घरफिचर्ससारांशश्रीपाद काळेंच्या वाड्यात

श्रीपाद काळेंच्या वाड्यात

Subscribe

वीस वर्षापूर्वी वाचलेल्या त्या कथा अशा अचानक आठवायचे कारण ‘कोकणीमाती’ ही माझी कादंबरी प्रकाशित झाली आणि मी ती कादंबरी मधुभाई कर्णिकांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेव्हा पुन्हा श्रीपाद काळेंचा विषय निघाला, त्यानंतर मी गावी गेलो, ते गणपतीचे दिवस होते. मी वाड्याला जायचे ठरवले, पण वाड्याला जाऊन भेटणार कुणाला? , श्रीपाद काळे तर हे जग केव्हाच सोडून गेलेले ....पण या लेखकाची भूमी, त्याची लेखनस्फूर्ती, त्याच्या लेखनाची पात्रे, ती स्थळे यांचा निदान शोध घेता येईल या उद्देशाने एका सकाळी मी वाड्याला जायला निघालो.

1995 चा एप्रिल महिना, त्यावर्षी दहावीची परीक्षा संपून लवकर गावी गेलो होतो. सकाळची वेळ काही कामात निघून जाई, पण दुपारी बाहेर रणरणत्या उन्हात बाहेर जावे कसे?. शेवटी त्यावर पर्याय म्हणून आतल्या खोलीतून माझ्या चुलत्यांनी आजोबांच्या वेळचे ग्रंथ बाहेर काढले, त्या पेटीत अनेक लहान मोठे ग्रंथ होते, त्याच बरोबर जुन्या मासिकांचे, साप्ताहिकांचे अंक होते. मी ते अंक चाळू लागलो, त्यात मुंबईच्या आलमगीर साप्ताहिकाचे अनेक अंक होते. मी अंक वाचू लागलो, त्यात एकाच लेखकाच्या कथांची मालिका होती. कथालेखकाचे नाव ओळखीचे नव्हते. पण कथा उत्तम होत्या. वाचत गेलो आणि कथा आणि कथालेखक आवडला. अगदी मनापासून, लेखकाचे नाव होते-श्रीपाद काळे, त्या नावापुढे दोन अक्षरे होती – वाडा, देवगड.

अरे, आपल्या गावच्या जवळ एक लेखक राहतो, हे त्याकाळी माझ्या गावी देखील नव्हतं. वीस वर्षापूर्वी वाचलेल्या त्या कथा अशा अचानक आठवायचे कारण ‘कोकणीमाती’ ही माझी कादंबरी प्रकाशित झाली आणि मी ती कादंबरी मधुभाई कर्णिकांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेव्हा पुन्हा श्रीपाद काळेंचा विषय निघाला, त्यानंतर मी गावी गेलो, ते गणपतीचे दिवस होते. मी वाड्याला जायचे ठरवले, पण वाड्याला जाऊन भेटणार कुणाला? , श्रीपाद काळे तर हे जग केव्हाच सोडून गेलेले ….पण या लेखकाची भूमी, त्याची लेखनस्फूर्ती, त्याच्या लेखनाची पात्रे, ती स्थळे यांचा निदान शोध घेता येईल या उद्देशाने एका सकाळी मी वाड्याला जायला निघालो.

- Advertisement -

मध्यंतरीच्या काळात श्रीपाद काळेंच्या वाचलेल्या कथा आणि कादंबरीची उजळणी करू लागलो. जवळपास बाराशे कथा आणि बावन्न कादंबर्‍या लिहिण्यासाठी कथानक ह्या लहान गावात त्यांना कसं मिळालं असेल? त्यांच्या कथा जरी कौटुंबिक स्वरूपाच्या होत्या तरी त्या एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करून भावनिक गुंतागुंत निर्माण करून त्याची उकल करणार्‍या होत्या हे मात्र तितकेच खरे. संसारात रमणार्‍या सोशिक स्त्रिया, आपली मर्यादा सांभाळून निगुतीने संसार करणार्‍या, त्यातच कुठला तरी अनैतिक प्रसंग तो ही कथानकाचा भाग म्हणून तेवढ्यापुरता रंगवणारे श्रीपाद काळे प्रत्येक कथेत एक वेगळा आशावाद साहित्यातून देत राहिले.

‘समर्पण’ किंवा ‘संचित’ या सारख्या कादंबर्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मिळाल्या, त्याकाळी त्या आघाश्यासारख्या वाचून काढल्या होत्या. त्यातील कथाबीजे इथलीच, ह्या मातीतलीच. ‘रानपाणी’सारखी कादंबरी वाचून तर खुद्द गोनीदा वाड्याला ह्या लेखकाला भेटायला आलेले. प्रवासात हे सगळं आठवत असताना, देवगड ओलांडून मी पडेल कॅन्टीनकडे गाडी वळवून वाड्याला सीमेला आलो. गावच्या बाहेरच गावचं वाचनालय. एखाद्या गावात वाचनालय असणं ही खरी त्या गावच्या समृद्धतेची ओळख. ती श्रीपाद काळेंच्या घराची चौकशी केली, त्यावर गाववाल्यांनी दाखवलेल्या ठिकाणी गाडी उभी करून मी विमलेश्वर मंदिराच्या बाजूने घाटी चढून पाणंदीत गेलो. आजूबाजूला कौलारू घरे, नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे पायाखाली चिकट झालेली माती, आजूबाजूला गणपतीचे दिवस असल्याने येणारे टाळ मृदुंगाचे आवाज, ते ताल आता माझ्या लयीत मिसळले होते.

- Advertisement -

त्या पाणंदीतून एका घराकडे जाणार्‍या वळणाकडे वळलो आणि काळेंच्या घराच्या खळ्यात येऊन उभा राहिलो. मी कोण आहे का घरात, असं विचारणार तेवढ्यात सत्तरीतली एक स्त्री उंबर्‍यात आली. आणि माझी चौकशी केली. मी कोण आणि येण्याचे प्रयोजन सांगताच. त्यांनी आनंदाने मला घरात घेतलं. त्यांनी अंगुलीनिर्देश केल्याप्रमाणे मी खुर्चीत बसलो, त्या आत गेल्या, येताना पाण्याचा तांब्या आणि वाटीत गूळ घेऊन बाहेर आल्या. मी तो गुळाचा खडा तोंडात टाकला आणि पाणी पिऊन, त्या घराच्या भिंती बघू लागलो. बहुतेक भिंतीवर काळेंच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठांची चित्रे फ्रेम करून लावलेली. मी ते सर्व बघत असताना आतल्या खोलीतून एक सोवळं नेसलेली व्यक्ती बाहेर आली नी मी वामन काळे, श्रीपाद काळेंचा लहान भाऊ. वामन काळे स्वतः ललितलेखक.

आमचा गप्पांचा फड रंगला. त्या गप्पांमधून कळलं की, श्रीपाद काळेंनी लौकार्थाने शालेय शिक्षण घेतले नाही, पण ते वेदशास्त्रसंपन्न होते. त्यांच्या घरात वेदपाठशाळा होती. त्या वेदपाठशाळेत त्यांनी अनेक विद्यार्थांना मोफत शिक्षण दिले. हे करत असताना अनेक कौटुंबिक अडचणी समोर होत्या. त्यांच्या मागचा भाऊ अचानक हे जग सोडून गेला. एक भाऊ घर सोडून गेला. त्यात वडिलांना देवाज्ञा झाली पण काळेंच्या हातातली लेखणी चालू होती.

त्या वाड्याच्या घरात अनेक साहित्यिकांची धूळभेट झाली. मधु मंगेश कर्णिक तर त्यांच्या सुरुवातीच्या काळात विजयदुर्गाला नोकरीला असताना वरचेवर वाड्याला येत. या पंचक्रोशीचे उपाध्यय पद श्रीपाद काळे यांच्याकडे होते. यजमानाच्या घराच्या कार्यासाठी समिधा गोळा करण्यासाठी फिरताना किंवा त्यांच्या घरचे कार्य करत असताना त्यांनी जो समाज पहिला तोच त्यांनी आपल्या कथा कादंबरीत मांडला. साहित्याव्यतिरिक्त काळे गावच्या समाजकारणात सक्रीय होते. आमच्या गप्पा रंगल्या तेव्हा मघाशी ज्यांनी मला घरात बोलावलं त्या स्त्री फराळाचे ताट घेऊन बाहेर आल्या. वामन काळेंनी त्यांची ओळख ह्या आमच्या वाहिनी अशी करून दिली.

श्रीपाद काळेंच्या लेखणीच्या मागे त्यांच्या पत्नीचा म्हणजे इंदिराबाईचा मोठा हात होता. अतिथीसत्कारात त्यांनी कधीही आपला हात आखडता घेतला नाही. वहिनींनी जेवून जाण्याचा आग्रह केला, पण मला त्यादिवशी मुंबईला परत यायचे होते. मी जेवायला नाही थांबलो. मला लेखकाची संवेदना नक्की कशात आहे, त्याच्या लेखणाची मुळी कशात दडली आहे हे चाचपून बघायचे होते. एखादे कथानक सुचायला नाकी नऊ येतात, आठवड्याचे सदर लिहिताना दमछाक होते, इथे तर बाराशे कथा काळेंनी साहित्यात आणल्या. मला निघण्याची घाई होती तरी वामन काळे मला विमलेश्वराच्या देवळात घेऊन गेले, मी दर्शन घेऊन गाडीत बसलो, पुन्हा देवगडच्या दिशेने जाताना वाड्याची लायब्ररी दिसली, गाडी थांबवली नी खाली उतरून लायब्ररीपर्यंत गेलो.

ह्या लायब्ररीत श्रीपाद काळे या सरस्वतीच्या पुत्राने आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. मी लायब्ररी बघितली, आतली पुस्तके चाळली. लहानपणी आजी गोष्ट सांगायची. गोकुळात श्रीकृष्ण नांदत होता तेव्हा त्याला भेटायला आलेला अक्रूर कृष्ण ज्या वाटेने गुरं घेऊन जायचा त्या वाटेला हात जोडून वंदन करायचा. आज काळे हयात नव्हते, पण वाड्यातल्या लोकांनी श्रीपाद काळे या लेखकाची ही स्मृती जिवंत ठेवली आहे. मी निघताना ह्या लायब्ररीच्या उंबर्‍याला लवून नमस्कार केला आणि निघालो. सरस्वतीपुत्राला अभिवादन अजून कसे करावे ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -