का होतेय महाराष्ट्रावर ढगफुटी?

अलीकडे सारे ऋतुमानच बदलून गेलंय. कधी पाऊस रुसून बसतो तर कधी इतका बरसतो की माणसाला जगणेच मुश्किल करून टाकतो. ढग कशामुळे फुटत आहेत, असा प्रश्न पडतो. ज्या पावसाच्याकडे माणूस डोळे लावून बसलेली असतात, तोच पाऊस अलीकडच्या काळात मानवाजातीवर सूड उगवल्यासारखा अतोनात कोसळतो की, माणसाच्या डोळ्यातून दु:खाच्या धारा वाहू लागतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये पावसाचा ट्रेंड बदलला आहे. हे असे का होतेय हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. पावसाच्या या कोसळण्याची कारणे काय आहेत, त्याच्या या तांडवापासून जीव वाचवण्यासाठी काय उपाय करता येतील, असे अनेक प्रश्न पडत आहेत. पूर्वी कधीतरी एखाद्या ठिकाणी ढगफुटी होत असे. आता मात्र ढगफुटींचे प्रमाणही वाढले आहे. या मागची कारणे काय, ती जाणून घेऊया...

7 सप्टेंबर 2021 रोजी एका दिवसात 85 पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ज्यात सर्वाधिक 42 ढगफुटी मराठवाडा येथे त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात 30 ढगफुटी, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात दोन तर घाटमाथ्यावर एक ढगफुटीची खात्री मिलीमिटर पाऊस व ढगफुटींचा परिणाम तसेच लक्षणांवरून केली आहे. सुमारे 100 लोक मृत्युमुखी पडले. त्याआधी 22 आणि 23 जुलै 2021 या दोन दिवसात 101 पेक्षा जास्त ढगफुटींनी महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झालेत. गाय, बैल, म्हशी, शेळ्या मेंढ्या आदी हजारो लहानमोठी जनावरे तसेच लाखो कोंबड्या आदी पाण्यात वाहून गेल्यात. इमारती-घरांची पडझड, वाहने, रस्ते, पुल वाहून जाणे यामुळे जनतेचे नुकसान झालेच, परंतु राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातील लाखो एकर शेतीचे क्षेत्र अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले आहे. कापूस, तूर, मुग, मका, बाजरी, केळी, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, कांदा, फळबागा, पालेभाज्या आदींचे मोठे नुकसान झाले असल्याने कोरोनाच्या झटक्यातून सावरतानाच भारतीय अर्थव्यवस्था व महागाईचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. संकटांची ही ‘ढगफुटी’ सोसण्यासाठी धैर्याची आवश्यकता आहे.

मान्सून पॅटर्न बदलला आहे. मान्सून बरोबरच चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटींचा पॅटर्न बदलाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटींच्या ‘हिटलिस्ट’ वर आहे. भारतात वार्षिक पावसाची सरासरी 890 मिलीमिटर आहे. मात्र एका दिवसात ही सरासरी पार करीत मराठवाड्यात कन्नडसारख्या ठिकाणी अवघ्या काही तासात 1000 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस पडत ढगफुटी झाली. एक हवामान शास्त्रज्ञ म्हणून वारंवार अलर्ट व अंदाज नव्हे तर हवामानाची माहिती देऊनदेखील याबाबत आपण गंभीर नाही हीच खूप मोठी ‘आपत्ती’ आहे. येत्या काळात हवामान आणि धरण जलव्यवस्थापन यात तातडीने समन्वय साधून आपण कृषी, पशूधन, उद्योगधंदे, मालमत्ता व जीवित हानी टाळून राज्य व राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबुतीसाठी ठोस पावले उचलू शकतो.

ढगफुटी (क्लाउडबर्स्ट) आणि महापूर (फ्लॅशफ्लड)

वर्ल्ड मेटियरोलॉजीकल ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएमओ) व्याख्येनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी म्हणजे ‘क्लाउडबर्स्ट’ होय. भारत हवामान विभाग (आयएमडी)च्या वेबसाईटसह 2010 सालापर्यंत उपलब्ध असणार्‍या व्याख्येनुसार 100 मिलीमीटर प्रतीतास या दराने कोसळणार्‍या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्लाउडबर्स्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक शोधनिबंध व अहवालात आहे. डेन्मार्क, युके, यूएस, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतासह इतर अनेक देशांतील संशोधक ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबर्स्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोधनिबंधात करतात.

आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे 15 मिनिटात 25 मिलीमिटर किंवा एक इंच किंवा 30 मिनिटात 50 मिलीमिटर किंवा दोन इंच किंवा 45 मिनिटात 3 इंच किंवा 75 मिलीमिटर किंवा एक तासाच्या कालावधीत 100 मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक दराचा पाऊस म्हणजे ढगफुटी (क्लाउडबर्स्ट) होय. डब्ल्यूएमओच्या व्याख्येनुसार कमी वेळात जास्त पडणार्‍या पावसाने ढगफुटी झाल्यानंतर येणार्‍या पुराला किंवा महापुराला ‘फ्लॅशफ्लड’ असे म्हटले जाते.

अतिवृष्टी आणि ढगफुटी फरक काय?

जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार विचार केला तर महाराष्ट्रात अवघ्या दोन दिवसात 101 पेक्षा जास्त ढगफुटींचा पाऊस होत महापूर आले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या चोवीस तासाच्या कालावधीत गुरुवार 22 जुलै 2021 व शुक्रवार 23 जुलै 2021 चा कमी वेळातील जास्त जीवघेणा ठरलेला व महापूराचा पाऊस म्हणजेच या 101 पेक्षा जास्त असलेल्या सर्व ढगफुटी भारत हवामान विभाग (आयएमडी) या अधिकृत संस्थेच्या अधिकारी व शास्त्रज्ञांनी नाकारतानाचे शास्त्रीय कारण मिळणे अद्याप बाकी आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील हा जीवघेणा पाऊस म्हणजे ‘अतिवृष्टी’ किंवा ‘महावृष्टी’ आहे असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे भारत हा 23 मार्च 1950 रोजी स्थापित डब्ल्यूएमओचा सदस्य असला तरी वर्ल्ड मेटियरोलॉजीकल ऑर्गनाझेशनची ‘अतिवृष्टी’ व ‘महावृष्टी’ या शब्दांना मान्यताच नाही व हे शब्द अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 24 तासात 64 मिलीमिटरपेक्षा कमी होणारा पाऊस म्हणजे यलो अलर्ट, 64 ते 200 मिलीमिटर पाऊस म्हणजे ऑरेंज अलर्ट तर 200 मिलीमिटरच्या पुढे अगदी तीन ते चार हजार मिलीमिटर असा होणारा पाऊस म्हणजे रेड अलर्ट आहे, अशी भारत हवामानशास्त्र विभागाची जनतेला माहिती देण्याची पद्धत आहे. 24 तासात जेव्हा 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे जास्त पाऊस (हेवी), 65 ते 125 मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (व्हेरी हेवी), तर 250 मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (एक्सट्रीमली हेवी ) अशी संकल्पना भारत हवामानशास्त्र खाते वापरते. मात्र 24 तास पाऊस क्वचितच कुठे तरी होतो ही वस्तुस्थिती आहे.

इतिहासात नोंद शोधली तर लक्षात येईल की अतिवृष्टी व महावृष्टी यांचा वापर केव्हापासून व का केला गेला. 4 ऑक्टोबर 2010 ला होण्याआधी ज्या ढगफुटीची आगाऊ सूचना देत हजारो नागरिकांचे प्राण मला वाचविण्याची संधी मिळाली होती. 90 मिनिटात 182 मिलीमिटरचा पाषाण, पुणे येथील पाऊसात चार लोक मृत्युमुखी पडले होते. त्याआधी पुण्यात 24 ऑक्टोबर 1892 रोजी 149.10 मिलीमिटरची 18 वर्षे जुनी नोंद हवामान खात्याकडे आहे. ही ढगफुटी अतिकृतपणे नाकारण्यासाठी अतिवृष्टी व महावृष्टी या शब्दांचा वापर सुरू झाला जो अशास्त्रीय, संदिग्ध व जनतेत गोंधळ निर्माण करणारा आहे.

पुणे या आयटी हबच्या इतिहासात पहिल्यांदाच या ढगफुटीमुळे ‘लॉकडाउन’ अनुभवत लोकांनी रात्रभर वाहने, कार्यालये आणि ट्रॅफिक जाममुळे मिळेल त्या ठिकाणी रात्रभर आश्रय घेतला. पुणे येथील या ढगफुटीमध्ये 4 नागरिकांनी आपले प्राण गमावले, यात एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला तर तीन माणसे ढगफुटीने कोसळलेल्या भिंतीखाली सापडल्याने मरण पावली. 12 जुलै 1961 च्या पानशेत धरण फुटल्यामुळे जवळपास एक हजार नागरिकांच्या मृत्यूनंतर ढगफुटीने पूर येऊन पाण्याने मृत्यूची नोंद पुण्यात 49 वर्षांनंतर झाली होती.

आशिया खंडासाठी नोडल एजन्सी आहे भारत!

जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) ही जगातील हवामानावर देखरेख करणारी संस्था असून लोकांचे जीव वाचविणे व आर्थिक हानी कमी करणे हा तिचा उद्देश आहे. त्यासाठी ही संघटना मोठा निधी देते. आशिया खंडातील देशांत होणाक्आ ‘ढगफुटीं’ चा सहातास आगाऊ ‘अलर्ट’ देण्याची जबाबदारी ‘नोडल एजन्सी’ या नात्याने भारताकडे गेली तीन वर्षे आहे. बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांना भारत सहा तास आधी ढगफुटी म्हणजे क्लाउडबर्स्टचे अलर्ट देत आला आहे. विशेष म्हणजे भारतीय यंत्रणांवर अविश्वास दाखवून पाकिस्तान या यादीतून बाहेर पडला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या भरवशावर ‘कार्यक्षम’ आहे.

भारत हवामान विभाग (आयएमडी) ने ‘फ्लॅशफ्लड (ढगफुटी) निर्देशन यंत्रणा (एफजीएसएस) उभारल्या आहेत आणि त्या सर्व प्रभावीपणे कार्यरत आहेत, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. येत्या काळात आयएमडी केवळ इतर देशांना नव्हे तर आपल्या देशातील शेतकर्‍यांनादेखील ‘फ्लशफ्लड अलर्ट’ देईल. ढगफुटींचा पाऊस पडतो आणि महापुराने लोक वाहून जात आहेत अशावेळी भारत हवामान विभाग (आयएमडी) ‘अंदाज’ नावाने अचूक हवामान माहिती प्रशासनाला 24 बाय 7 देते आहे.

विज्ञान : ढगफुटींच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र का?

सूर्यावरील घडामोडी व पृथ्वीचे ग्लोबल इलेक्ट्रिक सर्किट (जीइसी) तसेच ग्लोबल मॅग्नेटिक सर्किट (जीएमसी) यामध्ये खळबळ माजली आहे. परिणामी नैसर्गिक संतुलन (नॅचरल बॅलन्स) प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आयोनायझेशन, विजा पडणे आणि ढगफुटींचा सध्याचा दिसणारा सिलसिला होय. सूर्याकडून येणार्‍या वैश्विक किरणांमुळे (कॉस्मिक रेज्) अवकाशापासून ते पृथ्वीच्या वातावरणात मोठी खळबळ होते आहे.आयनोस्फेरिक म्हणजे जमिनीपासून 90 किलोमीटर उंचीपासून ते 400 किलोमीटरपर्यंत असलेल्या वातावरणाच्या विद्युतभारित अणुरेणूंनी बनलेल्या प्लाझ्मा थरात मोठी ढवळाढवळ झाली आहे, जी वैज्ञानिक भाषेत आयनोस्फेरिक सिंटिलेशन म्हणून ओळखली जाते. विजांचे प्रमाण वाढले आहे जे एखाद्या सेंसरप्रमाणे दर्शविते आहे की, हार्ड व सॉफ्ट एक्स रेज (क्ष किरण) च्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अणू रेणू हे विद्युत भारीत होऊन आयनायझेशन होत वातावरणात अचानक भोवर्‍यांसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामी आर्द्रता, तापमान, हवेचा दाब यांच्यात चढ उतार होत वातावरणात अस्थिरता निर्माण होते. प्रचंड अस्थिरता आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जटिल भौतिक व रासायनिक प्रक्रियांचा परिपाक म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी होय.

ढगफुटींचे वितरण आणि डाउनड्राफ्ट

जूनपासून ऑगस्ट अखेरपर्यंत झालेल्या ढगफुटी या मुख्यत्वे क्युमुलोनिंबस ढगांमुळे झालेल्या ढगफुटी आहेत. मात्र सध्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या ढगफुटींचा अभ्यास केला तर लक्षात येते की क्युमुलोनिंबस ढगांमध्ये मान्सूनच्या निंबोस्ट्रेटस ढगांची सरमिसळ दिसून येते आहे. सायंकाळी साडे चार वाजेनंतर तापमानातील वेगवान घसरणीमुळे ‘डाऊनड्राफ्ट’ म्हणजे वरून जमिनीवर खाली येणारा हवेचा अध:झोत कारणीभूत आहे. रसायनांचा भडीमार शेतजमिनीवर केल्याने सरफेस टेंशन तसेच बाष्पीभवनाच्या दरात झालेला बदल तसेच तापमानातील अचानक झालेला बदल तसेच समुद्राकडून मोठ्या प्रमाणावर येणार्‍या बाष्पाचा एकंदर ‘मिला-जुला’ जटिल परिणाम म्हणजे महाराष्ट्रात घडणारी ढगफुटींची मालिका सुरू आहे.

धोक्याची घंटा

मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात काळात वातावरणातील अस्थिरतेत भारतात ढगफुटी होतात. कैचीधामला दुपारी तीन वाजता झालेली आणि संपूर्ण आसमंत काळ्याकुट्ट अंधार करीत दुपारी तीन वाजता सूर्याला झाकून टाकत काळोखात झालेल्या थरकाप उडविणार्‍या अवघ्या 15 मिनिटात आकाशातून समुद्र ओतणार्‍या जीवघेण्या ‘ढगफुटी’चा थेट उत्तराखंडला प्रत्यक्ष भेट देत अभ्यास करण्याची संधी एक शास्त्रज्ञ म्हणून मला या देशात मिळाली होती हे मी मोठी भाग्याची गोष्ट समजतो. उत्तराखंडातील ढगफुटींचा अभ्यास करताना अनेक नवीन शास्त्रीय गोष्टींचा उलगडा झाला तर नवीन ‘पझल्स’ सोडविण्यासाठी संशोधन सुरू आहे. ढगफुटीच्या परिणामाने फ्लॅशफ्लडने डोंगरफोड करत होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे हा मुद्दा जूना असला तरी तो येत्या काळात महाराष्ट्रात अधिक जीवघेणा व खर्चिक डोकेदुखी ठरणार आहे.

विशेष म्हणजे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्हात 7 फेब्रुवारी 2021 रोजी हिवाळ्यात आणि पाण्याच्या गोठणबिंदूच्या खाली म्हणजे उणे दोन अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात सकाळी 10.40 ही घटना घडली होती. उत्तराखंडमध्ये ढगफुटी या ऑगस्ट, सप्टेंबर अशा कालावधीत होतात. मात्र यंदा उत्तराखंड केवळ नैनितालला नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी ढगफुटी मेमध्ये झाल्या आहेत. एवढेच तर मे व जूनमध्ये नैनितालला कधीच पाऊस पडत नाही आणि साधारणतः जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात नैनितालला पाऊस होतो. लंडन मध्ये जसा साजरा होतो तसा ‘सनी डे’ नैनितालला सूर्यप्रकाश दिसला तर मे जून मध्ये साजरा होतो हे नैनितालचे वैशिष्ठ्य आहे. अशावेळी 12 मे 2021 ला नैनितालला कैचीधाममध्ये 172.8 मिलीमीटर पावसाने अनेक बळी घेतले. कैचीधाम ढगफुटी होत प्रचंड नुकसान झालेच कसे हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जो सखोल व गांभीर्याने अभ्यासने गरजेचे आहे.

उत्तराखंडची ढगफुटी हे वेगाने बदललेल्या हवामानाकडे गांभीर्याने पाहण्याची धोक्याची घंटा होय. नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा)च्या ट्रिम (ट्रॉपिकल रेनफॉल मेजरींग मिशन) उपग्रहाने तसेच द साऊथ एशियन नेटवर्क फॉर डॅमस्, रिव्हर्स एंड पीपल (एसएएनडीआरपी) या संस्थेने झालेल्या शेकडो मिलीमीटर पावसाची जुनी आकडेवारी चिंताजनक आहे हे आपण शेती, शेतकरी व राज्य तसेच भारतीय अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी गांभीर्याने घेतले पाहिजे.

28 ऑगस्टपासून मान्सूनला सुरुवात होत आहे आणि साधारणतः डिसेंबर अखेरपर्यंत आपल्याला यंदा दिवाळी दसरा आणि ख्रिसमसला पाऊस आपल्याला पाहता येऊ शकेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा ढगफुटींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

डॉप्लर रडार आणि सुपर कॉम्प्युटर :उपायांसाठी आशादायक चित्र!

रडार, सॅटेलाईट आणि हवामान केंद्रांचा जमिनीलगतचा डाटा सुपर कॉम्प्युटरवर (एचपीसी) प्रोसेस करून अत्यंत अचूकपणे सहा ते आठ तास आधी ढगफुटींचा अलर्ट जनतेला देणे शक्य आहे. महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकारकडून वार्षिक 14 हजार 500 कोटींपेक्षा जास्त आपत्ती व्यवस्थापन निधी उपलब्ध आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना 27 जुलै 2021 ला सांगितले की, केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आपत्तीपूर्वी वेगवेगळ्या बँडचे डॉप्लर रडार लावून प्रयोग केले तरी 358 तालुक्यांसाठी 14,320 कोटी फायदेशीर ठरेल. अवघ्या 40 कोटीत मिळणारे डॉप्लर रडार हे भारतातील इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाइजेशन (इस्रो) देखील बनवून जगभर विकते. स्वस्त आणि फक्त 10 वर्षे वापरता येणारे महागडे, परदेशी बनावटीचे अथवा चायना मेड डॉप्लर रडारापेक्षा स्वदेशी इस्रो डॉप्लर रडार वापरणे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही फायद्याचेच ठरेल.

ढगफुटी वेधक डॉप्लर रडार यंत्रणा

26 जुलाई 2005 च्या मुंबई ढगफुटीने 1000 पेक्षा जास्त बळी गेल्यानंतर हवामान खात्याने ढगफुटीची माहिती अचूक देण्यासाठी रडार हवे ही मागणी झाली. आज 16 वर्षानंतर देशातील 32 पैकी 4 महाराष्ट्रासाठी डॉप्लर रडार उपलब्ध आहेत. विदर्भासाठी आय.एम.डी.चे नागपूर येथील डॉप्लर रडार कार्यान्वित आहे. कोकणसाठी मुंबई येथील डॉप्लर रडार काम करते. गोवा येथील डॉप्लर रडार कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अचूक माहिती देते. आयआयटीएमचे महाबळेश्वर व सोलापूर येथील एक्स बँड व केए बँड रडार पश्चिम महाराष्ट्राला अचूक हवामान व पाऊस माहिती देते. पण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हवामान अलर्ट व माहिती पासून वंचित आहे. उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात रडारची रेंज पोहचत नाही. सह्याद्री पर्वत रांगांमुळे 500 किलो मीटर पल्ल्याचे मुंबईच्या डॉप्लर रडारने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अचूक हवामान माहिती देऊ शकत नाही. उत्तर महाराष्ट्रात चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर डोंगरावर बसविणे आवश्यक आहे.

ढगफुटींचा अलर्ट अत्यंत अचूकपणे एक्स बँड व केए बँड डॉप्लर रडार यंत्रणेचा प्रभावी वापर करत देणे शक्य आहे. डॉप्लर रडारने बोटाच्या पेरा एवढ्या लहान भागामध्ये बाष्प, बर्फ आणि पाणी म्हणजे लिक्विड वॉटर कंटेंट (एलडब्लूसी) किती आहे याची अत्यंत अचूक माहिती मिळते. ढगाच्या एकूण आकारमानानुसार गणित करून ढगफुटी, गारपीट, पाऊस किती होणार किंवा नाही ही खात्रीशीर व बिनचूक सूचना देता येते.

हवामान विश्लेषक सुपर मेंदू : सुपर कॉम्पुटर

आज ‘आदित्य’, ‘प्रत्युष’, मिहीर अशी 10 पेट्याफॉलीपर्यंत क्षमतेचे सुपर कॉम्पुटर्स केवळ हवामान खात्याच्या दिमतीला चक्क पुण्यातदेखील अहोरात्र जनसेवेसाठी कार्यरत आहेत.

एक व्यक्ती 50 कोटी वर्षे जगला तर जेवढा विचार करु शकतो तेवढा विचार एका सेकंदात करणारा 10 पेट्याफ्लॉपी म्हणजे 10,00,00,00,00,00,00,000 (एकावर सोळा शून्य) क्षमतेचा खास हवामानासाठी वाहिलेला सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) पुण्यात आहे. जगातील 10 नंबरचा अद्यावत असलेल्या या सुपर कॉम्प्युटरची क्षमता आता पाच पट वाढविली जात आहे. एक व्यक्ती 2 अब्ज 50 कोटी वर्षे जगला तर जेव्हढा विचार करेल तेवढा विचार एका सेकंदात प्रोसेस करत निर्णायक रिझल्ट देणारा सुपर कॉम्पुटर यावर्षाअखेर बहुतेक पुण्यात उपलब्ध असेल. सॅटेलाईटचे व हजारो हवामान केंद्रांचे नेटवर्कबरोबरच देशातील 32 डॉप्लर रडारची संख्या 50 वर तर महाराष्ट्रात 4 वरून 8 वर लवकरच जाईल हे स्वागतार्ह आहे.

बँकेतील कॅशियरप्रमाणे प्रसंगी आपल्या पगारातून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देत अकाउंटिबिलीटी (उत्तरदायित्व) आणि रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी) घेत येत्या काळात देशाचे अ‍ॅसेट असलेले हवामान शास्त्रज्ञ व अधिकारी दिसून येतील. जगातील अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना भारतातही अंदाज नव्हे तर अचूक माहिती व अलर्ट हे अक्षांश रेखांशनुसार रियल टाईम व कस्टमाईज मिळण्याची व्यवस्था लवकरच कार्यान्वित होईल. धरणांच्या पाण्याचे व्यवस्थापन करीत राज्यातील शेती, शेतकरी व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळणे शक्य आहे. शेती आणि उद्योगधंद्यांचे फार मोठे नुकसान ढगफुटींची आगाऊ अचूक सूचना देत टाळणे शक्य आहे. पाऊस कधी, कोठे किती वाजता पडणार हे कळले आणि याची खात्रीशीर माहिती नागरिकांना वेळेवर दिली गेली तर खबरदारी घेत अनेक लोकांचे जीव, जनावरे आणि शेती आणि इतर मालमत्तेचे नुकसान टाळता येईल. ‘अंदाजां’च्या भरवशावर जीवनाची बाजी लावण्यापेक्षा अचूक हवामान माहितीने नुकसान टाळत जीवन सुखकर बनविणे अत्यंत सहजपणे शक्य आहे. भरीव योगदान करेल यासाठी तातडीने निर्णय घेत अंमलबजावणी होईल हा विश्वास जनहितासाठी बाळगायला हरकत नाही.

फ्रिक्वेन्सी बँड आणि डॉप्लर रडारची उपयुक्तता

विशिष्ट उपयोगानुसार डॉप्लर रडार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डॉप्लर रडार कोणत्या कंप्रतेच्या (फ्रिक्वेन्सी) विद्युतचुंबकीय लहरींचा वापर करून माहिती घेते यानुसार जागतिक पातळीवर मापदंड ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील प्रमाणे डॉप्लर रडार वेगवेगळ्या बँडच्या नावाने ओळखले जातात.

एल बँड (1 ते 2 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = पाऊस, मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहिती देते.

एस बँड (2 ते 4 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = जवळच्या व दूरच्या ढगांची अचूक माहिती देते.

सी बँड (4 ते 8 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = परदेशात खासगी टीव्ही वाहिन्या मुख्यत्वे अतिजवळच्या म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील ढगांच्या अचूक माहितीसाठी वापरतात.

एक्स बँड (8 ते 12 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = ढग तयार होण्यासारखी परीस्थिती आहे का, बनलेला ढग गडद होईल की विखरून जाईल, वारे किती उंचीवर कसे वाहतात हे कळते. हवेतले बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच गारपीट, ढगफुटींची माहिती देते.

केयू बँड (12 ते 18 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = ढगातील एकूण बर्फ कण, पाणी आणि गारांच्या निर्मितीचा वेग व त्यावरून त्या किती नुकसान करू शकतात, याची अगदी प्रत्येक सेंटिमीटरच्या भागातली शंभर टक्के अचूक माहिती मिळते.

के बँड (18 ते 27 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) = हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यास वापर केला जातो कारण पाण्यात ही फ्रिक्वेन्सी प्रभावीपणे शोषली जाते.

केए बँड (27 ते 40 गिगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी) = विमानतळावरील धावपट्टीच्या हालचाली टिपण्यासाठी

–प्रा. किरणकुमार जोहरे