घरफिचर्ससारांशस्कार्फवाली बाई...

स्कार्फवाली बाई…

Subscribe

स्कार्फवाल्या बाईमुळे रविवारची सुट्टी खराब झाली. घरी आलेली स्कार्फवाली बाई कोण? याचा विचार शंतनूच्या डोक्यात गरागरा फिरत होता. काल कोणालाही लिफ्ट दिली नाही तरी गाडीमध्ये बाईचा स्कार्फ आलाच कसा? असं म्हणत शंतनूने गप्प राहून दात घासले आणि चहा-पोहे घेण्यासाठी किचनमध्ये गेला. बायकोने पुन्हा त्याला डिवचले, कोणती बाई होती, लागला का तिचा शोध? भूतकाळातील एखादी मैत्रीण भेटली का? की नवीन कोणी पटली आहे ते तरी सांगून टाका एकदाचे म्हणजे विषय मिटला !

ऑफिसला सुट्टी असल्यामुळे रविवारचा दिवस म्हणजे मस्त आरामशीर! आठवड्याचा शीण काढायचा दिवस असल्यामुळे सकाळचे साडेनऊ वाजले तरी शंतनू महाशय अजूनही अंथरुणातून बाहेर येत नव्हते. शंतनूच्या बायको शीतलनेही नवर्‍याला ‘खूश’ करण्यासाठी अंथरुणावरच गरमागरम पोहे आणि वाफळलेला चहा घेऊन जाण्याचा बेत आखला होता. शीतलने पोहे करण्याची तयारी सुरू केली.

पोहे धुण्यासाठी नळाखाली धरले तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सकाळी सकाळी तिला कोणी तरी पाहुणे आल्याची चाहूल लागली. हॉलमध्ये टीव्हीवरील कार्टून पाहत बसलेल्या तेरा वर्षीय स्वामीला आवाज दिला. अरे स्वामी टीव्हीचा आवाज कमी कर आणि कोण आलंय ते बघ तरी. शीतलने स्वामीला दरवाजा उघडण्यास सांगितले आणि स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, टीव्ही पाहण्यात एवढी गुंग असतात हे पोरं, त्यांना घरामध्ये कोण आले, कोण नाही याचे काही भानच नसते.

- Advertisement -

स्वामीला आईने कोणते तरी भले मोठे काम सांगितले आहे, या आवेशात काहीसा अनिच्छेनं तो उठला. दरवाजा उघडताच त्याच्या समोर तीस-बत्तीस वर्षाची बाई दिसली. स्वामीला वाटले आईची मैत्रिणीचं आली म्हणून तो आईला आवाज देणार तेवढ्यात समोरील बाईने विचारले, पप्पा आहेत का तुझे ? पप्पा तर अजूनही बेडरूममधेच झोपलेले आहेत, या बाईला कसे सांगावे? असा विचार स्वामीच्या डोक्यात आला पण बाईचा आवाज थेट किचनमध्ये शितलाही ऐकू गेला. कोणीतरी बाई आपल्या ‘यांना’ विचारात आहे याची जाणीव तिला झाली आणि तिने किचनमधून आवाज दिला, कोण आहे रे स्वामी ?
आईने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आतच त्या ‘बाई’ने पुन्हा विचारले, आई आहे का तुझी? स्वामीने दारातूनच किचनकडे बघत आईला आवाज दिला, आई गं…. शितलने धुवायला घेतलेले पोहे बाजूला ठेवले, हात पुसत-पुसत हॉलमध्ये आली तर समोर एक सुंदर स्त्री होती.

उंच, भरल्या अंगाची आणि त्या अंगावर छानसी गुलाबी-लाल रंगाची साडी घातलेली, घट्ट हाफ बाह्यांचे गुलाबी ब्लाऊज त्यावर दिसणारा तिचा सुडौल बांधा, कपाळाच्या मध्यभागी नाजुकशी टिकली, गळ्यात मंगळसूत्र, आर्टिफिशियल गोल गोल कानातले, मोकळे केस आणि हसरा चेहरा. म्हणजे शंतनूच्या भाषेत सांगायचे झाले तर तिचे सर्वच ‘प्रमाणबद्ध’ होते. तिचे सुंदर रूप आणि शितलचा घरातील गबाळा अवतार. शितलला अवघडल्यासारखे झाल्यामुळे तिने अंगावर ओढणी घेतली आणि कोण पाहिजे ? असे विचारणार तोच ती बाई म्हणाली, शंतनु चव्हाण येथेच राहतात ना?

- Advertisement -

हो, या ना आत या. एव्हढी सुंदर बया माझ्या नवर्‍याकडे का बरं आली असेल? हा विचार करीत चौकस बुद्धीने तिने पुन्हा विचारले, मी त्यांना बोलवतेच. काही काम आहे का? ते झोपलेले आहेत म्हणून ! नको नको, झोपू द्या! मी शेजारच्या कॉलनीतच राहते. काल ऑफिसमधून घरी येताना शंतनु साहेबांनी मला लिफ्ट दिली. बहुतेक माझा स्कार्फ त्यांच्या गाडीतच राहिला. तुम्ही जरा गाडी चेक करता का ? आणि मला स्कार्फ देऊ शकता का?? .

हो .. हो देते, तुम्ही घरात या ना ! नको .. नको मला बाजरात जायचे आहे, मला फक्त गाडीतून स्कार्फ कडून द्या. मी पुन्हा येईल कधीतरी !!

नवर्‍याच्या लिळा घरापर्यंत येवून पोचल्या होत्या, सुंदर बाईला लिफ्ट देतात काय? थांबा हिला कटवते आणि मग तुमचा बेतच पाहते असा विचार करीत तिने स्वामीला सांगितले, ‘स्वामी बेटा, खाली जा आणि पार्किंगमधल्या गाडीमधून आत्याचा स्कॉर्फ काढून दे .’

आईचा जळकट चेहरा पाहून स्वामी मनातल्या मनात खुद्कन हसला आणि गाडीची चावी घेवून खाली गेला. तावा-तावाणे शीतल किचनमध्ये गेली आणि गॅस बंद केला. गुलाबी थंडीच्या रविवारी, सकाळी-सकाळी नवर्‍याला मस्तपैकी खूश करायचे म्हणून बेडवर नाश्ता घेऊन जावा आणि हळूच अंगावरच पांघरून बाजूला करीत प्रेमाच्या गुदगुदल्या कराव्या अशी योजना होती, पण आता बेडरुममध्ये जाऊन पेकाटात चांगलं लाटणं मारावं असं तिला वाटत होतं.

स्वामीने गाडीतून स्कॉर्फ काढून त्या बाईच्या हातात दिला आणि धापा टाकीत तो वर आला. गाडीची चावी टेबलावर ठेवली आणि पुन्हा कार्टून पहात बसला. स्वामी घरात आल्याची चाहूल लागताच शितल किचनमधून हॉलमध्ये आली. तिने स्वामीला विचारले काय झाले, गाडीत स्कॉर्फ होता का? स्वामीने होकारार्थी मान हलवली.

अशी कशी विसरली ही बया काय माहिती? घाई गडबडीत मी पण तिला नावही विचारले नाही असं बोलत तिने स्वामीला विचारले गाडीमध्ये कुठे सापडले तुला! मागच्या सीटवर? काय, मागच्या सीटवर ?? कार्टून पाहण्यात मग्न असलेल्या स्वामीला आईने विचारलेल्या या प्रश्नाचा अर्थ चांगला कळला म्हणून तो पप्पांच्या बेडरूमकडे पहात म्हणाला, अगं, विसरले असतील ! स्वामीचे उत्तर ऐकून आपला मुलगाही, बापाच्या बाजूने उभा आहे हे तिच्या लक्षात आले आणि ती तावातावाने किचनमध्ये गेली. स्वामी बेडरूममध्ये गेला आणि पप्पांना गदागदा हलवीत उठविले आणि किचनकडे इशारा करीत आई जॅम चिडली आहे असे सांगितले.

अरे तिला काय लागते चिडायला. असं अर्धवट झोपेत असलेल्या शंतनूने म्हणत पुन्हा झोपण्याचे नाटक केले आणि तसाच पडून राहिला. ‘त्या’ बाईचे असे घरी येण्याने शितलला किचनमध्ये काही मूड लागत नव्हता. ती बेडरूममध्ये गेली आणि शंतनूच्या अंगावरची चादर जोरात ओढली आणि म्हणाली, अहो उठा आता की, झोपेमध्ये कोणाला तरी लिफ्ट देत आहात का ?

शीतलचे तिरकस बोलणे शंतनूला काही समजले नाही. तो पुन्हा काही विचारणार तोच शितल किचनमध्ये निघून गेली. शंतनू तिच्या मागेमागे किचनमध्ये आला, काय झाले तुला? मला काय झाले, मला काही झाले नाही! मग आज काय, मोलकरीण येणार नाही असा फोन आला का तुला ?

शीतलने जळजळीत कटाक्ष शंतनूच्या तोंडावर टाकला आणि म्हणाली, काल कोणत्या बाईला लिफ्ट दिली होती, ती आताच येऊन गेली. मागच्या सीटवर तिचा स्कार्फ राहिला होता. ते घेण्यासाठी.

मी आणि बाईला लिफ्ट ? हो .. हो.. स्वामीला विचारा त्यानेच गाडीतून काढून दिला तिला ! अगं काल, मी कोणत्याही बाईला लिफ्ट दिली नाही, त्यामुळे गाडीमध्ये स्कार्फ कुठून येणार ? मग ती बाई कशी आली? कोणती बाई ? काय नाव तिचे ?

मी नाव-बिव काही विचारले नाही, पण तुम्ही मला सांगताना जरा नटून-थटून चांगली राहत जा अगदी तशीच होती ती बाई, तुमच्या स्वप्नातील सटवी ! अगं बाई, मी तुझ्याशिवाय दुसर्‍या कोणत्याही बाईकडे ढुंकूनही पाहत नाही. लिफ्ट देणे तर खूप लांबची गोष्ट आहे. मला माहिती आहे पुरुष जात कशी असते ते, तुम्ही काही बोलू नका. असं! पुरुष जात तशीच असते? मग तूच तर म्हणतेस तुझे वडील प्रभू रामचंद्रांसारखे ! त्याचे काय? शंतनूने हसत हसत शितलला विचारले.

अहो लाज वाटली पाहिजे, आपला तेरा वर्षांचा समजदार मुलगा आहे आणि तुम्हाला घरी भेटायला बायका येतात? तो काय विचार करेल. रागाचा पारा शंभरीवर जात शितलने शंतनूला खडसावले. अगं बाई, काल मी कोणत्याही बाईलाच काय पण पुरुषालाही लिफ्ट दिलेली नाही. कोणती बाई घरी आली. मला झोपेतून उठवायचे होते ना मग झाले असते दूध का दूध आणि पाणी का पाणी.

हो झालं ना ! तिने सांगितले, माझा स्कार्फ राहिला आहे आणि तो सापडला गाडीच्या मागच्या सीटवर! तिचा स्कार्फ तुमच्या गाडीत आला म्हणजे झाले ना दूध का दूध आणि पाणी का पाणी.

शीतलच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे त्याला समजत नव्हते म्हणून त्याने विचारले, ती बाई कशी होती दिसायला. शीतलने जळकट नजरेचा कटाक्ष टाकला आणि बोलली सुंदर बाई असेल तर तुम्ही लिफ्ट देणार ना ? मग मला काय विचारता??

अगं म्हणजे, तिने कोणते कपडे घातले होते, हेअर स्टाईल कशी होती, बुटकी होती की उंच, बोलण्याची लकब कशी होती हे सांग. म्हणजे मला लक्षात येणार कोण बाई घरी आली होती. शीतलने दोन मिनिटं विचार केला. पंधरा वर्षांचा सहवास होता, त्यामुळे तो खोटं बोलत नाही हे तिला कळतं होतं म्हणून तिने सांगितले, एवढे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील नाही, याचा शोध तुम्ही घ्या आणि माझा गैरसमज दूर करा. बायकोचा पारा चांगलाच वर चढलेला होता. आता तिच्याशी अधिक डोके लावले तर सर्व राग घरातील भांड्यांवर निघेल म्हणून शंतनू किचनमधून हॉलकडे जाऊ लागला.

नवरे सगळे असेच असतात, त्यांना घरातील बायको सोडून बाहेरच्याच बायका सुंदर दिसतात, असं म्हणत शीतलने आवाज दिला. चहा-पोहे तयार आहे लवकर दात घासून घ्या? हॉलमध्ये बसलेला स्वामी शंतनूकडे बघून मिश्किल हसला.

स्कार्फवाल्या बाईमुळे रविवारची सुट्टी खराब झाली. घरी आलेली स्कार्फवाली बाई कोण? याचा विचार शंतनूच्या डोक्यात गरागरा फिरत होता. काल कोणालाही लिफ्ट दिली नाही तरी गाडीमध्ये बाईचा स्कार्फ आलाच कसा? असं म्हणत शंतनूने गप्प राहून दात घासले आणि चहा-पोहे घेण्यासाठी किचनमध्ये गेला. बायकोने पुन्हा त्याला डिवचले, कोणती बाई होती, लागला का तिचा शोध? भूतकाळातील एखादी मैत्रीण भेटली का? की नवीन कोणी पटली आहे ते तरी सांगून टाका एकदाचे म्हणजे विषय मिटला !

अगं बाई, आता ही कामे करायला मला वेळ आहे का ? मी काल कोणालाही लिफ्ट दिली नाही, त्यामुळे स्कार्फचा प्रश्न निर्माण होत नाही. खरंच बायका मूर्ख असतात हे मला पटायला लागले आहे. थोडीफार अक्कल वापरा. असं म्हणत शंतनूने चहाचा कप उचला अन हॉलकडे जाऊ लागला.

हो मग पुरुष स्वत:ला काहीतरीच ‘हुशार’ समजत असतात, जणू काही सार्‍या जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे असे! दिवसभरामध्ये बायकोची अक्कल काढल्याशिवाय तुमचे पोटच भरत नाही का हो? रविवारच्या दुधात स्कार्फवाल्या बाईने खडा टाकला होता. बायकोचा गैरसमज कसा दूर करता येईल या विचाराने शंतनू चहा पीत होता तर शीतलच्याही मनात विचार चालू होता, यांना भूतकाळातील एखादी मैत्रीण तर भेटली नाही ना? का नवीनच पटवली? ऑफिसमधील एखाद्या नवीन बाईच्या प्रेमात तर नाही पडला ना माझा नवरा?

शंतनूच्या डोक्यात चक्र फिरत होतं तसं तो चहा फुर्र करून पीत होता.. शीतल सांगते तशी सुंदर आणि ‘प्रमाणबद्ध’ स्त्री तर आपल्या स्वप्नातही आली नाही, मग ती घरी कशी आली .. आपल्या एखाद्या सहकार्‍याने हे सगळं कारस्थान केलं असेल का, ऑफिसच्या मित्रानं मस्करी केली तर नाही ना? असा विचार करत असतानाच त्याची नजर कॅलेंडरवर गेली. शीतलची अचानक ट्यूब पेटली आणि ती धावतच हॉलमध्ये आली.

शीतलने शंतनूकडे बघितले आणि शंतनूने शीतलकडे आणि दोघेही एकदमच ओरडले, आज एप्रिल फुल आहे ! दोघांच्या मध्ये सोफ्यावर बसलेल्या स्वामीने डोक्याला जोरात हात मारला.

–किरण सोनार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -