगरांच्या पोटात ढकलून देतात. आणि आपल्या ह्या मूर्खपणाचा बोकडांना अभिमानसुद्धा असतो !

काहीही असलं, तरी बकरीच्या मुक्तीच्या दोनच अटी आहेत, एकतर अजगर मेला पाहिजे, किंवा शहाण्या लोकांनी त्याचं पोट तरी फाडलं पाहिजे ! तरच बकरी स्वतंत्र होऊ शकेल ! फसलेली बकरी कुणीतरी बाहेर काढलीच पाहिजे ! अजगर स्वतःहून काही आपले धंदे सोडायला तयार नाही. तो ऐकणारही नाही ! हजारो वर्षांची विकृती.. हीच त्याची संस्कृती झाली आहे! ‘बकरीनं मेलंच पाहिजे’ हीच त्याच्या धर्माची शिकवण आहे ! तीच त्याची धारणा आहे, धर्म आहे, निष्ठा आहे ! तेव्हा आता, बकरीलाच काय तो निर्णय घ्यायचा आहे.

आपण तिला मदत करूया का..? एकदा ठाम निर्धार तर करू या.. आणि बघा.. नंतर पुढं काय होते ! तूर्तास निदान एवढं तर करून बघा..

आधी
आपली खरकटलेली मनं
विसळून घ्या
नंतर..
‘शिवाजी’मधे ‘तुकाराम’
मिसळून घ्या !
आणि बघा..
नंतर पुढं काय होते !

आणखी थोडे पुढे जा
‘गांधीं’चा चष्मा घ्या..
‘भीमा’चं पुस्तक घ्या..
आणि बघा..
नंतर पुढं काय होते !

गळफास घेणार्‍या शेतामध्ये
विस्कटलेल्या वस्त्यांवर..
आलिशान मॉलमधे
पॉश सिनेमा हॉलमध्ये
किंवा सिमेंटच्या रस्त्यावर
गांधी कधी असतो का..
भीमराव चुकून दिसतो का ?

शेवटी..
एवढंच करा..
शहरातल्या रस्त्यावरच सिमेंट
आपापल्या मुठीमध्ये भरा
खेड्यांना शहराशी..
शहरांना खेड्याशी..
जोडता येईल असा रस्ता तयार करा..!
आणि बघा..
नंतर काय होते !

नीट बघा..
दाही दिशा
प्रसन्न होऊन हसतात का..?
किंवा..
नव्या क्रांतीची पावलं
तुमच्या दिशेनं येताना दिसतात का ?

–ज्ञानेश वाकुडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -