घरफिचर्ससारांशकशाला फॉरवर्ड करताय?

कशाला फॉरवर्ड करताय?

Subscribe

खरंच वेळ आलीये हा प्रश्न विचारण्याची. सोशल मीडियाच्या उदयाने निर्माण झालेले नवे प्रश्न कोणते, असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर देताना अकारण केले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड अग्रस्थानी असेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांना पाठवले जातात. यामध्ये टेक्स्ट आणि मल्टिमीडिया या दोन्हींचा समावेश आहे. टेकक्रंच आणि स्टॅटिस्टाने दिलेली जागतिक आकडेवारी बघितली, तर सध्या व्हॉट्सअ‍ॅपचे 2 अब्ज ग्राहक आहेत. हेच 2 अब्ज ग्राहक दर महिन्याला त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप वापरतातच. यापैकी 34 कोटी ग्राहक एकट्या भारतात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या दृष्टीने भारत मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दररोज जगात 100 अब्ज मेसेज एकमेकांना पाठवले जातात.

ही झाली आकडेवारी. या आकडेवारीचा सरळ अर्थ लावायचा झाल्यास व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वसामान्यांच्या मोबाईलमधील वापरले जाणारे महत्त्वाचे अ‍ॅप असल्याचे स्पष्ट होते. पण भारतात या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अकारण एकमेकांना पाठवले जाणारे मेसेज ही एक नवीच समस्या उभी राहिली आहे. एकावेळी एक मेसेज किती लोकांना पाठवता येऊ शकेल, यावर व्हॉट्सअ‍ॅपने निर्बंध घातले आहेत. सध्या एकावेळी पाच जणांनाच एक मेसेज पाठवता येऊ शकतो. पण एका दिवसात असे किती मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जाऊ शकतात, यावर तूर्ततरी कोणतेही निर्बंध नाही. म्हणजे एका दिवसात तुम्ही कितीही वेळा मेसेज फॉरवर्ड करू शकता. खरंतर एक दिवसात किती वेळा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मेसेज पाठविले जाऊ शकतात, यावरही कंपनीने निर्बंध घालायला हवेत. पण तसे सध्यातरी होण्याची शक्यता नाही. कारण यावरच कंपनीची सगळी गणिते अवलंबून आहेत. इथे त्याच्या खोलात जायला नको.

- Advertisement -

मूळ विषय व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड मेसेजचा. गेल्या काही वर्षांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून न्यूज वेबसाईटच्या लिंक्स एकमेकांना पाठविण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला. विशेषतः डिजिटल माध्यमात कार्यरत असलेल्या काही पत्रकारांकडून याचा अधिक वापर केला जातो. समोरच्या व्यक्तीला ताज्या घडामोडींची माहिती देऊन आपण काहीतरी उदात्त काम करतो आहोत, या पद्धतीने डिजिटल माध्यमात काम करणारे काही जण सतत वेगवेगळ्या ताज्या घडामोडींवर आधारित न्यूज वेबसाईटच्या लिंक्स एकमेकांना पाठवत असतात. समोरच्याची नक्की आवड काय, तो काय वाचतो, त्याला कोणत्या विषयातील ताजी माहिती वाचायला आवडते, कोणते विषय त्याला अजिबात आवडत नाही, तुमच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ त्याला हव्यात की नकोत, याचा काहीही अंदाज न घेता उचल लिंक आणि ढकल पाच ग्रुपवर असा एक नवीनच फंडा सुरू झाला आहे. विशेषतः नव्याने सुरू झालेल्या न्यूज वेबसाईट्स याचा खूप वापर करतात.

आमच्या सोसायटीचा एक ग्रुप आहे. त्यावर फक्त एकाच विषयाला सर्वाधिक एंगेजमेंट मिळते. ती म्हणजे सोसायटीच्या आवारात भटकी कुत्री हवी की नको. सोसायटीत भटकी कुत्री असली तर काय बिघडते म्हणून प्राणीप्रेमी तिथे व्यक्त होतात तर एखादे कुत्रे कोणाला चावले किंवा त्याने पार्किंगमधील गाड्यांचे नुकसान केले तर विरोधी गटातील माणसे ग्रुपवर आवाज उठवतात. आता अशा ग्रुपवर देशात बेरोजगारी कशी वाढली आहे, याबद्दलची माहिती देणारी लिंक टाकून काही उपयोग आहे का? खरंतर अजिबात नाही. फार कोणी त्या लिंकवर क्लिक करणार नाही. पण हे समजून घ्यायला कोणी तयारच नाही. करा बातम्या आणि पाठवा लिंक्स एवढेच काहींना माहितीये.

- Advertisement -

काही तर यापुढचे पाऊल टाकतात. नवीन न्यूज वेबसाईट सुरू केली की लगेचच आपल्या मोबाईलमध्ये जे नंबर्स आहेत. त्यांचे वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार करायचे आणि त्यावर बातम्यांच्या लिंक्स पाठवायला सुरू करायचे. बरं या बातम्या फार काही वेगळ्या नसतात. जे इतर सगळी माध्यमे देत आहेत तेच या वेबसाईट्स देतात. फक्त शीर्षकांमध्ये काय तो वेगळेपणा असतो. बाकी माहिती सगळीकडे आहे तीच. अशा ग्रुप्सची निर्मिती झाल्यावर लगेचच काहीजण त्यातून ‘लेफ्ट’ होतात आणि उर्वरित त्यामध्ये येणार्‍या लिंक्सकडे फारसे लक्षच देत नाही. त्यामुळे या माध्यमातून आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक येण्याचा हेतू साध्य होतच नाही.

काही जण संध्याकाळच्या वेळी बुलेटिन असे लिहून 15-20 बातम्यांच्या लिंक्स एकाच व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून पाठवतात. यापैकी बहुतांश मेसेजमध्ये बातमीचे शीर्षक आणि खाली शॉर्ट युआरएल असे एकाखाली एक असते. अशांना तर आपण कोणत्या माध्यमात काम करतोय, हेच समजलंय की नाही, अशी शंका येते. न्यूज वेबसाईट हे रिअल टाईम (घटना घडते तेव्हाच त्याचे वार्तांकन करणे) माध्यम आहे. सकाळी घडलेल्या घटनेची माहिती संध्याकाळी बुलेटिन म्हणून लोकांना देऊन फारसा उपयोगच नसतो. कारण ज्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे बुलेटिन पाठवले जाते, त्याच व्हॉट्सअ‍ॅपमधून संबंधित ग्राहकांना त्या घटनेचा व्हिडिओसहित इतर सगळी माहिती आधीच समजलेली असते. कारण फॉरवर्ड करणारे हजारो हात अशावेळी सक्रीय झालेले असतात. मग तुम्ही तीच माहिती 10-12 तास उशिराने देऊन काय उपयोग?

पूर्वी संतोषीमातेच्या नावाने पत्र यायची ना, त्यावर लिहिलेले असायचे की अशी पत्रे तुम्ही 25 लोकांना पाठवा आणि लगेच तुमचे नशीब बदलेल. व्हॉटसअ‍ॅपचे अकारण फॉरवर्ड मेसेज बघितले की त्या पत्रांचीच आठवण येते. आपण काय करतोय, कशाला फॉरवर्ड करतोय याचा काहीच विचार केला जात नाही.

मुळात समजून घेतले पाहिजे की तातडीची गरज म्हणून बातम्यांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. खूप सारी माध्यमे आणि सोशल मीडिया यामुळे लोकांना न मागता अनेक गोष्टी मिळत असतात. त्याचाच हा परिणाम आहे. लोकांना फक्त आणि फक्त त्यांच्या जगण्यावर परिणाम करणार्‍या घटना-घडामोडींची माहिती प्राधान्याने हवी असते. थेटपणे त्यांच्या जगण्याशी निगडित नसलेल्या गोष्टींशी त्यांना फारसे काही देणे घेणे नसते. ती माहिती ते वाचतही नाहीत आणि त्यावर व्यक्तही होत नाहीत. अशावेळी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणार्‍या लिंक्समुळे वेबसाईटला ट्रॅफिक मिळण्यासाठी फारसा फायदा होत नाही. सहज म्हणून बघितले तर या माध्यमातून साईटवर येणारे ट्रॅफिक 2 ते 3 टक्के इतकेच राहते. व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे चांगले माध्यम आहे. पण त्याचा कसा वापर करायचा हे समजले पाहिजे. एकमेकांचे बघून नुसत्या लिंक्स पाठवून चालणार नाही. तसे केल्याने तुमचा तो आशय व्हायरल होईल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची भाबडी समजूत आहे. त्यात रमण्यापेक्षा त्यातून बाहेर येणे कधीही चांगले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -