घरफिचर्ससारांशएक चुटकी सिंदूर की किमत.....

एक चुटकी सिंदूर की किमत…..

Subscribe

तू आधी कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारतमाता विधवा नाही, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्याने सध्या सोशल मीडियावर या विषयावरून जोरदार रणकंदन सुरू झालंय. महिलावर्गाचा संताप अनावर झाला असून त्यात आता राज्य महिला आयोगाने एन्ट्री केल्याने हे विधान भिडे यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. यावरून ‘ओम शांति ओम’ सिनेमातील अभिनेत्री दिपिका पदुकोणचा ‘एक चुटकी सिंदूर की कीमत’ हा डायलॉग सध्या महिलांमध्ये चांगलाच ट्रेंड झालाय.

कधी पोशाखावरून तर कधी कुंकू, टिकली लावण्यावरून महिलांचे चारित्र्य आणि कर्तृत्व ठरवणार्‍या मानसिकतेचा सर्वच स्तरावरून धिक्कार करण्यात येत आहे. यात महिला नेत्याही पुढे सरसावल्या असून भिडे यांचा समाचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दोन गटही पडले आहेत. त्यापैकी एक गट भिडे यांनी हिंदू संस्कृतीला धरूनच हे विधान केल्याचा दावा करत आहे. तर दुसरा गट भिडे आणि त्यांच्यासारख्या बुरसटलेल्या जुनाट विचारधारांवर चालणार्‍यांवर तुटून पडले आहेत. यातून नक्की काय साध्य होणार? तर फार काही नाही. कारण देशात लोकशाही आहे. यामुळे भिडे असोत किंवा दुसरं कोणीही ज्याला जे बोलायचंय ते तो बोलतच राहणार.

ज्यांना टिकली कुंकू लावायचं नाही त्या नाहीच लावणार आणि ज्यांना ते हिंदू संस्कृतीप्रमाणे सौभाग्यांचं लेणं वाटतं त्या कुंकू टिकल्या गौरवाने कपाळावर लावणार. मात्र यादरम्यान, जर महिला वर्गाचा रोष पाहता जर भिडेंनी जाहीर माफी मागितली तर हे प्रकरण मागच्या पानावरून पुढे तसं पुन्हा एकदा थंड पडणार. फार तर यापुढे महिलांवर टिप्पणी करताना प्रत्येक व्यक्ती सावध राहणार. पण खरंच प्रसंगापुरते कुंकू, टिकलीला विरोध करून आपल्याला आपल्याच धर्मातील रुढी, परंपरांना छेद देता येतो का? की फक्त हा संतापाचा बुडबुडा नेहमीप्रमाणेच तेवढ्याच प्रसंगापुरता उकळत नंतर आपसूकच थंड होणार? आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या हेच होत राहणार ?

- Advertisement -

कारण जर खरंच या विचारांमध्ये बदल करायचा असेल तर तो नेहमी कसा धगधगत राहील हे पहायला हवं. कुठलाही बदल जर खर्‍या अर्थाने हवा असेल तर तो मूळापासून व्हायला हवा. त्यासाठी त्या त्या समाजाची मानसिकता बदलायला हवी. त्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. ती प्रसंगानुरुप नको किंवा भिडेंसारख्या कोणी वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हाच ती उफाळून येता कामा नये. पण खरं तर तसं होत नाही. कारण सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर कपाळावर टिकली किंवा कुंकू नसलेली मोकळ्या कपाळाच्या आईला, बायकोला, मुलीला बघून आजही अनेकांच डोकं फिरतं. ते अपशकुनी मानलं जातं.

पण हेच महाभाग असे मुद्दे ज्यावेळी सोशल मीडियावर चघळले जातात त्यात चवीने भाग घेत आपण किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दर्शवण्यासाठी कुंकू टिकली हा फारच टिपिकल प्रकार असल्याचे सांगतात. त्याला आपलाही विरोध असल्याचे बोंबलत फिरत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळतं. गंमत म्हणजे यात महिलांची संख्याही अधिक आहे. ही दुटप्पी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महिलांच्या कुंकू, मंगळसूत्र, टिकली, पोशाखावरचे सगळे वाद हे फक्त सिझनल आहेत असे बोलण्यास हरकत नाही. सोशल मीडियावर भिडे यांच्या विधानाचे समर्थन करणार्‍यांचा आकडा पाहून हे नक्कीच लक्षात येईल.

- Advertisement -

आज टिकल्या कुंकू मंगळसूत्र घालून तर कधी काढून सर्वच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यात अशी काही कार्यक्षेत्र आहेत जिथे महिलेच्या कुंकू टिकलीपेक्षा तिच्या कर्तृत्वाला अधिक महत्व आहे. कुंकू टिकली कपाळावर लावून किंवा न लावताही महिला पत्नी, सून, मुलगी, आई, बहीण यासारखी कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहेत आणि आपले करियरही सांभाळत आहेत. आज सैन्य दलात, नौदलात आणि तत्सम क्षेत्रात काम करणार्‍या महिला कुंकू, टिकली, बांगड्या मंगळसूत्र घालू शकत नाहीत. कारण तो त्यांच्या प्रोटोकॉलचा भाग आहे. नियम आहे. ते त्यांना पाळावेच लागतात. मग याचा अर्थ त्या विधवा किंवा परित्यकत्ता आहेत असा काढायचा का? की त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आदर नाही असा प्रश्न भिडे यांच्या विधानामुळे उभा राहिला आहे.

शेवटी जगातील कुठलाही धर्म असो प्रत्येक धर्माने महिलांसाठी काही वेगळे नियम रुढी परंपरा आखून ठेवलेल्या आहेत. त्या पिढ्यानपिढ्या सुरूही आहेत. त्यांच्या बर्‍या वाईट अशा दोन बाजूही आहेतच. याला आपण अपवाद होऊ शकत नाही. पण त्या मानायच्या की नाहीत, त्या फॉलो करायच्या की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या धर्माने तेवढे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच दिलेले आहे. यामुळे कितीही हायफाय राहणीमान असो लग्नात, धार्मिक विधीवेळी मात्र प्रत्येकीच्या कपाळावर छोटी मोठी बिंदी, टीकली दिसतेच. हिंदू संस्कृतीत पतीच्या नावानेच कुंकू लावले जाते. आजची पिढी मात्र ती सोयीनुसार फॅशन सिम्बॉल म्हणून वापरते.

ट्रॅडीशनल लूकवर शोभून दिसणार्‍या साजाचाच टिकली, कुंकू हा भाग झाला आहे. काळानुरुप झालेला हा बदल आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की परंपरेचा र्‍हास झालाय. फक्त त्यावर धर्माची छाप कोणाला नकोय. धर्मात सांगितलंय म्हणून तसे करणे म्हणजे रुढीच्या जोखडात जगणे. हेच कोणाला नकोय. त्यापेक्षा आम्हाला इच्छेनुसार जगू देणं. आजच्या पिढीला हवं आहे. तुम्ही सांगितलं म्हणून मी टिकली कुंकू लावणार नाही तर जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लावणार, असा स्वतंत्र विचारांचा पगडा आजच्या पिढीवर आहे. यामुळे या पिढीच्या काळानुरुप बदलत जाणार्‍या विचारांचाही आदर करायला हवा. त्यासाठी त्यांची अवहेलना करता कामा नये. हे भिडेंसारख्या साचेबद्ध विचारांच्या मानसिकतेला कधी कळणार हे देवालाच माहीत.

तसेच दुसर्‍या बाजूला बायकांनी प्रत्येकवेळी का म्हणून भिडेंसारख्या व्यक्तींच्या वादग्रस्त विधानांना महत्व द्यायला हवं? त्याने साध्य तर काहीच होत नाही. जो काही रोष आवळला जातो तो तेवढ्यापुरताच असतो. मग उगाच त्याला नको तेवढे महत्व देऊन मोठे करायची काय गरज. रुढी परंपरा आणि व्यक्तीस्वातंत्र्य वेगळे. यातील फरक काळानुसार जी व्यक्ती किंवा समाज स्वीकारतो तो पुढे जातो. पण ज्या समाजात अभिव्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा रुढी आणि परंपरा लादण्याचाच प्रयत्न केला जातो. तेथे बंडखोरीचा जन्म होतो. आज कुंकू टिकलीवरून महिलांचा जो उद्रेक झाला आहे, हे त्याचेच प्रतीक आहे. त्यावर वेळीच विचार व्हायला हवा नाहीतर तालिबान विरोधात जसे अफगाणी महिलांना रस्त्यावर उतरावे लागले तसेच काहीसे चित्र भारतात दिसायला वेळ लागणार नाही.

मागील लेख
पुढील लेख
Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -