डाकीण…

Subscribe

21व्या शतकात ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग मानतो. अशा युगात आजही एखादी स्त्री डाकीण असते. ती माणसांना खाते, मारून टाकते, प्राण्यांचा जीव घेते, पीक पेरा कमी करते, गाई म्हशीचे दूध आटवते, अपघात घडवते, आजारी पाडते, जंगली प्राण्यांच्या रूपाने हल्ला करते, असे भ्रम घेऊन जगणारी माणसे आहेत. या अघोरी अंधश्रद्धेतून कितीतरी महिलांना डाकीण ठरवून मारहाण करणे, गावातून हाकलून देणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नग्न करून तिचा छळ करणे आणि प्रसंगी तिचा खून करणे हे सारं आजही घडत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशा सगळ्यांनाच डाकीण प्रश्नाबद्दल प्रशिक्षित करावे लागेल. महाविद्यालयातील युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शिक्षण देत आपल्या गावात, आपल्या पाड्यात कुठल्याही स्त्रीला डाकीण ठरवले जाणार नाही, यासाठी कृतिशील राहण्याची प्रेरणा द्यावी लागेल.

माझा जावई कित्येक दिवस बेपत्ता आहे. त्याला तूच गायब केलंस. कारण तू डाकीण आहेस. सांग माझा जावई कुठेय?अशा किती लोकांना तू खाल्लं आहे? असा आरोप करीत केलारामने तिला विवस्त्र अवस्थेत चटके दिले. बांधून ठेवले. तिचा छळ केला. हा छळ अशा तरुण महिलेचा केला गेला, जी गेली बारा वर्षे गावातच मनोरुग्ण अवस्थेत आपलं जीवन जगत आहे. जिला स्वतःच्याच आयुष्याचा थांगपत्ता नाही. जिला स्वतःच्याच गरजांची शुद्ध नाही. तिला डाकीण ठरवत निर्वस्त्र अवस्थेत छळत, तिचा व्हिडीओ करत, तो बाहेर प्रसारित करण्यात आला. या घटनेने परत डाकीण या प्रश्नाची दाहकता समाजाने अनुभवली. या घटनेची सत्यता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्या नंतर प्रशासनाने हालचाल केली. गुन्हा दाखल केला, परंतु या घटनेने पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्राला परत आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. अनेकांना अस्वस्थ केले. या क्षेत्रात गेले अनेक वर्षे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना हादरून सोडलं.

मध्य प्रदेशाच्या महाराष्ट्राच्या सीमेलगत सातपुड्याच्या डोंगरात वसलेल्या, बडवानी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यातील बायगोर नावाच्या गावाला घडलेली ही घटना आहे. ही काही तेवढी एकच घटना नाही. सातपुड्याच्या डोंगरात पाड्यापाड्यावर, गावागावात डाकीण ठरवून छळ झालेल्या, जीवे ठार मारण्याची धमकी दिलेल्या, शिवीगाळ करून मारहाण केलेल्या, परगावी निघून गेलेल्या, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी परागंदा झालेल्या, सासर सोडून माहेरी राहणार्‍या अनेक महिला अशा दिसून येतील, ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने डाकीण ठरवण्यात आलं आहे.

- Advertisement -

21व्या शतकात ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग मानतो. अशा युगात आजही एखादी स्त्री डाकीण असते. ती माणसांना खाते, मारून टाकते, प्राण्यांचा जीव घेते, पीक पेरा कमी करते, गाई म्हशीचे दूध आटवते, अपघात घडवते, आजारी पाडते, जंगली प्राण्यांच्या रूपाने हल्ला करते, असे भ्रम घेऊन जगणारी माणसे आहेत. या अघोरी अंधश्रद्धेतून कितीतरी महिलांना डाकीण ठरवून मारहाण करणे, गावातून हाकलून देणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नग्न करून तिचा छळ करणे आणि प्रसंगी तिचा खून करणे हे सारं आजही घडत आहे.

यातील ज्या डाकीण पीडित महिलांना शक्य आहे, ज्यांना मदत मिळते, मार्गदर्शन होते, अशा महिला तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यापर्यंत येतात. न्याय मागतात. पण तेथे येऊनही प्रत्येकीला न्याय मिळतोच असं नाही. त्यांची त्या ठिकाणी अनेकदा आर्थिक पिळवणूक केली जाते. त्या अनेकदा न्यायापासून वंचितच राहतात. आणि यापेक्षा अशा कितीतरी महिला आहेत की ज्या न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यांची प्रकरणे गावातच जातपंचायतीच्या सहभागाने मिटवली जातात. अनेकजण वर्षानुवर्षे तसाच छळ सहन करत स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगत राहतात. संविधानाने दिलेला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार असलेल्या असंख्य स्त्रिया आज या छळाचा सामना करताना दिसून येत आहेत.

- Advertisement -

जगात घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असते. हा कार्यकारणभाव मानवी बुद्धीला समजू शकतो. असं वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन शालेय अभ्यासक्रमातच समाविष्ट असतो. तो शाळेच्या मूल्यशिक्षणात असतो. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या जीवन कौशल्यात असतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशाच्या संविधानाने कर्तव्य म्हणून सांगितलेल्या मूल्यात असतो. जे आपल्याला शाळेतूनच मिळायला हवं होतं ते मूल्य आज आपल्यापर्यंत का पोचले नाही? संविधानाने सांगितलेल्या कर्तव्यापासून आपण इतके दूर कसे राहिलो?आणि आजही असंख्य स्त्रिया डाकीण ठरवून छळाला का सामोर्‍या जात आहेत? याचा आपण कधी विचार करू? याचे उत्तर कधी शोधू? कधी स्त्रिया स्वतःचं आयुष्य सन्मानपूर्वक पद्धतीने जगू लागतील? असे सारे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करत नाहीत का?

या प्रश्नाच्या मुळाकडे जाण्याची गरज आहे. डाकीण ठरवणार्‍या या माणसांना निर्बुद्ध म्हणायचे काय? मूर्ख म्हणायचे का? पराकोटीच्या अंधश्रद्धांना कवटाळणारा मध्ययुगीन, रानटी समाज म्हणायचं का? याचं स्पष्ट उत्तर आहे, ‘नाही’. कारण वरचे मूल्य आपण त्यांच्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात समाज म्हणून, सरकार म्हणून, प्रशासन म्हणून अपयशी ठरलो आहोत. ज्या भागात योग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, पुरेशा आरोग्य सुविधा, प्रबोधनाचा विचार, दारिद्य्र निर्मूलन, विकासाच्या संधी पोहोचविण्यात व्यवस्थेला अपयश आलेले आहे. जेथे खासगी कंपन्या आपल्या इंटरनेट सेवा पोहोचवितात, तेथे सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचू शकत नाही. हे किती विसंगत आहे. तरुणांच्या हातात डाटा आहे, पण रोजगार नाही. अशा समाजाकडून आपण अजून कोणती अपेक्षा करावी.

म्हणून, स्त्री जशी नव्या जीवाला जन्म घालण्याची ताकद ठेवते तशीच स्त्री एखाद्याचा जीव घेण्याचीसुद्धा ताकद ठेवणारी असते, असा भ्रम वर्षानुवर्षे जर या समाजात टिकून राहिला असेल तर त्यात नवल असे काय. छोट्या-मोठ्या आजारांवर जर हा समाज मांत्रिकाकडे, बुडवूकडे जात असेल तर यात त्यांचा दोष कसा? म्हणून ही लढाई केवळ अंधश्रद्धा, चुकीच्या कल्पना, भ्रम यांच्या विरोधातली वरवरची नाही, तर ही लढाई व्यापक परिवर्तनाची आहे. आणि व्यापक परिवर्तनासाठी मानवाच्या मूलभूत गरजा भागवणारी सक्षम व्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य याच्या किमान दर्जा पुरवणारी प्रभावी यंत्रणा आपल्याला विकसित करण्याची गरज आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर म्हणाले होते की, ही शतकांची लढाई आहे. ती अधिक निकराने लढावी लागणार आहे. ती केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढून भागणार नाही. तर येथील राजकीय पुढारी, प्रशासन, शिक्षण संस्था, माध्यमे, विविध संस्था, संघटना या सर्वांनी मिळून ही लढावी लागेल. पोलीस प्रशासनाची यात जबाबदारी मोठी आहे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांचा सर्व गावांशी थेट संबंध येतो. जादूटोणाविरोधी कायद्यासारखा एक प्रभावी कायदा डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानाने आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे तयार झालेला आहे, या कायद्याचा धाकदेखील पाड्यापाड्यावर पोहोचवण्याची गरज आहे. प्रशासनाची काही प्रमुख माणसं गावातील पाड्यापाड्यावर आज आहेत. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशा सगळ्यांनाच डाकीण प्रश्नाबद्दल प्रशिक्षित करावे लागेल. महाविद्यालयातील युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शिक्षण देत आपल्या गावात, आपल्या पाड्यात कुठल्याही स्त्रीला डाकीण ठरवले जाणार नाही, यासाठी कृतिशील राहण्याची प्रेरणा द्यावी लागेल.

डाकीण ठरवून स्त्रियांचा छळ करणार्‍या गावाला विविध विकास कामांसाठीअनुदान मिळणार नाही ही अशी रोखठोक भूमिका राजकीय नेत्यांना घ्यावी लागेल. डाकीण ठरवून छळ झालेल्या महिलांना न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक तत्पर आणि संवेदनशील व्हावे लागेल. अशा सर्व मार्गांनी जर सातत्याने पुढील काही वर्षे आपण प्रयत्न करू शकलो तर खरच स्त्रियांना राज्यघटनेने दिलेल्या सन्मानपूर्वक जगण्याच्या अधिकार गवसलेला असेल. त्याही आपले जीवन मुक्तपणे जगू शकतील आणि एक डाकीण प्रथामुक्त समाज आपण सारे निर्माण करू शकू.

–विनायक सावळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -