-पुष्पा गोटखिंडीकर
तवांगचं सौंदर्य पहात पहात आम्ही पुढे नुरानांगपाशी आलो. येथे सहा हजार फूट उंचीवरून पडणारा मनोहर धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. आपण वरून खाली धबधब्याच्या तळापर्यंत एका अरुंद, ओबडधोबड वाटेने जाऊ शकतो. मध्येच दगडगोटे, मध्येच पायर्या, मध्येच थोडसं घसरड. पण हे सगळं आपल्याला स्वत:चा तोल सावरत सावरत खालपर्यंत जाता येतं आणि आता खालून वर असा हा उसळता धबधबा पाहताना आपण मोहित होऊन जातो. सकाळी अकराची वेळ असल्याने आणि सूर्यप्रकाश बर्यापैकी असल्याने धबधब्यावरती इंद्रधनुष्याची कमान अधिकच खुलून दिसत होती. परमेश्वराने ही सप्तरंगांची केलेली उधळण कॅमेरामध्ये टिपून घेऊन आम्ही आता सेला बोगद्याजवळ आलो.
हा सेला बोगदा तेरा हजार फूट उंचीवर बी.आर.ओने बांधला आहे. ३००० मीटरचा हा बोगदा रस्ता असून जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगदा आहे. मार्च २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन झाले. या बोगद्यामुळे भारताची संरक्षण सिद्धता वाढली आहे. या प्रकल्पामुळे येथील प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान तर केलाच, पण देशासाठी सामरिकदृष्ठ्याही याचे महत्त्व अधोरेखित होते. हा रस्ता बारा महिने चालू असल्याने लढाई झाल्यास चीनशी चांगल्या प्रकारे सामना करता येईल तसेच चीनची घुसखोरीही थांबवता येईल हे निश्चित.
आमचा गाईड रणजित डेका हा आसामचा रहिवासी असल्याने त्याला तेथील अंतर्गत भागांची चांगली माहिती होती. तवांग ते दिरांग या रस्त्यावरील सांगती व्हॅली भागातील ठेंगबांग हे हेरिटेज व्हिलेज त्याने आम्हाला दाखवले. तेथे आम्हाला जुनी पारंपरिक केवळ दगड मातीत बांधलेली घरे पहावयास मिळाली. तेथील लोकसंस्कृती आम्हाला जवळून पाहता आली आणि तेथील लोकांशी संवाद साधता आला. तेथील एका घरात आम्ही त्या घरच्या बाईच्या मदतीने स्वयंपाक केला. एस्कोस नावाची वेगळीच रुचकर भाजी तसेच पर्सिमस नावाचे तेथील प्रसिद्ध फळ खाण्याचा आनंद मिळाला. एक दिवस तांदळाच्या पिठापासून केलेला भाले नावाचा एक वेगळाच छान पदार्थ आमच्या नाष्ठ्यामध्ये होता.
दिरांगमधील सुंदर बुद्ध मॉनेस्ट्री पाहून आम्ही आता काझीरंगाला आलो. काझीरंगाचे अभयारण्य ४३० किलोमीटर परिसरात पसरलेले असून तेथे घेतलेल्या जंगल सफारीत अनेक प्राणी, दुर्मिळ पक्षी आणि एकशिंगी गेंडे अगदी जवळून पाहता आले. संध्याकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमात असामी लोकनृत्यांचे वेगवेगळे नृत्यप्रकार पहावयास मिळाले. त्या कार्यक्रमात आमचा प्रमुख अतिथी म्हणून सत्कार करण्यात आल्याने आम्ही सर्वजण खूप आनंदित आणि भारावून गेलो होतो.
त्यादिवशी आमच्यासाठी असामी जेवण (लोकल फूड) अरेंज केले होते. त्या जेवणात आम्हाला अननसाची सुमधुर भाजी खावयास मिळाली. काझीरंगामधील रंगीबेरंगी फुलांनी नटलेले ऑर्किड गार्डन, क्वटस गार्डन तसेच नॅशनल पार्क पाहून आपण अचंबित होऊन जातो. तेथे आपल्याला एक आगळेवेगळे फोक इन्स्ट्रुमेंट संग्रहालय पाहायला मिळते. तेथून जवळच असलेल्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांनाही भेट देऊन आम्ही आता मेघालयची राजधानी शिलाँग येथे पोहोचलो.
मेघालय म्हणजे ढगांचं घर. येथे सतत ढगांची लपाछपी चालू असते. ढग अगदी खाली येऊन पोहोचलेले असतात. सतत धुक्याचं आच्छादन असतं. मधूनच सूर्यप्रकाश दृष्टीस पडतो. भारतात सर्वात भरपूर पाऊस पडणारा हा प्रदेश म्हणून याची ख्याती. तेथील पिनीन्सुला व्हॅली पाहून अतिशय खडतर, अवघड, अरुंद रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही दावकीला आलो. येथे उमंगट नावाची नदी असून तेथे पाण्याचा तळ अधिक स्पष्टपणे दिसतो. तेथे बोटिंग करताना भोवतालच्या सृष्टी सौंदर्याचा नजराणा टिपत आपण एका झुलत्या पुलाखालून पार होऊन पुन्हा नदीकाठावर येतो. येथून काही थोड्या अंतरावरच भारत-बांगलादेशाची बॉर्डर पहावयास मिळते.
केवळ झाडांच्या मुळांपासून बनवलेला लिविंग रूट ब्रिज पाहण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. संध्याकाळची वेळ, अंधार होत आलेला आणि आता मोबाईलच्या उजेडात आम्ही तो ब्रिज पूर्ण चालून गेलो.
आशियामधील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ज्याचा नावलौकिक आहे, अशा मायनाँग व्हिलेजमध्ये आम्ही आता आलो. येथे खासी लोक राहतात. येथे प्लास्टिक पूर्ण बॅन आहे. कागदाचा कपटासुद्धा आपल्याला आढळत नाही. सारीकडे स्वच्छ, सुंदर हिरवेगार. स्वच्छता जपणं हा तिथल्या लोकांचा अंगभूत गुणच म्हणावा लागेल. लहान मुलांपासून म्हातार्यांपर्यंत सर्वजण स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. प्रत्येक कोपर्यावर बांबूची सुंदर डस्टबिन केलेली आढळते. त्यामध्ये कचरा टाकून त्यापासून ते लोक सेंद्रिय खत तयार करतात. येथे शंभर टक्के साक्षरता आहे.
मेघालयमध्ये मातृसत्ताक पद्धती असून मुलांच्या पुढे आईचे नाव लावले जाते आणि मग आईकडील संपत्ती सर्वात धाकट्या मुलीला मिळते. चेरापुंजी येथील रामकृष्ण मिशनच्या शाळेत भेट देऊन मोस्माई केव्ह (लाईम स्टोनची गुहा) पाहण्यासाठी आम्ही आलो. येथे पावसाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे खडकांची झीज होऊन ही गुहा बनली असावी.
अडीचशे मीटर त्याची लांबी असून आतमध्ये जाताना वाकून तर कधी कधी खाली बसून जावे लागते. पूर्ण अंधार, खडकातून झिरपणारे पाणी, चालताना चढउतार, वाटेत मध्ये मध्ये साचलेले पाणी. मधूनच खडक अन दगडगोटे. पण एकमेकांच्या सहकार्याने ही गुहा पाहण्याचं केलेलं धाडस मात्र आपल्याला आनंद देऊन जाते. त्यानंतर सेव्हन सिस्टर हा प्रचंड मोठा वॉटर फॉल पाहून आम्ही आता आसामची राजधानी गुवाहाटी येथे आलो.
१२२८ मध्ये अहोम नावाची जमात येथे राज्य करत होती. त्यांनी सतरा वेळा मुघलांचे हल्ले परतवून लावले. त्या अहोमवरून असाम नाव पडले किंवा इथले सर्वच असमान म्हणून असाम किंवा आमच्यासारखे कोणीच समान नाही म्हणून असाम नाव प्राप्त झाले असे सांगितले जाते. येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेऊन ब्रह्मपुत्राच्या पात्रात बोटिंगचा आनंद घेत उमा शंकर मंदिराचे दर्शन घेतले. ट्रॉलीमधून सफर करत विस्तृत ब्रह्मपुत्रा नदीचे सौंदर्य नजरेने टिपले.
अशी ही पूर्वांचलची सहल करताना येथील लोक निसर्गपूजक आणि सौंदर्याचे, स्वच्छतेचे उपासक आहेत, याची आपल्याला जाणीव होते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते…. चलो गावकी ओर हमे देश बढाना है।