घरफिचर्ससारांशमहाराष्ट्राचे मानबिंदू...!

महाराष्ट्राचे मानबिंदू…!

Subscribe

ज्ञानोबा आणि तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास. महाराष्ट्राचे महात्म्य या दोन नावांमध्ये आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र संस्कृतीचे हे दोन महत्त्वाचे आधारस्तंभच. या दोन महात्म्यांच्या स्मरणाशिवाय मराठी मातीचे, मराठी माणसांचे मोठेपण कळत नाही. येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर, हे महाराष्ट्राच्या मातीतच शक्य झाले ते या दोन संतांमुळे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय संस्कृतीतील मूलमंत्राला खर्‍या अर्थाने लोकाभिमुखता आणि अर्थपूर्णता लाभली ती मराठी मातीत. महाराष्ट्राची थोरवी ज्या महनीय व्यक्तिमत्त्वामुळे दिगंतात पसरली त्यात या संतांचे स्थान सर्वात शीर्षस्थानी आहे.

जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. काही क्षणिक, काही मिनिटभर, काही तासभराचे, काही वर्षांचे, तर काही अनेक वर्षे आपली सोबत करतात. यातील सर्वच व्यक्ती आपल्या आठवणीत राहतात असे नाही, पण काही असाधारण अलौकिक कर्तृत्व असणारी महात्मे कायमच स्मरणात राहतात. सर्वसाधारणपणे अनेक सामान्य माणसे विस्मरणाच्या पडद्याआड जातात. काहींना जाणीवपूर्वक विसरावे लागते, तर काही आपल्या मार्गात ठाण मांडून बसलेले असतात. कोण कुठे भेटेल आणि कुठपर्यंत आपली सोबत करेल हे सांगता येत नाही. आपल्या अखेरीच्या प्रवासातही आपल्याला माहीत नसले तरी आपल्यातीलच काही येणार असतात. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे जाणार हे कोणाला माहीत असते?

जीवनातील असे माणसांचे भेटणे आणि तुटणे आपल्या हातात नसतेच मुळी. अशी माझी माझ्यापुरती तरी ठाम समजूत आहे. कारण असे असते तर आपणास ज्यांना टाळायचे असते त्यांना टाळता आले असते; पण तसे होत नाही. त्यामुळे याबाबत तरी मी नियतीची सत्ता मान्य करतो. कारण हे सगळे तीच ठरवते. आता यावरून मला दैववादी, भाबडा, मध्यकालीन कर्मठ पुरुष वगैरे संबोधन दिले जाऊ शकते. याबाबत याचा कोणताही प्रतिवाद मी करणार नाही, मात्र तसे कोणी ठरवू नये एवढेच. मला समजू लागल्यापासून अनेक माणसे मी पाहिली असतील.

- Advertisement -

काही माझ्यावर प्रभाव टाकून गेली. काही अद्दल घडवून, काही माणसे नवे काही शिकवून गेली, तर काही शिक्षा देऊन. जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा अनेक माणसांचे हात सुटलेले असतात. काही माणसे काळाच्या उदरात कधीच गडप झालेली असतात, पण त्यांच्या आठवणींचा गंध मागे उरतोच. आता माणसे भेटत नाहीत. भेटणारी माणसे माणसे असतात; पण त्यांच्यात माणुसकी नसते. अशा वेळी माणुसकीच्या भावनेने काठोकाठ भरलेली माणसे मला पुन्हा आठवतात. ती प्रत्यक्ष भेटली नसली तरी ती आसपास आहेत असे वाटत राहते. तेव्हा आपसूकच हे काव्य फुलते…माणसाने माणसाशी माणसासम वागणे, पण असे वागतात का माणसे? असे मोठे प्रश्न आज भवतालाकडे पाहिल्यावर मोठे होताना दिसतात.

पण इतिहासाच्या पानात अशी माणसे होती. अशी आरस्पानी मनाची माणसे कुठे गेली असतील? मी शोधतो त्यांचे ठिकाण. मग मला ती भेटतात, त्यांच्या कार्यातून, शब्दांतून, जगण्यातून आणि स्मरणातून! मानवतेचा नंदादीप हाती घेऊन त्यांनी जीवनातील अविवेकाचा काळोख मिटवून विवेकदीप प्रज्वलित केला. अप्प दीपो भव; हा महान संदेश देऊन बुद्धाने जसा अंतरंगातील आत्मदीप प्रज्वलित केला, तसेच अनेकांनी त्याच प्रकाश वाटेवर मार्गक्रमण केले.

- Advertisement -

ही माणसे मनाने श्रीमंत होती. माणसांचे आणि मानवतेचे मोल जाणणारी होती. अशा माणसांत संतत्व होते. ही माणसे वेळेचे, श्रमाचे आणि शब्दांचे मोल जाणणारी होती. भारतभूमी ही अशा तेजस्वी रत्नांची खाण आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, छत्रपती शिवाजी महाराज अशी कितीतरी नररत्ने या मातीत जन्माला आली. या विभूतीमत्वाच्या सहवासात येथील मातीला शूरतेचा, वीरतेचा, विरक्तीचा आणि भावभक्तीचा सुगंध लाभला. या महात्म्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांचे आदर्श जीवन, त्यांचा त्याग, लोककल्याणाचे कार्य पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेच! अनेकांचे आयुष्य त्यांनी उजळले.

त्यांचे स्मरण केले तरी त्या आठवांचा सुगंध आसमंत भारून टाकतो. तसेच या थोर महात्म्यांचा वावर, त्यांचे सहज बोलणेही हितोपदेश होता. ज्ञान, भक्ती आणि प्रबोध यांचा सुगंध त्यांच्या वाणीतून, कर्णीतून आणि लेखणीतून ओसंडून वाहिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता बहरू काळीयासी आला। अशा या भावभक्तीच्या या मोगर्‍याने अवघ्या गगनाला गवसणी घालून आसमंत व्यापला. महाराष्ट्राची माती अबीर-बुक्क्याच्या रंगाने आणि विठूनामाच्या संगाने पवित्र झाली. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा। हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा। असे म्हणत या मातीचे गायन अनेक कवींनी केले. सह्याद्रीचा काळा-कभिन्न पाषाणही ज्ञानदेवांच्या ओवीने आणि तुकोबांच्या अभंगाने द्रवला.

ज्ञानोबा आणि तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास. महाराष्ट्राचे महात्म्य या दोन नावांमध्ये आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र संस्कृतीचे हे दोन महत्त्वाचे आधारस्तंभच. या दोन महात्म्यांच्या स्मरणाशिवाय मराठी मातीचे, मराठी माणसांचे मोठेपण कळत नाही. येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर, हे महाराष्ट्राच्या मातीतच शक्य झाले ते या दोन संतांमुळे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय संस्कृतीतील मूलमंत्राला खर्‍या अर्थाने लोकाभिमुखता आणि अर्थपूर्णता लाभली ती मराठी मातीत. महाराष्ट्राची थोरवी ज्या महनीय व्यक्तिमत्वामुळे दिगंतात पसरली त्यात या संतांचे स्थान सर्वात शीर्षस्थानी आहे. ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत मराठी माणूस नेहमीच निश्चिंत होतो. मराठी मातीत नाममहिमा, नामभक्ती रुजवली ती वारकरी पंथाने. तोच मंत्र घेऊन आजही मराठी माणूस मराठी संतांच्या पावलावर पाऊल टाकत ते सुखी संसाराची गाठ सोडून पंढरीची वाट चालू लागतात. ही शिकवण दिली नसती तर आजही महाराष्ट्र तेराव्या शतकाप्रमाणे कर्मकांडात अखंड बुडाला असता. धर्म मार्तंडांच्या आपमतलबी धार्मिक शोषणाच्या मगरमिठीतून महाराष्ट्राच्या सामान्य माणसांची सुटका करून या महात्म्यांनी त्यांना सुलभ भक्तीच्या सुबक वळणावर आणले.

नंतर नामदेव, संत एकनाथ ते तुकोबांपर्यंतच्या संतांनी हा सुलभ भक्तीचा मार्ग अधिकच प्रशस्त आणि प्रसन्न केला. त्याला भक्तीबरोबरच सामजिक प्रबोधनाचे अधिष्ठानही दिले. हे संत त्यांच्या कार्यातून, त्यांच्या शब्दांतून असे भेटत आले. अशी काळजावर कोरली जाणारी भेट अमिट असते. दर आषाढीला या संतांचे माझ्या मनातील स्मरणाचे चांदणे अधिकच गडद होत जाते. तेव्हा ज्ञानोबांची ओवी आणि तुकोबांचे अभंग मनात फेर धरू लागतात आणि अलगदच ओठावर तरळून जाते, भेटी लागे जीवा। लागलीसे आस। ही आस तेव्हा मला एकट्यालाच लागलेली असते का? तमाम महाराष्ट्राच्या मातीचीच ही भूक असते, आस असते. त्या सावळ्या गोजिर्‍या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकर्‍यांच्या मनात गहिवर दाटतो. हा गहिवर म्हणजे त्यांच्या मनात उगवलेले कैवल्याचे चांदणेच। असे भक्तीचे, अध्यात्माचे चांदणे फुलवित ज्ञानोबा आणि तुकोबा माझ्या मनातील पौर्णिमा उजळून टाकतात. या महात्म्यांच्या प्रकाशमान आयुष्याने महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि भक्तीमय जीवन प्रकाशित केले ते या अर्थाने. त्यांच्या व्यक्तित्वाची, कार्याची आभा आजही त्या शीतल चांदण्याप्रमाणेच सर्वांना आल्हाददायक आनंद देणारी आहे. म्हणूनच हे कैवल्याचे चांदणे!

–डॉ. अशोक लिंबेकर 

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -