घरफिचर्ससारांशकर्णधारपदाची संगीत खुर्ची !

कर्णधारपदाची संगीत खुर्ची !

Subscribe

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं आणि एका यशस्वी संघ नायकाच्या कारकीर्दीचा शेवट (कर्णधार म्हणून) दुःखद झाला. 68 पैकी 40 कसोटी विजय ही कामगिरी भूषणावह, पण दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कोहलीच्या विराट यशाला चार चाँद लागले नाहीत, तरीदेखील त्याचं कौतुक करावंच लागेल. त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर होता, त्या संघाला त्याने अव्वल स्थानावर नेलं हीच त्याची मोठी कामगिरी. त्याच्यानंतर येणार्‍या कर्णधाराला हा वारसा पुढे चालवणं सोपं काम नाही. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत असे इच्छुक आहेत. आता कर्णधारपदाच्या या संगीत खुर्चीच्या खेळात कुणाला कर्णदारपदाच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळतो, याची सार्‍यांना उत्सुकता आहे.

भारतात दोन गोष्टींची चर्चा सतत होत असते आणि तीदेखील तावातावाने. भारताचे पंतप्रधानपद आणि दुसरे महत्वाचे पद म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असावा. सध्यादेखील विराट कोहलीनंतर भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असावा रोहित शर्मा की लोकेश राहुल की रिषभ पंत अशी चर्चा नाक्यानाक्यावर रंगतेय. कोरोनाची चर्चा मागे पडतेय. कोणीही कोरोनाची संख्या कितीने वाढली की कमी झाली याची फारशी चर्चा करत नाही. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात भारतीय संघ कसोटी मालिका जिंकणार आणि कोहली विराट यश संपादन करणार असाच जाणकारचा अंदाज होता, पण झालं सगळचं विपरीत! 2-1 अशी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली अन् मायदेशात मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली आणि विराट कोहलीने कसोटी कर्णधारपददेखील सोडण्याचा निर्णय घेतला तो बर्‍याच जणांना अनपेक्षित वाटला.

मला मात्र तसे वाटत नाही. गेल्या 3-4 महिन्यातील घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर याचा उलगडा होऊ शकेल. 16 सप्टेंबर 2021 रोजी त्याने आपण टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचं कर्णधारपददेखील सोडत असल्याची घोषणा केली. 3 नोव्हेंबरला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यानंतर वर्ल्ड टी-20 स्पर्धेत भारतीय संघ साखळीतच गारद झाला आणि वनडे संघाच्या कर्णधार पदावरून कोहलीच्या जागी रोहित शर्माची निवड चेतन शर्मा यांच्या निवड समितीने केली.

- Advertisement -

हा निर्णय कोहलीला पटला नाही. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीकडेच कर्णधारपद कायम राहिलं. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी विधान केले की, कोहलीला आपण टी -20 संघाच्या कर्णधारपदी राहण्याबाबत सांगितले होते, पण दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाताना झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने गांगुलीचं विधान बरोबर नसल्याचं सांगितलं. निवड समितीची बैठक होण्याआधी दीड तास अगोदर मला हे समजल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगून आपली बाजू मांडली. त्यात भर पडली ती चेतन शर्मा यांच्या विधानाची. आगीत तेल ओतले गेले. शर्मा यांनी गांगुलीची बाजू घेतली. यात कोहली दुखावला गेला आणि दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जातानाच अपशकून घडला.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात यश मिळवून कसोटी मालिका जिंकण्यात विराटला यश लाभलं नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एल्गरने नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देत मालिका 2-1 अशी जिंकली. 68 पैकी 40 कसोटीत विजय मिळवणार्‍या कोहलीला फायनल फ्रंटियर यशस्वीपणे पार करण्यात यश मिळविता आले नाही. यशस्वी कर्णधार हा त्याचा लौकिक डागाळला गेला आणि सलग दुसर्‍यांदा त्याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. संक्रांतीनंतर त्याने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासारख्या संघाना त्यांच्या देशात जाऊन नमविण्याचा भीमपराक्रम कोहलीने केला. त्याला रवी शास्त्रीसारख्या चाणाक्ष, धूर्त प्रशिक्षकाची साथ लाभली.

- Advertisement -

मोलाचं मार्गदर्शन मिळालं,पण दक्षिण आफ्रिका दौर्‍यात तो छाप पाडण्यात 21-22 मध्ये यशस्वी ठरला नाही. पाठीत उसन भरली अशी सबब पुढे करत कोहलीने जोहान्सबर्ग येथील दुसर्‍या कसोटीतून माघार घेतली आणि लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आले. कोहलीची उणीव भारताला प्रकर्षाने भासली ती फलंदाजी तसेच नेतृत्वातही! राहुल कमी पडला, परिणामी भारताने कसोटी गमावली आणि यजमान संघाने 1-1 अशी मालिकेत बरोबरी साधली. केप टाऊन कसोटीसाठी कोहली परतला, पण मालिकेचा नूर बदलला आणि तिसर्‍या व निर्णायक कसोटीत विजय तर दूरच राहिला आणि पराभवाला सामोरे जाण्याची आफत भारतावर ओढवली. एका यशवंत शिलेदराची अखेर पराभवाने झाली, मग त्याला कर्णधारपदाचा मूकुट काटेरी असल्याची जाणीव झाली आणि कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला.

कोहलीनंतर कोण, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अनेक पर्याय पुढे येत आहेत त्यात प्रमुख नाव येतं आहे ते मुंबईकर रोहित शर्माचे, अन तोच खरा वारसदार आहे. बहुधा त्याचीच त्या पदावर वर्णी लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत. वन डे सीरिजमध्ये रोहित शर्माने भारताचे यशस्वी नेतृत्व केलं आहे. शिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा तो नामवंत कर्णधार आहे. ही त्याची मोठी जमेची बाजू. रोहित आता आहे 34 वर्षांचा आणि फिटनेस हा त्याचा विक पॉइंट असून सार्‍यांना याबाबत माहिती आहे. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धा दरम्यान कर्णधार फीट नसल्यास आफत ओढवू शकते. रोहितला यापुढे फिटनेसबाबत खबरदारी घ्यावी लागेल.

राहुल हा कर्णधार म्हणून परिपक्व वाटत नाही आणि याची प्रचिती दुसर्‍या कसोटीत तसेच पर्ल येथील वन डे सामन्यांत आली, परंतु कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तसेच अजिंक्य रहाणेची ठिसूळ फलंदाजी त्यामुळे संघातील त्याची जागाच निश्चित नाही. रोहितच्या फिटनेसचे प्रश्नचिन्ह आहे. यामुळे अचानक अनपेक्षितपणे समस्या वाढल्या असून नूतन प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाच कसोटीचा क्षण आला आहे! राहुल द्रविड आणि लोकेश राहुल हे दोघेही कर्नाटकी पण लोकेश राहुलने रणजी ट्रॉफी स्पर्धा तसेच इतर घरगुती स्पर्धांमध्ये नेतृत्व केले नाही. अपवाद आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा. पंजाब इलेवनचे कर्णधारपद त्याने भूषवले, पण त्याची चमक दिसून आली नाही. आता भारताची नवी उमेद निर्माण केली आहे ती रिषभ पंत या दिल्लीतील युवकाने. कोहलीप्रमाणे पंतदेखील दिल्लीकरच. बुजुर्ग क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीदेखील पंतलाच पसंती दिली आहे. याचा अर्थ लागलीच पंतच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडेल, असं नाही पण त्याच्या नावाची चर्चा होणार यात वाद नाही.

पंत तरुण आहे अवघं 24 वर्षं त्याचं वय आहे आता. पूर्वीच्या तुलनेत त्याच्या यष्टी रक्षणात सफाई आली असून डावखुरेपण ही त्याची मोठी जमेची बाजू! चेंडू भिरकावून देण्यात तो पटाईत असून बेडरपणा हा त्याचा मोठा गुण आहे. वयोमानानुसार त्याच्या खेळात परिपक्वता येईल अशी अपेक्षा आहे. धोनीप्रमाणे त्याची क्रिकेट कारकीर्द प्रदीर्घ होऊ शकते. लहान वयात त्याची भारतीय संघात निवड झाली आणि चुका करत करत तो शिकतोय. केप टाऊन कसोटीतील त्याचं शतक फारच छान होतं. कठीण प्रसंगी त्याने झुंजार खेळी केली. भारताचा पराभव त्याला टाळता आला नाही, पण परदेशात 4 शतके झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक!!!

अजून काही वर्षात अनुभव मिळाल्यास त्याचा खेळ बहरेल अशी अपेक्षा आहे, अन् त्यावेळी कर्णधार पद त्याला लाभले तर त्याच्यासह भारतीय क्रिकेट संघालादेखील फायदाच होईल. पंतचे भवितव्य उज्ज्वल असून तो प्रदीर्घ काळ भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक बनेल अशी अपेक्षा आहे. जसप्रीत भुमरा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे. गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे..परदेशी विजय मिळवणार्‍या भारतीय संघाच्या यशात भुमराचा मोठा हातभार लागला आहे यात शंकाच नाही. भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाज कर्णधार फारच विरळ आहेत. वेंकट राघवन बिशन बेदी यांना हा मान मिळाला. कपिल देवदेखील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार होता, पण कपिल देव हा अष्टपैलू क्रिकेटपटू होता. निव्वळ गोलंदाज म्हणून तो संघात नव्हता.

विनू मंकड, लाला अमरनाथ, पॉली उम्रीगर यांनीदेखील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले, पण हे सारे अष्टपैलू खेळाडू होते. भुमरा हा भारताचा अव्वल गोलंदाज आहे. गुजरातकडून खेळणार्‍या जसप्रीतने आपली छाप पाडली असून त्यालादेखील आता कर्णधारपदाची स्वप्नं पडू लागली आहेत, पण रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत यांना डावलून गोलंदाज भुमराची कर्णधारपदी निवड होणे सद्य:स्थितीत अवघड दिसतंय. आगामी काळात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी मुंबईकर रोहित शर्मा याचीच निवड होईल, असे समजते. रोहित शर्मा हा भारताचा 35 वा कर्णधार होईल तसेच दहावा मुंबईकर कर्णधार म्हणून भारताला लाभेल अशी अपेक्षा आहे. नवा कर्णधार भारताला सुगीचे दिवस दाखवेल, अशी आशा आहे.

कोहलीने अचानक कर्णधारपदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे त्याचे असंख्य चाहते नाराज नक्कीच झाले आहेत, पण जेव्हा एखादा घटना अशी अचानक घडते, तेव्हा पडद्यामागे बराच काळ अनेक घडामोडी घडत असतात, त्या जेव्हा टोकाला पोहोचतात,तेव्हा पडद्यासमोर ती घटना घडल्याचे आपल्याला दिसून येते आणि धक्का बसतो. पडद्यामागे घडणार्‍या गोष्टी या नेहमीच रहस्यमय आणि गुपीत असतात, त्याचा नेमका पाड लागणे कठीण असते. त्यावरून काही काळ उलटसुलट चर्चा होत राहते. पण शो मस्ट गो ऑन या नात्याने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या कर्णधाराची निवड होईल, पण कोहलीने असा अचानक राजीनामा दिला, याची चुटपुटही त्याच्या निस्सीम चाहत्यांना लागून राहील एवढे मात्र नक्की. हे जरी खरे असले तरी सगळ्या भारतीयांना जोडणारा जर कुठला धर्म असेल तर तो क्रिकेट आहे. त्यामुळे आता कोहलीची जागा कोण घेणार आणि या संगीत खुर्चीत कोण बाजी मारणार याविषयीही क्रिकेट रसिकांना उत्सुकता लागलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -