घरफिचर्ससारांशआव्वाज कुणाचा?

आव्वाज कुणाचा?

Subscribe

आतषबाजीतून फुलणारं ‘कमळ’...‘धनुष्या’तून उडणारे डबल बॉम्ब...घडाळी बॉम्बमधून वाजणारी डबल टिकटिक... रंगबिरंगी सुरसुरी पेटवणारे ‘पंजे’... रॉकेटमधून येणारा ‘रेल्वे इंजिना’चा आवाज...अन् महागडे ठरलेले छोट्या पक्षांचे फॅन्सी बार यांसह अनेक फटाक्यांचा धुमधडाका गेल्या दीड वर्षापासून ऐकू येतोय. फरक एवढाच असतो की कुणी दिवाळी साजरी करतं, तर कुणी दुसर्‍याचं ‘दिवाळं’ काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. दिवाळीच्या निमित्तानं राज्यातील वार्षिक दिवाळीचं (की दिवाळं?) हे कवित्व! अर्थात फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणेच यात रंगीबिरंगी कारंजे उडतील, पण वाजून झाल्यावर कुणी फटाक्यांसारखं फुटू नये ही अपेक्षा. दिवाळीत अशी थोडीफार चेष्टामस्करी चालणारच राव!

-हेमंत भोसले

फुटणे म्हणजे केवळ फटाके फुटणे असा संदर्भ यापूर्वी लावला जायचा, पण आता फुटणे म्हणजे ‘अख्खा पक्ष फुटणे’ असं समीकरण सर्वसामान्य झालं आहे. त्यामुळे फुटाफुटीची दिवाळी आता राजकारणात रोजच अनुभवायला येत आहे. या दिवाळीच्या गदारोळात सर्वसामान्यांचा आवाज लवंगी फटाक्यांसारखा दबला जात असला तरी राजकीय मंडळींचा आवाज मात्र दणकेबाजच असतो. म्हणूनच आजकाल आव्वाज कुणाचा? असा नारा जेव्हा सभांमध्ये दिला जातो तेव्हा आपसूकच शब्द पडतात ‘आव्वाज फक्त राजकीय मंडळींचा!’ या राजकीय आवाजामध्ये आणि फटाक्यांच्या आवाजामध्येही कमालीचे साधर्म्य असतं बरं का! अनेकदा पांढर्‍या शुभ्र सात्त्विक खादीच्या आतून कर्कश्श आवाज बाहेर पडतात… कधी हे आवाज दरडावणारे असतात, कधी हुंदके देणारे… कधी किरकिर करणारे, तर कधी पोकळ सहानुभूती दर्शवणारे… कधी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ पडल्यावर येतात ना अगदी तस्सेही! इथं राजकारण रंगतं ते ‘आव्वाज माझाच’ म्हणण्याचं.

- Advertisement -

अधिवेशनाच्या दिवशी तर पाडव्यासारखा धुमधडाका असतो. केवळ आवाजच नाही तर इथली मंडळीदेखील अगदी फटाक्यांसारखीच असते. ती अपेक्षित वेळेत फुटेल की नाही याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही, पण तरीही इथला प्रत्येक पुढारी वेगवेगळ्या फटाक्यांची भूमिका वठवण्यातच धन्यता मानतो. आता आमचे लाडके मुख्यमंत्री महोदयच घ्या ना! रॉकेटसारखं नशीब घेऊन आलेले. या महोदयांची दिवाळी गेल्या वर्षापासून जोरदारपणे साजरी होऊ लागलीय. एका मॅनेत दोन तलवारी राहू शकत नाहीत तसंच एका बाटलीतून दोन रॉकेटही उडू शकत नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं. यासाठी त्यांनी बाटलीत पूर्वीपासून असलेलं टायगरछाप रॉकेट काढून स्वत:ला रोवून घेतलं. ‘ठाण्यातल्या या रॉकेट’ला एकदा पेटवलं की स्वर्ग दोन बोटच उरतो.

नशिबाची मोठी साथ लाभल्यानं ते नेहमी हवेतच भरारी मारत असतं. त्या नादात जमिनीवर कोण कोण आहे हे बघायलाही ते कधी कधी विसरतात. रॉकेटचा स्वभावधर्मच आवाज न करण्याचा आहे. त्याप्रमाणे ते तंतोतंत वागतात, हे नव्याने सांगणं नको, पण ‘पॉवर’ संपल्यावर जमिनीवर यावं लागतं याचं भान त्यांना ठेवावं लागेल इतकंच. रॉकेटला बाटली आणि डोक्यात दारू ही लागतेच, पण हे रॉकेट या दोघांपासून दूर आहे की जवळ हे त्यांचे निकटवर्तीयच सांगू शकतात. हेच रॉकेट कधी कधी फॅन्सी रॉकेटही होतं. कोणतीही योजना जनतेच्या माथी मारायची असेल तर फॅन्सी रॉकेटसारखे सुंदर सुंदर कारंजे उडवायचे आणि क्षणार्धात दिवाळखोरी जाहीर करून मोकळं व्हायचं हे त्यांचं कसब. अर्थात या रॉकेटच्या गोटातील काही आमदार मात्र सध्या ‘नागगोळी’सारखे झालेत. काळा धूर आणि उग्र वास कधी सोडतील याचा नेम नाही. गोळीतून निघणारा नाग बघायला जशी गंमत वाटते, तशीच गंमत यांचे ‘कारनामे’ बघताना येते.

- Advertisement -

अर्थात या रॉकेटनं आधीच्या ‘टायगरछाप रॉकेट’ची अवस्था केविलवाण्या आपटी बारसारखी करून ठेवलीय. या आपटी बॉम्बला पूर्वी रॉकेटची प्रतिष्ठा होती, पण त्यातील आमदार-खासदाररूपी दारूगोळाच काढून घेण्यात आला. त्यामुळे या रॉकेटचा आता आपटी बार झालाय. सध्या तर कुणी जोर लावून आपटला तरच तो फुटतो. शिवाय फुटला तरी फुटल्यासारखा मोठा आवाज येत नाही. त्यामुळे कानठळ्या कुणाच्याच बसत नाहीत. परिणामी त्याची दखल कुणी घेतच नाही. त्यातच टोमणेबाज स्वभावामुळे या आपटी बारला आपटायलाही कुणी तयार होत नाही. आपटला तर पुन्हा ‘का आपटला’ म्हणून टोमणे मारतील. त्यामुळे त्यांच्या वाटेला न जाण्याचीच भूमिका इतरांनी घेतलेली दिसते. कधी कधी रॉकेट मात्र या आपट बारला एका उंचीवर नेऊन आपटतो, पण तरीही बारमधून फार आवाज येत नाही ही बाब अलहिदा.

एकीकडं एका रॉकेटनं दुसर्‍या रॉकेटचा पार आपटी बार केलेला असताना दुसरीकडं दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र भुईचक्करची भूमिका वठवताय. हे दोन्ही चक्कर दिसायला अगदी छान. पेटल्यावरही मनमोहकच दिसतात, पण युती धर्म पाळताना त्यांना भुईचक्करसारखंच धड जमिनीवरही चालता येत नाही आणि धड हवेतही. अगदी मुकं मुकं फिरावं लागतं. फक्त ‘फटाका’ म्हणून मिरवण्याचंच सुख यांच्या नशिबी. जे मिळेल त्यात समाधान मानत गिरकी मारावी लागते. दिवाळी जोरदार साजरी व्हावी असं त्यांनाही खूप वाटतंय, पण आवाज करता येत नसल्यामुळे स्वत:भोवती फिरता फिरताच त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द संपून जाईल असं दिसतंय. त्यातलं ‘नागपुरी चक्कर’ कमळासारखं गोलाकार, शांत दिसतं, पण कधी कधी शेजारच्या बाटलीच्या रॉकेटचीही वात पेटवण्यात पटाईत.

मुख्यमंत्रीपदाची माळ दुसर्‍यांदा गळ्यात पडता पडताच राहून गेल्यानं त्यांनी आता काही काळासाठी बिनवातीचा फटाका बनून जगणं पसंत केलंय, पण ‘मी पुन्हा येईन’ म्हणत त्यांचं वाती लावण्याचं काम पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. अर्थात बर्‍याचदा रॉकेटला हवेतून जमिनीवर आणण्याचीही मोलाची भूमिका हे भुईचक्करच करतं म्हणा! दुसरं भुईचक्कर सतत धगधगत असतं. ‘दादागिरी’चा दारूगोळा त्यात इतका भरलाय की कधी एकदा फुटून बाहेर येतं असं होतं, पण आधीच्या ‘नागपुरी भुईचक्कर’नं या ‘बारामतीच्या भुईचक्कर’ला न फुटण्याची जणू तंबीच दिलीय. त्यामुळे ते मुकाटपणे स्वत:भोवतीच फिरत असतं. प्रकरण अगदीच अंगाशी येण्यासारखं दिसलं की आजारपणाचं निमित्त करत एखाद्या आडोशाला निपचित फिरत बसतं. या दोघा उपमुख्यमंत्र्यांच्या लीला बघता

एक उखाणा कमालीचा व्हायरल झाला म्हणे…
भाजपाच्या फटाक्याला राष्ट्रवादीचं कव्हर…
घड्याळच आहे कमळाबाईचा लव्हर !

रॉकेट म्हणा की भुईचक्कर या सर्वांना बेजार करून सोडलंय ते टायगरछाप सुतळी बॉम्बनं. दिवाळी असो वा नसो, रोज फुटत राहणं ते आपलं कर्तव्य मानतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं ‘डॉक्टरच्या डोस’ प्रमाणं ते फुटत राहतात. महाभारतातील ‘संजय’च्या आकाशवाणीसारखी यांचीही आकाशवाणी दिवसरात्र चालूच असते. कमी आवाजाच्या आपटी बारमध्ये दारूगोळा भरून तोदेखील बॉम्ब असल्याचा समज निर्माण करण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करतात, पण आपटी बार आपल्या टोमणेबाज स्वभावातून हा समज खोडून काढतो. दिल्लीच्या राजकारणात सक्रिय न राहता महाराष्ट्राच्या मैदानातच आतषबाजी करणार्‍या या फटाक्यानं सध्या तरी सार्‍यांच्याच कानठळ्या बसवल्याय. दुसरीकडे आता त्यांना एका मोठ्या आवाजाचा लेडीज बॉम्ब येऊन मिळालाय. ‘अंधारा’तही आपल्या वक्तृत्वशैलीचा प्रकाश पाडणार्‍या या नव्या बॉम्बमुळे दिवाळीच्या आतषबाजीत जणू ‘सुषमा’ आलीय.

विरोधकांच्या या सुतळीला उत्तर देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी एक कोकणी फटाका मैदानात उतरवलाय. त्यांचंही काम खरं दिल्लीत, पण फुटतो मात्र मुंबईतच. आकारानं छोटा असलेला हा फटाका थोडासा किरकिरा आहे. भांडे घासताना जसा आवाज त्यातून येतो तसाच आवाज या फटाक्याचा आहे. फुटण्यात प्रत्येक वेळी लॉजिक असेलच असं नाही, पण दिल्लीश्वरांनी सांगितलंय म्हणून ‘नारायण नारायण’ म्हणत फुटण्याचं ‘कर्तव्य’ ते अव्याहतपणे करत असतात. कधी कधी तर फुटण्याच्या नादात मराठा आरक्षणासारख्या मुद्यावरही फुटतात. असे मुद्दे फोडताना ते स्वत:लाच काडी लावत आहेत हे त्यांना पेट घेतल्यावरच कळेल!

भुजांमध्ये बळ असलेल्या नेत्याची अवस्था सध्या फुलबाजासारखीच आहे. विरोधात राहून उगीचंच फटाके फोडत बसण्यापेक्षा सत्ताधार्‍यांचे हात हातात घेऊन फुलबाजा ओवाळण्याचीच मजा हे महोदय घेताहेत, मात्र त्यांच्याच गोटातील ‘तडतड्या’ सुरसुर्‍या या फुलबाजाला शांत बसू द्यायला तयार नाही. आरक्षणासारखे मुद्दे पुढे करत या फुलबाजाचा बाजा वाजवायला सगळेच टपलेय. इतक्या सीनियर नेत्याला ‘फुसका बार’ म्हणून सिद्ध करण्याचा विडाच काही मंडळींनी उचललाय, पण या फुलबाजाला उतारवयात पुन्हा एकदा मोठा बॉम्बरूपी नेता होण्याची संधी दिसत असल्यानं तो या गोंधळातही आता मराठ्यांना आरक्षण देण्यावरून टीकेचे कारंजे उडवत आहे, पण या कारंजाच्या ठिणग्या कधी आपल्याच अंगावर येतील हे त्याला चटका लागल्यावरच कळेल बहुदा!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते साक्षात सुतळी बॉम्ब असल्याचा आव आणतात. प्रकृतीनं सुतळी बॉम्बसारखे आहेत, पण स्वभावाच्या बाबतीत मात्र साधाळलेल्या वातीचा फटाका. पेटायला आणि फुटायला अल्पवेळ देतात. मनात आलं तर कानठळ्या बसवतात. नाहीतर वात जाळण्यातच निम्मा वेळ घालवतात. विरोधकांबरोबर सत्ताधार्‍यांमध्येही ते त्याच जल्लोषात रोज दिवाळी साजरी करतात हे विशेष. दीड वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे ‘आपटी टायगर बॉम्बचं’ नशीब फुटलं असलं तरी सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचं नशीब फुलझडीसारखं उजळून निघालं आहे.

यापूर्वी लवंगी फटाक्यांच्या माळेतला एक फटाका म्हणून त्यांची ओळख होती, पण आपटी बारजवळ फारसा दारूगोळाच शिल्लक न राहिल्यानं आहे त्या दारूगोळ्यात समाधान मानत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच लवंगी फटाक्याला आता फुलझडीची प्रतिष्ठा प्राप्त झालीय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची अवस्था डबलबारसारखी झालीय. मित्रपक्षांच्या कारस्थानांमुळे ते आत्मविश्वास हरवून बसलेत. एकदा फुटला तरी ‘फुटलो की नाही कुणास ठाऊक’ असं म्हणत दुसर्‍यांदाही ते फुटतात.

मराठवाड्या ‘चिक्की’ फटाक्याची अवस्था तर अगदी सर्दावलेल्या फटाक्यासारखी…पक्षातील व्यवस्थेनं त्यांना इतकं थंडगार करून ठेवलंय की पेटायची इच्छा असूनही पेटत नाही. कधी पेटायचं ठरवलंच तरी बर्‍याच वेळाने आवाज येतो. त्यामुळे त्या कधी फुटतात याचा थांगपत्ताही कुणाला नसतो. गडावर ‘भगवान’ म्हणत त्या दसर्‍याला फुटतात, पण त्याचा आवाज पोहोचलाच नाही, असंच ‘नागपूरकरचं भुईचक्कर’ दाखवतं. त्यामुळे फुटणं हा शब्द केवळ ‘नशीब फुटणं’ यासाठीच वापरला जातो, यावर चिक्की फटाक्याचा एव्हाना ठाम विश्वास बसला असावा. इकडे ‘संकटमोचक फटाका’ काहीसा थंड झालाय. त्यांच्या ‘कारनाम्यां’चे भुईनळे कारंजे बनून सध्या उडतानाच दिसत नाहीत. भुईचक्करही त्यांना फारसं जवळ करत नसल्याने हा फटाका सध्या एकाकी पडलेला दिसतोय.

महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघालेल्या नेत्याची अवस्था बटरफ्लाय फटाक्यासारखी असते. हे बटरफ्लाय दिसायला छोटं असलं तरी आपल्या स्वभाववैशिष्ठ्यामुळे ते महाराष्ट्रातल्या सारीपटावर ‘राज’ करतं. बड्याबड्या फटाक्यांचा आवाज हे बटरफ्लाय खाऊन टाकतं. खरंतर बटरफ्लाय फटाका फोडायला कायद्यानं बंदी आहे, पण तरीही तो विकला जातोच. तसंच काहीसं या फटाक्याचं आहे. बर्‍याचदा कायद्याने बंदी घालूनही अनेक मुद्यांवर तो फुटतोच. शिवाय फुटल्यावर इतका उग्र दर्प निर्माण करतो की इतर फटाक्यांची मती गुंग व्हावी, पण हे बटरफ्लाय कधी कधी कमळाभोवती रुंजी घालत असल्यानं ते सत्ताधार्‍यांच्या अंगणात उडतंय की विरोधकांच्या हे कळणंच कठीण होऊन जातं.

उरतो प्रश्न छोट्या पक्षांच्या नेत्यांचा. यातले काही ‘बच्चे’ फटाके सत्तेत असूनही सत्ताधार्‍यांवर ‘कडू’ धूर सोडतात. डोळ्याला आग होईल असा धूर सोडणार्‍या फटाक्यांची संख्याही मोठी आहे. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये या फॅन्सी फटाक्यांना भाव असतो. किंबहुना प्रत्येक वर्षी त्यांचा भाव वाढतच असतो. त्यांना महत्त्वाच्या पदावरून हुलकावणी मिळाल्यानंतर ‘धोकादायक फटाक्यां’मध्ये त्यांची वर्णी लागते. त्यातही सगळेच फटाके सारखे आहेत असं मुळीच नाही. त्यातील काही पेटता पेटत नाहीत. गाव पेटलं तरी हे त्यातून वाचतील, तर काही विझता विझत नाहीत. काही काडेपेटीतील रंगीत पेटणार्‍या काड्यांची भूमिका बजावतात. या काड्यांमधून येणारे रंग मनमोहक नसतात, पण तरीही ‘रंग दाखण्यात’ त्यांना स्वारस्य असतं.

सत्तेच्या सारीपाटावर लवंगी फटाक्यांचीही कमी नाही. ‘घरफोडीं’च्या घटनांमुळेे अशा लडींची अक्षरश: लांबी वाढलीय. वर्षभर यांची फटफट सुरू असते. अधिवेशनाच्या धुमधडाक्यात यांचं ‘कोरस’ देणं अव्याहतपणे सुरूच असतं. गदारोळ झाला की कारण नसताना एकमेकांवर तोंडसुख घेऊन मोकळे होतात. या कोरसमध्ये ‘टिकल्यां’चा आवाज पार दडपला जातो. सभागृहात काय बोलायचं यापेक्षा कुठली साडी नेसायची याचाच या ‘टिकल्या’ जास्त विचार करतात. त्या बोलताहेत एवढंच सार्‍यांना दिसतं, पण काय बोलतात हे कुणाला ऐकूही येत नाही.

काही आहेत मोठ्या आवाजाच्या, पण त्यांचा आवाज सोयीसोयीने वाढतो हेदेखील तितकंच खरं. याशिवाय आवाजापेक्षा कागदच अधिक उडविणारे ‘लक्ष्मी’बॉम्ब, नेहमीच थाटात राहणारे ‘ताजमहाल फटाके’… नयनमोहक वाटणार्‍या फुलझड्या, लेस, अधिकार्‍यांच्या दृष्टीने ‘महागडे’ ठरणारे फॅन्सी फटाके इथे रोजच फुटतात. या सगळ्यांमध्ये एक अनोखा फटाका आहे. ‘तेल लावलेला फटाका’ही याला म्हणता येईल. तो नक्की फुलबाजा आहे, सुतळीबॉम्ब आहे की रॉकेट हे आजवर भल्याभल्यांना समजलेलं नाही. सार्‍याच फटाक्यांचे गुण या जुन्या फटाक्यात ओतप्रोत भरलेले आहेत. सत्तेत असो, नसो त्याची ‘पॉवर’ टिकून असते. कावेबाज तर असा की फुटूनदेखील तो न फुटल्यागत वावरतो.

सध्या सत्ताधार्‍यांच्या अंगणात त्याने स्वत:चेच भुईचक्कर पेटते ठेवलेय म्हणे. या भुईचक्करमधून ‘शरदाचं चांदणं’ बरसताना नेहमीच दिसतं, पण तरीही हे भुईचक्कर आपलं नाहीच, असाच ताठा आत्मविश्वासानं मिरवला जातो. दुसरीकडे वात निघालेले, साधळलेले, न फुटलेले फटाके जमा करून त्यातील दारूगोळा एका कागदावर तो जमा करण्याचं कामही हा ‘तेल लावलेला फटाका’ करतोय. साधाळलेल्या फटाक्यांमध्ये आवाज भरण्याची, जान आणण्याची क्षमता त्याच्यातच असल्यामुळे पुढच्या दिवाळीपर्यंत तो कशी कशी आतषबाजी करतो आणि कोणाकोणाच्या कानठळ्या बसवतो हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आहे की नाही गंमत… पटलं तर हो म्हणा; नाहीतर माफ करण्याएवढे उदार आहातच तुम्ही…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -